Monday, 19 March 2012

पुतळे


आजकाल जिवंत माणसांपेक्षा पुतळ्यांचे महत्व जास्त वाढले आहे. चालतीबोलती हाडामांसाची माणसे नकोत पण निर्जीव पुतळे हवेत. कारण हे पुतळे बिचारे निषेधार्थ आवाज उठवू शकत नाहीत. त्यांची विटंबना करा, त्यांना चपलांचे हार घाला, त्यांच्यावरून राजकारण करा, त्यांची स्थापना करून कावळ्या-कुत्र्यांची सोय करा, त्यांचे काही म्हणणे नसते.   
हे पुतळे बांधण्याचा आग्रह धरणारे किती जण या गतकाळातील लोकनायकांच्या तत्वांचे प्रामाणिकपणे आचरण करणारे असतात? एकही नाही. तरीही यांना कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेले पुतळे हवेत. देशातील कोट्यावधी गरीब जनता अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत सोयींपासून  वंचित राहो, यांना पुतळे हवेत. दिवसेंदिवस महागाई अगदी गगनाला भिडो, यांना पुतळे हवेत. लक्षावधी बेरोजगार नोकरीच्या शोधार्थ वणवण फिरोत पण यांना पुतळ्याचा प्रश्न जीवनमरणाचा वाटतो. दिसामाशी प्रचंड वाढणारी गर्दी, बाहेरील देशांतून येणारे लोंढे, अपुरी भासणारी वाहतुकीची साधने, पाण्याचा तुटवडा, जागोजागी दिसणारे कचऱ्यांचे ढीग, उखडलेले रस्ते, उघडी गटारे, हॉस्पिटल्सची दुरावस्था, प्रदूषणाची सतत भेडसावणारी समस्या, गरजेच्या वस्तू महागल्याने सामान्यांची परिस्थितीशी सदोदित चाललेली लढाई या व अशा प्रश्नांपेक्षा पुतळे अथवा स्मारके कुठे उभारायची हा प्रश्न जास्त ज्वलंत आहे असे यांना वाटते.
कधी वाटते की या निष्प्राण पुतळ्यांत  कुणीतरी प्राण फुंकावेत आणि त्यांचे मनोगत ऐकावे. जिवंत माणसांना भेडसावणारे प्रश्न किती महत्वाचे आणि पुतळ्यांच्यावरून होणारे राजकारण किती महत्वाचे यावरील त्यांचं भाष्य तरी ऐकता येईल. काय म्हणतील ते या राजकारण्यांना? अरे, आमच्या तत्वप्रणालींशी ज्यांचे काडीचेही सोयर-सुतक नाही अशी  माणसे जेव्हा काही राजकीय हितसंबंध, स्वार्थ जोपासण्यासाठी आमची स्थापना करायला निघतात तेव्हाच आमची खरी विटंबना होते. ज्या वीरांनी, देशभक्तांनी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्या स्वतंत्र भारतातील किती जनता आज खऱ्या अर्थाने वैचारिकदृष्ट्या,  आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे याचा हिशेब द्या. हा भारत आजमितीला जातपात, धर्मांधता, लाचारी, बेकारी, गरिबी, भ्रष्टाचार, चोरीमारी, खून-आत्महत्या, आतंकवाद यांपासून खऱ्या अर्थाने मुक्त झाला आहे का याचा हिशेब द्या. ज्या थोर लोकांनी या देशाच्या उन्नतीसाठी, विकासासाठी आपले अवघे आयुष्य पणाला लावले अशा लोकांनी घालून दिलेला समाजहिताचा आदर्श तुम्ही दृष्टीसमोर ठेवून त्याबरहुकुम वागताय का याचा हिशेब द्या. देशाचे शांघाय करण्याच्या प्रयत्नात किती जनविकासाच्या प्रकल्पांना तुम्ही कायमची घरघर लावणार आहात त्याचा हिशेब द्या. गरीब-श्रीमंत यांमधील दरी मिटवण्यासाठी तुम्ही किती सक्रीय आहत याचा हिशेब द्या. नवनवीन बांधकामे काढून तेथील हिरवळ,तिवरे,वृक्ष यांना हानी पोहोचवणाऱ्या महाभागांना तुम्ही का राजाश्रय देता याचा खुलासा करा. नद्या, खाड्या बुजवणाऱ्या, नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश करणाऱ्यांना तुम्ही कोणती शिक्षा देता याचा खुलासा करा. देशाद्रोह्यांविरुद्ध कडक शिक्षेची अंमलबजावणी तर सोडाच पण त्यांच्या सुरक्षेवर कोट्यावधी रुपये अकारण खर्च करणाऱ्यांनो तुमच्या या निंदनीय कृत्याचा खुलासा करा. जंगले तोडणाऱ्या, आपल्या स्वार्थासाठी मुक्या जनावरांची हत्या करणाऱ्या या मानवाच्या रूपातील पशुंनो आपल्या या निर्दय वागणुकीचा खुलासा करा.  इतक्या वर्षांत साधी असहाय स्त्रियांकडे बघण्याची समाजाची दृष्टी तुम्ही बदलवू शकला नाहीत हा आमच्या मूल्यांचा  पराभव आहे. धर्माचे,जातीपातीचे अवडंबर माजवून त्या बळावर राजकारण खेळले जाते आहे हा आमच्या विचारसरणीचा पराभव आहे.  क्षुद्र स्वार्थापायी आज अनेकजण गरिबीच्या, बेकारीच्या अंधारात ढकलले जात आहेत हाही आमचा पराभव आहे. अजूनही सर्वार्थाने या देशातील निरक्षरता आणि दारिद्य्र यांचे समूळ उच्चाटन होत नाही हा आमचा पराभव आहे. 
ज्या पायदळी तुडवल्या गेलेल्या आमच्या तत्वांच्या छाताडावर आज राजकारणी मनसुबे रचले जात आहेत त्या देशात सन्मानाने उभे राहण्यासाठी आम्हाला जागाच उरलेली नाही. गरीबाच्या पोटाला पुरेसे अन्न द्या, बेकारांना नोकरी द्या, बेघरांना माफक दरात घरे द्या, महागाईचा आवळलेला फास सैल करा, ज्याच्या श्रमावर अवघा देश, राष्ट्र पोसले जाते त्या शेतकऱ्याची झोळी सुखाने भरा, जनावरांच्या हत्या करू नका, नैसर्गिक संपत्तीचे जतन करा, वाढत्या लोकसंख्येला आळा घाला, बाहेरून येणारे लोंढे थांबवा, जातीयतेला खतपाणी घालू नका  मग भले आमचे पुतळे उभारले नाहीत तरी चालेल. नाहीतरी केवळ १५ ओगस्ट, २६ जानेवारी अशा काही तारखांनाच देशांतील लोकांना राष्ट्रप्रेमाचे भरते येत असते. त्या निमित्ताने आम्हाला धुवून-पुसून स्वच्छ केले जाते. कारण झेंडावंदनाचा  उपचार पार पाडायचा असतो. इतर वेळेस मात्र काही पक्षी-प्राणी आमच्यावर त्यांचा हक्क निर्विघ्नपणे बजावत असतात. आमच्या काही अवयवांचीही पडझड झालेली असते. धुळीचे लोट आमच्यावर त्यांचे वर्चस्व गाजवीत असतात. आमच्या अंतरंगात डोकावून पाहण्याची कोणाचीच इच्छा नसते कारण आम्ही मुळी निर्विकार, निर्विचार, स्तब्ध, अचल असतो. ही मानहानी सोसण्यासाठीच का आम्ही आमचे रक्त सांडले? असा आम्हाला वारंवार प्रश्न पडतो.   
आमचे पुतळे अजिबात उभारू नका पण आमचे विचार अंगीकारून कृपया समाजाचे हित साधा एवढीच आमची कळकळीची विनंती आहे नाहीतर जिवंत माणसांचे पुतळे होण्यास वेळ लागणार नाही.  


