Monday, 30 April 2012

'जग' जीत सिंग .......

१५ एप्रिल २०१२ रोजी 'कलर्स' या वाहिनीवर 'यादों का सफर'  हा कार्यक्रम पहिला आणि आपल्या मृदू,मुलायम,तरल, भावनास्पर्शी आवाजाने लाखो रसिकांच्या मनावर गारुड करणाऱ्या जगजीतसिंगच्या आठवणीत मन हरवून गेले. आशयघन शब्द, त्या शब्दांतून अभिव्यक्त होणारे दु:ख, आणि साधे, सोपे संगीत आणि हे साकारणारा प्रभावी स्वर ही शिदोरी पाठीशी घेऊन  जगजीतने मार्गक्रमणा सुरु केली आणि बघता बघता असंख्य श्रोत्यांच्या मनात जगजीतची गझल अलवार जाऊन बसली. ती ऐकताना मन हळवे होत गेले, सुरांच्या आणि शब्दांच्या रेशमी लड्या त्याच्या गळ्यातून थेट रसिकांच्या हृदयात उतरल्या आणि त्या गझलांनी आपली तिथली बैठक पक्की केली.  
८ फेब्रुवारी १९४१ साली राजस्थान मधील श्री गंगानगर येथे एका सिख कुटुंबात जगमोहनने जन्म घेतला. नंतर त्याचे नामकरण  'जगजीत' असे करण्यात आले आणि खरोखरच जगजीतच्या आवाजाने जगाला गवसणी घातली. पुढे चित्रा सिंग या सुरील्या जोडीदाराच्या साथीनेच जगजीतने आयुष्याची वाट 'सूर' मयी केली. वडिलांनी त्याच्यातील सुप्त गुण हेरून त्याला सिख देवळांत जाऊन तसेच पं. छगनलाल शर्मा आणि उस्ताद जमाल खान या गुरुद्वयींकडे संगीताची दीक्षा घेण्यासाठी प्रवृत्त केले. जगजीतने काही स्टेज आणि रेडीओ परफॉरमन्सेस दिले. १९६५ साली जगजीताने मुंबईच्या दिशेने कूच केले. कलाकाराच्या अंगभूत गुणांना वाव देणारी मुंबापुरी त्याला खुणावत होती. 
सुरवातीस काही जिंगल्समध्ये आणि कोरसमध्ये गाण्याची संधी त्याला मिळाली. या दरम्यान जगजीतने आपले रूप पालटून टाकले. डोक्यावरील सिख पगडी आणि वाढवलेले केस या दोन्ही गोष्टींचा त्याग करून जगजीतने आपली नवी ओळख प्रस्थापित केली. एका गुजराथी चित्रपटात काम मिळवले. १९६७ साली चित्रा दत्त नावाची बंगाली जिंगल सिंगर जगजीतला भेटली. ती तिच्या व्यक्तिगत आयुष्यात अतिशय दु:खी होती. तिला एक मुलगी होती. पतीला रीतसर घटस्फोट देऊन तिने १९६९ साली जगजीतशी लग्न केले. या दाम्पत्याला एक मुलगा झाला. अजूनही संगीताच्या क्षेत्रात हे दोघेही स्ट्रगल करत होते. त्यांना योग्य सूर गवसला नव्हता. विशेषत: गझल गायनाच्या क्षेत्रात पाकिस्तानी सिंगर्सचा वरचष्मा होता, पगडा होता. 
१९७६ सालापर्यंत त्यांचा टेस्टिंग पिरीयड चालूच होता. या सुमारास त्यांचा 'द अनफरगेटेबल्स' हा आल्बम रिलीज झाला आणि अल्पावधीतच जगजीत आणि चित्रा लोकप्रिय झाले. त्यातील 'बात निकलेगी' या गझलेला खूप लोकप्रियता लाभली. आणि अशा तऱ्हेने या दाम्पत्याचा व्यावसायिक यशाच्या दिशेने प्रवास सुरु झाला. त्याचे सोलो आणि joint पर फॉरमन्सेस रसिकमनावर राज्य करू लागले. गझल गायनाच्या क्षेत्रातील एक मानाचा शिरपेच चाहत्यांनी जगजीतला बहाल केला.   
हिंदी चित्रपट सृष्टीशी जगजीतचा संबंध आला आणि अनेक उत्तमोत्तम गझला जगजीतच्या मखमली गळ्यातून रसिकहृदयी विराजमान झाल्या. 'तुमको देखा तो ये खयाल आया', 'कोई ये कैसे बताये के वो तनहा क्यों है', 'झुकी झुकी सी नजर', ' शाम से आंख में नमी सी ही', 'तुम इतना जो मुस्कुरा रहे हो', 'होशवालों को खबर क्या', 'वो कागज की कश्ती वो बारिश का पानी', ललत रागावर आधारित 'कोई पास आया सवेरे सवेरे', होठों से छू लो तुम' या आणि अशा असंख्य गझलांनी रसिकांचे कान तृप्त केले. हिंदी गझलांचे दालन समृद्ध केले आणि पाकिस्तानी गझलकारांचा रसिकमनावरील पगडा सैल केला. 
मुलगा विवेक याच्या अपघाती मृत्यूने आणि चित्राची मुलगी मोनिका हिच्या आत्मघाती मृत्यूने हे दाम्पत्य दु:खात होरपळून निघाले. चित्राने गाण्याला पूर्णविराम दिला तथापि जगजीत गात राहिला. शब्दांतून, सुरांतून याच्या मनातील व्यथा मूर्त करत राहिला. हृदयातील दु:खाच्या हारात गझलेला गुंफत राहिला. 
२००३ साली 'पद्म भूषण' पुरस्काराने जगजीतला गौरविण्यात आले. 
जगजीतच्या गझलगायनात कधीही स्वर-चमत्कृती नसायची.  प्रत्येक शब्दाला व्हेरिएशन घेऊन बघा मी कसा गातो ते असा आवही नसायचा. सरळ, साधी, ऐकताना सोपी वाटणारी चाल, सहज गुणगुणता येईल असे वाटणारी गझल जगजीत गायचा. सुरांशी अनावश्यक खेळ खेळत गझलेचा खरा लुथ्फ रसिकांपासून हिरावून घेण्याचे पाप जगजीतने केले नाही. जगजीतची गझल ताजी, टवटवीत, सुगंधी राहिली. मोगऱ्याच्या फुलांसारखी मनात दरवळत राहिली. हा शब्द-सुरांचा सडा श्रोत्यांच्या हृदयात आनंदाची पखरण अव्याहतपणे करत राहिला.  
'यादों का सफर' या कार्यक्रमान्तर्गत अनेक ख्यातकिर्त गायकांनी जगजितच्या गज़लेला, त्याच्या जीवनप्रवासाला सलाम केला. शफकत अमानत अली या पाकिस्तानी गायकाने 'शाम से आँख में नमी सी है' ही ग़ज़ल प्रभावीपणे साकारली, सोनू निगमने 'होशवालों को खबर क्या' ही ग़ज़ल तन्मयतेने म्हटली, 'प्यार का पहला ख़त लिखने में वक्त तो लगता है'  ही रिचा शर्मा हिने गायलेली ग़ज़ल दखलपात्र  होती. मात्र उस्ताद रशीद खान यांनी 'याद पिया की आये' ही ठुमरी ज्या नजाकतीने गायिली त्याला तोड नव्हती.  
जगजीत सिंग आज आपल्यात नाही हे जरी सत्य असले तरी त्याच्या मऊसुत -मुलायम आवाजाची मोहिनी रसिकांवर अनंत काळापर्यंत राहील.  

Sunday, 29 April 2012

Matrimony वरील काही 'आदर्श' प्रोफाईल्स

आपल्याकडे लग्न ही वधू-वरांसाठी योजलेली एक सर्वसंमत रीत आहे याकडे सोयीस्कररित्या डोळेझाक करून त्यांचे सो-कॉल्ड पालक वेड्यावाकड्या प्रोफाईल्सचे रतीब घालत असतात. या प्रोफाईल्समध्ये लिहिलेला तपशील आणि प्रत्यक्ष विवाह यामध्ये विचारांचे महदंतर असते. मुलांचे पालक तर आपला मुलगा लग्नाला उभा आहे म्हणजे आता 'ओन्ली स्काय इज द लिमिट' अशा अविर्भावात प्रोफाईल्स प्रसवत असतात. माझ्या मुलीसाठी मी आणि प्रामुख्याने ती गेली सहा-सात वर्षे  काही  'Matrimony sites' शी सतत संपर्कात आहोत. मुलाला मुलगी कशी हवी आहे याविषयीची माहिती तसेच मुलाची स्वत:ची माहिती या दोन गोष्टी महत्वाच्या! पत्रिका बघणे न बघणे हा सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न! त्या दोघांचे विचार एकमेकांशी जुळणे अत्यावश्यक आहे. त्यांनी एकमेकांना त्यांच्या गुण-दोषांसकट स्वीकारणे महत्वाचे आहे. त्यांचे शिक्षण जसे महत्वाचे तशी त्यांच्यातील एक माणूस म्हणून जपलेली गुणवत्ताही तितकीच महत्वाची आहे. कारण संसार हा शैक्षणिक कुवतीशी करावयाचा नसून मनातून उपजणाऱ्या प्रेमभावनेशी त्याची गाठ बांधावयाची असते. 
मुलाचे शिक्षण जास्त असेल कर त्याच्यावर जास्त प्रेम, मुलाचा पगार उत्तम आहे कर त्याच्यावर भरपूर प्रेम मग तो माजोरडा असेल, माणूसघाणा असेल, व्यसनी असेल तरी क्काही फरक पडत नाही हे विधान कितपत सयुक्तिक आहे? एखादी मुलगी मुलाला लग्नाच्या दृष्टीने बघते म्हणजे तो दिसायला कसा आहे? त्याची ओव्हरऑल personality कशी आहे? त्याचे विचार कसे आहेत? थोडक्यात तो एक माणूस म्हणून कितपत चांगला आहे? 'दाखव पगाराची स्लीप मगच लग्न करीन किंवा दाखव तुझी इस्टेट मगच लग्न करीन' असे म्हणणाऱ्या उपवर मुली अभावानेच आढळतात.  
हे असे असले तरीही लग्नाच्या बाजारात उतरलेला आपला उच्चशिक्षित आणि रग्गड पैसा कमावणारा मुलगा म्हणजे अनेक आई-वडिलांना सोन्याचे अंडे देणारी कोंबडीच वाटते. ठीक आहे वधू-वरांच्या पत्रिका तपासा, गुण-मेलन होते की नाही ते बघा, दोघांचे भावी आयुष्य चांगल्या रीतीने निभावणार असेल असे वाटल्यासच पुढे जा पण इतर बाबी ज्या त्या दोघांच्या प्रापंचिक आयुष्यात तसूभरही मोलाच्या नाहीत त्यांचे अवडंबर कशाला माजवायचे? आणि अनेक आई-वडील नेमके हेच करतात. 
आपल्या मुलासाठी मुलगी चांगली हवी याविषयी कोणाचेच दुमत असण्याचे कारण नाही पण तिने अल्पावधीत सगळ्यांशी adjust  केले पाहिजे, ती कितीही शिकलेली असली, नोकरी करणारी असली तरी ती गृहकृत्यदक्ष असलीच पाहिजे ही जबरदस्ती का? म्हणजे तुमच्या मुलाच्या खांद्याला खांदा लावून ती ऑफिसात जाणार, तसाच चांगला पगारही घेणार पण घरी आल्यावर मात्र तिने स्वत:ला गृहकृत्यांना जुंपून घ्यायचे आणि त्याने एसीत ऐसपैस पसरायचे हा कोणता न्याय? ती तुमच्या घरात आली म्हणजे तुमच्या हरकत घेण्याजोग्या सवयींनाही तिने समजून घ्यायचे आणि तिच्या हातून घडलेल्या एखाद्या नगण्य चुकीलाही तुम्ही गुन्ह्याचे स्वरूप द्यायचे ही कुठली रीत?  
आम्ही ब्राह्मणकुलोत्पन्न आहोत, आमचे गोत्र अमके आहे, आमच्या घराण्याचा इतिहास असा आहे, आमचे कुलदैवत हे आहे , आम्ही खानदानी, उच्चभ्रू आहोत, आमच्याकडे गाड्या, नोकर-चाकर आहेत,  एवढ्या ठिकाणी आमच्या इस्टेटी आहेत या भांडवलावर कोणतेही संसार सुखी होत नाहीत. मुलीची उंची, तिचा वर्ण, तिचे रूप, तिची जात, तिचे घराणे, तिचे शिक्षण आणि नोकरीतील मासिक पगार ह्या गोष्टी जुळल्यानंतर त्या दोघांचा संसार सुखी होईल याची ग्वाही कुणीही देऊ शकत नाही. त्यात मुलगा परदेशवाऱ्या करणारा किंवा तिथेच कायम वास्तव्यास असणारा असेल तर ह्या मात्या-पित्यांचा भाव आणखीच वधारतो. 
मुलगी चश्मेवाली नको. का बुवा? मुलगा चष्मेवाला असला तरी तो त्याचा रुबाब समजायचा. हे वर्गीकरण का? मुलीच्या डोळ्यांची ब्बुबुळे अमक्याच रंगाची हवीत, ती निखालस गोरी हवी, तिची फिगर उत्तम हवी, तिचे केस अशाच प्रकारचे हवेत, तिचे दात सरळ हवेत, तिचे ओठ वाजवीपेक्षा जास्त जाडे नकोत, ती सदासदैव हसतमुख हवी. अरे मुलगी म्हणजे काय दुकानातील शो-केस मधील एखादी वस्तू आहे का? की जिचे मूल्य फक्त तिच्या बाह्यस्वरूपावरच अवलंबून आहे? म्हणजे तुमचा मुलगा जाड भिंगाचा चष्मा वापरणारा ढापण्या असला तरी चालेल, त्याचा वर्ण सुरणाचा किंवा वांग्याचा असला तरी काही प्रॉब्लेम नाही, तुमच्या मुलाचा चेहरा आणि मान ह्यांच्यात distinguishing points नसले तरी चालतील, तुमच्या मुलाच्या दातांवर तंबाखूमुळे पिवळे डाग पडले असतील तरी चालतील. कोणत्या बेसिसवर? तो मुलगा आहे म्हणून? कुलदीपक आहे म्हणून? घराण्याचा एकुलता एक वारस म्हणून? 
ह्या सो-कॉल्ड उच्चभ्रू घराण्यातील मुलांच्या भविष्याची दोरी त्यांच्या आई-वडिलांच्या हातात असते. मुलगी नकटी वाटते नाकारा, सावळी दिसते नाकारा, बुटकी आहे नाकारा, तिचे घराणे आपल्यासारखे नाही नाकारा, तिचा पगार खास नाही नाकारा, तिचे गोत्र माहित नाही नाकारा, तिचे कुलदैवत शंकास्पद आहे नाकारा, ती जाडी वाटते नाकारा, तिच्याकडे चांगला मोबाईल नाही नाकारा अशी नकारघंटा हे माय-बाप सातत्याने वाजवत राहतात. आपल्या पोटी निपजलेला मुलगा हा जणू मदनाचा पुतळा आहे अशा भ्रमात हे माता-पिता असतात. सगळे उत्तम गुण त्याच्या ठायी मौजूद आहेत अशी आपली त्यांनी त्यांची समजूत करून घेतलेली असते. 
एरवी पत्रिका, कुंडली या शब्दांच्या वाऱ्यालाही न उभी राहणारी ही मुले लग्नाला उभी राहताच आई-वडिलांच्या मतासमोर आपली मान तुकवतात. आपले खाण्या-पिण्याचे सर्व चोजले येणाऱ्या मुलीने खुशीने संभाळावेत,  मुलांच्या संगोपनाची पूर्ण जबाबदारी तिने घ्यावी, आपल्या आई-वडिलांची, भावंडांची मर्जी तिने राखावी, त्यांची सेवा करावी,त्यांचा आदर करावा, तिने महिन्याचा पगार आपल्या हातात द्यावा,  माझ्या मित्रमंडळींना तिने सुग्रास खाऊ-पिऊ घालावे, घरी येणाऱ्या पाहुण्यांची व्यवस्थित सरबराई तिने करावी, सणवार-व्रते नेमाने पाळावीत अशा 'माफक' अपेक्षा ह्या नवरदेवांच्या असतात. थोडक्यात काय घरी-दारी तिने स्वत:ला पिसून घ्यावे आणि इतरांसाठी आपला देह चंदनासारखा झिजवावा अशा उच्च विचारांनी ही मुलाकडची मंडळी भारलेली असतात.
सुखी संसाराची समीकरणे २ अधिक २ चार या पद्धतीने सोडवता येत नाहीत. उत्तम राहते घर अधिक उत्तम पगार इज इक्वल टू सुखी, आनंदी संसार असे इक्वेशन मांडता येत नाही. संसार सुखाने, एकमेकांशी न भांडता कसा करावा हे शिकवणारी विद्यालये नसतात. लग्नातील होमात स्वत:विषयी बाळगलेला फाजील अहंकारही समर्पित करायचा असतो ही जाणीव ज्याची त्याला व्हावी लागते. बाह्य गोष्टींनी स्वत:ला आणि दुनियेला फक्त चार दिवस दिपवता येते पण संसाराचे चक्र सुयोग्य दिशेने फिरते ठेवायला काही चांगल्या आंतरिक उर्मींची गरज असते. 
तेव्हा अनेक अनावश्यक गोष्टींचा भरणा केलेली प्रोफाईल अपलोड करून त्यायोगे आपण मनाजोगती मुलगी सहज मिळवू शकू या भ्रमात वावरणाऱ्या समस्त मात्या-पित्यांना मी एवढेच सांगू इच्छिते की अशी माहिती द्या किंवा करून घ्या जी तुमच्या मुलाच्या आणि येणाऱ्या सुनेच्या संसारात उपयुक्त ठरू शकेल. जात-पात, प्रतिष्ठा-पत, शिक्षण, नोकरी,पगार, गाडी-बंगला, नोकर-चाकर, आर्थिक गुंतवणुका, इस्टेटी या बाह्य गोष्टी एका ठराविक मर्यादेपर्यंतच महत्वाच्या आहेत. 
संसाराचे शेत हिरवेगार दिसण्यासाठी आधी उत्तम विचारांचे बी पेरले गेले पाहिजे, त्याला तेवढ्याच उत्तम आचारांचे खत घातले पाहिजे तरच त्याला सौख्याच्या मोत्यांचे पिक येईल नाहीतर नुसती महागडी बाह्य फवारणी कुचकामी ठरेल.    


