मानवी मन हे नि:संशय अथांग आहे. या मनातील अनेक कप्प्यांत वर्षानुवर्षांच्या चांगल्या -वाईट आठवणी घर करून असतात. या मनाचा थांग घेण्याचे ठरवावे तर एखाद्या गूढ, निबिड अरण्यात शिरल्यासारखे वाटते. एखाद्या झाडामागे कोणते सावज दडून बसले आहे आणि पुढच्याच क्षणी ते आपल्यावर झेपावेल या भीतीने एखाद्याचा जो थरकाप होईल तसा मनाचा ठाव घेताना होतो. या मनाच्या गूढ व्यवहारातूनच अनेक गूढकथा जन्म घेतात.
आपल्या सगळ्यांच्याच अंतर्मनाची नाळ त्या वैश्विक शक्तीशी जोडली गेलेली असते. बाह्यमनाने अंतर्मनात ढकललेल्या विचारांची तीव्रता जेवढी जास्त तेवढीच जास्त बाहेरून येणाऱ्या अनुभवांची प्रचीती असते. अनेकवेळा अकारण मन आनंदाने उचंबळून येतं तर काही वेळा अकारण उदास होतं. आपण अकारण एवढ्यासाठी म्हणतो कारण आपल्याला या विशिष्ट भावनांच्या उद्दिपनाचा नेमका हेतू माहित नसतो.
एका स्वीडीश महिलेला सकाळच्या फ्लाईटने बाहेरगावी जायचे होते. ती विमानतळावर आली. तिथे बसल्यानंतर तिला एकदम जाणवले की आपण ताबडतोब घरी जाऊया. ती सरळ घरी आली. तिच्या नवऱ्याने तिला परत येण्यामागचे कारणही विचारले पण ती एवढेच म्हणाली की मला बरे वाटत नाही. मी जरा विश्रांती घेते. ती पडून काही वेळ झाला तेवढ्यातच तिचा नवरा त्याच्या खोलीतून धावत धावत आला आणि तिला एवढेच म्हणाला की टी.व्ही.ऑन कर. टी.व्हीच्या जवळजवळ सगळ्या वाहिन्यांवर त्या विमानाच्या अपघाताची बातमी झळकत होती. टेक ऑफ केल्या केल्या विमानाच्या इंजिनात बिघाड होऊन, आग लागून ते कोसळले होते आणि विमानातील जवळजवळ सगळे प्रवासी मृत्युमुखी पडले होते. ती सुन्न होऊन बातमी पाहत व ऐकत होती. कोणती प्रेरणा , कोणती उर्मी तिला या अपघातातून वाचवण्यासाठी परत घरी घेऊन आली? आतून उदास करणारी भावना, एक अनामिक हुरहूर या प्रवासास जाण्यापासून तिला परावृत्त करू पाहत होती का? या प्रश्नांची उकल होणे जरी संभव नसले तरी धोक्याची पूर्वसूचना तिला मिळाली होती असे म्हणता येईल.
या उलट एक घटना. एका माणसाला कामासाठी तातडीने युरोपला जायचे होते. सगळ्या फ्लाईट्स फुल होत्या. तिकीट मिळणे जवळजवळ दुरापास्त होते. तो विलक्षण बेचैन झाला होता. जणू त्याच्या जीवनमरणाचा प्रश्न असल्यागत तो तिकीट मिळवण्यासाठी जंग जंग पछाडत होता. अखेर आयत्या वेळेस एका माणसाने रद्द केलेले तिकीट त्याला उपलब्ध झाले आणि त्याने सुटकेचा निश्वास टाकला. तो आनंदाने विमानात चढला आणि युरोपला जाता जाता मध्यावर ते विमान डोंगरावर कोसळले. त्या भीषण अपघातात सगळे प्रवासी ठार झाले. इथे त्याला मृत्युपाशात ढकलण्यासाठी जणू अंतर्मनातील सर्व यंत्रणा कार्यरत झाल्या होत्या. तिकीट मिळत नाही म्हणून त्याचे ते अस्वस्थ होणे, त्याच्या जीवाची आतून घालमेल होणे, कसेही करून मला हे तिकीट मिळवलेच पाहिजे या आतील सूचनेनुसार त्याचे ते जंग जंग पछाडणे या सगळ्या गोष्टी पुढे घडणाऱ्या अपघाताप्रत त्याला नेऊ पाहत होत्या का? ज्या माणसाने आयत्या वेळी त्याचे तिकीट रद्द केले त्याला आतून तशी काही सूचना मिळाली असेल काय? ते तिकीट रद्द केल्यानंतरची त्याची भावना नक्की काय होती ? या भीषण अपघाताची बातमी त्याच्या कानावर येताच त्याच्या मनाची प्रतिक्रिया नेमकी काय होती ?
