Friday, 3 February 2012

स्वातंत्र्य आणि आम्ही


पारतंत्र्याचे सावट I महत्प्रयासाने सरले 
स्वातंत्र्यदेवता प्रसन्न I झाली आम्हां....
बलिदानांची कुरणे  I  रक्ताचे शेतमळे 
साहसाच्या बागा  I  फुलत राहिल्या ...... 
जे न पहिले-साहिले   I  जे न कधी अनुभवले 
त्या सदगुणांचे माप  I   कैसे समजावे ......
आता समाज पोटार्थी  I  पिढ्या निपजती स्वार्थी 
संवेदनाशून्य हाती  I  राज्य पडावे ......
वरिष्ठांचे लांगुलचालन  I  उघडे सुखाचे दालन 
प्रतिष्ठेचे कवाड  I  आपसूक खुले.......
 भ्रष्ट झाले राजमार्ग  I  भ्रष्ट झाल्या पाउलवाटा 
डोंगराएवढ्या नोटा I मोजून घेती......
कुणी कुणाला शोषावे  I कुणी कुणाला भक्षावे 
अटीतटीचे सामने  I  रंगा येती ..........
कुठे जाज्वल्य अभिमान   I कुठे मुल्यांची जाणीव 
नीतिमत्तेचा पान्हा  I  आटला गा........ 
थोरामोठ्यांची भाषणे   I  स्वातंत्र्याशी देणे-घेणे 
राष्ट्रप्रेमाचे उखाणे  I  पंधरा ऑगस्टला .......
जोखुनी मतांचे हित   I  समाजाचे करती अहित 
तेच आज सिंहासनी  I   बैसलेले ........
झुलतो बळींचा झुला  I  पोटाला नसे खायला 
घेती टांगुनी फासाला I  नाईलाजे ........
बलात्कार, सूड, हत्त्या  I  रोजचीच नवी कथा 
अवजारे परजती   I  विकृतीची .......
दिनचर्या माणसाची I  ओझ्याच्या गाढवाची 
विचारशून्यता अंती  I अंगी आली .........
कुटुंबाचे जरी हे कर्ते  I  देशासाठी हे नाकर्ते 
अलिप्ततेची सोय  I  अनायासे झाली .........
यंत्रयुगाची साधने  I  आज विध्वंसाच्या खाणी 
मातृभूमिचीही मती  I  सुन्न व्हावी ........  
ह्याची देही ह्याची डोळा I   विनाशाचा हा सोहळा 
पाहतो हजारो वेळा  I  जळी-स्थळी आम्ही ..........
चोहीकडे अंध:कार  I  दहशतीचा महापूर 
आरशात दुर्भाग्याच्या  I  पाहतो स्वत:ला ..........
तरीही अजुनी जागी I  एक आशा पुसटशी 
कधीतरी एके दिवशी  I जागृती होईल ......... 
जग भासेल हे नवे  I  नव्या विचारांचे थवे
कृतीच्या पंखांवर  I  स्वार होतील......... 
गरीब-श्रीमंतांची दरी  I  सुशिक्षितांची बेकारी 
अहंमन्न्यांची माजोरी  I  मातीत मिळेल ..........
कोणाच्या महाकृपेने  I  असा दिस उगवेल 
ईश्वराच्या अस्तित्वाची  I  खूण आम्हां सापडेल .........



No comments:

Post a Comment