Friday, 27 April 2012

माझा १०० व्वा ब्लॉग- १०० वर्षाच्या तरुणीस समर्पित .......

२७ एप्रिल १९१२ साली जन्मलेली ही सदाबहार तरुणी म्हणजे झोहरा सेहगल. वाढत्या वयाच्या दुपटीने वाढणाऱ्या उदासीनतेच्या छटांचा मागमूस तिच्या चेहऱ्यावर औषधालाही दिसत नाही. 'संध्याछाया भिवविती हृदया- लागले नेत्र रे पैलतीरी' असा आयुष्याबद्दलचा तिचा अप्रोच नाही. डोळ्यात खट्याळ हसू आणि चेहऱ्यावर मिश्कील भाव हे तिच्या शतकी आयुष्याचे भांडवल आहे. इतरांच्या टोप्या उडवण्यात ती तरबेज आहे. तिचा जीवन जगण्याचा उत्साह एखाद्या षोडषेलाही लाजवेल असा आहे. 'चीनी कम' मध्ये  'जिम जाओ जिम जाओ' म्हणून तिच्या ६४ वर्षीय मुलाच्या मागे तगादा लावणारी आणि 'सेक्स इन द सिटी' बघणारी झोहरा वास्तवात काही वेगळी नाही. आयुष्यातील चढ-उतारांच्या घसरगुंडीवर अमाप मजेने, आनंदाने, उत्साहाने हिंदोळणारी ही तरुणी म्हणजे जीवन कसे जगावे ह्याचा वस्तुपाठ आहे. 



सहारणपूर , उत्तर प्रदेश हे झोहरा मुमताजचे  जन्मगाव. तिच्या सात भावंडांत ती तिसरी. दिवसाकाठी पाच वेळा नमाज पडणाऱ्या सुन्नी मुसलमान परंपरेची ती पाईक! बालवयातच तिच्या अवखळ आणि खट्याळ स्वभावाची चुणूक तिच्या आप्तांना अनुभवायला मिळाली. तिला झाडांवर चढण्याचा विलक्षण छंद! तिला मुलांचे खेळ खेळायला आवडत. तिने  'tomboy' असा लौकिक संपादन केला होता. अवघ्या वर्षाची असताना तिच्या डाव्या डोळ्याची दृष्टी गेली आणि ती दृष्टी परत आणण्यासाठी तब्बल ३ लाख एवढी प्रचंड किंमत मोजावी लागली. तरुण वयात आईच्या मायेला ती आणि तिची भावंडे पारखी झाली. आईच्या इच्छेनुसार 'क्वीन मेरी गर्ल्स कॉलेज', लाहोर इथे तिची शिक्षणासाठी रवानगी झाली. तेव्हा पडद्याची ( बुरख्याची) प्रथा ही कडक होती. कॉलेजचा सगळा स्टाफ इंग्लिश होता. तिच्या बहिणीचा फसलेला विवाह तिने पहिला आणि लग्नबंधनाच्या आहारी न जाता पुढे शिकण्याचा निर्णय तिने घेतला. ती पदवीधर झाली आणि तिच्या मामाने तिची रवानगी युरोपला केली. तिथे तिच्या मावशीने 'मेरी विंगमन' या नृत्यशाळेत तिला दाखल करण्याचा निर्णय घेतला. पडद्याच्या प्रथेमुळे तिला नृत्यशिक्षण घेता आले नव्हते. पुढील तीन वर्षे ड्रेसडन, जर्मनी येथे तिने आधुनिक नृत्याचे रीतसर शिक्षण घेतले. याच सुमारास प्रख्यात नर्तक उदय शंकर यांचा 'शिव-पार्वती' वर आधारित नृत्याविष्कार तिच्या पाहण्यात आला. ती मनोमन हरखून गेली. उदय शंकर यांना भेटली आणि भारतात परतल्यानंतर माझ्या नृत्यसंस्थेत तुला नोकरी देईन असे आश्वासन तिला त्यांनी दिले. पुढे तिने उदय शंकर यांच्या ग्रुपबरोबर नृत्यानिमित्ताने अनेक दौरे केले.
१९४० साली उदय शंकर यांच्या अल्मोरा येथील नृत्यसंस्थेत ती शिक्षिका म्हणून रुजू झाली. तिथे तिला कमलेश्वर सेहगल हा इंदोरचा तिच्यापेक्षा आठ वर्षांनी लहान असलेला संशोधक, नृत्यनिपुण  असा तरुण भेटला आणि तिने स्वत: मुस्लीम असूनही एका हिंदू तरुणाशी जन्मांतरीची लग्नगाठ जोडण्याचा अत्यंत धाडसी निर्णय घेतला. तिच्या घरच्यांनी सुरवातीस या लग्नास हरकत घेतली पण नंतर त्यांनी त्यांचा विरोध मागे घेतला. झोहाराने किरण आणि पवन अशा दोन मुलांना जन्म दिला. दरम्यानच्या काळात झोहरा आणि  कमलेश्वर हे दोघेही नृत्यदिग्दर्शक झाले होते. त्यानंतर दोघे लाहोरला परत आले आणि त्यांनी 'झोहरेश डान्स इंस्टीट्युट' ची स्थापना केली. त्यानंतर तिची बहिण उझरा बट्ट हिच्याप्रमाणेच झोहराने  'पृथ्वी थिएटर' मध्ये प्रवेश केला आणि नंतरची चौदा वर्षे नृत्याच्या निमित्ताने अवघा भारत पिंजून काढला. तिने 'इप्टा' साठी काम केले आणि निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले.   
बाजी, आवारा सारख्या चित्रपटांसाठी तिने नृत्य दिग्दर्शन केले. तुरुंगातील कैद्यांसाठीही तिने शोज आयोजित केले. १९५९ साली कमलेश्वरांना देवाज्ञा झाली आणि झोहरा दिल्लीत आली. तेथील नव्याने स्थापन झालेल्या 'नाट्य संस्थेची ती संचालिका झाली. तिला नृत्यासाठी स्कॉलरशिप मिळून ती लंडनला गेली. तिथे तिची ओळख भरतनाट्य करणाऱ्या राम गोपाल यांच्याशी झाली. Chelsea इथे तिने काही काळ नृत्य शिकवले. याच दरम्यान बीबीसी TV साठी तिने काही एपिसोड्सचे संचालनही केले. १९९० च्या आसपास ती भारतात आली आणि तिने काही फिल्म्स, TV शोज व प्लेज केले. पाकिस्तान दौरा केला. काही स्टेज परफॉरमन्सेस  दिले.   
झोहरा अनेक पारितोषकांनी सन्मानित झाली. १९६३ सालचे 'संगीत नाटक अकॅडमी अवार्ड' तिला मिळाले. १९९८ साली 'पद्मश्री' या किताबाने ती गौरवली गेली. २००१ साली 'कालिदास' सन्मानाची ती मानकरी ठरली. २००२ साली 'पद्म भूषण' हा मान तिला लाभला. २००४ साली 'संगीत नाटक अकॅडमी फेलोशिप' तिला मिळाली. २०१० साली 'पद्म विभूषण' हा किताब तिने पटकावला. 
अशी ही अभूतपूर्व झोहरा आणि तिचा हा सांस्कृतिक प्रवास! आज वयाच्या शंभराव्या वर्षीही तिला पाच फुट सहा इंच उंची, सुंदर फिगर आणि लांबलचक केस हवे आहेत. ज्या वयात नामस्मरण आणि पोथ्या हाच आयुष्याचा आधार असतो त्याहीपेक्षा जास्त वयात जोहरा सर्वस्वी वेगळी आणि उमेदीची स्वप्ने उरी बाळगते आहे. ईश्वर तिच्या सगळ्या इच्छा या पृथ्वीवरील एक स्पेशल केस म्हणून पुऱ्या करो हीच इच्छा आणि प्रार्थना! 




