Tuesday, 3 April 2012

गोळ्या गिळण्याचा 'फोबिया'

आमच्या घरी माझ्या लहानपणी कोणालाही काही दुखले-खुपले की होमिओपथीच्या पांढऱ्या साबुदाण्यासारख्या दिसणाऱ्या गोळ्यांनी उपचार व्हायचा. यापेक्षा मोठ्या गोळ्या ज्या चघळायच्या असतात त्या फक्त लिमलेटच्या अशी आपली आमची भाबडी समजूत होती. क्वचित प्रसंगी नाईलाजास्तव इंजेक्शन घ्यायला लागायचे एवढीच आमची या गोळ्या-इंजेक्शनची सलगी होती. अगदी शक्तीपूरके म्हणून ज्या 'B -complex'  च्या गोळ्या दिल्या जातात त्यांची आणि आमची तोंडओळखही नव्हती. 
जसजशी मी मोठी व्हायला लागले तसतशा प्रकृतीच्या काही किरकोळ तक्रारींसाठी डॉक्टरांची पायरी चढायला लागली. मला वाताचा बराच त्रास व्हायचा. एकदा डॉक्टरांनी एक गोळी घ्यायला दिली. तशी आकाराने गोल आणि मध्यम होती. ती माझ्याच्याने गिळता गिळली जात नव्हती. गोळी गिळण्याच्या निमित्ताने भरपूर पाणी पोटात गेले पण गोळी मात्र जिभेवरच ठिय्या देऊन होती. जीव नुसता कासावीस झाला. मग मी ती गोळी घेतलीच नाही. अशा प्रकारे गोळी गिळायचा पहिलावहिला अनुभव एक प्रकारची भीती मनात निर्माण करून गेला. 
नंतर काही वेळेस मग मी गोळ्या कुटून त्या मधातून घ्यायची क्लुप्ती शोधून काढली. परंतु काही गोळ्या इतक्या कडवट असायच्या की त्या मधातूनही घेताना ब्रम्हांड आठवायचे. काही वेळेस त्या पाण्यात विरघळून ते महाभयंकर पाणी घशात ओतून टाकायचे महत्कर्मही मी केले. त्यानंतर भरपूर साखर खाल्ली पण काही काही गोळ्या इतक्या जहाल असतात की त्यांची नुसती चव जिभेला लागली की नाकीनऊ येतात. विशेषत: पेनकिलर ब्रुफेन. काही गोळ्यांचे आकार बघून अजूनही मी भयभीत होते. जी माणसे एक नाही तर एका वेळेस दोन-तीन गोळ्या सहजतेने गिळतात त्यांचा मला मनोमन हेवा वाटतो. माझ्या मुलीही सहज गोळ्या गिळतात. आमच्या लहानपणी गोळ्या गिळायची आम्हा भावंडांपैकी कोणावर पाळी आलीच तर तो एक सोहळा असायचा. एका हातात पाण्याचा ग्लास, दुसऱ्या हातात गोळी ( तिच्या आकारमानाप्रमाणे होणारा मानसिक त्रास वेगळा). सभोवताली घरची माणसे. गोळी गिळणाऱ्याएवढीच चिंतीत. आता गोळीचा घशाच्या दिशेने प्रवास सुरु. पाण्याचा घोट घशात, आता त्यात गोळी अलगदपणे सोडणे. घरातल्यांच्या नाना सूचना. त्यांचे भयमिश्रित चेहरे. गोळी आत जाते की नाही या कल्पनेने आपण कासावीस आणि  गोळी मध्येच अडकली तर या कल्पनेने घरातले! आपला घसा केवढा, गोळी केवढी तरीपण त्या गोळीचे इच्छित ठिकाणी विसर्जन होईपर्यंत सगळेच घामाघूम! 
वास्तविक पाहता आपण गोळी गिळण्याच्या कल्पनेनेच अर्धमेले झालेलो असतो. गोळी गिळणे ही प्रक्रिया वाटते तितकी कठीण नाही हे माझ्या अनुभवास आले आहे. आता सरावाने मी गोळी बऱ्यापैकी गिळू लागले आहे. अजूनही साशंकता असतेच पण पूर्वीच्या प्रमाणात थोडीशीच! गोळी मोठी म्हणून ती अर्धी केली तर घशाला टोचते म्हणून जशी आहे तशीच ती गिळणे सोयीस्कर वाटते. 
माझी एक आत्या गोळी या प्रकाराला प्रचंड घाबरते. ती इंजेक्शन प्रिफर करते. पण असे नेहमीच शक्य नसते. त्यामुळे काही शारीरिक व्याधींसाठी गोळ्या घेणे हे क्रमप्राप्त असते. ती आधी गोळीकडे टक लावून बघते. अंदाज घेते. ती जिभेवर सरकवण्याआधी देवाचे नाव घेते. गोळी आणि पाणी यांचा संगम घशाच्या टोकापर्यंत जातो. पाणी पोटात जाते पण गोळी मात्र जिभेची साथ काही सोडत नाही. चेहऱ्यावर भीतीने घाम साचतो. पाण्याचा अजून एक पेला रिचवला जातो पण ती मेली हट्टी गोळी काही जिभेवरून हलण्याचे नाव घेत नाही. एव्हाना ती जिभेवर विरघळू लागते. तिची चव सहन करण्यापलीकडची असते. मग ती ओली गोळी जिभेवरून खाली उतरवली जाते. एकतर पाण्यात अथवा मधात तिचे क्रियाकर्म झाल्यावर मगच तिची पोटात रवानगी होते. तिचा एवढा वेळ त्या गोळी नामक शस्त्राशी झुंजण्यात गेलेला असतो. मग येणाऱ्या-जाणाऱ्याला  त्या गोळीला अखेर सद्गती कशी मिळाली याची इत्यंभूत माहिती दिल्याशिवाय तिला चैन पडत नाही. 
 प्रत्येकासाठी गोळी गिळणे सोपे की कठीण याचे समीकरण निराळे असते. काहींना गोळ्या लीलया गिळता येतात तर काहींसाठी गोळ्या गिळणे हे एक आव्हान असते. वास्तविक पाहता घशाचा आकार पाहता गोळी आत जाणे हे काही खासच कठीण नसते पण भीतीचा, शंकेचा पगडा मनावर असल्याने ती प्रक्रिया अमलात आणणे हे महाकर्मकठीण वाटते. गोळ्या गिळण्याचे  प्रशिक्षण योग्य वेळेस जर मिळाले तर तो एक भयाने पछाडलेला प्रवास न होता ती एक सहजकृती होईल. 

No comments:

Post a Comment