Wednesday, 14 March 2012

किमया मेकअपची !

निमिषा कॉलेजमधून घरी आली आणि  तिने पलंगावर स्वत:ला हताशपणे झोकून दिले.  सुधाताईंनी कानोसा घेतला. हे असे किती दिवस चालायचे? हिच्याशी आजतरी बोललेच पाहिजे. निमू उठतेस का? मी गरमागरम चहा आणि तुझी आवडती भजी करते. निमिषाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. सुधाताईंनी ताडले की आज तिचे जरा जास्तच बिनसले असावे. गेले पंधरावीस दिवस निमिषा अस्वस्थ होती. तिचा चेहरा निराशेने काळवंडला होता. तिच्या म्हणण्याप्रमाणे खूप खूप क्रीम्स, लोशन्स, फेस स्क्रब्स लावूनही तिचा चेहरा टवटवीत, तजेलदार, तुकतुकीत दिसत नव्हता. जाहिरातीतील नट्यांनी अंगाला लावलेले साबण ती वापरत होती. त्यांनी रेकमेंड केलेली फेअरनेस क्रीम्स वापरत होती. शिवाय पिंपल्सचा प्रॉब्लेम सतावत होता तो वेगळाच! काही दिवसांत, काही महिन्यांत त्या नट्यांच्या चेहऱ्यात जे आमुलाग्र बदल होतात ते निमिषालाही अपेक्षित होते. त्यांच्या केसाचे टेक्स्चर आणि तिच्या केसांचे टेक्स्चर यांत तिच्या मते जमीन-अस्मानाचा फरक होता. सुधाताईंनी  त्यांच्या परीने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ज्याचे नाव ते! जाहिरातींची खोटी, बनावट दुनिया तिला खरी, वास्तवातील वाटायला लागली होती. ती स्वत:ची त्या जाहिरातींमधल्या मॉडेल्सशी, नट्यांशी तुलना करून स्वत:ला कमी लेखू लागली होती. या न्यूनगंडाच्या भावनेमुळे तिला तिचे मित्र-मैत्रीणीही नकोसे वाटू लागले होते. थोडक्यात काय तिचे कशातच मन लागत नव्हते.  
सुधाताई हुशार होत्या. आज कसेही करून निमिषाला सत्याचा चेहरा दाखवायचाच असे त्यांनी ठरवले. नाहीतर ती कायमची मोडून जाईल अशी चिंता त्यांना सतावत होती. त्यांनी निमिषाला बळेबळेच उठवले. तिला हात-पाय धुवायला सांगितले आणि तिच्या पुढ्यात गरम चहाचा कप ठेवला. निमिषा सुधाताईंना नजर (eye contact) सुद्धा  देत नव्हती. सुधाताई आतमध्ये गेल्या  आणि त्यांनी तिच्यासमोर एक मासिक उलगडून तिला दिसेल असे ठेवले. तिने हळूच मासिकावरील ते चित्र पहिले आणि ती उडालीच! श्शी! आई ही कोण आहे ग? तिने तो चेहरा ओळखला होता पण तिचा विश्वास बसत नव्हता. मग सुधाताईंनी असे अनेक चेहरे मासिक उलगडून तिला दाखवले. प्रत्येक चेहऱ्यागणिक तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटत होते. चेहऱ्यावर मेक-अप नसताना या सगळ्या नट्या कशा दिसतात पाहिल्यास ना? अग चेहऱ्यावर एवढी रंगरंगोटी केल्यावर आपणही त्यांच्यासारखे  छानच दिसू की! त्यांची केशभूषा-वेशभूषा-मेकअप ही सारी बाह्य किमया असते. पण अभिनय मात्र त्यांचा त्यांनाच करावा लागतो बरं का. तू बघतेस त्या जाहिराती आकर्षक असतात पण तद्दन खोट्या असतात. या नट्या खरोखरच ते शाम्पू, ते साबण, ती नाना प्रकारची क्रीम्स वापरतात असं तुला खरंच वाटतं का? अग एकदा का अभिनय करून त्या पडद्यामागे गेल्या की अगदी तुझ्या-माझ्यासारख्याच त्या सामान्य दिसू लागतात. उलट इतक्या पॉवरफुल लाईट्समुळे त्यांची त्वचा लवकर खराब होते. ते खोलगट डोळे, ते बसकं नाक, ती गालफडे, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या बघून निमिषा चांगलीच हबकली होती. याच नट्या पडद्यावर कित्ती सुंदर दिसतात? त्यांचं चालणं, बोलणं, हसणं, दिसणं  पाहून अगदी मन मोहून जातं.   खरेच त्यांच्या त्या रुपाला आपण इतके दिवस खरं समजत होतो आणि आपले आरशातले रूप पाहून मनोमन खंतावत होतो. जाहिरातीतल्या त्या मॉडेल्स काही दिवसातच कोणकोणती क्रीम्स थापून एकदम सुंदर दिसायला लागायच्या, त्यांचे ते शाम्पू लावल्यानंतरचे सळसळते ,चमकदार केस पाहून आपण दिपून जायचो. आईने किती वेळा आपल्याला सांगितले तरी आपण विश्वास म्हणून ठेवायचो नाही. निमिषा खुदकन हसली. तिचा हसरा चेहरा पाहून सुधाताई आनंदल्या.  
आई मी या मासिकातल्या नट्यांपेक्षा खरंच चांगली दिसतेय की!  निमिषाचा हरवलेला विश्वास तिला परत मिळाला होता. अग आई कॉलेजचा अन्युअल डे दोन दिवसांवर आलाय आणि कॉमपेरिंग मला करायचं आहे. मी विदुलाला फोन करते हं ! असे म्हणून एका वेगळ्याच खुशीत निमिषाने मोबाईल कानाला लावला.   