मंगळ

तुम्हाला मंगळ आहे असे जाणकारांनी सांगितल्यावर अनेकजण मनातून चरकतात.. मग यावर काय उपाय आहे , कोणता खडा घालू, कोणती उपासना करू अशी पृच्छा सुरु होते. तथापि मंगळ आहे म्हणजे नक्की काय याचा मागोवा घेणारे संख्येने फार कमी आढळतात. विवाह जमविण्याच्या मार्गातील हा एक मोठा अडथळा आहे अशी अनेकांची पक्की खात्री झालेली असते.
तुमच्या जन्मकुंडलीत बाराव्या स्थानी (व्यय), पहिल्या स्थानी (लग्न), चतुर्थ, सप्तम आणि अष्टम स्थानी मंगळ स्थित असता मंगळदोष आहे असे समजले जाते. पण या मंगळाच्या प्रतिकूलतेची टक्केवारी मात्र इतरही अनेक गोष्टींवर अवलंबून असते. मंगळ कोणत्या राशीत, कोणत्या नक्षत्रात, कोणत्या ग्रहाच्या अंशात्मक युतीत अथवा प्रतियोगात, केंद्रयोगात या योगांवरून त्याची बरी-वाईट फळे देण्याची क्षमता ठरवली जाते. यांशिवाय मंगळाच्या दृष्ट्याही तपासणे गरजेचे असते. मंगळाच्या बाल, कुमार, वृद्ध अवस्थाही समजून घेणे इष्ट असते. मंगळावर होणारे शनीसारख्या अथवा गुरूसारख्या ग्रहांचे दृष्टीयोग अभ्यासावे लागतात. मंगळ-राहूचे नाते तपासणेही अत्यावश्यक ठरते. इतक्या सगळ्या बाबींचा साकल्याने विचार केल्यानंतर मग एखाद्या निश्चित अशा निष्कर्षाप्रत येता येणे शक्य असते. पण याचा अर्थ असा नव्हे की इतर स्थानी मंगळ असता त्याचे सगळे अनुकूलच परिणाम दिसून येतात. काही जाणकार द्वितीय स्थानातील म्हणजेच कुटुंब स्थानातील मंगळ प्रतिकूल मानतात. 
मुळात मंगळ हा तामसी प्रकृतीचा ग्रह आहे. पण म्हणून मंगळ सर्वार्थाने वाईट होत नाही. तो अविचारी आहे पण तो साहसीसुद्धा आहे. शस्त्रास्त्रांचा कारक ग्रह मंगळ शूर योद्धेही निर्माण करेल आणि प्रचंड नरसंहार करणारे अतिरेकीही निर्माण करेल. मूळ नक्षत्रातील मंगळ एखाद्या शल्यविशारदाच्या हाताला अमाप यश देईल तर हाच मूळ नक्षत्रातील मंगळ वाणीशी संबंधित स्थानात असता माणसाला अत्यंत तिखट आणि अर्वाच्य जीभ देईल. बुधासारख्या ग्रहाच्या युतीत असता जशी टीकाखोर वृत्ती देईल तशी गणिती बुद्धी आणि हजरजबाबी वृत्तीही देईल. शुक्राच्या योगात कामभावनेचा अतिरेक करेल पण  खेळाडूस पोषक असे नैपुण्यही देईल. उच्च राशीतील ( मकर ) मंगळ चांगली श्रेणी देईल तर नीच राशीतील (कर्क) मंगळ चांगली फळे देण्यास असमर्थ ठरेल. मंगळाचा लढाऊ बाणा रणभूमी गाजवेल पण तोच बाणा घराच्या भिंती उध्वस्त करून टाकेल.  स्फोटक गोष्टींचा, आगीचा, उष्णतेचा कारक ग्रह मंगळ आहे तर  अंगभूत व्यायामाचा, कसरतीचा, कुस्तीचा कारक ग्रहही हाच आहे.  सुदृढ प्रकृती बहाल करणारा मंगळच असतो आणि उष्णतेचे विकार देणाराही मंगळच असतो. पुढचा मागचा विचार न करता संकटात सर्व-शक्तीनिशी झोकून देणारा मंगळ असतो तर आगीचे, स्फोटाचे प्राणभय निर्माण करणारही मंगळच असतो. 
नाण्याला जशा दोन बाजू असतात त्याचप्रमाणे प्रत्येक ग्रहाला धन आणि ऋण अशा दोन बाजू असतात. चांगल्या स्थानात, चांगल्या राशीत, चांगल्या नक्षत्रात आणि इतर ग्रहांच्या चांगल्या योगांत असलेला ग्रह सर्वसाधारणपणे चांगली फळे देण्यास समर्थ असतो. प्रत्येक ग्रहासाठी सु-स्थाने आणि दु-स्थाने वेगवेगळी असतात. चांगली-वाईट राशी, नक्षत्रे वेगवेगळी असतात. स्थानपरत्वे मिळणारी फळेही भिन्न असतात. 
प्रखरता,  दाहकता, निश्चयाचे तेज, ओजस्विता , पेटून उठण्याची जिद्द ही मंगळाची बलस्थाने होत. पण राशी, नक्षत्रे अथवा इतर ग्रहांचे सहकार्य लाभले नाही पण त्याच्या या अंगभूत गुणांवर पाणी पडते आणि साहसाची जागा भित्रेपणा घेतो. कणखरता आणि शौर्य या सद-गुणांचा लोप होऊन अस्थिरता, भ्याडपणा, कचखाऊ वृत्ती अंग वर काढते. वाणी ओजस्वी न होता दुर्बल होते. रिपुंना पराजित करण्यास सरसावणारा मंगळ कुणाच्यातरी पदराआड लपण्यास अधीर होतो. निर्भीड विचारांची जागा मुळमुळीत विचार घेतात. देशाचे संरक्षण करण्यास आणि देशद्रोह्यांचा बिमोड करण्यास आघाडीवर असलेला मंगळ देशविघातक कृत्यांचा आसरा घेताना आढळतो. 
मुळातच मंगळाची वृत्ती ही एक घाव दोन तुकडे करण्याची असल्याने आणि 'तोडफोड' हेच त्याचे स्वाभाविक धोरण असल्याने असा हा मंगळ दुस्थानात, वाईट ग्रहयोगात किंवा वाईट राशी-नक्षत्रात असता त्याची वाईट बीजे अंकुरित होतात. त्यामुळे घटस्फोटाकडे, माणसे तोडण्याकडे या ग्रहाचा कल असतो. चतुर्थ स्थानातील मंगळ घरातील वातावरण सतत संतप्त ठेवण्यात यशस्वी होतो. घरात अथवा आईशी वाद-विवाद, भांडणे किंवा जमिनीवरून ( इस्टेटीवरून) कोर्ट-कचेऱ्या हे या मंगळाचे दृश्य परिणाम असतात. पण चतुर्थातील सु-स्थित मंगळ हा भू म्हणजेच जमिनीची मालकीही नि:संशयपणे प्राप्त करून देतो. सप्तम स्थानातील दु-स्थित मंगळ हा वैवाहिक सुखावर विरजण पाडतो. एकमेकांशी न पटण्याचे पर्यावसान घटस्फोटात होऊ शकते. सप्तम स्थानातील प्रतिकूल नक्षत्र-राशीतील मंगळ जोडीदारास अपघातभय दर्शवतो. पण या स्थानातील  सु-स्थित मंगळ कर्तृत्ववान, कणखर, सक्षम जोडीदारही दर्शवतो.  
हा मंगळ भावना-संवेदनाशून्य नसला तरी हा शारीरिक स्तरावर (फिजिकल लेव्हलवर) जास्त कार्यरत (active)असल्याने ही माणसे भावनांच्या सहजी आहारी जाणारी नसतात. यांचा 'practical approach' जास्त प्रकर्षाने दिसून येतो. या मंगळात सोशिक वृत्ती अभावानेच आढळून येते. जे पटणार नाही त्याला हा मंगळ जोरदार विरोध केल्यावाचून राहत नाही. हा मंगळ हुकुमशाही वृत्तीचा निदर्शक असतो. सेनापती असतो. लोकनायक असतो. जन-नेतृत्व स्वीकारण्यास सदैव उत्सुक असतो. लोक-भावना भडकवण्यासाठी जागृत असतो. शस्त्रांचे सान्निध्य त्याला आवडते. रणभूमीवर त्याच्या सामर्थ्याला वेगळीच झळाळी येते. या मंगळाची अंगकांती एखाद्या तप्त लोहासारखी असते. त्याच्या विचारांत उष्ण लाव्हा खदखदत असतो. अशा मंगळाच्या शौर्याला, क्षमतेला, अंगभूत स्वभावाला जर पोषक दिशा, भूमी आणि परिस्थिती लाभली नाही तर त्याची प्रखरता , दाहकता घरच्या घरीच वणव्यासारखी पसरू शकते आणि तीत नात्यांची राख-रांगोळी झाल्याशिवाय राहत नाही. 
तथापि शनी-गुरु सारख्या ग्रहांच्या योगांत अथवा दृष्टींत या मंगळाचे अवगुण थोडे शमू शकतात. त्याच्या दाहकतेस, विघातक, विध्वंसक वृत्तीस थोडा चाप बसू शकतो. शनीसारखा संयमी, धीरगंभीर आणि शीततत्वाचा ग्रह मंगळासारख्या अग्नितत्वाच्या प्रवृत्तीस काही प्रमाणात शांत करू शकतो. गुरूची सात्विकता, सहिष्णू आणि विवेकी वृत्ती मंगळाच्या अतिरेकाला, अतिक्रोधाला चांगले वळण लावू शकते.    
असा हा साधक-बाधक मंगळ! कधी शत्रूंना चारी मुंड्या चीत करून आपल्या शौर्याचे रणशिंग फुंकणारा तर कधी समाजविघातक कृत्ये करून आपल्याच देशात रक्ताचे पाट वाहणारा! समाज संवर्धनासाठी, धर्म प्रसारासाठी विवेकानंदांच्या ओजस्वी वाणीतून दुमदुमणारा तर हिटलर, स्टालिन, मुसोलिनीच्या रूपाने भयंकर नरसंहार घडवणारा ! कधी एखाद्या कुशल सर्जनच्या बोटांतून रोग्याला नव-संजीवन देणारा तर कधी याच शस्त्रास्त्रांनी निरपराध्यांचा शिरच्छेद करणारा!  कधी देशाचे प्राणपणाने संरक्षण करणारा तर कधी देशांतर्गत भीषण बॉम्बस्फोटांनी मानवी देहाच्या चिंधड्या उडवणारा! कधी आपल्या वैचारिक प्रखरतेने अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरांचा बिमोड करून नव-विचारांचा पायंडा घालणारा तर कधी याच रुढींच्या, चालीरीतांच्या आधाराने आपल्याच रक्तातील नात्यांचे शिरकाण करणारा!    
बुधाइतकाच पृथ्वीच्या जवळ असलेला हा मंगळ जितका जास्त अभ्यासाल तितका जास्त उलगडेल! 





Tuesday, 24 April 2012

काकस्पर्श

या शीर्षकाचा महेश मांजरेकर कृत चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे असे ऐकिवात आहे. असो. साधारणत: श्राद्धसंस्कारांच्या वेळी, पिंडदान करतेसमयी या काक म्हणजेच कावळ्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते. कावळा पिंडाला शिवला की मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा अडकलेला श्वास मोकळा होतो. तिची किंवा त्याची पश्चात काही इच्छा, वासना राहिली नसावी म्हणूनच तर इतक्या लवकर पिंडाला कावळा शिवला अशी आपण आपली समजूत करून घेतो. ( कावळा पिंडाला लवकर शिवला नाही तर दर्भाचा कावळा करून त्यास पिंडाला शिवायला लावणे अशीही सोय असतेच की!) 
वास्तविक पाहता इच्छा, वासना असते म्हणूनच जन्म-मृत्युच्या भोवऱ्यात माणूस पुनश्च गटांगळ्या खात असतो. अगदी म्हातारा होऊन जरी माणूस गेला तरीही त्याची काहीतरी इच्छा ही उरलेली असतेच. काहीतरी शिकायचे, कुणाशीतरी बोलायचे, कुणाची माफी मागायची राहून गेलेली असते.आयुष्यभर पैसा पैसा करत वेडीवाकडी वणवण केलेली असते. वारेमाप खस्ता खाल्लेल्या असतात. निवांत क्षण असे आयुष्यात फारसे वाट्याला आलेलेच नसतात. रिटायर्ड आयुष्य असे घालवू न तसे घालवू असे मनसुबे कित्येकदा रचलेले असतात. पाण्याच्या सपाट्याने नितळ वाळूवरील अक्षरे एकदम पुसून जावीत असेच काहीसे भाग्य त्या मनसुब्यांच्या वाट्याला आलेले असते. आपण रिटायर होतो काय आणि अवघ्या सहा महिन्यांनी पत्नीचा देहांत होतो काय! क्षणार्धात मुलगा-सून आणि त्यांचा संसार आपल्याला एकदम परका वाटू लागतो. त्यांचे आणि आपले ट्युनिंग जमूच शकत नाही असे वाटू लागते. आपला नातू लहान असेपर्यंत आपल्या अवतीभवती घोटाळत असतो. पण कालौघात तोही मोठा होतो आणि आपले वर्तुळ आपल्यापुरते सीमित होऊन जाते. 
माणूस कोणत्याही वयात गेला तरी शोक हा होतोच. वय वेगळे असते, मृत्यूची निमित्ते वेगवेगळी असतात पण जी नाती आपण आयुष्यभर जोपासलेली असतात त्या नात्यांपासून सहजासहजी विरक्त होता येत नाही. सण-समारंभ, नैमित्तिक कर्मकांडे, पूजाअर्चा या प्रथांकडे निवृत्त मनाने पाठ फिरावावीशी वाटत नाही. एखाद्या म्हाताऱ्या आजींचे मनही लोणच्याच्या बरणीपाशी , ताक-दह्याच्या घुसळणीपाशी सारखे घुटमळत राहते. ऑफिसमधून सन्मानाने निवृत्त झालेला किंवा झालेली प्रपंचातून कृतार्थ मनाने निवृत्ती स्वीकारू शकत नाही. कितीही पोथ्या वाचा, कीर्तने करा, पारायणे करा, प्रवचनाला जा, मनाला वानप्रस्थाश्रमी होणे मान्य नसते.  त्यामुळेच माणूस गेला आणि त्याच्या पिंडाला कावळा शिवला म्हणजे त्याची कोणतीही इच्छा-वासना अपुरी राहिली नाही हे तितकेसे तर्कसंगत वाटत नाही. 
एवढ्या मोठ्या विश्वात अगदी नगण्य रूपाने आपण वावरत असतो. आपले अस्तित्व एखाद्या छोट्याशा ठिपक्याएवढे असते. एखाद्या मोठ्या मॉलमध्ये शिरताक्षणी लहान मूल अगदी झपाटून जाते. प्रत्येक खेळणे त्याला बोलावत असते. त्याच्या आई-वडिलांच्या खिशाचा विचार त्याच्या चिमुकल्या मनात डोकावतही नाही.त्याला जे पाहिजे त्यासाठी ते एकतर हट्ट तरी करते अथवा आपल्या गोड बोलांनी ते खेळणे मिळवते. पण एक खेळणे जरी मिळाले तरी त्याचे मन मात्र अनेक खेळण्याभोवती गुंतून पडलेले असते. पुढच्या वेळेस कोणते खेळणे घ्यावयाचे याबद्दलचे बेत त्याचे मन रचत असते. या विश्वाच्या अफाट पसाऱ्यातील आपणही मुलच असतो. अनेक विलोभनीय दृश्ये ,ठिकाणे  आपल्याला पहायची असतात, यशाची अनेक शिखरे आपल्याला सर करायची असतात, लौकिकाच्या, प्रतिष्ठेच्या, बरकतीच्या मार्गावरील कैक खेळणी आपल्याला खुणावत असतात. सुबत्तेच्या पायघड्यांवरून आपल्याला मार्गक्रमणा करायची असते,  घरीदारी आनंदाच्या कारंज्यात आपल्याला डुंबायचे असते. पण नशिबाचे, नियतीचे बेत मात्र गुलदस्त्यात असतात. त्याची उकल आपल्याला वर्षागणिक आणि वयागणिक थोडीबहुत होत जाते. काही स्वप्ने पूर्ण होतात तर काहींना तिलांजली द्यावी लागते. आज ना उद्या हे करू असे म्हणताना आयुष्य वाळूच्या कणासारखे मुठीतून झरझर निसटत जाते. 
अनेक वर्षे बायका आपल्या इच्छा-आकांक्षा ओठांबाहेर न येऊ देता मन मारून जगलेल्या असतात. पतीसाठी करणे, मुलांसाठी करणे यात पाउण आयुष्य निघून गेलेले असते. म्हातारपण हे जणू पोथ्या-प्रवचनासाठीच आरक्षित केल्यासारखे या बायका जगत असतात. अनेक गोष्टींचा आस्वाद घ्यायचे राहून गेलेले असते. खेळ-साहित्य-गाणे-चित्रकला-पाककला-भरतकाम-अभिनय हे आणि असे अनेक वैयक्तिक छंद जोपासायचे राहून गेलेले असतात. नंतर करू, नंतर करू असा विचार करता करता आयुष्याची संध्याकाळ झालेली असते. आता उरलेला वेळ नामस्मरणात घालवावा असा त्यांच्या परीने सुज्ञ विचार बायकांनी जरी केला तरीही मनाच्या तळाशी या न केलेल्या पण त्यावेळी कराव्याशा वाटलेल्या गोष्टी ठाण मांडून असतातच! कुठे चांगले चित्र-प्रदर्शन पहिले अथवा कुणा नामवंताच्या गाण्याला हजेरी लावली की मनोमन आपण शिकलो नाही याची खंत वाटतेच वाटते. पूर्तता न झालेल्या या सर्व इच्छांची उजळणी मनातल्या मनात अव्याहत होत राहते. 
ज्या व्यक्तीच्या वासनांचा संपूर्णपणे क्षय झाला आहे अशी व्यक्ती एकतर या भूतलावर सापडणे अशक्यप्राय गोष्ट आहे अथवा ही व्यक्ती प्रापंचिक चौकटीतून सर्वस्वी मुक्त होऊन परमार्थाच्या मार्गावर चालली आहे असे मानायला हरकत नाही. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत एखादीतरी क्षुल्लक का होईना इच्छा ही राहतेच! कुणाला नातवंडाचे तोंड बघायचे असते, कुणाला परदेशात कायमच्या स्थायिक झालेल्या आपल्या मुलाला डोळे भरून पहायची इच्छा असते, कुणाला आपल्या मुलाला आयुष्यात यशस्वी झालेले पाहायचे असते तर कुणाला आपल्या मुलाला व्यसनमुक्त झालेले! अगदी गंभीर आजारी असलेल्या माणसालादेखील  विशिष्ट पदार्थ खायची प्रचंड इच्छा होते. ते पदार्थ त्याच्यासाठी वर्ज्य असे तरी! जसे मूल जन्म घेते तशा मनातील इच्छाही जन्म घेतात. कालपरत्वे मुलाचा माणूस होत जातो आणि मनातील इच्छांचा आवाका वाढत राहतो. माणसामाणसागणिक इच्छा जरी भिन्न असल्या तरीही त्याची पूर्तता करण्यासाठी माणूस कधी स्वत:शी, कधी परिस्थितीशी तर कधी  अवतीभवतीच्या माणसांशी झुंजत  राहतो. तरीही काही इच्छा या अपूर्णच राहतात. 
शेवटी देह म्हणजे या इच्छांची पूर्तता करण्याचे एक माध्यम असते. वर्षानुवर्षांच्या, जन्मानुजन्मांच्या आत्म्यावर झालेल्या संस्कारांतून या इच्छा-वासना उदय पावलेल्या असतात. जोवर शरीर असते तोवर या इच्छांना मूर्त स्वरूप लाभणे शक्य असते. ज्या क्षणी देहातून प्राण म्हणा किंवा जीव म्हणा निघून जातो आणि लौकिकार्थाने शरीर अचेतन होते त्या अवस्थेत कोणत्याही इच्छांची पूर्तता होणे हे संभव नसते. पण अमूर्त स्वरुपात, साठवणीच्या रुपात या इच्छा-वासना असतातच! त्याचा क्षय होत नाही फक्त आता त्या माध्यमाअभावी प्रकट होऊ शकत नाहीत.  ज्या अंतस्थ प्रेरणा घेऊन माणसे यशाची शिखरे पादाक्रांत करतात त्या प्रेरणांचा उगम कोठून होतो? कुणाला आकाशातील ग्रहगोल अभ्यासावेसे वाटतात तर  कुणाला या ग्रहगोलांचे मानवी आयुष्यातील महत्व जाणून घ्यावेसे वाटते. नेमके अमुक एकाच विषयाचे मनन किंवा अध्ययन आतील प्रेरणेशिवाय होणे हे असंभव आहे. ही आतील प्रेरणा , हा स्त्रोत नक्की येतो कुठून? याविषयी अनेकजण अनभिज्ञ राहणेच पसंत करतात. अंतर्मन, सिक्स्थ सेन्स, इंट्युशन या शब्दांचा नक्की आधार कोणता? बरेचजण या अंतस्थ उर्मींना उपहासिक दृष्टीने  बघतात. पिंडाला कावळा शिवला त्यामुळे आता मृत व्यक्तीची कोणतीही इच्छा शिल्लक राहिली नाही असे मानणारे प्रतिगामीच आज संख्येने अधिक आहेत. 
देह निवर्ततो, इच्छा नाहीत. शरीराचे निर्वाण होते, वासनांचे नाही. कारण प्रत्येक शरीरागणिक जर मानवी इच्छा-वासनांचाही क्षय झाला असता तर नरजन्माचे प्रयोजनच उरले नसते. काही महापुरुषांनी लोककल्याणासाठी देह धारण केला तर काही नराधमांनी मानवतेला पायदळी तुडवण्यासाठी! चौऱ्याऐंशीलक्ष योनीं फिरून येणारा मानवाचा जन्म हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. या अशा अनेक जन्मांतील बऱ्या-वाईट संस्कारांची बीजे मनुष्य जन्माबरोबर इच्छा-आकांक्षांत परावर्तीत होतात. या जन्मात ज्या इच्छा केवळ बिजस्वरुपातच राहतात त्यांच्या पूर्ततेसाठी पुनश्च देह धारण करणे क्रमप्राप्तच असते. भगवान श्रीकृष्णांनी पार्थाला केलेल्या गीतोपदेशात ते म्हणतात, 'जो जन्माला आला त्याचे मरण निश्चित आहे आणि जो मृत्यू पावला त्याचा जन्मही निश्चित आहे'. कोर्टात खरे बोलण्यासाठी या गीतेच्या महान ग्रंथाचा उपयोग केला जातो पण त्यात सांगितलेले तत्वज्ञान मात्र बहुतेककरून डोळेझाक करण्यासाठीच असते, ते आचरण्यासाठी नसते असा कित्येकांचा  एक गोड गैरसमज असतो.  
त्यामुळे मरणोत्तर काकस्पर्श हा माणसांत लपलेल्या इच्छा-वासनांची जाणीव करून देणारा असतो, त्यांना पूर्णविराम देणारा नसतो. 