आपल्याला एखाद्या व्यक्तीला खूप भेटावेसे वाटते. काही वेळेस याची तीव्रता एवढी असते की त्याला किंवा तिला भेटल्याशिवाय चैनच पडत नाही. याबद्दलचा माझ्या वाचनात आलेला एक किस्सा आहे. एका विवाहित महिलेला आपल्या वडिलांना भेटण्याची विलक्षण ओढ लागली. तिचे सासर माहेरापासून बरेच दूर असल्याने तिची ही इच्छा तात्काळ पूर्ण होणे सर्वथैव अशक्य होते. तिने फोन करायचा प्रयत्नही केला पण फोन लागत नव्हता. ती खूप अस्वस्थ झाली. काय करावे? बाबांना कसे भेटावे? ते सुखरूप असतील ना? त्यांना काही झालं तर नसेल ना? एक ना दोन. शंकाकुशन्कांनी तिला पुरतं पछाडलं. ती सैरभैर झाली. आपल्याला काय होतंय तेच तिला कळेना. ती घरची कामे सवयीनुसार उरकण्याचा यत्न करू लागली. एवढ्यात दारावरची बेल वाजली. तिने दार उघडले आणि ती किंचाळलीच. बाबा तुम्ही? अहो फोन नाही, काही नाही आणि असे अचानक न सांगता कसे आलात? आज सकाळपासून तुमची खूप आठवण येत होती. तुम्हाला भेटावं असं सारखं वाटत होतं. तुम्ही कसे आहात? एकदम मजेत, बाबा उत्तरले. मला सुद्धा तुझ्या हातची गुरगुटी खिचडी खायची खूप इच्छा होत होती. लेकीच्या हाताचा चहा व नंतर खिचडी खाऊन बाबा जवळच्या देवळात जाऊन येतो म्हणाले आणि तिचे बाबा तिथून निघून गेल्यानंतर काही वेळातच फोन वाजला आणि बाबांच्या निधनाची बातमी तिच्या कानांवर आदळली. तिचा यावर विश्वास बसणे अशक्य होते. तिने याची देही, याची डोळा बाबांना पहिले होते. त्यांच्याशी गप्पा मारल्या होत्या. ती धावत धावत त्यांना देवळात शोधायला गेली आणि हताश होऊन घरी आली. तिचे बाबा देवळात सापडले नाहीत. ती समजून चुकली. अशा रीतीने दोघांची एकमेकांना भेटण्याची इच्छा पुरी झाली होती. आधी अंतर्मनाच्या पातळीवर एकमेकांविषयीच्या ओढीने या घडामोडी घडल्या आणि नंतर त्याचे पर्यवसान त्यांच्या प्रत्यक्ष भेटीत झाले. हा अतिगूढ ,संवेदनशील असा मनोव्यापार समजणे ही फारच कठीण गोष्ट आहे.
काही घटना तर अगदी साध्या असतात. काहीतरी अमुक एक गोड पदार्थ खावासा वाटतो. आज जेवणात श्रीखंड किंवा जिलेबी असती तर मजा आली असती असं वाटू लागतं. मन त्या पदार्थाकडे तीव्रतेने , अतितीव्रतेने ओढ घेतं. ही संवेदना खोल मनात झिरपते. आणि शेजारचं कुणीतरी काही कारणानिमित्त गोड पदार्थ तुमच्या हातावर ठेवतं. तुम्हाला आश्चर्यमिश्रित आनंद होतो. पण बहुतांश लोक या छोट्या घटनांकडे डोळसपणे पाहत नाहीत. ही घटना प्रत्यक्षात घडण्यासाठी आधी त्या घटनेची प्रक्रिया मानसिक पातळीवर झालेली असते. गोड पदार्थ आत्यंतिक तीव्रतेने खावासा वाटणे आणि तो प्रत्यक्षात मिळणे यासाठी अंतर्मनात उमटलेला इच्छेचा पडसाद कारणीभूत असतो.