मी स्पिरिच्युअल (?) आहे

खूप देवभोळ्या लोकांना ते स्पिरिच्युअल आहेत असे वाटत असते. पोथ्या-पारायणे केली, नवस-सायास केले, देवदर्शने केली की त्यांना स्पिरिच्युअल झाल्यासारखे वाटत असावे. सारख्या देवळात जाणाऱ्या बाईविषयी इतर बायकांचे मत ' ए, ती खूपच स्पिरिच्युअल आहे ना' असेच असते.      
वास्तविक पाहता 'स्पिरीट' म्हणजे 'सोल' अर्थात माणसाचा अंतरात्मा. या स्पिरिटच्या जवळ जाणे याला माणसाचा स्पिरिच्युअल प्रोग्रेस असे म्हणता येईल. आपल्या आत असलेला चैतन्याचा उगम अनुभवणे या भावस्थितीला स्पिरिच्युअल म्हणता येईल. बरेच वेळा स्पिरिच्युअल आणि धार्मिक यात गल्लत केली जाते. धर्मानुसार आचरण करणे वेगळे आणि आपला पिंड, मूळ जाणून त्यानुसार आचरण करणे वेगळे. देवळातील देवाचे दर्शन घेणे म्हणजे स्पिरिच्युअल होणे नाही. देवदर्शनाला जाणे हा नित्यक्रम असू शकतो, हा एक दिखाऊपणा असू शकतो, ही एक अगतिकता असू शकते, तो एक विरंगुळा असू शकतो किंवा ही एक समवयस्कांबरोबर चर्चेची जागा असू शकते. 
अध्यात्म्यावरील प्रवचनांना हजेरी लावण्याच्या उद्देशाने जाणारे अधिक असतात. तात्विक, बोधप्रद असे भाष्य ऐकून तेवढ्यापुरते ते त्यात रंगून जातात पण बाहेर येताच प्रपंचातील गोष्टींचा उहापोह सुरु होतो. 'आपुला आपणाशी संवाद' ज्यांना खऱ्या अर्थाने साधता येतो ते आत्मोन्नती साधू शकतात. प्रापंचिक असूनही स्वत:च्या पिंडाशी, आत्मरूपाशी जे तादात्म्य पावू शकतात त्यांना त्या ईश्वरी शक्तीची प्रचीती येते. नाम घ्या असे प्रवचनकारांनी सांगितले आहे म्हणून केवळ जे नाम घेऊ इच्छितात परंतु त्यांची ती हाक अंतरहृदयापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्या शक्तीची प्रचीती येण्यास ते असमर्थ ठरतात. 