Thursday, 19 April 2012

उन्हाळी वरदान

प्रत्येक सिझनला एकेक आजार नेमून दिलेले आहेत. थंडी-पावसाळ्याकडील आजार हे साधारणत: ताप-सर्दी-खोकल्याशी संबंधित असतात. उन्हाळ्यातील आजार हे उष्णतेच्या विकारांशी! ठुसठूसणारी गळवे ही उन्हाळ्याने दिलेली एक मौलिक व्याधी आहे. ही वेदनादायी गळवे शरीरावर कुठेही बिनदिक्कत त्यांचा हक्क सांगू शकतात. त्यांच्यावर औषधी लेप लावा,त्यांना शेका, त्यांना गोंजारा शरीराला अथक वेदना देण्याचा त्यांचा परिपाठ सुरूच राहतो, परिपाठाच्या काढ्यालाही न जुमानता!
सध्या अशा एका गळवाने माझ्या नाकात त्याचे बस्तान मांडले आहे. सुरवातीस नाकात थोडे दुखू लागल्यावर मला वाटले की माळीण आली आहे. मग मी हुंगायला म्हणून गजरा आणला. खोल श्वास घेत गजरा हुंगला खरा पण त्याने नाकामध्ये दुखायचे काही थांबले नाही. त्यानंतर अधिकच दुखू लागले आणि मी नॉस्टेल्जीक झाले. मला माझे लहानपण आठवले. माझी वार्षिक परीक्षा जवळ यायची आणि न चुकता हे गळू माझा कान, माझे नाक, माझा डोळा किंवा माझी पाठ शोधायचे. डोळ्यावर गळू मिरवत मी अनेकवेळा परीक्षा दिलेल्या आहेत. केस सारखे करताना म्हणा किंवा कोणाचा सहज थोडा जरी धक्का लागला की ही गळू नावाची व्यथा आपले अस्तित्व भयंकररित्या जाणवून द्यायची. मग कोणी म्हणतंय म्हणून चंदनाचा लेप लाव, कैलास जीवन लाव, बर्फ फिरव, कधी कोणी सुचवलं म्हणून पापड (मिरीचा) ओला करून त्याचे पोटीस लाव असे नाना प्रकार करूनही गळू 'जैसे थे' च असायचे. अखेर गळू माझा नाद सोडत नव्हते म्हणून मग मीच त्याचा नाद सोडून देऊ लागले. त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागले. ठुसठूसणाऱ्या वेदनांचे स्वागत करू लागले. 
या गळू नामक व्याधीने शरीरावरील आपली जागा एकदा पक्की केली की मग त्या दृष्टीने त्याच्या हालचाली सुरु होतात. ती जागा लालसर होते. तिथे दुखू लागते. हळूहळू त्या व्याधीला एक निश्चित आकार येतो. छोट्या डोंगराचा! वर त्याचे तोंड असते. लालसर-पिवळ्या रंगाचे, त्यावर एक ब्युटी-स्पॉट सारखा काळ्या रंगाचा ठिपका उगवतो. आजूबाजूचा भाग हाताला गरम लागतो आणि थोडा सूजट दिसतो. त्या व्याधीचे हे रूप आपण येत-जाता न्याहाळत बसतो. चेहऱ्यावर गळू दिसले की जो तो हे काय आलंय गं  हे त्या बिरबलाच्या गोष्टीतील आंधळ्या डोळसांसारखे प्रश्न विचारत राहतो. गळू ठणकू लागते आणि आपल्या शरीराला ठणकणे ही एकच गोष्ट इमाने-इतबारे करता येते असे आपल्याला वाटते. उठता-बसता आई गं, आ अशी बाराखडी सुरु होते. लोक निरनिराळे उपाय सुचवत राहतात आणि आपण ते श्रद्धेने करत राहतो. आपल्या आधीच ठणकणारया गळवाला कुणाचा चुकूनमाकून हात लागायला नको म्हणून आपण त्याला विलक्षण जपत असतो. ते दिसामाशी तट्ट फुगत राहते आणि आपण असहाय होऊन जातो. 
अखेरीस त्याला हवे तेव्हाच ते आपली पाठ सोडते आणि इतके दिवस आपली झालेली वेदना परकी होते. आपण गळूमुक्त होतो. आपण साडी-खरेदी एन्जॉय करू शकतो. आपण टी.व्ही वरील सास्वा-सुनांची भांडणे आता चवीने बघू शकतो. आपण मैत्रिणींबरोबर आनंदाने गॉसिप करू शकतो. आपण भाजी विक्रेता,फळवाला,रिक्षावाला, बस कंडक्टर, वाणी, मोची, दूधवाला,धोबी अशा लोकांशी हिरीरीने वादू शकतो. आपल्या या आनंदावर इतके दिवस गदा आलेली असते. कारण कुठेही गेलं तरी गळू ही एक वेदना आपल्याला व्यापून दशांगुळे उरलेली असते. त्यामुळे आपल्या स्वाभाविक उर्मी दबून गेलेल्या असतात. आपला चेहरा वस्तू-संग्रहालयातील एक नमुना झालेला असतो.  
या दरम्यान बाह्योपचार तर सुरु असतातच शिवाय आपण सतत दुध-दही-ताक रिचवत असतो. फळांचे रस पीत असतो. सब्जा -तुळशीचे बी यांना प्राधान्य देत असतो. बर्फाने शेकत असतो. गारेगार गोष्टींचा भडीमार करत असतो. ठणकणारे गळू कालांतराने  भुईसपाट, चारी मुंड्या चीत होते आणि आपल्याला विजयोन्माद होतो. त्याला कसे पिटाळून लावले याच्या सुरस कहाण्या आपण इतरांना सांगण्यात गर्क असतो आणि एखाद्या बेसावध क्षणी मागील दराने सर्दी आल्याची वर्दी देते. आपले नाक गळक्या पाईपलाईन सारखे वाहू लागते. आता दुध -हळद आणि अशा अन्य कोणत्या उपायांनी सर्दीला पिटाळून लावायचे या विवंचनेत आपण हरवून जातो. 

Monday, 16 April 2012

समस्त पालकांना उद्देशून...........

