Sunday, 26 February 2012

माझी बालमोहन शाळा

शिक्षणमहर्षी कै. दादासाहेब रेगे यांनी नावारूपाला आणलेल्या शाळेत माझे शिक्षण झाले. माझ्या सुदैवाने मला अतिशय उत्तम शिक्षक आणि शिक्षिका लाभल्या. माझ्या शाळेतले सांस्कृतिक वातावरणही खूप छान होते. माझ्या शाळेतील संजूचे उपाहारगृह तर वाखाणण्यासारखे होते. माझ्या शाळेच्या समोरील टपरीवर जिरागोळ्या विकणारा बुवा एक खास वल्ली होता. 
रोजची शाळा दुपारची असायची. फक्त शनिवारी सकाळची शाळा. त्यावेळी आम्ही सर्व विद्यार्थी कवायतीसाठी शिवाजीपार्क मैदानावर जात असू. शाळेत बहुतेक सर्व सण साजरे केले जात असत. बालदिन, मातृदिनाला दादासाहेब रेगे यांची खास भाषणे असायची. विशेषकरून मातृदिनाच्या दिवशी एका बुजुर्ग शिक्षिकेला व्यासपीठावर बोलावून सर्वांसमक्ष दादा त्यांना आई मानून त्यांच्या पायांवर लोटांगण घालायचे. आईचे आपल्या सर्वांच्या जीवनातील स्थान या विषयावर बोलताना दादा स्वत: अनेक वेळा सद्गदित व्हायचे. १४ नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी चाचा नेहरुंचाही वाढदिवस असतो. नेहरूंविषयी सुद्धा दादा भरभरून बोलायचे. आम्हा मुलांना या दोन्ही दिवशी खाऊ वाटला जाई. संक्रांतीला ऊस आणि तिळगुळ. श्रावणी शुक्रवारी मुठभरून चणे. चैत्रात आंब्याची डाळ आणि कैरीचे पन्हे. उन्हाळ्यात कलिंगडाची मोठी फाक. ललितापंचमीला साखर-खोबऱ्याची खिरापत. हा नेम कधीच चुकला नाही. दहाव्वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास जेवण असायचे. दहीहंडीच्या दिवशी शाळेत बाल-गोपाळांची हंडी असायची.  भगवान श्रीकृष्णांची मोठी तसबीर ठेवेलेली असायची. स्वत: दादा कृष्णाच्या गोष्टी सांगायचे. दरवर्षी आमची सहल असायची. तळेगावला बालमोहनची दुसरी शाखा. तिथेही आमची सहल जायची. शाळेत वक्तृत्व स्पर्धा, नाटके, गाणी याचेही आयोजन होत असे. अधूनमधून आम्हाला माहितीपट दाखवत असत. आम्हा मुलांकडून देशभक्तीपर गीते म्हणून घेतली जात असत. मला आठवतंय एका वर्षी ज्येष्ठ संगीतकार कै.वसंत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली 'आमार शोनार बांगला' हे गीत  आम्हाला शिकवले होते. 
आमच्या शाळेला दोन मधल्या सुट्ट्या असायच्या. एक छोटी व एक मोठी. डबे आणणं हे तसं कंपल्सरीच होतं. पण मोठ्या वर्गात गेलो आणि संजूच canteen आम्हाला खुणावायला लागलं. इडली,वडा-सांबार, बटाटेवडा, चाऊ-म्याऊ ( चटणी-पाव ) ही त्याची खासियत. रविवारी शाळेत असलेल्या नाटकांच्या मध्यंतरात बटाटेवड्यांचा नुसता खमंग दरवळ सुटायचा. नाटकाचं आकर्षण होतंच परंतु बटाटेवड्यांच अंमळ जास्तच होतं. शाळेच्या मधल्या सुट्टीत किंवा शाळा सुटल्यावर बुवाच्या टपरीला भेट असायचीच. ओली हिरवीगार बडीशेप, गाभुळलेल्या चिंचा, लाल पेरू, जिरागोळ्या ही मुख्य अमिषे! बुवा आणि त्याची टपरी यात जास्त कळकट कोण हे सांगणं मुश्कील होतं. आम्ही मुले ज्यात त्यात हात घालायला बघायचो. बुवा आमच्यावर मोठ्याने खेकसायचा. आमचे व त्याचे रोजचे व्यवहार याच पद्धतीने चालत. त्याच्या ओरडण्याचे वैषम्य एकालाही वाटत नसे. शाळा सुटली आणि बुवा इतिहासजमा झाला. 
