Thursday, 2 February 2012

चिमण्यांचे सुलभ प्रसूती गृह

अनेक वर्षांपासून माझ्या मनात एक इच्छा होती की  घराच्या बाल्कनीत 'Sparrow Shelter' असावे जेणेकरून खूपशा चिमण्या खाऊ-पिऊ करण्यासाठी येतील आणि माझे घर त्यांच्या चिवचिवाटाने गजबजून जाईल. ती इच्छा काही कारणाने पूर्ण होऊ शकली नाही पण काही चिमण्या मात्र  बाथरूमच्या खिडकीबाहेर आपल्या आगमनाची वर्दी देऊ लागल्या. 
काही चिमण्यांनी त्यांच्या बाळंतपणासाठी माझ्या बाथरूमबाहेरील जाळीच्या खिडकीची निवड केली. एक चिमणा अनेकदा 'सर्व्हे' करण्यासाठी तासनतास खिडकीवर येऊन  बसायचा. मुळातच ही जागा पिल्लांसाठी कितपत सुरक्षित आहे, येथे उत्तम आणि भक्कम घरटे बांधता येईल का याचा अंदाज  तो घेत असावा. आपण कसे नवीन जागा घ्यायची म्हटली की आजूबाजूची वस्ती, शेजारीपाजारी, एकंदर सुखसोयी, वीज-पाणी अशा गोष्टींचा विचार आधी करतो त्याचप्रमाणे त्यांचे काहीसे असावे. तथापि चिमण्यांना या तात्पुरत्या का होईना पण राहत्या घरासाठी कम प्रसूतिगृहासाठी छदामही मोजायला लागणार नव्हता.  
ठिकाण निश्चित झाले आणि काड्या, कापूस, पिसे याची आयात होऊ लागली. काड्यांची रचना काही कारणाने मनाजोगती झाली नाही की चिमणी किंवा चिमणा ते काम थांबवून विचारमग्न होत असे.  कदाचित घरट्याच्या रचनेबद्दल त्यांचे एकमत होत नसावे. बांधलेले अर्धवट घरटे तसेच सोडून देऊन ते थोडे वरचे ठिकाण निवडायचे. अखेर त्यांच्या अथक परिश्रमाने ते घरटे बांधले गेले आणि पोटुशा चिमणीबाई तिथे वस्तीला आल्या. चिमणा घरट्या बाहेर राहून सर्व काही आलबेल असल्याचा कानोसा घेत असे. अवघडलेल्या चिमणीला चारापाणी देण्याच्या व्यवस्थेत गढलेला असे. चिमणी जिथे तिच्या पिल्लांना जन्म देणार होती त्या जागी मऊमऊ कापसाची बिछायत घातली होती. बाजू टोचू नयेत म्हणून पिसांचे आच्छादन होते. इतका सगळा विचार झाल्यानंतर चिमणीबाई अंडी देण्याच्या मार्गाला लागल्या. चिमण्याचा सक्त पहारा होता. घरात राहणाऱ्यांनाही त्यांचा प्रसूती सोहळा दिसणार नाही याची व्यवस्थित काळजी घेतली गेली होती. अंडी दिल्यानंतर ते उबवण्याचे काम सुरु झाले. चिमणी-चिमण्याच्या न समजणाऱ्या संभाषणाव्यतिरिक्त मला काही दिसू शकत नव्हते. काही दिवसांनी अगदी बारीकशा आवाजातील चिवचिव ऐकू आली. मी आणि माझ्या मुलींनी उत्सुकतेपोटी घरट्याकडे बघितले पण पिल्ले छोटी असल्याकारणाने दिसू शकली नाहीत. आता पिल्लांचे भरणपोषण अगदी जोमाने चालू झाले. चिमणा घरट्या बाहेरून चिमणीच्या चोचीत खाऊ देत असे आणि ती तिच्या पिल्लांना तो भरवत असे. हळूहळू त्या पिल्लांची चिमुकली डोकी वर आली. त्यांच्या कोवळ्या लालबुंद चोची कायम आ वासलेल्या असत. विलक्षण अधीर होऊन ते चाऱ्याची वाट बघत. चिमणा खाऊ घेऊन आला की एकाच हलकल्लोळ होत असे. चिमणीच्या चोचीत खाऊ आला की आधी मला, आधी मला असं जणू काही ती पिल्ले ओरडून सांगत असावीत. पिल्लांची बडदास्त अगदी चोख होती. चिमणा-चिमणीला जरा म्हणून उसंत नव्हती. ती पिल्ले सदानकदा भुकेलेली असायची. त्याच्या चोचीत चारा घालेपर्यंत त्यांची चिवचिव शांत होत नसे. अखेर काही दिवसांनी एकदम ही चिवचिव शांत झाली आणि चार दिवसांचे पाहुणे भुर्रदिशी उडून गेले. आम्ही हिरमुसलो कारण आता ते घरटे रिकामे आणि सुनेसुने वाटत होते. पण आमची ही मनस्थिती काही दिवसच टिकली कारण त्या आयत्या बांधलेल्या घरट्यातच दुसऱ्या जोडप्याची हालचाल सुरु झाली.   
यथावकाश अनेक चिमण्यांची बाळंतपणे त्या घरट्यात सुखरूपपणे पार पडली. आयत्या घरट्यात अनेक चिमण्यांनी घरोबा केला. पण काही महिन्यांनी मात्र त्या बांधलेल्या घरट्यावर दुसऱ्या नवीन घरट्याचे बांधकाम सुरु झाले. त्याच प्लॉटवर 'डुप्लेक्स' घरटे बांधून झाले आणि काही बाळंतपणे या नवीन घरट्यात झाली. रात्री 'नाईट वॉचमन' म्हणून चिमणा यायचा आणि घरट्याच्या सुरक्षिततेची टेहळणी करत राहायचा. त्याने 'NOC' दिल्यावर मग चिमण्या आपले बस्तान मांडायच्या. अंड्यातून पिल्ले बाहेर यायची. काही दिवस चिवचिवाट करून मग तीही उडून जायची. आजही हे सत्र अव्याहत चालू आहे. रात्रीचा चिमणा येऊन घरट्याबाहेर बसला की आम्हाला समजते की लवकरच हे घरटे चिवचिवाटाने गजबजणार आहे. अशा वेळी मी कविता गुणगुणायला लागते.
माझिया घरात चिमण्या आल्या   
घराचे गोकुळ करून गेल्या 
आनंदाची पिसे, सुखाचा चारा 
माझिया दारात खोवून गेल्या 
निरागस, कोवळ्या स्वरांचा गंध 
माझिया मनात लिंपून गेल्या 
मायेच्या उबेचे, मायेच्या छायेचे
पांघरूण मनावर अंथरून गेल्या 

No comments:

Post a Comment