१८ वर्षाचा मुलगा अथवा मुलगी कायद्याच्या दृष्टीने सज्ञान मानले जातात म्हणजेच स्वतंत्र निर्णय घेण्याच्या त्यांच्या क्षमतेवर कायदेशीर शिक्कामोर्तब होते. तरीही अनेक पालक अजून तू लहान आहेस, तुला काय कळते यातले, वेड्यासारखा वागू नकोस अशा अर्थाची वाक्ये सतत त्यांच्यासमोर उच्चारत असतात.  
मोठे होणे म्हणजे इथे नुसते वयाने मोठे होणे हे अभिप्रेत नसून बुद्धीने, सारासार विचारक्षमतेने आणि अनुभवाने असा अर्थ यात अध्याहृत असतो. वयानुसार भले-बुरे अनुभव येत जातात आणि जगाबद्दल, लोकांबद्दल एक मत आकारास येते. प्रत्येक व्यक्तीच्या अनुभवानुसार ही मते निश्चितपणे वेगळी असू शकतात. जे आईचे मत तेच मुलीचे वा जे वडिलांचे मत तेच मुलाचे असावे असा आग्रह असू नये. 
आपल्यापैकी बहुतेक सगळेच पालक मुलांच्या भवितव्यविषयी उत्सुक असतात आणि हे स्वाभाविक आहे पण मुलांच्या काही निर्णयांमुळे उत्सुकतेची जागा साशंकता घेते आणि मग मुलांच्या निर्णयात ढवळाढवळ करण्याची बहुतांश पालकांची उर्मी एकदम उफाळून येते. तू हा कोर्स घेऊ नकोस तू हाच घे हे सांगण्यामागे एक सुप्त भीती दडलेली असते. जो कोर्स तो मुलगा करू इच्छित आहे त्या कोर्सविषयी ठोस अशी माहिती पालकांना नसते आणि ती मिळवण्याची गरजही त्यांना वाटत नाही. पण कुणीतरी तमक्याने तो कोर्स घेतला होता आणि त्याला त्यात यश आलं नाही म्हणा किंवा पुढे त्या कोर्सला चांगले व्यावसायिक भविष्य नाही हे त्यांनी कधीतरी ऐकलेले असते. त्यामुळे आपल्या मुलानेही हा कोर्स करू नये असे त्यांना वाटते. हे वाटणे इथेच थांबत नाही. मग ह्या विशिष्ट कोर्सविषयी सर्व नकारात्मक विचार त्या मुलाच्या मनात भरवले जातात नुसते एवढेच नाही तर त्याने कोणता कोर्स करावा याविषयीची मते त्याच्यावर वारंवार थोपवली जातात. त्याची सज्ञानता मतदान करण्यापुरतीच सीमित राहते. मित्रांची मते, पालकांची मते आणि आजूबाजूची परिस्थिती हा विषमभुज त्रिकोण त्याला भेडसावू लागतो.  
माझ्या मैत्रिणीच्या मुलाला केटरिंगला जायचे होते. आपल्या मुलाने केटरर व्हावे हे वडिलांना अजिबात पसंत नव्हते. आज माझी पोझिशन बघ, ऑफिसात एवढ्या मोठ्या पोस्टवर असलेल्या वडिलांचा एकुलता एक मुलगा केटरर आहे असे चारचौघांत सांगायला मला बिलकुल आवडणार नाही. तू एम.बी.ए हो. वडिलांनी झटक्यात सांगून टाकले. आईनेही वडिलांचीच री ओढली. ती हाउसवाईफ असल्याने तिचे जग फारच सीमित होते. शिवाय नवऱ्याच्या विरुद्ध जाऊन मुलाच्या निर्णयाचे स्वागत करणे  तिला मंजूर नव्हते . शिवाय नवऱ्याचा हुद्दा बघता तो सांगेल ते योग्यच असेल असे तिला वाटत होते. तो मुलगा निराश झाला. घरी कुणाशीही बोलेनसा झाला. दिवस-रात्र बाहेर राहू लागला. सिगारेटी फुंकणे सुरु झाले. चेहरा ओढल्यासारखा, डोळे खोल गेलेले, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होऊ लागले. शरीरावर परिणाम दिसू लागला. त्याच्या मित्रांनी घरी येऊन आईला त्याच्या मानसिक स्थितीची कल्पना देऊन त्याच्या वडिलांचे मन वळवायला सांगितले. आई घाबरून गेली आणि तिने वडिलांच्या कानावर हा प्रकार घातला. वडिलांनी कानाडोळा केला आणि काही दिवसांनी तो ताळ्यावर येईल असे सांगून तिला दिलासा दिला. या घटनेनंतर बरोब्बर आठ दिवसांनी हा मुलगा घरातून निघून गेला. कोणतीही चिठ्ठी-चपाटी त्याने लिहून ठेवली नाही. तुझ्या लाडाने तो बिघडला, तुम्ही नाही म्हणालात म्हणून तो निघून गेला असे एकमेकांवर आईवडिलांचे दोषारोप करून झाले. दोघेही पोलीस स्टेशनात वाऱ्या करू लागले. नातेवाईक, आजूबाजूचे, ऑफिसमधले सर्वांपर्यंत बातमी पोहोचली. सांत्वनाच्या  निमित्ताने लोक घरी येऊन चाचपणी करू लागले. टी.व्ही.वर फोटो दाखवला गेला. पेपरमध्ये आई-वडिलांचे 'असशील तसा निघून ये. आई फार आजारी आहे' अशी विनंतीही छापून आली. वडिलांची 'इमेज आणि इभ्रत' नको त्या प्रकारे चव्हाट्यावर आली. त्याची आई भकास दिसू लागली. तिला हे आयुष्य नकोसे वाटू लागले. मुलाला सपोर्ट करायला हवा होता असेही वाटू लागले. ती तिच्या नवऱ्याशी बोलेनाशी झाली. त्याच्या मित्रांनीही तोंडात मिठाची गुळणी धरली होती.  अखेर तपासांती काही महिन्यांनी त्या मुलाचा शोध लागला. तो गोव्याला होता. सुखरूप होता. त्याच्या मित्रांनी त्याला थोडी आर्थिक मदत केली होती. गोव्याला एका हॉटेलवर तो रुजू झाला होता आणि साईड बाय साईड त्याच हॉटेलमध्ये केटरिंगचा कोर्सही करत होता. आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला. मुलाने स्वत:च्या जीवाचे काही बरे-वाईट केले नाही हे पाहून त्यांना उभारी आली. आई-वडील त्याला आणायला गेले. पण मुलाने हा कोर्स पूर्ण करीन आणि मगच घरी येईन असे निक्षून सांगितले. मुलगा हातचा जाता जाता राहिला ह्या गोष्टीवर त्याच्या पालकांनी समाधान मानले. इतर पालकांसाठीही हा धडाच होता. 
बरेच पालक मुले मोठी झाल्यानंतरही मुलाने काय खावे-प्यावे, कोणत्या वाहनाने प्रवास करावा अथवा करू नये, कोणत्या प्रकारचे मित्र-मैत्रिणी निवडाव्यात, रस्ता क्रॉस कसा करावा, कोणते सिनेमे बघावेत, कोणते कपडे घालावेत, कोणत्या हॉटेलांत जावे, कोणता व्यावसायिक कोर्स निवडावा,कोणते खेळ खेळावेत या किंवा अशा बहुतेक गोष्टींवर अकारण आपले मतप्रदर्शन करत राहतात. आपले मुलाविषयीचे प्रेम हे आधी अधिकारात आणि नंतर काळजीत, अतिकाळजीत, चिंतेत आणि मग व्यथेत रुपांतरीत होत राहते.  
आपली मुले जोवर लहान आणि अज्ञ असतात तोवर त्यांना पंखांखाली सुरक्षित ठेवणे योग्य असते पण एकदा का ती सज्ञान झाली की ती विचारपूर्वक आपले निर्णय घेऊ शकतात. ती व्यकी म्हणून स्वतंत्र असतात. तुमच्या मार्गदर्शनाची त्यांना गरज असते पण तुमचा त्यांच्या आयुष्यातील अवाजवी हस्तक्षेप त्यांना आवडत नाही. ठराविक वयानंतर त्यांना लहानांसारखी वागणूक दिलेलीही खपत नाही. त्यांची गाडीही चांगल्या-वाईट स्टेशनांवरूनच पुढे सरकणार असते. त्यांच्या विचारांनी दिशा आणि गती पकडलेली असते. त्यांचे सहप्रवासी होणे ठीक असते पण त्यांच्या विचारांची सीट बळकावू पाहणे हे त्यांच्या सज्ञानतेवर , स्वतंत्रतेवर अतिक्रमण केल्यासारखे होते.  तुमच्या अनाहूत सल्ल्यांचा बुलडोझर त्यांच्या कोवळ्या पण सक्षम मनावर फिरतो आणि त्यांची स्वप्ने क्षणार्धात धुळीला मिळतात. या वडिलकीच्या वादळाच्या तडाख्यातून काहीजण सावरतात तर काही न परतण्याची वाट जवळ करतात. म्हणूनच सज्ञान मुलांचे मित्र जरूर व्हा पण तुमच्या पालकत्वाचे ओझे त्यांच्यावर लादून त्यांचे स्वतंत्र व्यक्तित्व गुदमरू देऊ नका. त्यांच्या उमलण्याचा आनंद घ्या पण त्यांच्या उमलण्याच्या वाटेतील काटे होऊ नका. त्यांच्या निर्णयाचे खुल्या दिलाने स्वागत करायला शिका. तुमच्या इच्छा-आकांक्षा यांची पूर्तता करण्याचे ते हुकमी एक्के नाहीत ही खुणगाठ मनाशी पक्की बांधा. त्यांनाही टक्के-टोणपे खाऊ द्या. त्यांनाही उन्हाचे चटके लागू द्या. त्यातूनच त्यांचे बावनकशी सोने तावून-सुलाखून बाहेर येईल याची खात्री बाळगा. 

Friday, 13 April 2012

मीनाकुमारी- पडद्यामागची शोकांतिका

१९३२ ते १९७२ असा उणापुरा चाळीस वर्षांचा मृत्यूलोकातील प्रवास तिने केला. तिच्या जन्मापासूनच दुर्दैवाने तिची सोबत केली. ती जन्माला आली खरी पण आई-वडिलांच्या गाठी पैसेच नसल्याकारणाने तिला एका मुस्लीम अनाथाश्रमात सोडून यावे लागले. नंतर त्यांनी तिला घरी आणले. ज्या वयात मुले शाळेत जातात त्या वयात लहानगी मीना वडिलांबरोबर अनिच्छेने चित्रपट स्टूडीओच्या पायऱ्या चढू लागली. तिला शाळेत जाऊन इतर मुलांसारखे शिकायचे होते. त्यासाठी ती तळमळत असायची. पण नियतीचे बेत काही वेगळेच होते. वयाच्या सातव्या वर्षापासून बेबी मीना चित्रपटांत बाल-कलाकार म्हणून दाखल झाली.  
ती एकटीच तिच्या कुटुंबाची पोषणकर्ती होती. तिचे वडील उर्दू कविता करायचे, हार्मोनियम वाजवायचे, चित्रपटांत क्षुल्लक भूमिकाही करायचे पण त्यांची  निश्चित स्वरुपाची आवक नसल्याने मीनाच्या लहानशा खांद्यांवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. तिला दोन बहिणीही होत्या. आज जशा मुला-मुलींना त्यांच्या नोकरदार आई-वडिलांकडून वेगवेगळ्या आर्थिक सुविधा उपलब्ध होतात, तशा मीनाकडून मीनाच्या कुटुंबियांना मिळत होत्या.
बैजू बावरा, आझाद, कोहिनूर अशा काही चित्रपटांतून मीनाकुमारीचे लोभस दर्शन प्रेक्षकांना घडले. छोट्याच्या चणीची, निरागस, खट्याळ, प्रेमळ, त्यागी, रुपात विलक्षण गोडवा असलेली मीनाकुमारी पडद्यावर वेगवेगळ्या स्वरुपात अनुभवायला मिळाली. काही निखळ विनोदी भूमिकाही तिच्या वाट्याला आल्या पण पडद्यावर तिने साकारलेल्या 'शोक'नायिकेलाच प्रेक्षकांनी उचलून धरलं. डोक्यावरून पदर घेतलेली, कपाळावर मोठं कुंकू लावलेली 'भाभी की चूडिया' मधील तिची शालीनता पाहून ही मुस्लीम आहे हे मानायला मन तयार होतंच नव्हतं. ती तिने साकारलेल्या जवळजवळ प्रत्येक भूमिकेत चपखल बसायची. 'दिल एक मंदिर' मध्ये तिने साकारलेली विवाहितेची भूमिका सहजसुंदर, मन हेलावून टाकणारी होती. पतीच्या मृत्युच्या चाहूलीने अंतर्बाह्य व्यथित झालेली आणि पतीवर उपचार करणारा तिचा लग्नाआधीचा प्रियकर असल्याने जुन्या आठवणींनी व्याकूळ झालेली तसेच आपल्या पतीवर आपल्या प्रियकराकडून योग्य ते उपचार होतील ना या साशंकतेने सैरभैर झालेली व्यक्तिरेखा तिने उत्कृष्टपणे साकार केली. तिची पाकीजामधील साहिबजानही काळजात घट्ट रुतून बसली. साहब बीबी गुलाम हा तर तिच्या अभिनयसंपन्नतेचा परमोच्चबिंदू होता. तिने पडद्यावर साकारलेली छोटी बहु ही एकमेवाव्दितीय आहे. चित्रलेखा, बहुबेगम, गझल, दिल आपण और प्रीत पराई, मी चूप रहूंगी, शारदा, काजल अशा अनेक चित्रपटांतून मीनाकुमारी ने दर्जेदार अभिनयाने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. अनेक परितोषकांनी  ती सन्मानित झाली.       
 तिचे स्वत:चे शिक्षण झाले नसले तरीही ती कवीमनाची होती. उर्दू शेरो-शायरी उत्कृष्ट पद्धतीने करत होती. अनेक नझ्म तिने गायल्याही! पण तिच्या अतिसंवेदनशील कविमनाला वास्तवातील आघात पेलवले नाहीत. ती उन्मळून पडली. मदिरेच्या आहारी गेली. तिला जगाची शुद्ध राहिली नाही. 
१९५३ साली वयाने पंधरा वर्षे वडील असलेल्या आणि विवाहित असलेल्या दिग्दर्शक कमाल अमरोहीशी ती विवाहबद्ध झाली. सुरवातीची काही मोजकी वर्षे जरा बरी गेली पण नंतर दोघांमधील वैचारिक अंतर वाढू लागले. त्यानंतर अवघ्या सात वर्षांनी म्हणजे १९६० साली त्यांची वैवाहिक कारकीर्द घटस्फोटापर्यंत पोहोचली. अनेक तरुण प्रलोभनांना ती बळी पडली. तिच्या आयुष्याचे तारू येणाऱ्या वेड्यावाकड्या लाटांवर हेलकावत दिशाहीन भरकटत चालले. १९६४ साली घटस्फोटावर कायदेशीर शिक्कामोर्तब झाले आणि मीनाकुमारी नैराश्याच्या गर्तेत खोल बुडाली. ती वारेमाप पिऊ लागली. तिच्या वागण्याला कोणताही घरबंध राहिला नाही. मानसिक तसेच शारीरिक अध:पतन सुरु झाले. 
१९६४ च्या दरम्यान ती गंभीररित्या आजारी झाली. पिण्याचा तिच्या लिव्हरवर अतिशय वाईट परिणाम झाला होता. तिला उपचारांसाठी लंडनला नेण्यात आले.त्यातून ती कशीबशी सावरली आणि चित्रपटांतून चरित्र अभिनेत्री साकारू लागली. 'मेरे अपने' या चित्रपटातून तिने लक्षणीय भूमिका साकारली. १९५६ साली सुरु केलेल्या पाकीजाचे चित्रीकरण पूर्ण झाले नव्हते. स्व.सुनील दत्त आणि नर्गिस यांनी पाकिजा चित्रपटाची काही रिळे पहिली आणि कमाल अमरोहींना हा चित्रपट पूर्ण करण्याची विनंती केली. मीनाकुमारीची अवस्था त्यावेळेस बिकट होती परंतु त्याही अवस्थेत तिने जिद्दीने उरलेले, रखडलेले चित्रीकरण पूर्ण केले आणि अखेर तब्बल सोळा वर्षांनी, १९७२ साली हा चित्रपट रसिकांसाठी खुला झाला.  ३१ मार्च १९७२ साली मीनाकुमारीने जगाचा निरोप घेतला. ज्या निर्धन अवस्थेत ती जन्मली त्याच निर्धन अवस्थेत ती गेली. ती गेल्यानंतर हा चित्रपट बघायला प्रेक्षकांची अमाप गर्दी लोटली. 
लोकांनी तिला व्यभिचारी, चरित्रहीन अशी अनेक लेबले लावली. तिच्या पिण्यावरही भरपूर टीका झाली पण जे आयुष्य तिच्या वाट्याला आलं त्या तिच्या आयुष्याबद्दल किती जणांना समानुभूती वाटली? तिची शिकण्याची इच्छा मारली गेली. संपूर्ण कुटुंबासाठी तिने तिचं आयुष्य पणाला लावलं. चेहऱ्याला रंग फासून ती उभी राहिली म्हणून तिचे आई-वडील, भावंडे यांना जगता आले, वावरता आले. ती व्यसनाधीन म्हणून लोक तिचा तिरस्कार करत होते पण तिने सोसलेल्या दु:खाचा, असहायतेचा, कष्टाचा, मानहानीचा अन्वय लावायचा कुणी साधा प्रयत्नही केला नाही. वयाने एवढ्या वडील असलेल्या माणसाशी तिने लग्न का केलं हे जरी इतरांच्या दृष्टीने अनाकलनीय असले तरी तिला प्रापंचिक सुख हवे होते, मुलेबाळे हवी होती, आर्थिक स्थैर्य, कौटुंबिक जिव्हाळा हवा होता. तिने अपेक्षिलेल्या बहुतांश गोष्टी तिला मिळाल्या नाहीत आणि मग त्या मिळवण्यासाठी तिची केविलवाणी धडपड, तगमग सुरु झाली. प्रेम हवं म्हणून ती प्रलोभनांना शरण गेली. ते मिळालं नाही तेव्हा तिने दारूला आपली जिवाभावाची सखी मानली.  
आज मीनाकुमारीला जाऊन चाळीस वर्षे लोटली. तिच्या समकालिनांनी तसेच अनेक नवनव्या तारकांनी चित्रपटसृष्टी आपापल्या वकुबाप्रमाणे गाजवली. पण 'रुक जा रात ठहर जा रे चंदा' हे गीत जेव्हा कानाचा कब्जा घेतं तेव्हा वाटतं ती अजून जरा थांबली असती तर! 'पिया ऐसो जिया में' म्हणत तिच्या डोळ्यांनी रसिकांची आणखी नजरबंदी करायला  हवी होती.  विरहव्याकुळता, सोशिकता, शालीनता या भावांची ती मूर्तिमंत स्वामिनी होती. तिने अजून राहायला हवं होतं.  