माझ्याकडे एक बाई त्यांच्या मुलाच्या पत्रिकेसंदर्भात काही प्रश्न घेऊन आल्या होत्या. माझा मुलगा देवाला हात म्हणून जोडत नाही, देवाचं काही म्हणत नाही, देवळात चुकूनही जात नाही अशा अनेक तक्रारी त्यांनी माझ्यासमोर मांडल्या. त्याच्या नास्तिक वागण्याचा एकंदर त्यांना फारच ताप झालेला माझ्या लक्षात आला. आमच्याकडे देवाचं, कुळाचाराच केवढं आहे आणि हा पडला असा. आता यावर उपाय काय हे त्यांना समजेनासं झालं होतं म्हणून हा पत्रिका दाखवण्याचा उपचार होता. मुलगा दहाव्वीत होता. त्याचा अभ्यास उत्तम होता. त्याला खेळात आणि चित्रकलेतही विशेष गती होती. कोणत्याही क्लासला न जाता तो मेहनत करून चांगले गुण मिळवत होता. दहाव्वीला असल्यामुळे जर याने एकदाही देवाचे स्तोत्र म्हटले नाही, नमस्कार केला नाही किंवा देवळात गेला नाही तर याचे काही खरे नाही अशी बहुतेक त्या बाईंनी समजूत करून घेतली होती. थोडक्यात त्यांचा मुलगा देव मानत नव्हता. हा कुणाशी वाईट वागतो का हो? हा दुष्ट,गर्विष्ठ आहे का?  हा वडीलधारयांशी विनयाने वागत नाही का? याचे मित्रांशी जमते का? हा अप्रामाणिक आहे का? ह्याला इतरांना मदत करायला आवडते का? असे काही प्रश्न त्यांना मी विचारले. हा मुलगा सुस्वभावी, विनयशील, प्रामाणिक, निगर्वी आणि कष्टाळू आहे असे त्यांच्याकडून मला कळले. ज्या गोष्टी तो करतो त्या मन लावून किंबहुना त्यात सर्वस्व ओतून करतो ही माहितीही त्यांनी दिली. तेव्हा तुम्ही बिलकुल काळजी करू नका. त्याला त्याचा देव सापडला आहे असे मी सांगितले. त्यांचे फारसे समाधान झालेले त्यांच्या चेहऱ्यावरून मला दिसले नाही त्यावरून ह्या बहुधा आता दुसऱ्या एखाद्या ज्योतिषाचा दरवाजा ठोठावतील असे मी मनातल्या मनात भाकीत केले.  
आपल्यापैकी बहुतांश लोक हे सगुण भक्ती करणारे असतात. ह्या घरांतील देव्हाऱ्यात किंवा देवळांतील गाभाऱ्यात स्थापलेल्या मूर्तीची पूजा आपण करतो. रोज देवाला जाणारे असतात, स्तोत्रे म्हणणारे असतात, जपमाळा ओढणारे असतात, प्रदक्षिणा घालणारे असतात, शंखनाद करणारे असतात, टिळे लावणारे असतात, पैशाने, सोन्या-चांदीने देवाला मढवणारे असतात, स्वत:च्या पोझिशनचा फायदा घेऊन रांगेत घुसून देवदर्शन करू पाहणारेही असतात. यांतील खरोखर किती लोकांचा भक्तीभाव आतून जागृत झालेला असतो? सांगणे अत्यंत कठीण आहे.  
देव बघण्यासाठी अथवा देवत्वाची प्रचीती येण्यासाठी देवळातच जायला पाहिजे असे कुठे लिहून ठेवले आहे का? तुमच्या अभ्यासात, कामात, कर्तव्यात, परोपकारातही तुम्ही देवाला पाहू शकता. तुमच्यातील सद्गुण हे देवस्वरुपच असतात. 'नसे राउळी वा नसे मंदिरी, जिथे राबती हात तेथे हरी' ह्या गदिमांच्या ओळी इथे तंतोतंत पटतात. स्वत:त वसलेल्या त्या आत्म-स्वरुपाची प्रचीती येणे अगोदर गरजेचे असते. त्या स्वरूपाने दिलेली साद ऐकणे गरजेचे असते. त्यांचा आवाज समजणे गरजेचे असते. नाहीतर घरच्यांनी सांगितले म्हणून, भीतीपोटी म्हणून, टेन्शन येते म्हणून, मित्रांनी खेचले म्हणून देवळात जाणारे अनेक असतात. राम म्हणायचे म्हणून राम असे म्हटले गेले तरी त्यात राम असतोच असे नाही तर त्याचा उद्भव हृदयातून व्हायला हवा. आंधळ्या-पांगळ्याला, तहानल्या-भुकेलेल्याला, मुक्या जनावराला, आजाराने-वृद्धत्वाने जर्जर झालेल्याला मदतीचा हात जेव्हा दिला जातो त्यात राम असतोच. 
महायोगी कै. बाबा आमटे देवळाच्या पायऱ्या भले चढले नाहीत पण त्यांच्यातील देवाचं दर्शन अनेकांना संजीवन देऊन गेलं. स्व-चैतन्याला ओळखून त्यांनी कुष्ठसेवेचं रामायण घडवलं आणि असंख्य पीडितांच्या मनात आनंदवन फुलवलं. याच चैतन्याच्या लाटेवर आरूढ झालेले रामकृष्ण परमहंस जगाने अनुभवले. मदर तेरेसांच्या अंत:करणातील त्या चैतन्यरुपी शक्तीने दीन-दु:खितांच्या मनावर हळुवार फुंकर घातली. स्वामी विवेकानंदांच्या त्या चैतन्याने अवघ्या विश्वालाच गवसणी घातली. स्वत:चा आतला आवाज ओळखून त्याबरहुकुम आचरण करणारी ही माणसे म्हणजे 'दिव्यत्वाची प्रचीती' ठरली.  पराकाष्ठेचे हाल सोसून ज्ञानेश्वरांनी जनोद्धारासाठी अंत:प्रेरणेने ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्यांच्यातील परम-रूपाचा साक्षात्कार लिखित स्वरुपात आपण आजही अनुभवतो आहोत.    
जितका माणूस स्व-स्वरूपापासून दूर जाईल तितकीच त्याची 'स्पिरिचुअल' भावना लयाला जाईल.  आपल्या मनावर साचलेलं मायेचं शेवाळ प्रयत्नपूर्वक बाजूला सारून ज्या क्षणी माणूस आत्म-रुपाला पाहील व त्याप्रमाणे आचरण करेल त्या क्षणी तो 'स्पिरिचुअल' होईल.  

