मी 'DTP' चा कोर्स करत होते. 'Pagemaker', 'Coral Draw' आणि 'Photoshop' अशी तिन्ही तंत्रे ( techniques ) या अंतर्गत शिकवली जाणार होती. मी भलतीच उत्सुक होते. साधारण तीन एक महिन्यांचा हा कोर्स होता. पण माझी घोर निराशा झाली कारण केवळ 'टूल्स आणि टेक्निक्स' यापलीकडे विशेष काहीच शिकवले जात नव्हते. मुळातच एखाद्या टूलचा वापर हा नक्की कोणत्या कारणास्तव केला जातो किंवा जावा याविषयाची हवी तशी माहिती मिळत नव्हती. कोर्स संपत आला पण त्याविषयीच्या माझ्या ज्ञानात काही फारशी भर पडली नाही.
या तिन्हींपैकी फोटोशॉपने मला विलक्षण भुरळ घातली होती. त्यामुळे त्याविषयीची साद्यंत माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात मी होते. अखेर नेटवरून बरीच माहिती आणि फोटोशॉप ट्युटोरिअल्स बघायला मिळाली. फोटोशॉप animation मध्ये विशेष रुची निर्माण झाली. मी अनेक गोष्टी शिकत गेले. शिकता शिकता नवीन कल्पना डोक्याचा ताबा घेऊ लागल्या. आजकाल बहुतांश मुले व मोठी माणसे संगणक वापरतात. आपल्या कल्पनाशक्तीला चालना देऊन आपण याद्वारे अनेक गोष्टी साध्य करू शकतो.
एक छोटेसे रोपटे मातीतून वर येण्याची प्रक्रिया आपण दाखवू शकतो. नुसत्या छायाचित्रापेक्षा रोपट्याच्या वाढीतील जिवंतपणा जास्त परिणामकारक वाटतो.
'SIP' या शब्दातून प्रतीत होणारा अर्थ या animation द्वारे सजीव झाला आहे. शब्दांना strowberry चे आवरण आहे. रंग आणि विशिष्ट गती वापरून ही अक्षरे दृश्यमान झाली आहेत.
मंदिराचे द्वार अलगद उघडले जाते आणि गाभाऱ्यातील 'कृष्ण-राधा' ही द्वयी आपले लक्ष वेधून घेते. कृष्ण-राधेचे चित्र आणि एक सुबक नक्षीकाम केलेले दार या दोहोंच्या माध्यमातून आपण आवश्यक तो परिणाम साधू शकतो. यात कृष्ण-राधेचे चित्र स्थिर तर दाराला गती आहे.
थिएटर मध्ये बसल्यानंतर मोठ्या पडद्यावर हलणाऱ्या प्रतिमांचा या animation मध्ये मी वापर केला आहे. नुसते थिएटर आणि मोठ्या स्क्रीनवरील स्थिर चित्र यांनी तो परिणाम साधला नसता.
सर्वच मुलांना आवडणारी वेगवेगळी कार्टून्स या घड्याळात मी घेतली आहेत. आकड्यांच्या जागी कार्टून्स आणि फिरणारे काटे यामुळे या घड्याळाची शोभा वाढली आहे. मुलांना घड्याळ बघायला शिकवताना याचा उपयोग करता येऊ शकेल तसेच मुलांना हे शिकणे रंजक वाटेल.
ही फक्त काही उदाहरणे मी दिली आहेत. यात शिकण्यासारखे आणि स्वत:हून करण्यासारखे बरेच काही आहे. आपली कल्पकता वापरून जेव्हा आपण अशी animations तयार करतो तेव्हा त्यातून मिळणारा आनंद हा वेगळाच असतो. ह्याची अनुभूती सर्व आबालवृद्धांना येऊ शकते. आपल्या रोजच्या व्यापातला थोडा वेळ यासाठी काढा आणि बघा किती आणि कसा आनंद आपण मिळवू शकतो ते! विशेष करून माझे युवा पिढीला सांगणे आहे की आपला वेळ चांगल्या प्रकारे नियोजित करायला शिका आणि मनातल्या निसर्गदत्त सृजनशीलतेला, कल्पकतेला जास्तीत जास्त वाव द्या.
No comments:
Post a Comment