काटा : एकदम इडीयट आहे तो. त्याला किचनमधल्या वस्तू जागच्या जागी ठेवता येत नाहीत आणि खरकटी भांडी नीट घासताही येत नाहीत.
चमचा : अरे सवय कुठे आहे त्याला कामाची? ऑफिसमधून आला की फुल स्पीडवर पंखा सोडून त्याच्याखाली हाफ चड्डीत बसतो. पेपरची सगळी पाने उलटीपालटी करित वाचतो आणि बायकोने दिलेला आयता चहा फुर्र फुर्र करत ढोसतो.
काटा : ए त्या बरण्या बघ कशा वेगळ्याच दिसताहेत.
चमचा : बरोबर आहे. कारण बरण्यांची जागा त्या बावळटाने बदलली आहे. चहाची बरणी त्याने साखरेच्या बरणीच्या जागी ठेवली आहे. मसाले आणि ड्रायफ्रुट्स च्या बरण्या त्याच्या कृपेने एकमेकांशी खो खो खेळत आहेत.
काटा : मघाशी त्याने बरण्या शोधून मूठभर बदाम-काजू मटकावले आणि बरण्या अस्ताव्यस्त पसरून ठेवल्या. दोन दिवस बायको माहेरी काय गेली की हे पुरुष लोक घराला नुसती अवकळा आणतात.
चमचा : खरं आहे. अरे काल तिच्या माहेरी जाण्यावरून दोघांचं वाजलं की! तिची आई आजारी म्हणून ही जायला निघाली तर हा पठ्ठ्या म्हणतो कसा, 'मग मला जेवण कोण देणार?' का रे तुला दोन हात दिलेत ना परमेश्वराने? मग त्याने काय आयुष्यभर अंगाच खाजवित राहणार?
काटा : अरे साधा चहा करता येत नाही त्याला. जेवण करतोय! आज सकाळी त्याने ग्यासवर रिकामं पातेलं ठेवलं आणि त्यात पाणी घालायलाच विसरला. पातेलं चरचरायला लागलं तेव्हा त्याने घाईघाईने त्यात पाणी ओतलं. एका कपाला चार चमचे साखर आणि अर्धा चमचा चहा पावडर टाकली आणि असा तो मिट्ट गोड चहा करून प्यायला.
चमचा : हा घरी आला की घराची नुसती अडगळीची खोली होऊन जाते. पेपर, मासिके, laptop , ऑफिसची ब्याग, रुमाल, मोबाईल, ह्याचे कपडे, ओला टॉवेल जिकडेतिकडे विखुरलेले असतात. हा आवरायचे म्हणून नाव घेत नाही. बायको आहे ना दिमतीला! परत ह्याला वेळच्या वेळी खायला-प्यायला नीट हवे. नाहीतर आरडओरड ठरलेली.
काटा : नाहीतर काय. घरी आला की मोठ्ठ्याने टी.व्ही. लावतो आणि त्या खास वाहिन्यांवरील नटमोगरयांकडे डोळे फाडफाडून पाहत बसतो. लुब्रा मेला!
चमचा : अरे ह्याची बायको दिसायला काही कमी आहे का? पण तिला बिचारीला स्वत:ला आरशात बघायलाही वेळ मिळत नाही. सारखं आपलं हे आवर ते आवर. ह्याला चारी ठाव गिळायला दे. मशीनला कपडे लाव. धुतलेल्या कपड्यांच्या घड्या कर. ह्याचे कपडे इस्त्रीला दे. एक ना दोन.
काटा : ह्याचे बँकेचे व्यवहार हिनेच करायचे. भाजी-वाणसामान हिनेच आणायचं. पै पै चा हिशेब ठेवायचा. सणवार-पाहुणेरावळे सांभाळायचे. शिवाय चिंटूचा अभ्यास घ्यायचा. त्याला मार्क कमी पडले की हा लांब तोंड करून ओरडणार, 'अगं घरीच असतेस ना मग तुला एवढं सुद्धा जमत नाही का?' अरे ती माणूस आहे की ओझ्याचं गाढव?
चमचा : अरे परवा किचनचा नळ गळत होता. मालकीण म्हणाली, अहो जरा प्लंबरला प्लीज फोन करा ना. तर हा लगेच म्हणतो कसा, हे बघ, ऑफिसशिवाय मला काही माहित नाही. ह्या सगळ्या घरगुती गोष्टींत तूच लक्ष घालायला हवंस. वा रे वा!
काटा : ए ती कढई बघितलीस सिंकमध्ये टाकलेली?
चमचा : श्शी! केवढी काळी कळकट झाली आहे.
काटा : ह्याचीच किमया. काल जाताना तिने भाजी करून ठेवली होती. ह्याला ती फक्त गरम करून घ्यायची होती. ह्याने कढईत भाजी काढून ती गरम करायला ठेवली. ह्याचे लक्ष दुसरीकडेच. शेवटी भाजी करपली. ती त्याने चपातीबरोबर कशीबशी गिळली आणि भाजीची कढई तशीच सिंकमध्ये टाकली. तीत पाणी सुद्धा घालायचे कष्ट घेतले नाहीत.
चमचा : एका दिवसातच घराचा भयंकर कायापालट झालाय. अजून पूर्ण एक दिवस बाकी आहे.
काटा : त्या वॉशिंग मशिनच्या बाजूला पाण्याचं थारोळ कसं झालं?
चमचा : मालकाने मशीनमध्ये पाणी भरायला लावलं आणि टी.व्ही. बघत बसला. त्या नटव्यांना बघता बघता हा विसरून गेला आणि पाणी जमिनीवर सांडलं.
काटा : पण मी म्हणतो त्याने पुसून का घेतलं नाही लगेच?
चमचा : अरे वेळ कुठे आहे त्याला ? बायकोच्या अपरोक्ष पहायच्या गमतीजमती आत्ताच पाहणार ना? शिवाय अवतीभवती चिंटू असला की ह्याची गोची होते.
काटा : त्या तिथे टेबलावर काहीतरी चिकट पडलंय बघ.
चमचा : हो. साखरेसारखं दिसतंय आणि त्याला मुंग्या लागल्या आहेत.
काटा : देवा देवा! कधी अक्कल येणार ह्या माणसाला? घराची पार वाट लावलीय.
चमचा : आता उद्या मोहना येईल ना घरकामाला तेव्हा तिच्या कपाळावर सतराशे साठ आठ्यांच जाळ पडलेलं असेल. उद्या ती धुसफुसतच काम करेल बघ.
काटा : पण आपण काय करणार? ती कढई बघून तिला नक्की झीट येणार. साहेबाला ती मनातल्या मनात शिव्यांची लाखोली वाहणार.
चमचा : अरे ते फ्रीजचं दार अर्धवट उघडं आहे की काय?
काटा : हो की रे. मघाशी त्याने बायकोने करून ठेवलेले पुडिंग फ्रीजमधून काढून खाताना मी पाहिले.
चमचा : आता फ्रीज बंद कसा होणार?
काटा : आता उद्या ह्या घराचा नकाशा मोहनाच बदलू शकेल. आपण कशाला डोक्याला नसती झिगझिग करून घ्यायची ?
चमचा : तुझं बरोबर आहे. आपण जरा उभ्याउभ्याने विश्रांती घेऊया.