Sunday, 11 March 2012

ब्रेन प्रोग्रामिंग

नुकतंच मी डॉ. रमा मराठे यांनी लिहिलेलं 'ब्रेन प्रोग्रामिंग' अशा शीर्षकाचे पुस्तक वाचले. अतिशय साध्या, सोप्या शैलीत त्यांनी काही मुद्दे मांडून सकारात्मक ( positive) आणि नकारात्मक (negative) अशा परस्परविरोधी ब्रेन प्रोग्रामिंगविषयी  सविस्तर चर्चा केली आहे. अनेकांना हे पुस्तक उदबोधक ठरेल यात शंका नाही. ही बहुमूल्य माहिती पुस्तकाव्दारे दिल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार! 
आपण जन्मल्यापासून ते वार्धक्यापर्यंत घरातील माणसांचा, इतर नातलगांचा, शेजाऱ्यांचा, ओळखीच्यांचा, मित्र- मैत्रिणींचा सामाजिक आणि राजकीय घटकांचा, बाह्य घडामोडींचा आपल्यावर चांगला वा वाईट परिणाम होत असतो.  आपल्या संपर्कात आलेली माणसे आपल्याला आपल्याविषयी काही विशिष्ट प्रतिमा ( image ) देत असतात. काही वेळेस ह्या प्रतिमा सकारात्मक असतात तर काही वेळेस नकारात्मक! उदा. आई अनेक वेळा तिच्या दोन मुलांमध्ये त्यांच्या बाह्य रूपावरून किंवा तिला जाणवलेल्या गोष्टींवरून फरक करते. हा काळा तो गोरा किंवा हा उंच तो बुटका किंवा हा जाड तो बारीक किंवा हा हुशार तो मठ्ठ याप्रमाणे. आईकडून या भावना व्यक्त होतात आणि मुले ह्या तिने दिलेल्या प्रतिमा स्वीकारतात.  सकारात्मक प्रतिमा मुलांचे मनोबल उंचावतात तर नकारात्मक प्रतिमा स्वीकारल्यामुळे मुलांचे मनोबल खचते. आपण काळे आहोत अथवा बुटके आहोत अथवा जाडे आहोत किंवा मठ्ठ आहोत ही आईची आपल्याबद्दलची मते अंतर्मनात खोलवर रुतून बसतात आणि आपल्याला स्वत:विषयी घृणा उत्पन्न होते. घरचे किंवा समाज आपल्याला स्वीकारतो ही त्यांची मेहेरबानीच आहे असे आपल्याला प्रकर्षाने वाटू लागते. आपण अभ्यासात (इतरांच्या म्हणण्यानुसार) मठ्ठ आहोत म्हणजे आपण कुचकामी आहोत हा विचार आपल्या आत्मविश्वासावरच थेट आघात करतो. परिणामी न्यूनगंडाची भावना आपल्याला अंतर्बाह्य पोखरून टाकते आणि आपले व्यक्तित्व झाकोळले जाते. 
खरं म्हणजे आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच असतो हे निर्विवाद सत्य आहे. आपल्याला घडवणारे आपणच आणि  बिघडवणारेही आपणच असतो. वडील रोज दारू ढोसतात म्हणून तेवढेच योग्य समजून एक मुलगा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून दारुडा होतो आणि दुसरा या पित्यासारखं कसं व्हायचं नाही यासाठी अमाप प्रयत्न करून एक यशस्वी उद्योजक होतो. एकाच वातावरणात दोघेही वाढलेले पण दोघांच्या अंतर्मनात स्त्रवणारे विचार मात्र सर्वस्वी भिन्न!  आपल्या पुढील पाण्याचा ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे हे आपली त्याकडे बघायची दृष्टी ठरवत असते. आयुष्यातील आव्हानांना संकटं म्हणून घाबरायचे की यशाप्रत नेणारा खडतर मार्ग म्हणून त्यांना सामोरे जायचे ह्याकडे बघण्याचा दृष्टीकोन ज्याचा त्याचा वैयक्तिक असतो. आव्हाने पेलण्याची ताकद ही मनात असावी लागते आणि मन अशा आव्हानांकडे सकारात्मक दृष्टीने बघण्यास उद्युक्त व्हावे लागते. यासाठी योग्य ते ब्रेन प्रोग्रामिंग व्हावे लागते. 
शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तींकडे आपण आदराने बघतो, त्यांचे गुणगान करतो प्रसंगी त्यांचा हेवाही करतो. आपल्याला हे जमणार नाही अशी एक न्यूनत्वाची भावना त्यांच्याकडे बघताना आपण करून घेतलेली असते. परंतु हे यशाचे शिखर सर करताना त्यांनाही कैकदा प्रतिकूलतेशी झुंजावे लागलेले असते. समाजाचा रोष सहन करावा लागलेला असतो. कौटुंबिक निंदा सहन करावी लागलेली असते. वाटेत येणारे, थकवणारे, वाकवणारे धोंडे, काटेकुटे स्व-प्रयत्नांनी दूर सारावे लागलेले असतात.  यश हे कुणालाच सहजसाध्य नसते. प्रथम ते मिळवण्यासाठी आणि नंतर ते टिकवण्यासाठी खूप प्रयास करावे लागतात.  माउंट एव्हरेस्ट चढण्यासाठी तुम्ही ट्रेनिंग लाख घ्याल पण त्याआधी मनातील माउंट एव्हरेस्ट पादाक्रांत कराल की नाही? शिखर सर करण्यासाठी उपयोगी अवजारे जवळ आहेत पण मनातील सकारात्मक अवजार जर योग्य वेळी परजल गेलं नाही तर काय उपयोग? बाह्य लढाई जिंकण्याआधी ती लढाई मनातून जिंकणे अति-आवश्यक आहे. 
अनेक वेळा चुकीच्या ब्रेन प्रोग्रामिंगमुळे  आपण चांगली संधी गमावून बसतो. एक उच्चशिक्षित , चांगल्या स्वभावाचा तरुण मुलगी बघायला येतो. मुलीला मात्र काळी, बुटकी, नाकात गेलेली अशी अनेक लेबलं इतरांनी लावलेली असतात. कसं व्हायचं हिचं? हिच्याशी लग्न कोण करणार? असे प्रश्न ती घरच्यांच्या डोळ्यांत बघत आलेली असते. हीच नकारात्मक प्रतिमा ती सातत्याने स्वत:ला देत आलेली असते. वास्तविक पाहता ती अभ्यासात हुशार असते. चांगली शिकलेलीही असते परंतु तिच्या बाह्यरूपावरून इतरांनी तिला दिलेली प्रतिमा तिने स्वीकारल्यामुळे तिचा आत्मविश्वास हरवलेला असतो. तिच्या मनातील न्यूनगंडाची भावना प्रबळ होते आणि हा आलेला मुलगाही आपल्याकडे त्याच नजरेने बघेल या भीतीने ती बाहेर येत नाही आणि  आयुष्यातील एक संधी ती मनातून हरते. 
आपण स्वत:ला आनंदाच्या लहरींवर तरंगत ठेवायचं की दु:खाच्या खाईत लोटायचं हे ज्याचं त्याने ठरवावं. प्रत्येकाची स्वत:ची बलस्थानं असतात, कमतरता असतात. प्रयत्न असा झाला पाहिजे की तुमच्या उणीवा अग्रभागी राहणार नाहीत. आपल्या मनाचं सारथ्य आपल्याला कुशलतेने करता यायला हवं. नकारात्मक विचारांचे अवजड धोंडे प्रयत्नपूर्वक बाजूला सारून आपला रथ आपल्याला इप्सिताच्या दिशेने कूच करता यायला हवा. तेव्हाच अतिशय दुर्लभ असा मनुष्य जन्म अचूक ब्रेन प्रोग्रामिंगची कास धरून आपण निश्चितच सार्थकी लावू शकतो. 

Thursday, 8 March 2012

'वूमन्स डे' च्या निमित्ताने.........