       

Thursday, 12 April 2012

मनाच्या तळघरातील गूढ खजिना ..........


मानवी मन हे नि:संशय अथांग आहे. या मनातील अनेक कप्प्यांत वर्षानुवर्षांच्या चांगल्या -वाईट आठवणी घर करून असतात. या मनाचा थांग घेण्याचे ठरवावे तर एखाद्या गूढ, निबिड अरण्यात शिरल्यासारखे वाटते. एखाद्या झाडामागे कोणते सावज दडून बसले आहे आणि पुढच्याच क्षणी ते आपल्यावर झेपावेल या भीतीने एखाद्याचा जो थरकाप होईल तसा मनाचा ठाव घेताना होतो. या मनाच्या गूढ व्यवहारातूनच अनेक गूढकथा जन्म घेतात. 
आपल्या सगळ्यांच्याच अंतर्मनाची नाळ त्या वैश्विक शक्तीशी जोडली गेलेली असते. बाह्यमनाने अंतर्मनात ढकललेल्या विचारांची तीव्रता जेवढी जास्त तेवढीच जास्त बाहेरून येणाऱ्या अनुभवांची प्रचीती असते. अनेकवेळा अकारण मन आनंदाने उचंबळून येतं तर काही वेळा अकारण उदास होतं. आपण अकारण एवढ्यासाठी म्हणतो कारण आपल्याला या विशिष्ट भावनांच्या उद्दिपनाचा  नेमका हेतू माहित नसतो.  
एका स्वीडीश महिलेला सकाळच्या फ्लाईटने बाहेरगावी जायचे होते. ती विमानतळावर आली. तिथे बसल्यानंतर तिला एकदम जाणवले की आपण ताबडतोब घरी जाऊया. ती सरळ घरी आली. तिच्या नवऱ्याने तिला परत येण्यामागचे कारणही विचारले पण ती एवढेच म्हणाली की मला बरे वाटत नाही. मी जरा विश्रांती घेते. ती पडून काही वेळ झाला तेवढ्यातच तिचा नवरा त्याच्या खोलीतून धावत धावत आला आणि तिला एवढेच म्हणाला की टी.व्ही.ऑन कर. टी.व्हीच्या जवळजवळ  सगळ्या वाहिन्यांवर त्या विमानाच्या अपघाताची बातमी झळकत होती. टेक ऑफ केल्या केल्या विमानाच्या इंजिनात बिघाड होऊन, आग लागून ते कोसळले होते आणि विमानातील जवळजवळ सगळे प्रवासी मृत्युमुखी पडले होते. ती सुन्न होऊन बातमी पाहत व ऐकत होती. कोणती प्रेरणा , कोणती उर्मी तिला या अपघातातून वाचवण्यासाठी परत घरी घेऊन आली? आतून उदास करणारी भावना, एक अनामिक हुरहूर या प्रवासास जाण्यापासून तिला परावृत्त करू पाहत होती का? या प्रश्नांची उकल होणे जरी संभव नसले तरी धोक्याची पूर्वसूचना तिला मिळाली होती असे म्हणता येईल. 
या उलट एक घटना. एका माणसाला कामासाठी तातडीने युरोपला जायचे होते. सगळ्या फ्लाईट्स फुल होत्या. तिकीट मिळणे जवळजवळ दुरापास्त होते. तो विलक्षण बेचैन झाला होता. जणू त्याच्या जीवनमरणाचा प्रश्न असल्यागत तो तिकीट मिळवण्यासाठी जंग जंग पछाडत होता. अखेर आयत्या वेळेस एका माणसाने रद्द केलेले तिकीट त्याला उपलब्ध झाले आणि त्याने सुटकेचा निश्वास टाकला. तो आनंदाने विमानात चढला आणि युरोपला जाता जाता मध्यावर ते विमान डोंगरावर कोसळले. त्या भीषण अपघातात सगळे प्रवासी ठार झाले. इथे त्याला मृत्युपाशात ढकलण्यासाठी जणू अंतर्मनातील सर्व यंत्रणा कार्यरत झाल्या होत्या. तिकीट मिळत नाही म्हणून त्याचे ते अस्वस्थ होणे, त्याच्या जीवाची आतून घालमेल होणे, कसेही करून मला हे तिकीट मिळवलेच पाहिजे या आतील सूचनेनुसार त्याचे ते जंग जंग पछाडणे या सगळ्या गोष्टी पुढे घडणाऱ्या अपघाताप्रत त्याला नेऊ पाहत होत्या का? ज्या माणसाने आयत्या वेळी त्याचे तिकीट रद्द केले त्याला आतून तशी काही सूचना मिळाली असेल काय? ते तिकीट रद्द केल्यानंतरची त्याची भावना नक्की काय होती ? या  भीषण अपघाताची बातमी त्याच्या कानावर येताच त्याच्या मनाची प्रतिक्रिया नेमकी काय होती ?  
आपल्याला एखाद्या व्यक्तीला खूप भेटावेसे वाटते. काही वेळेस याची तीव्रता एवढी असते की त्याला किंवा तिला भेटल्याशिवाय चैनच पडत नाही. याबद्दलचा माझ्या वाचनात आलेला एक किस्सा आहे. एका विवाहित महिलेला आपल्या वडिलांना भेटण्याची विलक्षण ओढ लागली. तिचे सासर माहेरापासून बरेच दूर असल्याने तिची ही इच्छा तात्काळ पूर्ण होणे सर्वथैव अशक्य होते. तिने फोन करायचा प्रयत्नही केला पण फोन लागत नव्हता. ती खूप अस्वस्थ झाली. काय करावे? बाबांना कसे भेटावे? ते सुखरूप असतील ना? त्यांना काही झालं तर नसेल ना? एक ना दोन. शंकाकुशन्कांनी तिला पुरतं पछाडलं. ती सैरभैर झाली. आपल्याला काय होतंय तेच तिला कळेना. ती घरची कामे सवयीनुसार उरकण्याचा यत्न करू लागली. एवढ्यात दारावरची बेल वाजली. तिने दार उघडले आणि ती किंचाळलीच. बाबा तुम्ही? अहो फोन नाही, काही नाही आणि असे अचानक न सांगता कसे आलात? आज सकाळपासून तुमची खूप आठवण येत होती. तुम्हाला भेटावं असं सारखं वाटत होतं. तुम्ही कसे आहात?  एकदम मजेत, बाबा उत्तरले. मला सुद्धा तुझ्या हातची गुरगुटी खिचडी खायची खूप इच्छा होत होती. लेकीच्या हाताचा चहा व नंतर खिचडी खाऊन बाबा जवळच्या देवळात जाऊन येतो म्हणाले आणि तिचे बाबा तिथून निघून गेल्यानंतर काही वेळातच  फोन वाजला आणि बाबांच्या निधनाची बातमी तिच्या कानांवर आदळली. तिचा यावर विश्वास बसणे अशक्य होते. तिने याची देही, याची डोळा बाबांना पहिले होते. त्यांच्याशी गप्पा मारल्या होत्या. ती धावत धावत त्यांना देवळात शोधायला गेली आणि हताश होऊन घरी आली. तिचे बाबा देवळात सापडले नाहीत. ती समजून चुकली. अशा रीतीने दोघांची एकमेकांना भेटण्याची इच्छा पुरी झाली होती. आधी अंतर्मनाच्या पातळीवर एकमेकांविषयीच्या ओढीने या घडामोडी घडल्या आणि नंतर त्याचे पर्यवसान त्यांच्या प्रत्यक्ष भेटीत झाले. हा अतिगूढ ,संवेदनशील असा मनोव्यापार समजणे ही फारच कठीण गोष्ट आहे. 
काही घटना तर अगदी साध्या असतात. काहीतरी अमुक एक गोड पदार्थ खावासा वाटतो. आज जेवणात श्रीखंड किंवा जिलेबी असती तर मजा आली असती असं वाटू लागतं.  मन त्या पदार्थाकडे तीव्रतेने , अतितीव्रतेने ओढ घेतं. ही संवेदना खोल मनात झिरपते. आणि शेजारचं कुणीतरी काही कारणानिमित्त गोड पदार्थ तुमच्या हातावर ठेवतं. तुम्हाला आश्चर्यमिश्रित आनंद होतो. पण बहुतांश लोक या छोट्या घटनांकडे डोळसपणे पाहत नाहीत. ही घटना प्रत्यक्षात घडण्यासाठी आधी त्या घटनेची प्रक्रिया मानसिक पातळीवर झालेली असते. गोड पदार्थ आत्यंतिक तीव्रतेने खावासा वाटणे आणि तो प्रत्यक्षात मिळणे यासाठी अंतर्मनात उमटलेला इच्छेचा पडसाद कारणीभूत असतो.  
एखाद्या ठिकाणी आपण सहलीला जातो. ते ठिकाण आपण याअगोदर कधीही पाहिलेले नसते. तरीही ते ठिकाण अपरिचित वाटत नाही. तो सबंध परिसर ओळखीचा वाटतो. आपण आधी इथे येऊन गेलो आहे असे प्रकर्षाने वाटू लागते. हा 'दे जा वू' अनुभव असतो.  आपण या ठिकाणाचे फोटो आधी पहिले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कधीतरी आपण कल्पनेतही या जागेचे चित्र  रंगवलेले असते. परंतु प्रत्यक्ष त्या जागी पोहोचल्यानंतर आपल्याला जो ओळखीचा फिल येतो तो कोणत्याही शब्दांत पकडता येत नाही. आपल्या अंतर्मनात अनेक जन्मांच्या आठवणींची चित्रे जतन केलेली असतात. त्यातील काही चित्रे पुन्हा सजीव होतात एवढेच! 
माझा एक अनुभव मला इथे या निमित्ताने कथन करावासा वाटतो आहे. आम्ही विक्रमगडला गेलो होतो. बरेच फिरत होतो. फिरता फिरता एका जुन्या महालसदृश वास्तूसमोर आलो. वास्तू पहावी या हेतूने आत शिरलो. अनेक पेशवे, राजे, संस्थानिक यांचा राबता म्हणे या वाड्यात असायचा. या वाड्याला आत अनेक छोटी छोटी दालने होती. त्या ऐतिहासिक काळातील बऱ्याच वस्तु जतन केलेल्या दिसत होत्या. त्यावेळची ती बांधणी आम्ही अपूर्वाईने बघत होतो. खिडक्यांची तावदाने रंगीत होती. ऐसपैस बिछायती, लोड, तक्के,  उशा, झिरझिरीत पडदे, त्यावेळी वापरली जाणारी भांडीकुंडी, शोभेच्या वस्तु, विशिष्ट हत्यारे अशा अनेक गोष्टी आम्ही बघितल्या. चौकात पाण्याचे कारंजेही होते. भिंतीवर कलाकुसर होती. काही दालनांत जेव्हा आम्ही फिरत होतो तेव्हा मला तिथे क्षणभरही थांबू नये असे वाटू लागले. मी जरा अस्वस्थ झाले. वास्तविक पाहता तिथे भीतीदायक असे काहीच नव्हते. आमची वास्तूच्या भेटीची वेळाही दुपारची होती तरीही माझ्या मनात विलक्षण घालमेल सुरु झाली. तेथील एक प्रकारचा वास मला नकोसा वाटू लागला. मी आतून भलतीच उदास झाले. माझ्याबरोबर माझे कुटुंबीय होते तसेच ती वास्तू बघायला आलेले इतरही अनेक जण होते. पण मला काही केल्या त्या वास्तूतून बाहेर जावेसे वाटू लागले. थोडा वेळ इथे तिथे भटकून मी कसाबसा काढला आणि बाहेर येताक्षणी सुस्कारा टाकला. त्या जुन्या, ऐतिहासिक वास्तूत प्रवेश करताना माझ्या मनाला मरगळ आणि उदासीनता नक्की कशामुळे आली याचे उत्तर मला आजही मिळालेले नाही. पण त्या वेळी विलक्षण खिन्नतेने माझे मन भरून गेले होते हे मात्र खरे! 
मनाचा व्यापार हा खरेच अथांग, गूढ डोहासारखा आहे. त्यात कुठल्या कप्प्यात काय गवसेल हे सांगणे महाअवघड आहे. अंतर्मनातील घडामोडी जेव्हा बाहेर दृश्य स्वरुपात प्रक्षेपित होतात तेव्हाच फक्त या मनाच्या व्याप्तीचा थोडासा अंदाज येऊ शकतो. काही घटनांचा थांग लावण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा बऱ्याच वेळेस घनदाट अरण्यात चुकलेल्या वाटसरूसारखीच आपली अवस्था होते. खजिना हाताला लागलासा वाटतो पण ते केवळ एक मृगजळ असते. 

Wednesday, 11 April 2012

काही असेही अनुभव ( संगीत क्लासच्या निमित्ताने...)

