युसुफ खान आणि प्रिया गोडबोले. दोघांची ओळख ऑफिसच्या निमित्ताने व्ही.टीला जाताना झालेली. ठराविक लोकल पकडताना दोघांची नजरानजर व्हायची. तो जेन्ट्स मध्ये आणि ती लेडीजच्या डब्यात! हळूहळू एकमेकांकडे बघताना चेहऱ्यावर हास्य दिसू लागले. तिची नोकरी नवीन होती. एकदा मोबाईलवर बोलत असताना ती चालत चालत platformच्या टोकाशी गेली. समोरून भरधाव लोकल येत होती. आणि क्षणार्धात ती खसकन मागे ओढली गेली. युसुफने जीवाच्या आकांताने तिला ओढले होते. परत असे करशील तर तुझा मोबाईल तुला परत मिळणार नाही अशी प्रेमाची धमकीही तिला मिळाली. या घटनेनंतर तिच्या मनात युसुफविषयी ओढ निर्माण झाली आणि त्याची परिणती दोघांच्या एकमेकांवरील प्रेमात झाली.
आता ऑफिस व्यतिरिक्तही दोघे एकमेकांना भेटू लागले. एकमेकांना जाणून घ्यायचा प्रयत्न करू लागले. आपले प्रेम धर्मबाह्य असल्याने आपल्याला घरच्यांकडून संमती मिळणार नाही हे दोघे समजून होते. युसुफ एका चांगल्या कंपनीत वरच्या हुद्द्यावर नोकरीला होता. घरून परवानगी मिळणारच नव्हती त्यामुळे लग्न झाल्यानंतर राहायचे कुठे हा त्यांच्यापुढील यक्षप्रश्न होता. अखेर युसुफने त्याच्या अगदी जवळच्या मित्रांशी याबाबत सल्ला-मसलत केली आणि गृहकर्ज काढून नवे घर घेण्याचे निश्चित केले. नवे घर होईपर्यंत त्यांनी कटाक्षाने त्यांच्या प्रेमाची जाहीर वाच्यता करायचे टाळले. जानेवारी महिन्यात घराचा ताबा मिळाला. आवश्यक ते सुशोभीकरण झाले आणि १४ फेब्रुवारीला कोर्टात जाऊन विवाह नोंदणी करण्याचे ठरले. आता घरी सांगणे भागच होते.
आता ऑफिस व्यतिरिक्तही दोघे एकमेकांना भेटू लागले. एकमेकांना जाणून घ्यायचा प्रयत्न करू लागले. आपले प्रेम धर्मबाह्य असल्याने आपल्याला घरच्यांकडून संमती मिळणार नाही हे दोघे समजून होते. युसुफ एका चांगल्या कंपनीत वरच्या हुद्द्यावर नोकरीला होता. घरून परवानगी मिळणारच नव्हती त्यामुळे लग्न झाल्यानंतर राहायचे कुठे हा त्यांच्यापुढील यक्षप्रश्न होता. अखेर युसुफने त्याच्या अगदी जवळच्या मित्रांशी याबाबत सल्ला-मसलत केली आणि गृहकर्ज काढून नवे घर घेण्याचे निश्चित केले. नवे घर होईपर्यंत त्यांनी कटाक्षाने त्यांच्या प्रेमाची जाहीर वाच्यता करायचे टाळले. जानेवारी महिन्यात घराचा ताबा मिळाला. आवश्यक ते सुशोभीकरण झाले आणि १४ फेब्रुवारीला कोर्टात जाऊन विवाह नोंदणी करण्याचे ठरले. आता घरी सांगणे भागच होते.
अपेक्षेप्रमाणेच दोघांच्याही घरून या लग्नाला कडवा विरोध झाला. ती कोकणस्थ ब्राह्मण तर तो उच्चभ्रू मुसलमान. नातेवाईक, शेजारीपाजारी,समाज काय म्हणेल या भीतीने आणि धर्मांतराच्या संभाव्य धोक्यामुळे तिच्या घरच्यांनी तिला या लग्नापासून परावृत्त करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. त्याच्या आईने तर हिंदू सून मी माझ्या घरात येऊ देणार नाही असे निक्षून सांगितले. पण दोघेही आपापल्या निर्णयावर ठाम होते. अखेर काही मित्र-मैत्रिणींच्या साक्षीने १४ फेब्रुवारी रोजी युसुफ आणि प्रिया विवाहबंधनात बांधले गेले. त्यांचा त्यांच्या नवीन घरात प्रवेश झाला. आता त्यांच्या या नव्या विश्वात ते फक्त एकमेकांसाठी होते.