दरवर्षीप्रमाणे ८ मार्च हा दिवस येतो आणि काही मोजक्या विदुषी सन्मानित होताना आपल्याला दिसतात. तेवढ्यापुरता स्त्री-स्वातंत्र्याचा उदोउदो होतो आणि तो दिवस पालटताच पुन्हा जळी-स्थळी पुरुषप्रधान संस्कृती आपले हातपाय पसरू लागते. 

मुळात खरोखरी किती स्त्रियांना वैचारिक स्वातंत्र्य मिळते किंवा ते मिळवता येते ही एक संशोधनाचीच बाब आहे. आजही शहरी स्त्री काय किंवा ग्रामीण स्त्री काय आपल्या अस्मितेसाठी, आपल्या सन्मानार्थ दृढपणे उभी राहिलेली आपल्याला क्वचितच दिसते. अनेक स्त्रियांवर अनन्वित अत्याचार होतात, स्त्री-भ्रूणहत्या सर्रास केल्या जातात, मुलगा आणि मुलगी असा घृणास्पद भेदभाव त्यांना वाढवताना केला जातो, घटस्फोटित, बलात्कारित, परित्यक्ता, विधवा, आजन्म कुमारिका स्त्रीकडे अत्यंत आक्षेपार्ह नजरेने समाज बघतो. बोडकी, लाल आलवणातील स्त्री ही स्त्रीची बाह्य-प्रतिमा जरी आज लुप्त झालेली असली तरीही समाजाची अशा स्त्रियांकडे बघण्याची दृष्टी ही सदोष असते. 'स्त्री म्हणजे आपल्या पायाखालची वहाण' या पुरुषांच्या मानसिकतेला आव्हान देऊन अनेक स्त्रिया निर्भीडपणे  उभ्या राहिल्या आणि स्वत:चे वैचारिक अस्तित्व त्यांनी सिद्ध केले परंतु अशा स्त्रियांची टक्केवारी आजमितीला फारच कमी आहे ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे. 
आपलं तान्हुलं पोर पाठुंगळीला घेऊन झाशीची राणी इंग्रजांवर स्वार झाली.संत मुक्ताईने तिच्या ओजस्वी वाणीने समाजोद्धार केला. अहिल्याबाई होळकरांनी समाजहिताचा विडा उचलून निपक्षपातीपणे राज्यकारभार केला.'There is only one man in the Parliament' असा अनोखा सन्मान भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा झाला. मदर तेरेसा यांची करूणामूर्ती अनेक पीडितांच्या जगण्याला अर्थ देऊन गेली. सातासमुद्रापार जाऊन आणि अत्यंत प्रतिकूल शिक्षण संपादन करून डॉ.आनंदीबाई जोशी यांनी तथाकथित समाजव्यवस्थेला जबरदस्त हादरा दिला. डॉक्टर आयडा स्कडर यांनी भारतात येऊन केलेले सामाजिक वैद्यकीय कार्य मानवतेला भूषणास्पद ठरले. नर्मदा आंदोलन श्रीमती मेधा पाटकर यांच्या कणखर आवाजात चोहीकडे दुमदुमले. कै.साधनाताई आमटे आणि डॉ. सौ.मंदाताई आमटे यांनी अनेक शोषितांच्या, पीडितांच्या, रोग्यांच्या मनात आशेची, चैतन्याची, आनंदाची पालवी निर्माण केली. श्रीमती लतादिदींनी आपल्या अतुलनीय आवाजाने कलाक्षेत्रात क्रांती आणली. श्रीमती पुष्पा शेणोलीकर यांनी स्त्रीपुरोहित म्हणून पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात लौकिक मिळवला.  कल्पना चावला यांनी थेट अंतराळात भरारी घेऊन स्वत:चे कर्तृत्व अमर केले. भारताचे राष्ट्रपतीपद भूषवणाऱ्या श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी पाऊणशे वयोमान असताना सुखोय भरारी मारून एक नवा विक्रम प्रस्थापित केला. 
अशा कित्येक स्त्रियांची उदाहरणे आपल्यापुढे असूनही अनेक स्त्रिया वैचारिक प्रकाशापासून अजून सहस्त्र योजने दूर आहेत असे वाटते. अंधाराची सवय जडलेल्या स्त्रिया अधिक आहेत. पिता,नवरा आणि मुलगा ठेवेल तसे राहावे या मानसिकतेला शिकल्या-सावरलेल्या महिलाही छेद देऊ पाहत नाहीत ही मोठी शोचनीय बाब आहे. कौटुंबिक धुरा वाहायची स्त्रीने आणि कौटुंबिक निर्णय मात्र घ्यायचे पुरुषांनी हा फरक न समजण्या इतकी स्त्री अडाणी नाही. परंतु तिचे या पुरुषप्रधान समाजव्यवस्थेला झुगारून देण्याचे धैर्य कुठेतरी निश्चितच कमी पडते आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आर्थिक सक्षमता सिद्ध करणारी स्त्री वैचारिक सक्षमता सिद्ध करण्यात थोडी मागे राहते असे मला प्रकर्षाने वाटते. 
स्त्री उच्चशिक्षित असो वा अल्पशिक्षित, उच्चस्तरीय असो वा निम्नस्तरीय , आर्थिकदृष्ट्या सबळ असो वा अल्पबळ आपल्या वैयक्तिक विकासासाठी तिने सतत प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. गाव असो वा शहर असो आपल्या सन्मानासाठी तिने झटणे गरजेचे आहे. स्त्री कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असो तिने विचार स्वातंत्र्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे.  कुटुंबासाठी अहोरात्र झटणाऱ्या स्त्रीला तिचा वैचारिक अधिकार अबाधित ठेवणे गरजेचे आहे. 
स्त्री स्वातंत्र्याचा उष:काल पहावयाची मनीषा बाळगणाऱ्या स्त्रीला परंपरेने दिलेला अंधार भेदण्यासाठी वैचारिक तलवार परजता आली पाहिजे.   




