Monday, 30 April 2012

'जग' जीत सिंग .......

१५ एप्रिल २०१२ रोजी 'कलर्स' या वाहिनीवर 'यादों का सफर'  हा कार्यक्रम पहिला आणि आपल्या मृदू,मुलायम,तरल, भावनास्पर्शी आवाजाने लाखो रसिकांच्या मनावर गारुड करणाऱ्या जगजीतसिंगच्या आठवणीत मन हरवून गेले. आशयघन शब्द, त्या शब्दांतून अभिव्यक्त होणारे दु:ख, आणि साधे, सोपे संगीत आणि हे साकारणारा प्रभावी स्वर ही शिदोरी पाठीशी घेऊन  जगजीतने मार्गक्रमणा सुरु केली आणि बघता बघता असंख्य श्रोत्यांच्या मनात जगजीतची गझल अलवार जाऊन बसली. ती ऐकताना मन हळवे होत गेले, सुरांच्या आणि शब्दांच्या रेशमी लड्या त्याच्या गळ्यातून थेट रसिकांच्या हृदयात उतरल्या आणि त्या गझलांनी आपली तिथली बैठक पक्की केली.  
८ फेब्रुवारी १९४१ साली राजस्थान मधील श्री गंगानगर येथे एका सिख कुटुंबात जगमोहनने जन्म घेतला. नंतर त्याचे नामकरण  'जगजीत' असे करण्यात आले आणि खरोखरच जगजीतच्या आवाजाने जगाला गवसणी घातली. पुढे चित्रा सिंग या सुरील्या जोडीदाराच्या साथीनेच जगजीतने आयुष्याची वाट 'सूर' मयी केली. वडिलांनी त्याच्यातील सुप्त गुण हेरून त्याला सिख देवळांत जाऊन तसेच पं. छगनलाल शर्मा आणि उस्ताद जमाल खान या गुरुद्वयींकडे संगीताची दीक्षा घेण्यासाठी प्रवृत्त केले. जगजीतने काही स्टेज आणि रेडीओ परफॉरमन्सेस दिले. १९६५ साली जगजीताने मुंबईच्या दिशेने कूच केले. कलाकाराच्या अंगभूत गुणांना वाव देणारी मुंबापुरी त्याला खुणावत होती. 
सुरवातीस काही जिंगल्समध्ये आणि कोरसमध्ये गाण्याची संधी त्याला मिळाली. या दरम्यान जगजीतने आपले रूप पालटून टाकले. डोक्यावरील सिख पगडी आणि वाढवलेले केस या दोन्ही गोष्टींचा त्याग करून जगजीतने आपली नवी ओळख प्रस्थापित केली. एका गुजराथी चित्रपटात काम मिळवले. १९६७ साली चित्रा दत्त नावाची बंगाली जिंगल सिंगर जगजीतला भेटली. ती तिच्या व्यक्तिगत आयुष्यात अतिशय दु:खी होती. तिला एक मुलगी होती. पतीला रीतसर घटस्फोट देऊन तिने १९६९ साली जगजीतशी लग्न केले. या दाम्पत्याला एक मुलगा झाला. अजूनही संगीताच्या क्षेत्रात हे दोघेही स्ट्रगल करत होते. त्यांना योग्य सूर गवसला नव्हता. विशेषत: गझल गायनाच्या क्षेत्रात पाकिस्तानी सिंगर्सचा वरचष्मा होता, पगडा होता. 
१९७६ सालापर्यंत त्यांचा टेस्टिंग पिरीयड चालूच होता. या सुमारास त्यांचा 'द अनफरगेटेबल्स' हा आल्बम रिलीज झाला आणि अल्पावधीतच जगजीत आणि चित्रा लोकप्रिय झाले. त्यातील 'बात निकलेगी' या गझलेला खूप लोकप्रियता लाभली. आणि अशा तऱ्हेने या दाम्पत्याचा व्यावसायिक यशाच्या दिशेने प्रवास सुरु झाला. त्याचे सोलो आणि joint पर फॉरमन्सेस रसिकमनावर राज्य करू लागले. गझल गायनाच्या क्षेत्रातील एक मानाचा शिरपेच चाहत्यांनी जगजीतला बहाल केला.   