काही महिन्यांपूर्वी माझ्याकडे गाणे शिकायला एक मुलगी येत असे. वयाने तशी लहान पण चुणचुणीत. तिच्या वाढदिवसानिमित्त मी तिला एक छोटीशी भेट देऊ केली. त्यावेळी तिची आईसुद्धा तिच्याबरोबरच होती. मी वयाने आणि अनुभवाने मोठी आणि गुरु असूनही ना माझ्या ती पाया पडली ना मी गिफ्ट दिल्याबद्दल तिने मला धन्यवाद दिले. शिष्टाचाराची संथा पालकांकडून मुलांना योग्य त्या वयात मिळणे खूप आवश्यक असते. वास्तविक पाहता तिचे वय लहान असे जरी मानले तरी तिला तिच्या आईने तसे सांगणे गरजेचे होते. तिच्या आईलाही या गोष्टीची जाणीव नसावी याबद्दल मला आश्चर्य वाटले आणि वाईटही वाटले. वडीलधारयांच्या पाया पडणे त्याचप्रमाणे कुणी आपल्याला प्रेमाने काही भेट देऊ केली तर त्या व्यक्तीचे आभार मानणे हे आउटडेटेड होत चालले आहे काय असा मला प्रश्न पडला. बहुतेक अमुक एक प्रसंगात आपण नेमके कसे वागावे आणि शिष्टाचार कसा पाळावा याचे क्लासेस सुरु होण्याची वाट पालक बघत आहेत की काय असेही वाटू लागले. 
माझ्याकडे सर्व वयोगटातील मुली आणि बायका गाणे शिकण्यासाठी येतात. खास 'वन टू वन' अशी शिकवणीही मी घेत असल्याने एक तरुण मुलगी या शिकवणीसाठी माझ्याकडे येऊ लागली. माझा एक तास अशा वेळेस मी पूर्णपणे त्या विशिष्ट क्लाससाठी राखून ठेवलेला असतो. मी स्वत: वेळेचे काटेकोर पालन करते आणि तशी अपेक्षा माझ्या विद्यार्थ्यांकडूनही  करते. अनेक वेळेस मी या मुलीसाठी तिष्ठत असायचे. अर्धा तास असाच निघून जायचा. काही फोन नाही, मेसेज नाही. मला राग यायचा पण आज ना उद्या या मुलीला आपली चूक कळेल असे मला वाटत होते. माझा अमूल्य वेळ फुकट गेल्याचे मला मनोमन दु:ख व्हायचे. मी तिला याबद्दल विचारल्यानंतरही दिलगिरीची साधी भाषाही नाही. सबबी मात्र तोंडावर असायच्या. काही महिने मी तिची ही बेजबाबदार वागणूक सहन केली आणि नंतर तिला सरळ डच्चू दिला. 
एक मध्यमवयीन बाई माझ्याकडे गाणे शिकायला यायच्या. स्वत: दाक्षिणात्य असूनही मराठी चांगले बोलायच्या. दर गुरुपौर्णिमेला माझ्या विद्यार्थ्यांच्या गाण्याचा कार्यक्रम मी आयोजित करते. वर्षभर गुरुकडून जे काही शिकले गेलेले असते त्यातील थोडे स्वतंत्रपणे आणि आत्मविश्वासपूर्ण श्रोत्यांसमोर सादर करता यायला हवे हा त्यामागील उद्देश असतो. जे क्लासमध्ये अनेक वर्षे शिकत आहेत त्यांच्याकडून संख्येने थोडी जास्त आणि अवघड गाणी मी म्हणून घेते. या बाई नव्यानेच रुजू झाल्या होत्या त्यामुळे त्यांना मी फक्त एक गाणे म्हणावयास सांगितले. त्या जरा नाराज दिसल्या. इतर विद्यार्थ्यांच्या गाण्यांच्या संख्येशी तुलना करू लागल्या. माझे सगळेच विद्यार्थी भरपूर मेहनत घेतात. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या आधी जवळजवळ दोन महिने आमच्या तालमी सुरु असतात. शिवाय कार्यक्रमाच्या एक-दोन दिवस अगोदर रंगीत तालीमही असते. रंगीत तालमीच्या वेळेस मी त्या बाईंना दोन गाणी म्हणायची मुभा दिली. हेतू हा की त्यातील जे गाणे अधिक चांगले होईल ते त्यांनी व्यासपीठावर सादर करावे. त्या बाईंनी दोन्ही गाणी यथातथाच म्हटली. कार्यक्रमाच्या दिवशी हॉलमध्ये मी सगळ्या विद्यार्थ्यांच्या गाण्यांच्या याद्या डोळ्यांखालून घालत होते. तेवढ्यात या बाई माझ्याजवळ येऊन मला म्हणाल्या, अमकी जर दोन गाणी म्हणू शकते तर मी का नाही? मी त्यांना नीट सांगितले की हे बघा ती अमकी जी आहे ना ती माझ्याकडे गेली तीन वर्षे शिकत आहे. तिचा शास्त्रीय संगीताचा पाया पक्का आहे. तुम्ही आत्ताच आला आहात. शिवाय तुमचे हे गाणे बरे होते आहे तेव्हा तेच तुम्ही सादर करणे माझ्या दृष्टीने योग्य आहे. त्या बाईंना माझे म्हणणे पटता पटेना. त्या माझ्याशी हॉलमध्ये हुज्जत घालू लागल्या. माझ्या इतर विद्यार्थिनीसुद्धा अचंबित नजरेने त्यांच्याकडे पाहत होत्या. शेवटी गुरु या नात्याने मला त्यांना थोडी समाज द्यावी लागली तेव्हा कुठे ती त्यांची दोन गाणी म्हणायची खुमखुमी शमली. 
एक बाई माझ्याकडे गाणे व पेटी अशा दोन्ही गोष्टी शिकायला यायच्या. साधारणपणे तासभर क्लास होतो. सुरवातीस अलंकार, रागाची सरगम, बंदिश व नंतर त्यावर आधारित एखादे गाणे असे सामान्यत: गाण्याच्या शिकवणीचे स्वरूप असते. काही वेळेस तासाच्या आधीच जे काही नियोजित शिकवणे असते ते संपून जाते. अगदी पाच-एक मिनिटे उरलेली असतात. पण या बाई मात्र शिकवणी संपली तरी ढिम्म हलायच्या नाहीत. मी आवरते घ्यायला लागले की म्हणायच्या अहो अजून पाच मिनिटे आहेत की ! ती पाच मिनिटे वसूल केल्याशिवाय त्यांचे समाधान होत नसे. एकदा माझ्या घरी रंगकाम चालू होते आणि नेमकी मी त्यांना निरोप द्यायला विसरले. माझ्याकडून क्लास जर रहित झाला तर तो क्लास मी नंतरच्या आठवड्यात भरून देते. या बाई आल्या. घरात जिकडेतिकडे पसारा होता. रंगारी आजूबाजूस वावरत होते. माझाही तसा अवतारच होता. या सगळ्या गोष्टी नजरेआड करून या बाई आत गेल्या. रंगकाम हॉलचे चालू होते त्यामुळे आम्ही बेडरूममध्ये वावरत होतो. मी त्यांना म्हटले की पुढच्या आठवड्यात मी तुमचा हा क्लास घेते. त्या म्हणाल्या कशाला? आणि त्यांनी पेटी सरळ स्वत:जवळ ओढली. मी मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. बरोब्बर तासभर त्यांनी  पेटी वाजवली आणि मगच त्या निघून गेल्या. 
माझ्याकडे वयाने तशा मोठ्या असलेल्या बाई यायच्या. सुरांशी त्यांचं तसं बरं होतं पण तालाशी जमवून घेताना त्यांना नाकीनऊ येत असत . धृवपद संपल्यानंतर कडवे नेमके कसे उचलायचे, गाण्यातील शब्द तालाचे भान ठेवत कसे गायचे अशा बऱ्याच तांत्रिक बाबी पुन्हा पुन्हा सांगूनही त्यांच्या चुका होत राहायच्या. प्रत्येक गाण्याचा एक निश्चित साचा असतो. त्या ठराविक पद्धतीनेच ते गाणे म्हणायचे असते. एखादी ओळ एकदा म्हणायची की दोनदा हे इतके वेळी गाण्याचा रियाझ होऊनही त्यांच्या पचनी पडायचे नाही. इतर तालमींच्या वेळेस माझी मोठी मुलगी तबल्यावर साथ करायची. ती सवयीची असल्याने त्या बऱ्यापैकी न बिचकता गायच्या.  कार्यक्रमाच्या वेळेस जो तबलजी आम्ही बोलावतो त्या तबलजी बरोबर आधी रंगीत तालीम होते. त्यांचे गाणे सारखे लयीला कमी-जास्त व्हायचे. एकदा म्हणायची ओळ त्या दोनदा गायच्या आणि दोनदा म्हणायची ओळ हमखास एकदा!  कार्यक्रमाला श्रोते बघितले की त्या गडबडून जायच्या. त्यांचं गाणं लय-तालाची बंधने झुगारून देऊन एकदम मुक्त व्हायचं. तबलजी जेरीस यायचा. त्या गाण्याला बसल्या की मी मनातून नेहमी तबलजीला 'ऑल द बेस्ट' म्हणून टाकत असे. पण मलाही या 'ऑल द बेस्ट'ची अशावेळी नितांत गरज वाटायची कारण त्यांच्या गाण्याचा मागोवा घेता घेता माझाही हात पेटीवरून अनेकवेळा सटपटायचा.    
एकदा एक गुजराथी बाई माझ्याकडे क्लासच्या चौकशीसाठी आल्या. मेरे बेटे के लिये आपका ट्युशन रखना है. जुजबी चौकशी करून नंतर त्यांनी विचारले, कितना पैसा? मी माझी फी त्यांना सांगितली. ये तो जादा लग रहा है, कम नही हो सकता क्या? मी त्यांना शांतपणे सांगितले की हा संगीताचा क्लास आहे, हे भाजीमार्केट नाही भावावरून घासाघीस करायला. तुम्हाला जिथली फी परवडेल तिथे तुम्ही जा. माझ्याकडे तुमच्या मुलाला पाठवण्याचे कष्ट बिलकुल करू नका.  
एक अंदाजे बारा-चौदा वर्षांचा मुलगा माझ्याकडे पेटी शिकण्यासाठी आला. त्याच्या आई-वडिलांनी सांगितले की हा वर्ष-दीड वर्षे पेटी शिकतो आहे. मी त्याला जे येते ते वाजवून दाखवायला सांगितले. त्याच्या वहीत एकूण पाच ते सहा राग लिहिले होते. त्यातील एक रागही त्याला धड वाजवता आला नाही. याचे मला कळलेले कारण असे होते की त्या क्लासमध्ये चार-पाच पेट्यांवर एकाच वेळी चार-पाच मुले वेगवेगळे राग वाजवीत. शेजारी साधारण तेवढ्याच तबल्यांवर तेवढ्याच मुलांचा वेगवेगळ्या तालांचा सराव. त्यामुळे या सगळ्या गोंगाटात आपण नक्की काय वाजवीत आहोत याचे ज्ञान कुणालाच व्हायचे नाही. अशा प्रकारे ही संगीतसाधना चालायची. बऱ्याचदा मुलांचे आई-वडील याविषयी अनभिज्ञ असतात म्हणा किंवा त्यांना वाटते की अशाच पद्धतीने सगळीकडे पेटी शिकवली जात असावी. त्या मुलाचे फक्त नुकसान झाले नव्हते तर त्याची आणि त्याच्या पालकांची फसवणूकही झाली होती त्याबद्दल मला अतिशय वाईट वाटले. 
१९९६ ला 'स्वरतृष्णा'ची स्थापना केल्यापासून आजपर्यंत मला अनेक चांगले-वाईट अनुभव आले.  त्यातील काही अनुभव मी या ब्लॉगद्वारे शेअर करते आहे. या निमित्ताने का होईना निरनिराळ्या मानवी वृत्ती मला अभ्यासता आल्या किंवा त्यांना समजून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागले. अनेकांनी त्यांची वैयक्तिक सुखदु:खेही माझ्याबरोबर शेअर केली. काहींनी आनंद दिला तर काहींनी मनस्ताप! मला जेवढे जमले तेवढे दिले आणि द्यायचा प्रयत्न करत राहणार आहे. दुसऱ्याला देता येण्यासाठी ओंजळ मात्र कायम भरलेलीच राहावी एवढीच त्या शक्तीकडे माझी मनापासून पार्थना! 



Monday, 9 April 2012

माणसे- हसणारी आणि न हसणारी ....