Tuesday, 6 March 2012

पॉवर हंगर - एक मनोवैचित्र्य


पॉवर हंगर अर्थात शक्ती-क्षुधेचा प्रयोग करणारी माणसे ही फक्त राजकीय आणि सामाजिक बाजारपेठेतच नाहीत तर कुटुंबकारणातही  सक्रीय असतात. 'अटेन्शन सिकींग' हा हेतूही या सक्रीयतेत अभिप्रेत असू शकतो.आपल्याला लोकांनी महत्व द्यावं, येनकेनप्रकारेण आपला चारचौघांतील वावर सतत दृश्यमान व्हावा यास्तवकाही माणसे आपल्या 'कम्फर्ट झोन'च्या बाहेर जाऊन कार्यरत असतात. वास्तविक पाहता माणूस हासामाजिक प्राणी असल्याने समाजातील आपले अस्तित्व दुसऱ्याला जाणवून देण्याची त्याची इच्छा ही स्वाभाविक असते पण काही माणसे केवळ अटेन्शन सिकींगसाठी शक्ती-प्रदर्शनाचा अवलंब करतात. अशा माणसांचा हा 'पॉवर प्ले' त्यांच्या मनातील वैचित्र्याचा निदर्शक असतो.   
राजकारणात सक्रीय असलेल्या व्यक्ती ज्याप्रमाणे रस्तोरस्ती होर्डींग्ज लावून स्वत:ची छबी ( कर्तृत्व apart )  जनमानसात ठसवू पाहतात त्याचप्रमाणे कुटुंबकारणात सक्रीय असलेले ज्यात त्यात जबरदस्तीने डोकावू पाहतात. त्यांची ही सक्रियता सिनेमामध्ये दाखवल्या जाणाऱ्या एखाद्या क्षणिक जाहिरातीएवढीच महत्वाची असते. 'काम केले पाच पैशांचे आणि आव आणला पाच हजाराचा' असा यांचा बाणा असतो. परंतु कुटुंबातील लोकांची मानसिकता, त्यांच्या आवश्यकता, कमतरता  या गोष्टींचा त्यांचा अभ्यास पक्का असल्याने त्यांचं प्रतिबिंब यांना आरशात उतरवणं सोप्पं जातं. 
कधीतरी प्रसंगपरत्वे येणारा पाहुणाच यावासा वाटतो. त्याने यावे, काय असेल ते खावे-प्यावे, चार क्षण आनंदात घालवावेत एवढीच माफक अपेक्षा असते पण अनाहूतपणे येऊन घरच्या गोष्टींत नाक खुपसणारा पाहुणा मात्र परत न आला तर बरा असे वाटण्यास पात्र असतो. पॉवर म्हणजे शक्ती ही पूर्वी गोधन, अश्व-गज, सैन्य या रुपात मोजली जात असे आज ती पैसा, इस्टेट, गाड्या या रूपांत मोजली जाते. या भौतिक साधनांच्या बळावर 'पॉवरफुल' झालेली ही माणसे 'अटेन्शन सिकींग' साठी नवनवे खेळ खेळत राहतात.  
राजकारणात वैयक्तिक स्वार्थासाठी जसे पक्षांतर केले जाते त्याप्रमाणे या 'पॉवर हंग्री' व्यक्ती आपली सोय बघून 'ग्रुप्स' बदलतात. यांच्या 'नावडत्या' यादीत असणाऱ्या माणसांची नावे आता 'आवडत्या' यादीत नमूद केली जातात. ज्या माणसांकडे पूर्वी काही येणेजाणे नव्हते वा त्यांच्याशी तसे काही देणेघेणे नव्हते त्या माणसांसाठी ही माणसे आता सदैव उपलब्ध होऊ पाहतात.  आपल्याकडील आर्थिक  क्षमतेच्या बळावर ही माणसे आपली प्यादी कुटुंबपटावर पुढे पुढे सरकवत राहतात. एकेक नव्या कुटुंबाकडे कूच करत यांची राजकारणी घोडदौड चालू असते. नवीन राज्ये पादाक्रांत करायची असतात. नवे भिडू जिंकून मिळवायचे असतात. जुन्याच सरहद्दी नव्याने उल्लंघून जायच्या असतात. आकांक्षांचे नवे गड सर करायचे असतात.
पण हा सगळा खटाटोप फक्त स्वत:चे शक्तीप्रदर्शन करण्यासाठीच असतो. नाती हवी असतात पण ती स्वत:च्या 'श्री-शक्तीचा' जयजयकार करण्यासाठी! तुमचा आधारस्तंभ फक्त मीच आहे हा सुप्त अहंकार जपण्यासाठी! तुमच्या सेवेला मी तत्पर आहे असे वरकरणी भासवण्यासाठी! आपली वैचारिक अ-क्षमता झाकण्यासाठी!  
आपल्या या स्वभाव-वैचित्र्याला परोपकार असे गोंडस नाव देत स्वत:चीच पाठ थोपटून घेणाऱ्या या माणसांपासून सुज्ञांनी चार हात लांब राहणे हेच सर्वार्थाने श्रेयस्कर आहे. 




Monday, 5 March 2012

बहिऱ्या आणि आंधळ्यांची आधुनिक दुनिया.....


