Thursday, 19 April 2012

उन्हाळी वरदान

प्रत्येक सिझनला एकेक आजार नेमून दिलेले आहेत. थंडी-पावसाळ्याकडील आजार हे साधारणत: ताप-सर्दी-खोकल्याशी संबंधित असतात. उन्हाळ्यातील आजार हे उष्णतेच्या विकारांशी! ठुसठूसणारी गळवे ही उन्हाळ्याने दिलेली एक मौलिक व्याधी आहे. ही वेदनादायी गळवे शरीरावर कुठेही बिनदिक्कत त्यांचा हक्क सांगू शकतात. त्यांच्यावर औषधी लेप लावा,त्यांना शेका, त्यांना गोंजारा शरीराला अथक वेदना देण्याचा त्यांचा परिपाठ सुरूच राहतो, परिपाठाच्या काढ्यालाही न जुमानता!
सध्या अशा एका गळवाने माझ्या नाकात त्याचे बस्तान मांडले आहे. सुरवातीस नाकात थोडे दुखू लागल्यावर मला वाटले की माळीण आली आहे. मग मी हुंगायला म्हणून गजरा आणला. खोल श्वास घेत गजरा हुंगला खरा पण त्याने नाकामध्ये दुखायचे काही थांबले नाही. त्यानंतर अधिकच दुखू लागले आणि मी नॉस्टेल्जीक झाले. मला माझे लहानपण आठवले. माझी वार्षिक परीक्षा जवळ यायची आणि न चुकता हे गळू माझा कान, माझे नाक, माझा डोळा किंवा माझी पाठ शोधायचे. डोळ्यावर गळू मिरवत मी अनेकवेळा परीक्षा दिलेल्या आहेत. केस सारखे करताना म्हणा किंवा कोणाचा सहज थोडा जरी धक्का लागला की ही गळू नावाची व्यथा आपले अस्तित्व भयंकररित्या जाणवून द्यायची. मग कोणी म्हणतंय म्हणून चंदनाचा लेप लाव, कैलास जीवन लाव, बर्फ फिरव, कधी कोणी सुचवलं म्हणून पापड (मिरीचा) ओला करून त्याचे पोटीस लाव असे नाना प्रकार करूनही गळू 'जैसे थे' च असायचे. अखेर गळू माझा नाद सोडत नव्हते म्हणून मग मीच त्याचा नाद सोडून देऊ लागले. त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागले. ठुसठूसणाऱ्या वेदनांचे स्वागत करू लागले. 
या गळू नामक व्याधीने शरीरावरील आपली जागा एकदा पक्की केली की मग त्या दृष्टीने त्याच्या हालचाली सुरु होतात. ती जागा लालसर होते. तिथे दुखू लागते. हळूहळू त्या व्याधीला एक निश्चित आकार येतो. छोट्या डोंगराचा! वर त्याचे तोंड असते. लालसर-पिवळ्या रंगाचे, त्यावर एक ब्युटी-स्पॉट सारखा काळ्या रंगाचा ठिपका उगवतो. आजूबाजूचा भाग हाताला गरम लागतो आणि थोडा सूजट दिसतो. त्या व्याधीचे हे रूप आपण येत-जाता न्याहाळत बसतो. चेहऱ्यावर गळू दिसले की जो तो हे काय आलंय गं  हे त्या बिरबलाच्या गोष्टीतील आंधळ्या डोळसांसारखे प्रश्न विचारत राहतो. गळू ठणकू लागते आणि आपल्या शरीराला ठणकणे ही एकच गोष्ट इमाने-इतबारे करता येते असे आपल्याला वाटते. उठता-बसता आई गं, आ अशी बाराखडी सुरु होते. लोक निरनिराळे उपाय सुचवत राहतात आणि आपण ते श्रद्धेने करत राहतो. आपल्या आधीच ठणकणारया गळवाला कुणाचा चुकूनमाकून हात लागायला नको म्हणून आपण त्याला विलक्षण जपत असतो. ते दिसामाशी तट्ट फुगत राहते आणि आपण असहाय होऊन जातो. 
अखेरीस त्याला हवे तेव्हाच ते आपली पाठ सोडते आणि इतके दिवस आपली झालेली वेदना परकी होते. आपण गळूमुक्त होतो. आपण साडी-खरेदी एन्जॉय करू शकतो. आपण टी.व्ही वरील सास्वा-सुनांची भांडणे आता चवीने बघू शकतो. आपण मैत्रिणींबरोबर आनंदाने गॉसिप करू शकतो. आपण भाजी विक्रेता,फळवाला,रिक्षावाला, बस कंडक्टर, वाणी, मोची, दूधवाला,धोबी अशा लोकांशी हिरीरीने वादू शकतो. आपल्या या आनंदावर इतके दिवस गदा आलेली असते. कारण कुठेही गेलं तरी गळू ही एक वेदना आपल्याला व्यापून दशांगुळे उरलेली असते. त्यामुळे आपल्या स्वाभाविक उर्मी दबून गेलेल्या असतात. आपला चेहरा वस्तू-संग्रहालयातील एक नमुना झालेला असतो.  
या दरम्यान बाह्योपचार तर सुरु असतातच शिवाय आपण सतत दुध-दही-ताक रिचवत असतो. फळांचे रस पीत असतो. सब्जा -तुळशीचे बी यांना प्राधान्य देत असतो. बर्फाने शेकत असतो. गारेगार गोष्टींचा भडीमार करत असतो. ठणकणारे गळू कालांतराने  भुईसपाट, चारी मुंड्या चीत होते आणि आपल्याला विजयोन्माद होतो. त्याला कसे पिटाळून लावले याच्या सुरस कहाण्या आपण इतरांना सांगण्यात गर्क असतो आणि एखाद्या बेसावध क्षणी मागील दराने सर्दी आल्याची वर्दी देते. आपले नाक गळक्या पाईपलाईन सारखे वाहू लागते. आता दुध -हळद आणि अशा अन्य कोणत्या उपायांनी सर्दीला पिटाळून लावायचे या विवंचनेत आपण हरवून जातो. 

No comments:

Post a Comment