Monday 24 December 2012

ढिम्म सरकार ...... विषण्ण जनता !


आठ दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत एक भयानक घटना घडली आणि तिचे पडसाद देशाच्या कानाकोपऱ्यात उमटले. दिल्लीतील युवा पिढी रस्त्यावर उतरली. निदर्शने, आंदोलने, घोषणा यांनी दिल्ली दुमदुमली. राजधानीत चर्चासत्रे चालू झाली. आरोपी पकडले गेले. देशभरातून त्या दुर्दैवी मुलीसाठी प्रार्थना सुरु आहेत. डॉक्टर तिला वाचवण्याची शिकस्त करत आहेत.  परंतु गेल्या आठवड्याभरातील वेगवेगळ्या घटनांमधून  सरकार आणि आम जनता यांच्यातील दरी वाढत जाते आहे. आरोपींच्या शिक्षेसंदर्भातील कोणत्याही ठोस निर्णयाप्रत अजून तरी सरकार पोहोचू शकलेली नाही. असे अनेक बलात्कारी, अत्याचारी आजही या देशाच्या पाठीवर राजरोस निर्भीडपणे फिरत आहेत. त्यांच्या कृष्ण-कृत्यांना आळा घालायला कुणी आलेलाच नाही. आणि जन्मभराची शिक्षा भोगत बसल्या आहेत अनेक असहाय तरुणी ! 
मुंबईत निखिल बनकर या तरुणाच्या हल्ल्याचे लक्ष्य झालेली तरुणी हॉस्पिटल मध्ये गंभीर अवस्थेत आहे. दिवसेंदिवस या घटना बेसुमार वाढल्या आहेत. जवळजवळ सगळ्या आई-वडिलांच्या डोक्याला नसता घोर लागला आहे. शाळा-कॉलेज-ऑफिस मध्ये जाणारी आपली पोर घरी सुखरूप येईल ना ही चिंता त्यांना दिवस-रात्र  कुरतडते आहे.  'सिंगल रेप-gang रेप' हे शब्द नको त्या वयात मुला-मुलींच्या ओठांवर येत आहेत. छोट्या-छोट्या मुलींना स्वत:चे रक्षण परपुरुषापासून कसे करायचे याविषयी मार्गदर्शन देण्याची वेळ आली आहे.  यातील काही मुली स्वकीयांपासूनच विटंबिल्या जात आहेत.  घरी-दारी लहान मुलींचे, तरुणींचे, स्त्रियांचे शत्रू निर्माण होत आहेत. मुलींच्या वयाचा जराही मुलाहिजा न ठेवता त्यांना आपल्या कामांधतेचे बळी ठरवण्यासाठी अनेक पुरुष तत्पर आहेत.    
हे सगळे अव्याहत चालू असताना सरकार मात्र अनेक गंभीर प्रश्नांना ठराविक चाकोरीबद्ध उत्तरे देत आणि मूळ प्रश्नाला बगल देत ढिम्म बसले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेतील दिरंगाई आणि ढिलाईमुळेच अपराध्यांचे फावले आहे. रस्त्यात चालणाऱ्या कोणत्याही मुलीवर हात टाकणे, तिची छेड काढणे, तिच्यावर acid फेकणे, चाकूहल्ला करणे त्यांना सहजसाध्य होते आहे. एकीकडे स्त्रीला देवी म्हणायचे आणि दुसरीकडे तिच्या देहाला खेळणे समजायचे अशा प्रकारची मानसिकता समाजात बोकाळली आहे.  सत्तेवर बसलेल्या व्हीआयपींना मुली आहेत पण त्या मुलींचे आयुष्य आणि सर्वसामान्य मुलींचे आयुष्य यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. कडेकोट बंदोबस्तात आपला अभ्यासक्रम आणि करियर करणाऱ्या त्यांच्या मुली आणि कोणत्याही प्रतिकूल परिस्थतीत कुटुंबाला आधार देत नोकरी करणाऱ्या, घर चालवणाऱ्या, एकट्या-दुकट्या राहणाऱ्या सामान्य मुली यात कुठल्याही दृष्टीने तुलना होऊ शकत नाही. रात्रीच्या वेळी बसची वाट बघत आणि परक्यांच्या घाणेरड्या नजरा सहन करत एकटीने उभे राहणे किती व्हीआयपीजच्या मुलींच्या वाट्याला आले आहे? रात्री उशिरा ट्रेनमधून जीव मुठीत धरून प्रवास करणे किती व्हीआयपीजच्या मुलींच्या वाट्याला आले आहे? त्यामुळे आम्हालासुद्धा मुली आहेत हा त्यांचा युक्तिवाद इथे प्रशस्त ठरत नाही. 