'शास्त्र हे वरदान की शाप?' अशा विषयाचा एक निबंध आम्हाला शाळेत बहुतेक वेळा लिहिण्यासाठी यायचा. आमच्या बालमनांना शास्त्राला शाप का म्हणायचं हे कळत नव्हतं म्हणा किंवा त्याची प्रचीती आली नव्हती. आज मात्र पावलोपावली अशा  अत्याधुनिकतेचा साज चढवलेल्या या शास्त्राला 'शाप' असे म्हणण्याची पाळी अनेक लोकांनी आणली आहे. 
देशहितरक्षणार्थ वापरली जाणारी आयुधे समाजकंटक सामाजिक अस्थिरता निर्माण करण्यासाठी, एखाद्याला संपवण्यासाठी सर्रास वापरतात आणि हे शास्त्र सामान्यजनांसाठी तापदायक ठरते. तलवारी आणि पिस्तुलांची दहशत ही उघड असते पण आजकाल  'मोबाईल' नामक अस्त्राची छुपी दहशत निर्माण झाली आहे. अनेकदा आपण रिक्षात बसतो. रिक्षाचालकाचा मोबाईल वाजतो आणि माणसांच्या आणि वाहनांच्या जबरदस्त गर्दीतून रिक्षा हाकत हाकत त्याचं ते मोबाईलवरील अनावश्यक संभाषण आपल्याला जीव मुठीत धरून ऐकावं लागतं. जागोजागी रस्त्यांची कामे चालू असतात. ओव्हरहेड ब्रिजची बांधकामे चालू असतात. बऱ्याच ठिकाणी 'ट्राफिक पोलीस' नावाची चालतीबोलती संस्था दृष्टोत्पत्तीस पडत नाही. त्यामुळे वाहनांची एकमेकांच्या पुढे जाण्याची शर्यत लागलेली असते. या जीवघेण्या सर्कशीतून आपल्याला इच्छित स्थळी सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी त्या रिक्षाचालकाची असते. एखाद्या टर्निंगवर समोरून वाहन सुसाट वेगाने येत असतं. आपल्या मनात नाही नाही ते वाईट विचार येत राहतात. केवळ आपलं नशीब बलवत्तर असल्यामुळे 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' या म्हणीचा आपल्याला प्रत्यय येतो. रिक्षा चालवताना मोबाईलवर बोलणे हा गुन्हा आहे हे त्याला रिक्षेतून उतरताना सांगण्याचं धारिष्ट्य आपण करतो तेव्हा लगेचच तुम्हाला सहीसलामत पोहोचवलं ना मग खालीपिली कीटकीट करू नका  असा त्या रिक्षावाल्याचा उद्दाम शेरा ऐकावा लागतो. एकदा पुणे-मुंबई व्होल्व्होचा बसचालक सुद्धा बस सुटल्यापासून मोबाईलवर बोलत होता . अनेक वेळा मनात आले की त्याला सांगावे अरे बाबा तुला गप्पा मारायची इतकी लहर आली असेल तर बस थांबव आणि पोटभर बोलून घे पण आम्हा बस-प्रवाशांचा जीव असा टांगणीला लावू नकोस. पण मजा म्हणजे बसमधील इतर प्रवासी त्याच्या या मोबाईलसूक्ताला काहीच हरकत घेत नव्हते जणू काही आम्ही आमचा जीव तुझ्या हवाली केला आहे तेव्हा  तारायाचे असेल तर तार किंवा मार! 
आपण रस्त्यावर महानगरपालिकेने न बुजवलेले खड्डे चुकवत चालत असतो. रस्त्यावर लहान मुले, म्हातारेकोतारे, अपंग, आजारी असे अनेकजण चालत असतात. आपल्या समोरून वायुवेगाने एखादी बाईक येत असते. बाईकस्वार मोबाईलवर  बोलण्यात गुंग असतो. आजूबाजूच्या पादचारयांकडे त्याचे यत्किंचितही लक्ष नसते. तो मोबाईलवर हास्याचे फवारे उडवण्यात बिझी असतो. त्या बाईकखाली येता येता एक मुल कसेबसे वाचते. लोक गोळा होतात आणि  बाईकवाल्याची यथेच्छ धुलाई होते. त्याचा मोबाईल अध्याय तिथे तेवढ्यापुरता तरी संपतो. पण भविष्यात असे अपघात घडणारच नाहीत याची हमी कोण देऊ शकतं?  आपली काहीही चूक नसतानादेखील आपल्याला हे वाहनचालक अपघाताची शिक्षा देण्यास पूर्णपणे समर्थ असतात. शासन कितीही कायदे करुदे पण रस्त्यारस्त्यात, गल्लीबोळांत मोबाईलवर बोलत सुसाट वाहने हाकणाऱ्या ह्या बेजाबदार चालकांना पोलीस यंत्रणा कुठे पुरी पडू शकणार ? ही आधुनिकतेच्या आहारी जाऊन स्वेच्छेने बहिरी झालेली एक जमात आहे जी भविष्यातील अनेक अपघातांची जनक होऊ शकते. 
आजच पेपरात वाचलं की गुगल बाजारात असे काही भन्नाट गॉगल आणणार आहे की ते डोळ्यांवर चढवताक्षणी त्यावर अनेक गोष्टी दिसू लागतील. अचूक पत्ता शोधता येईल. गाणी ऐकता येतील. एक ना दोन! म्हणजे एक संकट कमी होतं म्हणून की काय त्याच्या जोडीला हे नवीन संकट येऊन ठाकले आहे. कानात इयरफोन्स, डोळ्यांवर गॉगल म्हणजे कान असून बहिरे नी डोळे असून आंधळे अशी अवस्था युवा पिढीची होणार नव्हे सर्वांचीच होणार. ही म्हणजे अपघाताच्या जगातील क्रांतीच असेल. रस्त्यावरून चालायची भीती, वाहनांत बसायची भीती अशी स्थिती सामान्य डोळसांची होणार. जर बहुसंख्य लोक स्व-इच्छेने बहिरे आणि आंधळे होणार असतील तर जे असे बहिरे नाहीत त्यांना आणि डोळसांनाच जागरूक राहावे लागणार आहे. 'रात्र वैऱ्याची आहे' हा वाक्प्रचार बदलून आता 'दिवस बहिऱ्या व आंधळ्यांचे आहेत' असा नवा वाक्प्रचार रूढ करावा लागणार आहे. मुलांनी परीक्षेला जाताना बहिऱ्या आणि आंधळ्या रिक्षाचालकांच्या रिक्षांत अथवा अशा लोकांच्या वाहनांत बसून प्रवास करू नये अशी एक कळकळीची सूचना इतर सूचनांच्याबरोबर द्यावी लागणार आहे. गॉगल लावलेल्या एखाद्या माणसाला समोरचं काही नीट दिसतंय का याची शहानिशा करावी लागेल. काही वेळा तर असंही वाटू शकेल की एकवेळ दारूची नशा परवडली पण ही अशी झिंग नको ज्यामुळे आपल्या जाणीवा तर हरपतीलच पण इतरांच्या जाणीवा शाबूत ठेवण्याचे भान आपल्याला राहणार नाही. 
शेवटी शास्त्र हे वरदान की शाप हे ज्याचं त्याने अनुभवांती ठरवावे आणि किमान तो शाप ठरणार नाही ह्याची वैयक्तिक खबरदारी घ्यावी.