एखाद्या ठिकाणी आपण सहलीला जातो. ते ठिकाण आपण याअगोदर कधीही पाहिलेले नसते. तरीही ते ठिकाण अपरिचित वाटत नाही. तो सबंध परिसर ओळखीचा वाटतो. आपण आधी इथे येऊन गेलो आहे असे प्रकर्षाने वाटू लागते. हा 'दे जा वू' अनुभव असतो. आपण या ठिकाणाचे फोटो आधी पहिले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कधीतरी आपण कल्पनेतही या जागेचे चित्र रंगवलेले असते. परंतु प्रत्यक्ष त्या जागी पोहोचल्यानंतर आपल्याला जो ओळखीचा फिल येतो तो कोणत्याही शब्दांत पकडता येत नाही. आपल्या अंतर्मनात अनेक जन्मांच्या आठवणींची चित्रे जतन केलेली असतात. त्यातील काही चित्रे पुन्हा सजीव होतात एवढेच!
माझा एक अनुभव मला इथे या निमित्ताने कथन करावासा वाटतो आहे. आम्ही विक्रमगडला गेलो होतो. बरेच फिरत होतो. फिरता फिरता एका जुन्या महालसदृश वास्तूसमोर आलो. वास्तू पहावी या हेतूने आत शिरलो. अनेक पेशवे, राजे, संस्थानिक यांचा राबता म्हणे या वाड्यात असायचा. या वाड्याला आत अनेक छोटी छोटी दालने होती. त्या ऐतिहासिक काळातील बऱ्याच वस्तु जतन केलेल्या दिसत होत्या. त्यावेळची ती बांधणी आम्ही अपूर्वाईने बघत होतो. खिडक्यांची तावदाने रंगीत होती. ऐसपैस बिछायती, लोड, तक्के, उशा, झिरझिरीत पडदे, त्यावेळी वापरली जाणारी भांडीकुंडी, शोभेच्या वस्तु, विशिष्ट हत्यारे अशा अनेक गोष्टी आम्ही बघितल्या. चौकात पाण्याचे कारंजेही होते. भिंतीवर कलाकुसर होती. काही दालनांत जेव्हा आम्ही फिरत होतो तेव्हा मला तिथे क्षणभरही थांबू नये असे वाटू लागले. मी जरा अस्वस्थ झाले. वास्तविक पाहता तिथे भीतीदायक असे काहीच नव्हते. आमची वास्तूच्या भेटीची वेळाही दुपारची होती तरीही माझ्या मनात विलक्षण घालमेल सुरु झाली. तेथील एक प्रकारचा वास मला नकोसा वाटू लागला. मी आतून भलतीच उदास झाले. माझ्याबरोबर माझे कुटुंबीय होते तसेच ती वास्तू बघायला आलेले इतरही अनेक जण होते. पण मला काही केल्या त्या वास्तूतून बाहेर जावेसे वाटू लागले. थोडा वेळ इथे तिथे भटकून मी कसाबसा काढला आणि बाहेर येताक्षणी सुस्कारा टाकला. त्या जुन्या, ऐतिहासिक वास्तूत प्रवेश करताना माझ्या मनाला मरगळ आणि उदासीनता नक्की कशामुळे आली याचे उत्तर मला आजही मिळालेले नाही. पण त्या वेळी विलक्षण खिन्नतेने माझे मन भरून गेले होते हे मात्र खरे!
मनाचा व्यापार हा खरेच अथांग, गूढ डोहासारखा आहे. त्यात कुठल्या कप्प्यात काय गवसेल हे सांगणे महाअवघड आहे. अंतर्मनातील घडामोडी जेव्हा बाहेर दृश्य स्वरुपात प्रक्षेपित होतात तेव्हाच फक्त या मनाच्या व्याप्तीचा थोडासा अंदाज येऊ शकतो. काही घटनांचा थांग लावण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा बऱ्याच वेळेस घनदाट अरण्यात चुकलेल्या वाटसरूसारखीच आपली अवस्था होते. खजिना हाताला लागलासा वाटतो पण ते केवळ एक मृगजळ असते.
No comments:
Post a Comment