Wednesday, 11 April 2012

काही असेही अनुभव ( संगीत क्लासच्या निमित्ताने...)

काही महिन्यांपूर्वी माझ्याकडे गाणे शिकायला एक मुलगी येत असे. वयाने तशी लहान पण चुणचुणीत. तिच्या वाढदिवसानिमित्त मी तिला एक छोटीशी भेट देऊ केली. त्यावेळी तिची आईसुद्धा तिच्याबरोबरच होती. मी वयाने आणि अनुभवाने मोठी आणि गुरु असूनही ना माझ्या ती पाया पडली ना मी गिफ्ट दिल्याबद्दल तिने मला धन्यवाद दिले. शिष्टाचाराची संथा पालकांकडून मुलांना योग्य त्या वयात मिळणे खूप आवश्यक असते. वास्तविक पाहता तिचे वय लहान असे जरी मानले तरी तिला तिच्या आईने तसे सांगणे गरजेचे होते. तिच्या आईलाही या गोष्टीची जाणीव नसावी याबद्दल मला आश्चर्य वाटले आणि वाईटही वाटले. वडीलधारयांच्या पाया पडणे त्याचप्रमाणे कुणी आपल्याला प्रेमाने काही भेट देऊ केली तर त्या व्यक्तीचे आभार मानणे हे आउटडेटेड होत चालले आहे काय असा मला प्रश्न पडला. बहुतेक अमुक एक प्रसंगात आपण नेमके कसे वागावे आणि शिष्टाचार कसा पाळावा याचे क्लासेस सुरु होण्याची वाट पालक बघत आहेत की काय असेही वाटू लागले. 
माझ्याकडे सर्व वयोगटातील मुली आणि बायका गाणे शिकण्यासाठी येतात. खास 'वन टू वन' अशी शिकवणीही मी घेत असल्याने एक तरुण मुलगी या शिकवणीसाठी माझ्याकडे येऊ लागली. माझा एक तास अशा वेळेस मी पूर्णपणे त्या विशिष्ट क्लाससाठी राखून ठेवलेला असतो. मी स्वत: वेळेचे काटेकोर पालन करते आणि तशी अपेक्षा माझ्या विद्यार्थ्यांकडूनही  करते. अनेक वेळेस मी या मुलीसाठी तिष्ठत असायचे. अर्धा तास असाच निघून जायचा. काही फोन नाही, मेसेज नाही. मला राग यायचा पण आज ना उद्या या मुलीला आपली चूक कळेल असे मला वाटत होते. माझा अमूल्य वेळ फुकट गेल्याचे मला मनोमन दु:ख व्हायचे. मी तिला याबद्दल विचारल्यानंतरही दिलगिरीची साधी भाषाही नाही. सबबी मात्र तोंडावर असायच्या. काही महिने मी तिची ही बेजबाबदार वागणूक सहन केली आणि नंतर तिला सरळ डच्चू दिला. 
एक मध्यमवयीन बाई माझ्याकडे गाणे शिकायला यायच्या. स्वत: दाक्षिणात्य असूनही मराठी चांगले बोलायच्या. दर गुरुपौर्णिमेला माझ्या विद्यार्थ्यांच्या गाण्याचा कार्यक्रम मी आयोजित करते. वर्षभर गुरुकडून जे काही शिकले गेलेले असते त्यातील थोडे स्वतंत्रपणे आणि आत्मविश्वासपूर्ण श्रोत्यांसमोर सादर करता यायला हवे हा त्यामागील उद्देश असतो. जे क्लासमध्ये अनेक वर्षे शिकत आहेत त्यांच्याकडून संख्येने थोडी जास्त आणि अवघड गाणी मी म्हणून घेते. या बाई नव्यानेच रुजू झाल्या होत्या त्यामुळे त्यांना मी फक्त एक गाणे म्हणावयास सांगितले. त्या जरा नाराज दिसल्या. इतर विद्यार्थ्यांच्या गाण्यांच्या संख्येशी तुलना करू लागल्या. माझे सगळेच विद्यार्थी भरपूर मेहनत घेतात. