Thursday, 23 February 2012

साध्या सोप्या गोष्टी

आपण आयुष्यात मोठ्ठ्या गोष्टी मिळवण्याच्या हव्यासापायी छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद गमावून बसतो. या छोट्या पण महत्वाच्या गोष्टींमधून आपण स्वत:ला तसेच आपल्या माणसांना आनंदी राहण्याचा आणि आनंदाने जगण्याचा कानमंत्र  देऊ शकतो.

घराच्या बाल्कनीत पाण्याने भरलेला वाडगा ठेवल्यास पक्ष्यांना त्यांची तहान भागवता येईल. घर तळमजल्यावर असल्यास थोडा खाऊ आणि पाणी ठेवल्यास कुत्रीमांजरीही याचा लाभ घेऊ शकतील. 
वाढदिवसाला जाताना महागड्या गिफ्टऐवजी जर एखादे कुंडीतले हिरवेगार रोपटे दिले तर मनातील आनंदाचं झाड जपलं जाईल आणि पर्यावरणासाठी काहीतरी केल्याचे समाधान आपल्याला मिळेल. 
झाडांशी, मुक्या प्राण्यांशी संवाद साधलात तर तुमच्यातील ममतेचा अंश त्यांना मिळू शकेल. तुमच्या स्पर्शाने त्यांना संजीवन मिळू शकेल.
तुमच्या दरमहा पगारातील छोटा हिस्सा जर समाजातील दुर्बल घटकांसाठी तुम्ही देऊ केलात तर सामाजिक ऋणातून काही अंशी उतराई होण्याचा आनंद तुम्हाला लाभू शकेल. तसेच ही कृती तुमच्या मुलांसाठी एक उत्तम आदर्श ठरू शकेल. 
घरच्यांबरोबर अथवा मित्र-मैत्रिणींबरोबर सहलीला गेलात तर ज्या ठिकाणी तुमचा मुक्काम असेल ती जागा स्वछ्च राहील याविषयी दक्षता बाळगा. रिकामी सिगारेटची पाकिटे, दारूच्या बाटल्या, अन्नाचे रिकामे खोके, प्लास्टिकच्या पिशव्या इतस्तत: टाकणे कटाक्षाने टाळा.  
मुलांनी चूक केल्यावर जसे त्यांना रागावता त्याचप्रमाणे मुलांनी एखादी चांगली गोष्ट केल्यास त्यांना शाबासकी देण्यास विसरू नका. त्यांचे प्रश्न, त्यांच्या चिंता तुमच्यासाठी क्षुल्लक असल्या तरी त्यांच्यासाठी त्या मोठ्या असतात हे त्यांच्या भूमिकेतून समजून घ्यायचा प्रयत्न करा व त्यांना कमी लेखू नका. मतदान करण्याच्या वयाच्या मुलांची मते स्वत:च्या मोठेपणाचा फायदा घेऊन धुडकावून लावू नका तर त्यांच्या मतांचा, विचारांचा आदर करा. 
गृहिणी असलेल्या स्त्रियांची कामे अजिबातच कमी महत्वाची नसतात हे पक्के लक्षात ठेवा. सगळ्यांच्या आवडीनिवडीचा विचार करून नाश्ता-स्वयंपाक करणे, डबे भरणे, कपडे-भांडी-लादी करणाऱ्या बायांची मर्जी सांभाळणे, किराणा सामान भरणे,आजारी माणसाचे वेळेवर औषधपाणी करणे, वडीलधाऱ्यांना, मुलांना, नवऱ्याला काय हवे नको ते बघणे, आल्यागेल्याची सरबराई करणे, मुलांचे अभ्यास, घरातील सण-समारंभ उत्साहाने साजरे करणे ह्या जबाबदाऱ्या फक्त ऑफिस आणि घर अशी झापड लावून वारी करणाऱ्याला कळणे कठीण आहे तेव्हा किमानपक्षी ह्या गृहिणी ह्या क्षेत्रात आपल्यापेक्षा जास्त सक्षम आहेत ही भावना मनात सदैव असू द्यावी. तू घरीच तर असतेस असे कुत्सित शेरे मारण्याऐवजी तुझे काम प्रशंसेस पत्र आहे हे त्यांना आपल्या बोलण्यातून जाणवून द्यावे.