दिल्लीत घडलेली घटना हा क्रौयाचा परमोच्चबिंदू आहे पण याआधीही अशा अनेक अत्याचाराच्या, मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. अशा अनेक घटना घडूनही सरकारच्या निर्ढावलेल्या डोळ्यांना काही पाझर फुटत नाही. अपराधी मोकाट सुटतात आणि त्यांच्या वासनेला बळी पडलेल्या एकतर मरून तरी जातात किंवा खालमानेने आपला जीव जगवत राहतात. केईम मध्ये आजही अरुणा शानभाग खितपत पडून, न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगते आहे आणि तिच्यावर अत्याचार करणारा मात्र त्याच्या वाटची जुजबी शिक्षा भोगून त्याचे प्रापंचिक आयुष्य व्यतीत करतो आहे. 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी स्त्रीकडे वाकडा डोळा करून बघणाऱ्या माणसास सज्जड शिक्षा होत असे. अमक्याने स्त्रीवर अत्याचार केला आहे हे सिद्ध झाल्यास त्याचे हात-पाय कलम केले जायचे. अपराध आणखी गंभीर असल्यास त्याला हत्तीच्या पायी दिले जात असे. पेशव्यांच्या काळीही अशा प्रकारच्या कठोर शिक्षांची अंमलबजावणी होत असे. तात्पर्य स्त्रीवर केला जाणारा अत्याचार हा अक्षम्य आणि दंडनीय होता. आजही अनेक आखाती देशांत स्त्रीवर केल्या जाणाऱ्या अत्याचाराला अतिशय कठोर शिक्षा सुनावली जाते. आपल्याकडे अत्याचाराचे गांभीर्य लक्षात न घेता शिक्षा सुनावल्या जातात, ज्या त्या अपराधाच्या तुलनेत अतिशय माफक स्वरूपाच्या असतात. अवघी काही वर्षे तुरुंगवास आणि मग सुटका! आरोप सिद्ध न झाल्यास विनासायास सुटका! आरोपी 'बडे बापका बेटा' असल्यास उलट अपराधाला बळी पडलेल्या तरुणीवरच चारित्र्यहिनतेचे शिंतोडे! 
शिक्षा अशी द्यायला हवी की ती शिक्षा बघून इतरांना जरब बसावयास हवी. शिक्षा अशी हवी की कुणी स्त्रीकडे वाकडी नजर करून बघण्याची हिम्मतच करणार नाही. मग तिच्या अंगाला हात लावण्याची गोष्ट तर दूरच राहिली! जोपर्यंत अशा कठोर शिक्षांची अंमलबजावणी या देशात होणार नाही तोपर्यंत येथील मुली आणि स्त्रिया कधीच सुरक्षित राहणार नाहीत. प्रत्येक पुरुषाने स्त्रीचा आणि तिच्या स्त्रीत्वाचा यथोचित आदर करायलाच हवा. वेडेवाकडे प्रश्न विचारून स्त्रीला अपमानित करणारे पोलिस, कोर्ट यांनीही योग्य मर्यादा पळून त्या स्त्रीबरोबर घडलेल्या घटनेची पडताळणी करायला हवी.  
शेवटी या पृथ्वीतलावरील प्रत्येक पुरुषाचे अस्तित्व स्त्रीमुळेच आहे हे लक्षात घेण्याची नितांत गरज आहे. 

No comments:

Post a Comment