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या आधी जवळजवळ दोन महिने आमच्या तालमी सुरु असतात. शिवाय कार्यक्रमाच्या एक-दोन दिवस अगोदर रंगीत तालीमही असते. रंगीत तालमीच्या वेळेस मी त्या बाईंना दोन गाणी म्हणायची मुभा दिली. हेतू हा की त्यातील जे गाणे अधिक चांगले होईल ते त्यांनी व्यासपीठावर सादर करावे. त्या बाईंनी दोन्ही गाणी यथातथाच म्हटली. कार्यक्रमाच्या दिवशी हॉलमध्ये मी सगळ्या विद्यार्थ्यांच्या गाण्यांच्या याद्या डोळ्यांखालून घालत होते. तेवढ्यात या बाई माझ्याजवळ येऊन मला म्हणाल्या, अमकी जर दोन गाणी म्हणू शकते तर मी का नाही? मी त्यांना नीट सांगितले की हे बघा ती अमकी जी आहे ना ती माझ्याकडे गेली तीन वर्षे शिकत आहे. तिचा शास्त्रीय संगीताचा पाया पक्का आहे. तुम्ही आत्ताच आला आहात. शिवाय तुमचे हे गाणे बरे होते आहे तेव्हा तेच तुम्ही सादर करणे माझ्या दृष्टीने योग्य आहे. त्या बाईंना माझे म्हणणे पटता पटेना. त्या माझ्याशी हॉलमध्ये हुज्जत घालू लागल्या. माझ्या इतर विद्यार्थिनीसुद्धा अचंबित नजरेने त्यांच्याकडे पाहत होत्या. शेवटी गुरु या नात्याने मला त्यांना थोडी समाज द्यावी लागली तेव्हा कुठे ती त्यांची दोन गाणी म्हणायची खुमखुमी शमली. 
एक बाई माझ्याकडे गाणे व पेटी अशा दोन्ही गोष्टी शिकायला यायच्या. साधारणपणे तासभर क्लास होतो. सुरवातीस अलंकार, रागाची सरगम, बंदिश व नंतर त्यावर आधारित एखादे गाणे असे सामान्यत: गाण्याच्या शिकवणीचे स्वरूप असते. काही वेळेस तासाच्या आधीच जे काही नियोजित शिकवणे असते ते संपून जाते. अगदी पाच-एक मिनिटे उरलेली असतात. पण या बाई मात्र शिकवणी संपली तरी ढिम्म हलायच्या नाहीत. मी आवरते घ्यायला लागले की म्हणायच्या अहो अजून पाच मिनिटे आहेत की ! ती पाच मिनिटे वसूल केल्याशिवाय त्यांचे समाधान होत नसे. एकदा माझ्या घरी रंगकाम चालू होते आणि नेमकी मी त्यांना निरोप द्यायला विसरले. माझ्याकडून क्लास जर रहित झाला तर तो क्लास मी नंतरच्या आठवड्यात भरून देते. या बाई आल्या. घरात जिकडेतिकडे पसारा होता. रंगारी आजूबाजूस वावरत होते. माझाही तसा अवतारच होता. या सगळ्या गोष्टी नजरेआड करून या बाई आत गेल्या. रंगकाम हॉलचे चालू होते त्यामुळे आम्ही बेडरूममध्ये वावरत होतो. मी त्यांना म्हटले की पुढच्या आठवड्यात मी तुमचा हा क्लास घेते. त्या म्हणाल्या कशाला? आणि त्यांनी पेटी सरळ स्वत:जवळ ओढली. मी मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. बरोब्बर तासभर त्यांनी  पेटी वाजवली आणि मगच त्या निघून गेल्या. 
माझ्याकडे वयाने तशा मोठ्या असलेल्या बाई यायच्या. सुरांशी त्यांचं तसं बरं होतं पण तालाशी जमवून घेताना त्यांना नाकीनऊ येत असत . धृवपद संपल्यानंतर कडवे नेमके कसे उचलायचे, गाण्यातील शब्द तालाचे भान ठेवत कसे गायचे अशा बऱ्याच तांत्रिक बाबी पुन्हा पुन्हा सांगूनही त्यांच्या चुका होत राहायच्या. प्रत्येक गाण्याचा एक निश्चित साचा असतो. त्या ठराविक पद्धतीनेच ते गाणे म्हणायचे असते. एखादी ओळ एकदा म्हणायची की दोनदा हे इतके वेळी गाण्याचा रियाझ होऊनही त्यांच्या पचनी पडायचे नाही. इतर तालमींच्या वेळेस माझी मोठी मुलगी तबल्यावर साथ करायची. ती सवयीची असल्याने त्या बऱ्यापैकी न बिचकता गायच्या.  