ड्राइव्ह करताना मोबाईलचा वापर कटाक्षाने टाळावा. आपल्या इतकेच इतरांचेही आयुष्य अनमोल आहे ह्याची जाणीव असू द्यावी. आपण रिक्षा, taxi अथवा बसमध्ये बसलो असताना वाहनचालक जर मोबाईलवर संभाषण करत असेल तर त्याला वेळीच त्याच्या चुकांची जाणीव करून द्यावी. नको तिथे मूग गिळून गप्प बसू नये.  
मुलांनी निवडलेला शिक्षणाचा पर्याय अगदी आपल्याला मान्य नसेल तरी नाकारू नये. त्यांनी हा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे की मित्र-मैत्रिणींच्या आग्रहाला बळी पडून घेतला आहे ह्याची खातरजमा केल्यानंतरच आपले मत मांडावे परंतु ते मत त्यांच्यावर लादण्याचा अट्टाहास करू नये. चांगल्या-वाईटाची जबाबदारी त्यांची त्यांना घेऊ द्यावी. आपला मुलगा किंवा मुलगी ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे आणि तो किंवा ती म्हणजे आपला 'extended part' नाही ह्याचे भान असू द्यावे. 
घरातील वडीलधाऱ्यांचा आपण यथोचित आदर करावा आणि मुलांनाही करावयास शिकवावे. 'oldies', 'garbage' अशा विशेषणांनी त्यांना संबोधू नये. आपल्यालाही भविष्यात हीच वाट चोखाळायला लागणार आहे ह्याचे भान असू द्यावे. वडीलधारयांकडून चुका झाल्यास त्यांना चांगल्या पद्धतीने त्या समजावून द्यायचा प्रयत्न करावा. 
हलकी व कष्टाची कामे करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना तूछच लेखू नये. आया आणि नर्सेस शिवाय कोणताही डॉक्टर हॉस्पिटल चालवू शकणार नाही. गटारसफाई ,नालेसफाई करणारे, कचरेवाले, गाड्या धुणारे, mechanic, प्लंबर, electrician, हवालदार, कपडे-भांडी-लादी करणाऱ्या मोलकरणी याच्याशिवाय समाजाचे पानही हलणार नाही याची योग्य ती जाणीव असणे गरजेचे आहे.  
घरामध्ये एसी जरूर बसवावा  पण मुलांना मोकळ्या हवेचे महत्वही सांगावे. मुलांबरोबर परदेशाच्या सहली करा पण त्याचबरोबर भारतातील पर्यटनस्थळांचे महत्वही सांगा जेणेकरून आपल्या देशाविषयीही त्यांना तितकीच ओढ वाटेल. 
कोणत्याही सामाजिक नियमांचे उल्लंघन न करता उत्तम नागरिक होण्याचे आपले कर्तव्य चोख बजावा. 
डोळ्यांवर श्रीमंतीचे अतिक्रमण करणारे चित्रपट मुलांना दाखवत असाल तर देशासाठी, समाजासाठी स्वत:चे तन-मन-धन अर्पण करणाऱ्या समाजातील उत्तुंग व्यक्तींचीही ओळख त्यांना करून द्यायला विसरू नका.
विजेचा,पाण्याचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर कसोशीने टाळा. 
आपल्या गरजा सीमित ठेवा, राहणी साधी ठेवा, वृत्ती आनंदी आणि समाधानी ठेवा, आपले वर्तन परोपकारी, इतरांना शारीरिक आणि मानसिक इजा न पोहोचवणारे असे ठेवा. 
जसे रिकाम्या हाती आलो आहे तसेच एक दिवस रिकाम्या हाती जायचे आहे हे सत्य अधोरेखित करा. पैशाने शिगोशिग भरलेली आपली झोळी इथेच राहणार आहे परंतु आपल्या चांगल्या किंवा वाईट कर्मांनी भरलेली झोळी मात्र आपल्या बरोबरच येणार आहे याची खात्री असू द्या. 


No comments:

Post a Comment