हिंदी चित्रपट सृष्टीशी जगजीतचा संबंध आला आणि अनेक उत्तमोत्तम गझला जगजीतच्या मखमली गळ्यातून रसिकहृदयी विराजमान झाल्या. 'तुमको देखा तो ये खयाल आया', 'कोई ये कैसे बताये के वो तनहा क्यों है', 'झुकी झुकी सी नजर', ' शाम से आंख में नमी सी ही', 'तुम इतना जो मुस्कुरा रहे हो', 'होशवालों को खबर क्या', 'वो कागज की कश्ती वो बारिश का पानी', ललत रागावर आधारित 'कोई पास आया सवेरे सवेरे', होठों से छू लो तुम' या आणि अशा असंख्य गझलांनी रसिकांचे कान तृप्त केले. हिंदी गझलांचे दालन समृद्ध केले आणि पाकिस्तानी गझलकारांचा रसिकमनावरील पगडा सैल केला. 
मुलगा विवेक याच्या अपघाती मृत्यूने आणि चित्राची मुलगी मोनिका हिच्या आत्मघाती मृत्यूने हे दाम्पत्य दु:खात होरपळून निघाले. चित्राने गाण्याला पूर्णविराम दिला तथापि जगजीत गात राहिला. शब्दांतून, सुरांतून याच्या मनातील व्यथा मूर्त करत राहिला. हृदयातील दु:खाच्या हारात गझलेला गुंफत राहिला. 
२००३ साली 'पद्म भूषण' पुरस्काराने जगजीतला गौरविण्यात आले. 
जगजीतच्या गझलगायनात कधीही स्वर-चमत्कृती नसायची.  प्रत्येक शब्दाला व्हेरिएशन घेऊन बघा मी कसा गातो ते असा आवही नसायचा. सरळ, साधी, ऐकताना सोपी वाटणारी चाल, सहज गुणगुणता येईल असे वाटणारी गझल जगजीत गायचा. सुरांशी अनावश्यक खेळ खेळत गझलेचा खरा लुथ्फ रसिकांपासून हिरावून घेण्याचे पाप जगजीतने केले नाही. जगजीतची गझल ताजी, टवटवीत, सुगंधी राहिली. मोगऱ्याच्या फुलांसारखी मनात दरवळत राहिली. हा शब्द-सुरांचा सडा श्रोत्यांच्या हृदयात आनंदाची पखरण अव्याहतपणे करत राहिला.  
'यादों का सफर' या कार्यक्रमान्तर्गत अनेक ख्यातकिर्त गायकांनी जगजितच्या गज़लेला, त्याच्या जीवनप्रवासाला सलाम केला. शफकत अमानत अली या पाकिस्तानी गायकाने 'शाम से आँख में नमी सी है' ही ग़ज़ल प्रभावीपणे साकारली, सोनू निगमने 'होशवालों को खबर क्या' ही ग़ज़ल तन्मयतेने म्हटली, 'प्यार का पहला ख़त लिखने में वक्त तो लगता है'  ही रिचा शर्मा हिने गायलेली ग़ज़ल दखलपात्र  होती. मात्र उस्ताद रशीद खान यांनी 'याद पिया की आये' ही ठुमरी ज्या नजाकतीने गायिली त्याला तोड नव्हती.  
जगजीत सिंग आज आपल्यात नाही हे जरी सत्य असले तरी त्याच्या मऊसुत -मुलायम आवाजाची मोहिनी रसिकांवर अनंत काळापर्यंत राहील.  

No comments:

Post a Comment