कार्यक्रमाच्या वेळेस जो तबलजी आम्ही बोलावतो त्या तबलजी बरोबर आधी रंगीत तालीम होते. त्यांचे गाणे सारखे लयीला कमी-जास्त व्हायचे. एकदा म्हणायची ओळ त्या दोनदा गायच्या आणि दोनदा म्हणायची ओळ हमखास एकदा!  कार्यक्रमाला श्रोते बघितले की त्या गडबडून जायच्या. त्यांचं गाणं लय-तालाची बंधने झुगारून देऊन एकदम मुक्त व्हायचं. तबलजी जेरीस यायचा. त्या गाण्याला बसल्या की मी मनातून नेहमी तबलजीला 'ऑल द बेस्ट' म्हणून टाकत असे. पण मलाही या 'ऑल द बेस्ट'ची अशावेळी नितांत गरज वाटायची कारण त्यांच्या गाण्याचा मागोवा घेता घेता माझाही हात पेटीवरून अनेकवेळा सटपटायचा.    
एकदा एक गुजराथी बाई माझ्याकडे क्लासच्या चौकशीसाठी आल्या. मेरे बेटे के लिये आपका ट्युशन रखना है. जुजबी चौकशी करून नंतर त्यांनी विचारले, कितना पैसा? मी माझी फी त्यांना सांगितली. ये तो जादा लग रहा है, कम नही हो सकता क्या? मी त्यांना शांतपणे सांगितले की हा संगीताचा क्लास आहे, हे भाजीमार्केट नाही भावावरून घासाघीस करायला. तुम्हाला जिथली फी परवडेल तिथे तुम्ही जा. माझ्याकडे तुमच्या मुलाला पाठवण्याचे कष्ट बिलकुल करू नका.  
एक अंदाजे बारा-चौदा वर्षांचा मुलगा माझ्याकडे पेटी शिकण्यासाठी आला. त्याच्या आई-वडिलांनी सांगितले की हा वर्ष-दीड वर्षे पेटी शिकतो आहे. मी त्याला जे येते ते वाजवून दाखवायला सांगितले. त्याच्या वहीत एकूण पाच ते सहा राग लिहिले होते. त्यातील एक रागही त्याला धड वाजवता आला नाही. याचे मला कळलेले कारण असे होते की त्या क्लासमध्ये चार-पाच पेट्यांवर एकाच वेळी चार-पाच मुले वेगवेगळे राग वाजवीत. शेजारी साधारण तेवढ्याच तबल्यांवर तेवढ्याच मुलांचा वेगवेगळ्या तालांचा सराव. त्यामुळे या सगळ्या गोंगाटात आपण नक्की काय वाजवीत आहोत याचे ज्ञान कुणालाच व्हायचे नाही. अशा प्रकारे ही संगीतसाधना चालायची. बऱ्याचदा मुलांचे आई-वडील याविषयी अनभिज्ञ असतात म्हणा किंवा त्यांना वाटते की अशाच पद्धतीने सगळीकडे पेटी शिकवली जात असावी. त्या मुलाचे फक्त नुकसान झाले नव्हते तर त्याची आणि त्याच्या पालकांची फसवणूकही झाली होती त्याबद्दल मला अतिशय वाईट वाटले. 
१९९६ ला 'स्वरतृष्णा'ची स्थापना केल्यापासून आजपर्यंत मला अनेक चांगले-वाईट अनुभव आले.  त्यातील काही अनुभव मी या ब्लॉगद्वारे शेअर करते आहे. या निमित्ताने का होईना निरनिराळ्या मानवी वृत्ती मला अभ्यासता आल्या किंवा त्यांना समजून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागले. अनेकांनी त्यांची वैयक्तिक सुखदु:खेही माझ्याबरोबर शेअर केली. काहींनी आनंद दिला तर काहींनी मनस्ताप! मला जेवढे जमले तेवढे दिले आणि द्यायचा प्रयत्न करत राहणार आहे. दुसऱ्याला देता येण्यासाठी ओंजळ मात्र कायम भरलेलीच राहावी एवढीच त्या शक्तीकडे माझी मनापासून पार्थना! 



1 comment:

  1. This post made me nostalgic, teacher. I do remember some of the incidents stated above with the people associated with them ;-)
    miss those days..

    ReplyDelete