लग्नानंतर नोकरी आणि घर अशी दुहेरी जबाबदारी प्रिया सांभाळू लागली. दोघांचे ऑफिस अवर्स जवळजवळ सारखेच होते. घरकामात युसुफही प्रियाला मदत करू लागला. ती कट्टर ब्राह्मण असल्यामुळे तिच्या घरी कधीही अंडेही शिजले नव्हते. युसुफ अट्टल मांसाहारी. एकदा प्रियाने युसुफला खुश करण्यासाठी अंड्याचे आमलेट करायचे ठरवले. तिने रेसिपी बघून घेतली. अंडे फोडून तव्यावर टाकले आणि त्या वासाने ती बाथरूम कडे धावली. त्या दिवसापासून युसुफने मांसाहार वर्ज केला. प्रियाने नमाज आणि रोज्याचे महत्व युसूफकडून समजावून घेतले. त्याला तोडकेमोडके मराठी येत होते पण तिच्या सान्निध्यात राहून तो बऱ्यापैकी मराठी बोलायला शिकला. दिवाळी आणि ईद असे दोन्ही सण त्याच्या घरात साजरे होऊ लागले.
एकमेकांच्या आवडीनिवडी जपत त्यांचा संसार फुलू लागला. कोणत्याही अप्रिय विषयावर चर्चा करण्याचे दोघे टाळत. त्या दोघांचे जवळचे मित्र आणि मैत्रिणी सोडून त्यांच्या घरात इतर कुणीही फिरकले नव्हते. त्या दोघांच्या घरच्यांनी त्यांना जवळजवळ बहिष्कृत केले होते. एकदा तिची आई आजारी आहे असे तिच्या कानावर आल्यामुळे चिंतीत होऊन ती तिच्या आईला भेटायला गेली परंतु तिच्या तोंडावरच घराचा दरवाजा बंद केला गेला. ती घरी येऊन खूप रडली. युसुफनेही घरची खुशाली समजून घेण्यासाठी घरी एक-दोनदा फोन केला होता पण त्याच्या घरच्यांनी त्याच्याशी संभाषण करण्याचे टाळले. घरच्यांना दुखावल्याचे शल्य दोघांच्याही मनात होते पण त्यांचाही नाईलाज होता.
म्हणता म्हणता त्यांच्या लग्नाला पाच वर्षे झाली आणि प्रियाला गोड चाहूल लागली. दोघेही हरखून गेले. बाळाची स्वप्ने रंगवू लागले. दिवस जसजसे भरत आले तसा प्रियाने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. एव्हाना त्यांचे कर्जही फिटत आले होते. युसुफ प्रियाला काही कमी पडू देत नव्हता. तिचे सगळे डोहाळे तोच पुरवत होता. तिला काय हवे काय नको यात तो जातीने लक्ष घालत होता. तिच्या वाट्याला जास्तीत जास्त आनंदाचे क्षण यावे यासाठी प्रयत्नशील होता. अधूनमधून मित्रमंडळी येऊन त्या दोघांची आस्थेने वास्तपुस्त करत होती. त्यांच्या घरच्यांनाही बाळाच्या आगमनाची बातमी या दोघांच्या मित्रांकरवी कळली होती परंतु दोघांच्याही घरून साधी चौकशी करायलाही कुणी फिरकले नाही. अखेर बाळाचे आगमन झाले. प्रियुल असे त्याचे नामकरण झाले. आई-बाबांचे बोट धरून प्रियुलची वाटचाल सुरु झाली. त्याला इतर नातेवाईक मंडळींचे कधीच दर्शन झाले नाही. आई-बाबा हेच त्याचे चिमुकले विश्व होते.