अनेक शिक्षकांनी आम्हाला शिकवलं आणि आमचं शैक्षणिक दालन समृद्ध व्हायला हातभार लावला. कालपरत्वे सर्व शिक्षकांची नावे आठवत नाहीत पण आमच्या चौबळ बाईंनी शिकवलेली मराठी भाषा आजही स्मरणात आहे. प्रत्येक धडा शिकवताना त्या त्या लेखकाची किंवा कवीची साद्यंत माहिती, लेखकाने धड्यातून मांडलेले विचार, काव्याचे रसग्रहण त्या इतक्या तन्मयतेने आणि इतक्या खुबीने शिकवायच्या की त्या त्या धड्याबद्दलच्या सर्व शंकांचा निचरा होऊन जायचा. 
विज्ञान शिकवायला पांगम बाई होत्या. त्याही उत्तम रीतीने शिकवायच्या. दाभोळकर सर संस्कृत शिकवायचे. इंग्रजीचे आपटे सर यांना आम्ही शशी कपूर ही उपाधी दिली होती. मराठे सर उत्तम गणित शिकवायचे. आमच्या वर्गाला माथुर बाई गणित शिकवायच्या. डेरे-भांडारकर अर्थशास्त्र शिकवायच्या. परुळेकर बाई इतिहास आणि हिंदी शिकवायच्या. अर्थात इयत्ता बदलल्या की शिक्षकही बदलत. देसाई बाई, वर्तक सर,पापल सर पी.टी. शिकवायचे. गायनासाठी जोगळेकर, पाटकर आणि जोशी मास्तर होते. मायाताई, विद्याताई चित्रकलेसाठी होत्या. जाधव बाई भूगोल शिकवायच्या. या व्यतिरिक्तही बऱ्याच शिक्षकांनी आम्हा सर्वांच्या शैक्षणिक कारकिर्दीत खूप मोलाचे योगदान दिले आहे. दादासाहेब रेग्यांच्या पश्चात बापूसाहेबांनी शाळेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. 
तेव्हा शाळेची फी अत्यल्प होती. शाळेत सण साजरे करताना मुलांना जो खाऊ वाटला जायचा त्यासाठी कधीही शाळेने वेगळे पैसे आकारले नाहीत. अंगभूत कलागुणांना शाळेतील शिक्षक नेहमीच प्रोत्साहन द्यायचे. माझ्या कवितांना चौबळ बाईचं बहुमोल मार्गदर्शन लाभलं होतं. राष्ट्रीय दिनाच्या अथवा सणांच्या निमित्ताने आम्हा मुलांच्या प्रभातफेऱ्या निघायच्या. मोठमोठे फलक हातात घेऊन घोषणा देत शिवाजीपार्कवरून आमची स्वारी परत शाळेत यायची. दसऱ्याला शाळा आणि वर्ग सुशोभित केले जायचे. तोरणे, रांगोळ्या यांनी वर्ग सजायचे. नंतर आम्ही सगळी मुले हॉलमध्ये जमायचो. दसऱ्यानिमित्त भाषण व्हायचे आणि गोडाचा आस्वाद घेत आम्ही घरी परतायचो. 
आज शाळा सोडून इतकी वर्षे झाली. काही आठवणी अजून तितक्याच ताज्या आहेत तर काही कालौघात पुसट झाल्या आहेत. पूर्वीच्या काळच्या पालकांना अगदी माफक पैशांत कोणत्याही बाहेरील क्लासेसचा आधार न घेता मुलांना उत्तम व दर्जेदार शिक्षण देता आले. आम्ही सुदैवी की आम्हाला अशी शाळा व असे शिक्षक लाभले. त्या काळी शिक्षणाचे बाजारीकरण झाले नसल्यामुळे शाळांचे 'मार्केट' धंदेवाईकांना उपलब्ध झाले नव्हते. त्यामुळेच शिक्षणाच्या पाण्याचा प्रवाह हा नैसर्गिक आणि शुद्ध राहिला. त्यात गढूळ विचारांचे प्रवाह मिसळले नाहीत. परीक्षा आम्हीही दिल्या परंतु आमच्या शाळेने आम्हाला केवळ परीक्षार्थी केले नाही. शालेय परीक्षा हा संपूर्ण जीवनातील एक महत्वाचा टप्पा होता पण पावलापावलावर परीक्षा घेणाऱ्या जगाच्या विद्यापीठात आत्मविश्वासाने वावरण्याचे धडे आम्ही याच शाळेत गिरवले हे आज मी अभिमानाने सांगू शकते. 




No comments:

Post a Comment