आपण रस्त्यावरून चालत असतो. समोरून ओळखीचा चेहरा येतो. आपण तोंड भरून हसतो. तो चेहरा हसावं की न हसावं या विचारातच निघून जातो. आपल्याला ज्याच्या त्याच्यासमोर हसण्याचा रोगच आहे असे वाटण्याइतपत आपण अपमानित होतो.
माणसे ओळखीची असली तरीही ती हसतीलच याची हमी ब्रम्हदेवालाही देता येणार नाही. It depends on their mood. आपल्या मूडच खोबरं झालं असलं तरी आपण हसायचच हा आपला बाणा असतो.   
हसण्याच्या कैक तऱ्हा असतात. काही माणसे खळखळून हसतात. काही फिदीफिदी हसतात. काही गोडसे स्मितहास्य करतात. काही चमत्कारिक, गडगडाटी हसतात. काही माणसे कंटाळवाणे हसतात. काही माजोरडे हसतात. काही हसल्यासारखे करतात. काही रडल्यासारखे हसतात. काही बद्धकोष्ठ झाल्यासारखे अवघडून हसतात. काही हसतच नाहीत. काही माणसे नको त्या प्रसंगात हसतात तर काही सणा-समारंभालाही हसायचे कष्ट घेत नाहीत.  
हसण्याच्या आणि माणसाच्या परिस्थितीचा सुतराम संबंध नसतो. एखादा अगदी सामान्य परिस्थितीतील माणूससुद्धा इतका दिलखुलास हसतो की त्याला विचारावेसे वाटते, अरे बाबा तुला आयुष्यात कुठलेच दु:ख, कुठलीच व्यथा ठुसठुसत नाही का? तुला वाढती महागाई, कामवाली बाई, रिक्षावाले, वर्गण्यावाले, तृतीयपंथी, भिकारी, ऑफिसमधला बॉस कधीच पिडत नाहीत का रे? तू ऑफिसमधून दमूनभागून घरी आल्यावर तुझे पाय तुझी बायको प्रेमाने चेपते का रे? तुझी मुले आज्ञाधारक आहेत का रे? मुंबापुरीची लाईफलाईन असलेल्या लोकलमध्ये भरगर्दीत चढताना तुझ्या शरीराचं भजं होत नाही का रे? 
याउलट काही माणसे मुळी हसतच नाहीत. यांना वाचायला पुलं द्या, अत्रे द्या, मिरासदार द्या, कणेकर द्या  हे नक्की काय वाचत आहेत असा प्रश्न इतरांना पडेल इतका यांचा चेहरा पडेल असतो. यांना कुणी विनोद सांगायला गेला तर आपण विनोद सांगितला की कुणाच्या मर्तिकाची बातमी दिली असा संभ्रम त्याला पडेल. भरदिवसा ऑफिस अवर्सला लोकलमध्ये सहज चढता येऊन यांना जरी विंडो सीट मिळाली तरी यांचा चेहरा आंबटच! बरं, आर्थिक चणचण यांना माहित नाही. घरी सुंदर बायको सदैव दिमतीला, मुले अभ्यासात हुशार, चोवीस तास पाणी, खेळते वारे, घर अत्याधुनिक सुखसोयींनी सज्ज, कामवाली बाई कमीत कमी खाडे करणारी, झाडूवाला, वॉचमन, लिफ्टवाला याच्याशी सौजन्यपूर्ण वागणारे, शेजारीपाजारी यांना मान देणारे तरीही यांचा चेहरा कायम रडक्या,कुजक्या, आंबलेल्या ठेवणीचा!     
काही माणसे आपल्या इभ्रतीला शोभेल इतपतच हसतात. जपून, सावधपणे हसतात. न जाणो जरा जास्त हसलो आणि आपल्या प्रतिष्ठेला बाधा आली तर काय होईल या भीतीने हे मोजूनमापून हसतात. भल्या सकाळी मात्र पार्कात जाऊन मऊसुत हिरवळीवर हा: हा: हा: असा भयाकारी कृत्रिम हास्याचा सराव त्यांच्या  अशाच पठडीतील सहकाऱ्यांबरोबर 'लाफ्टर क्लबात, करत असतात.   
काहीजण बद्धकोष्ठहास्य हसतात. कायम अवघडून हसतात. म्हणजे धड नीट हसतही नाहीत पण हसल्यासारखे करतात. या त्यांच्या अनुपमेय हास्याचा अर्थ फक्त त्यांनाच ठाऊक असतो. यांना विचारावेसे वाटते, काय हो तुमची बायको हिऱ्याच्या बांगड्या मागतेय की काय? महिन्याचा पगार महिन्यालाच होतो ना? घरी सगळे आलबेल आहे ना ? मुले दरवर्षी पुढच्या इयत्तेत जाताहेत ना? घरी एखाद्या म्हातारीने अथवा म्हाताऱ्याने छळवाद मांडलाय का?  
कल्पना करा की एखाद्या घराचे लग्नघर झाले आहे. पाहुण्यांची वर्दळ वाढली आहे. अनेक नाजूक, गोऱ्यापान हातांवर मेंदी सजलेली आहे, विनोद, उखाणे, गप्पांचे फड अगदी रंगात आलेले आहेत, थट्टा-मस्करीला नुसता ऊत आला आहे, खाण्यापिण्याची  रेलचेल आहे, पोरेबाळे वारा प्यायल्यासारखी इकडून तिकडे धावत आहेत, घराला मंगल तोरण बांधले आहे. अशा मंगलप्रसंगी तुमचा एरंडेल प्यायलेला चेहरा हे इतरांसाठी 'सुभग' दर्शन असेल काय? घरातील वधू आणि तुमची एकुलती एक लेक बोहल्यावर चढणार आहे की .................? पण यांना सांगणार कोण?  यांच्या बायकोने केसांवर छानसा मोगऱ्याचा गजरा माळला आहे, जरीकाठाची साडी नेसली आहे, नाकात नथ घातली आहे, ओठांना हलकीशी लिपस्टिक लावली आहे. डोळ्यांत मुलीच्या लग्नाचे आणि पाठवणीचे आनंदाश्रू आहेत. तुमच्या नुसत्या हास्यपूर्ण आणि प्रेमळ कटाक्षाने ती अंतर्बाह्य मोहरून जाणार आहे. पण अशा शुभ प्रसंगीही तुमचा चेहरा उलटा यू ( इंग्लिशमधला ) करून असतो. काय दुर्बुद्धी झाली आणि या माणसाशी माझा पाट लागला असा विचार तुमच्या बायकोच्या मनात येण्याइतके तुम्ही आंबट चेहऱ्याने वावरत असता. ती पंचमहाभूते तुम्हाला साकार करताना त्यात हास्यरस नामक फ्लेवर घालायला विसरली की काय अशी शंका येण्यास भरपूर वाव असतो. 
परमेश्वराने नवरस निर्माण केले. त्यात हास्यरस हा श्रेष्ठ गणला जातो. कारण हास्याने माणसे जोडली जातात. निर्मळ हास्य हे एखाद्या मौल्यवान अलंकारासारखे असते. हसणे तुम्हाला श्रीमंत करते. तुमच्या हास्यात दुसऱ्याला आनंद  देण्याची ताकद असते. हसणे हे आरोग्यवर्धक असते. शिवाय ते प्रत्येकाच्या हक्काचे असते. आयुष्याचा खडतर प्रवास सुसह्य करण्याची शक्ती हास्यात असते. तेव्हा हसा, भरपूर हसा आणि हसवा! हसण्याला पर्याय नाही. 

Sunday, 8 April 2012

'हुशारी' आणि 'ढ' पणा

मूल जसजसे मोठे होत जाते तसतसे त्याला हा 'हुशार' किंवा हा 'ढ' अशी लेबले लोकांकडून लागायला सुरवात होते. वास्तविक पाहता हुशारी म्हणजे अमुक एक विषय जाणून घेऊन तो आत्मसात करण्याची आपली क्षमता. आता ही क्षमता प्रत्येकागणिक भिन्न असते. सर्व माणसे एकाच विषयात पारंगत कशी होतील? प्रत्येकाचा स्वाभाविक पिंड, त्याची वैचारिक जडणघडण, पालकांच्या आणि शिक्षकांच्या विचारांचा मुलावर पडणारा प्रभाव, सभोवतालची परिस्थिती आणि मनातून अमुक एक ध्येय साध्य करण्याची दुर्दम्य इच्छा अशा सगळ्या घटकांवर लौकिकार्थाने जी हुशारी किंवा जो ढ पणा असतो तो अवलंबून असतो.     
काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. माझी मोठी मुलगी दहाव्वीला बसली होती. रिझल्ट लागायचा होता. अकरावीला 'आर्ट्स' घेण्याचे आधीच तिने ठरवले होते. 'मानसशास्त्र' अर्थात 'Psychology' हा विषय अंतिम पदवीपरीक्षेसाठीही तिने ठरवून टाकला होता. माझ्या सोसायटीत राहणाऱ्या एका बाईंनी विलक्षण उत्सुकतेपोटी मला विचारले , हं मग काय घ्यायचे ठरवले आहे तुमच्या लेकीने?  मी सांगितले की तिने आर्ट्स घेण्याचे ठरवले आहे. त्यावर त्यांनी मला प्रतिप्रश्न विचारला, का हो कमी मार्क मिळणार आहेत का तिला? म्हणजे आर्ट्स या शाखेचा आणि कमी मार्कांचा असा काही संबंध त्या बाईंनी मनोमन प्रस्थापित केला होता. 
जास्त मार्क मिळवणारी मुलेच फक्त  'सायन्स' किंवा 'कॉमर्स' या शाखेसाठी लायक असतात असाही एक समज फोफावलेला  असतो. म्हणजे गणित किंवा शास्त्र येणारा विद्यार्थी हुशार असतो मग अगदी त्याला भाषा किंवा इतिहास-भूगोल जेमतेम येत असतील तरीही! हे ठरवण्याचा अधिकार कुणाला आहे?  मी बालमोहन शाळेत शिकत असताना माझ्या वर्गात सुनील राजे नावाचा मुलगा होता. तो निव्वळ अप्रतिम 'स्केचेस' काढायचा. लोकमान्य टिळकांचे त्याने काढलेले चित्र मला अजूनही आठवते इतके ते सुंदर जमले होते. पण त्याने काढलेल्या चित्राला गणित आणि शास्त्राच्या तराजूत का म्हणून बसवायचे? वर्गात फळ्यावर गणित सोडवून दाखवल्यानंतर त्याच पद्धतीने दुसरे गणित सोडवणे ही जर 'हुशारी' असेल तर मग कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय उत्कृष्ट चित्र काढणारा 'अतिहुशार' का म्हणायचा नाही? 
वयाच्या नवव्या-दहाव्या वर्षापासून म्हणजे सर्वसाधारणपणे खेळा- बागडायच्या वयात ज्येष्ठ शास्त्रीय गायक की.कुमार गंधर्व मैफिली गाजवू लागले होते. त्यांची गाण्यातील समज एखाद्या गणितज्ञापेक्षा खचितच कमी नव्हती. आता सांगा की लौकिकार्थाच्या तराजूने त्यांची 'हुशारी' कशी तोलायची? संगीतकार ए.आर.रेहमान सुद्धा वयाच्या पंधरा-सोळाव्या वर्षापासून सातत्याने चांगले संगीत देत आहे. पंडित भीमसेन जोशी सवाई गन्धर्वांकडे गाणे शिकायला मिळावे म्हणून घरातून पळून गेले होते. त्यांची पुढील कारकीर्द तळपत्या सूर्याइतकीच दैदीप्यमान होती हेही आपण सर्व जाणतो. ही आणि अशी अनेक कलेचा वारसा लाभलेली माणसे त्यांच्या क्षेत्रात हुशारच होती. त्यांना शालेय परीक्षेत मार्क किती मिळाले यावरून आपण त्यांची गुणवत्ता ठरवायची का? जगदविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याने तर शिक्षणच अर्ध्यावर सोडलं यामुळे त्याच्या 'ढ' पणावर म्हणा किंवा शालेय अभ्यासात न दाखवलेल्या 'हुशारी'वर शिक्कामोर्तब होते का?  
काही महिन्यांपूर्वी टी.व्ही.वरील एका मुलाखतीत लेखक अनिल अवचट यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता तो असा की केवळ काही विषयांची परीक्षा हा अंतिम निकष लावून एकाच वयाच्या किंवा एकाच इयत्तेत शिकणाऱ्या मुलांच्या बुद्धीचे मूल्यमापन कसे होऊ शकते? प्रत्येकाचाच गणित हा विषय जसा उत्तम असतोच असे नाही त्याचप्रमाणे प्रत्येकाचा भाषा हाही विषय उत्तम असेलच असे नाही. काही मुलांना काही विशिष्ट विषयांत अशी काही गती असते की ते इतरांना तोंडात बोटे घालायला लावतील कारण त्यांची त्या विशिष्ट विषयातील ग्रहणशक्ती म्हणा किंवा आकलन म्हणा इतरांपेक्षा सरस असते. एखादा लहानगा ज्या खुबीने घरातील बिघडलेली यंत्रे दुरुस्त करेल त्याप्रमाणे शेजारच्या घरातील मुलगाही करेल का? पण शेजारच्या  घरातील मुलगा त्याचा अभ्यास मात्र मन लावून करत असेल आणि पहिला नंबर आणत असेल. मग आता यंत्रे दुरुस्त करणारा मुलगा अभ्यासात जेमतेम असेल तर तो पालकांची बोलणी नक्की खाणार. आला मोठा यंत्रे दुरुस्त करणारा! आधी अभ्यास नीट करून दाखव असा त्याचा 'उद्धार' नक्की होत असणार. शिवाय शेजारचा राजू बघ नेहमी कसा पहिला नंबर आणतो, शिक त्याच्याकडून काही अशा टोचाही त्याला सहन कराव्या लागणार. कारण हा अभ्यासात 'ढ' आणि तो 'हुशार'! शेजारच्या राजूला यंत्रे दुरुस्त करता येत नाहीत म्हणून त्याला कोणीही काही बोलणार नाही किंवा त्याच्यावर 'ढ' असा शिक्काही बसणार नाही. रेडीमेड उत्तरे घोकून जो परीक्षेचा गड सर करतो तो हुशार पण ज्याला कुणी कधीही बापजन्मात जे शिक्षण दिलेले नाही त्या विषयांतील कौशल्याचे कौतुक होणे तर सोडाच पण अभ्यासापासून पळवाट किंवा रिकामपणाचे उद्योग अशा नजरेनेही त्याच्याकडे बघितले जाणार.     
शिक्षकांनी सांगितलेली उत्तरे पाठ करा, निबंध पाठ करा, भूमितीतील प्रमेये पाठ करा, काढलेल्या आकृत्या परत परत गिरवा अशा प्रकारे वर्षभर अभ्यास झाल्यानंतर जी काही परीक्षा होते त्यात काहीजण उत्तम मार्क मिळवतात तर काही थोडेसे! काहीजण चक्क नापासही होतात. पालक-शिक्षकांकडून तुलना होतात, हुशार-ढ अशा वर्गवाऱ्या होतात,  कौतुक होते, उपेक्षा होते. एवढे शिकवूनही 'गधडा' किंवा 'गधडी' नापास होतेच कशी? या विषयाच्या मुळाशी कोणी हात घालत नाही कारण  ते अवघड असते. हुशार किंवा ढ अशी लेबले लावणे सोपे असते. शाळेत जातोय, ट्युशन लावलीय, आई-बापाचे पैसे जातायत पण त्याला काही आहे का? त्या गधड्याला नक्की कोणत्या विषयात गती आहे, स्वारस्य आहे किंवा त्याच्यातील सुप्त गुण काय आहेत याचा रीतसर अभ्यास करायला आई-वडिलांना थोडाच वेळ असतो? ज्येष्ठ सतारवादक पण.शंकर अभ्यंकर यांनी एकदा रंगलेल्या गप्पांत एक किस्सा सांगितला होता. त्यांना लहापणापासून संगीताची विलक्षण ओढ. शालेय विषयांत फारशी गती नव्हतीच. चौथी झाली आणि वडिलांनी सांगितले आता उद्यापासून तुझी शाळा बंद. तुला हवे तेवढे गाणे शिक. शंकर अभ्यंकर मनातून खूप आनंदले आणि त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाचे त्यांनी चीज केले. ते पुढे म्हणाले 'शाळा शिकू नकोस आणि गाणे शिक' असा सल्ला देणारे माझे वडील हे जगावेगळेच होते. 
कालांतराने माणसाचे तारुण्य ओसरते. प्रापंचिक जबाबदाऱ्या पेलता पेलता मध्यमवयात माणूस पदार्पण करतो. अनेक गोष्टी करायच्या, शिकायच्या राहून गेलेल्या असतात. कुणाचे गायक व्हायचे स्वप्न तर कुणाचे चित्रकार व्हायचे स्वप्न धुळीला मिळालेले असते. स्वप्न आणि वास्तव याचा मेळ कुणाला घालता आलेला नसतो. खूप शिक, नोकरी कर आणि भरपूर पैसे मिळव अशा सल्ल्यांना शिरोधार्य मानून अनेकांनी वाटचाल केलेली असते. भौतिक सुखे हात जोडून उभी असली तरी इच्छा, प्रेरणा अंतर्धान पावलेल्या असतात. अशातच कधीतरी पेटीवर बोटे फिरवून बघावीशी वाटू लागतात, कुंचला हातात धरावासा वाटू लागतो, कागदाची फुले करण्याची उर्मी दाटून येते, कोणे एकेकाळी केलेले विणकाम बघत बसावेसे वाटू लागते, शाळेत असताना केलेल्या नाटकांतल्या संवादांशी मन खेळू लागते, खेळण्यासाठी हात शिवशिवू लागतात, सायकलीच्या पायडलवरून पाय फिरवावासा वाटू लागतो. आज मी जर अमुक एक शिक्षण घेतले असते तर मी एव्हाना कुठल्या कुठे गेलो असतो या अंतर्मनात दडलेल्या वाक्याला आपल्याला घासूनपुसून परत लख्ख करावेसे वाटू लागते. 
ज्या शस्त्रांनी आपली हुशारी सिद्ध झाली असती ती शस्त्रे आपल्याला अशी चाकोरीबद्ध वृक्षाच्या मुळाशी गाडावी लागली याची खंत आता मनात दाटून येते. 'हुशारी' सिद्ध झाली नाही आणि आपण 'ढ' म्हणून गणले गेलो याची रुखरुख मनाला लागून राहते.