दिवसामागून दिवस आणि वर्षामागून वर्षे गेली. प्रियुल पाच वर्षांचा होणार होता.. प्रियुलचा वाढदिवस आणि त्यांच्या लग्नाचा दहाव्वा वाढदिवस एकदम साजरा करण्याचे ठरले. मित्र-मैत्रिणींना आमंत्रणे केली गेली. प्रियुलचे लहानगे मित्रही येणार होते. युसुफ आणि प्रियाच्या मित्र-मैत्रिणींनी त्यांच्यासाठी सरप्राईज गिफ्टचे आयोजन केले होते. सगळे घर रंगीबेरंगी फुगे आणि माळांनी भरून गेले. जेवणाचा खास बेत आखला होता. भला मोठ्ठा केक टेबलावर प्रसंगाची शोभा वाढवत होता. पाहुणे यायला सुरवात झाली. घर गजबजून गेले. हास्याची कारंजी उडू लागली. केक कापायची वेळ झाली आणि लहानगा प्रियुल केक कापण्यासाठी पोझ घेऊन उभा राहिला. एवढ्यात प्रिया आणि युसुफला अनपेक्षित धक्का बसला. त्या दोघांचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले. समोर खान आणि गोडबोले कुटुंबीय हसतमुखाने हजर होते. प्रियाने इतक्या वर्षांच्या साचलेल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. ही अपरिचित मंडळी बघून प्रियुल प्रथम बावरून गेला पण मग त्यांची ओळख पटताच तितक्याच जोशात त्यांच्याशी मस्ती करू लागला. घराला खऱ्या अर्थाने घरपण आले. इतक्या वर्षांचा हरवलेला आनंद मनमुराद लुटण्याचा जो तो प्रयत्न करू लागला. ती विरहाची, दु:खद जाणिवांची मधली वर्षे आनंदकल्लोळात विरघळून गेली. युसुफ आणि प्रियाच्या मित्र-मैत्रिणींच्या अथक परिश्रमांना शेवटी यश मिळालं. खान आणि गोडबोले कुटुंबियाची भेट त्यांनी घडवून आणली आणि एकमेकांविषयीच्या गैरसमजाचे मळभ पुसले गेले.
खरंच काय लागतं हो विवाह यशस्वी होण्यासाठी? फक्त एकमेकांवरील अतूट विश्वास आणि निरपेक्ष प्रेम. काही मोजक्या कपड्यांनिशी प्रियाने घर सोडलं तर युसुफनेही तेच केलं. पैसाअडका किंवा तिचे स्त्रीधनही तिने बरोबर घेतले नाही. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाची शिदोरीसुद्धा त्यांच्या नशिबात नव्हती. कुठलाही परंपरागत सोहळा नाही की हौसमौज नाही. तरीही त्यांचं लग्न यशवी झालं.
लौकिकार्थाने किंवा वरकरणी अनेक लग्ने यशस्वी झाल्याचे आपल्याला वाटत असते. कारण गृहछिद्रे झाकण्याचे कसब अनेकांना अवगत असते. संसार होतात. नवरा-बायकोची, आई-वडिलांची कर्तव्ये पार पडली जातात. पण अशा संसारात राम असतोच असे नाही. अनेक वर्षे एकत्र राहूनही नवरा-बायकोचे चेहरे एकमेकांसाठी अनोळखीच असतात. मानसिक तादात्म्य साधले जात नाही.
दाम मोजून घर खरेदी नक्की करता येऊ शकतं पण घरातील परस्परांचे सुख अबाधित ठेवणारी प्रेम नावाची गोष्ट जगातील कोणत्याही दुकानात उपलब्ध होऊ शकत नाही. तिची देवाणघेवाण ही भौतिक सुखा पलीकडची असते. अशा प्रेमाची जाणीव हा उत्तम मनुष्यत्वाचा सहज स्त्रोत असतो. अशा प्रेमाला कोणत्याही जातीपातींच्या, उच्च-नीचतेच्या,गरीब-श्रीमंतीच्या तराजूत तोलता येत नाही. पैसा व प्रतिष्ठा हे प्रेमाचे समीकरण होऊ शकत नाही.
आणि म्हणूनच या 'valentine' डे च्या निमित्ताने अशा अनेक भावी युसुफ आणि प्रियासाठी आपण शुभेच्छा देऊया आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सारासार विचारशक्तीसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment