Wednesday, 9 May 2012

स्त्रियाच स्त्रियांच्या वैरी असतात .......

आमीर खानने त्याच्या छोट्या स्क्रीनवरील पदार्पणातच अवघ्या भारताला हलवून सोडले. विषयही तसाच होता. स्त्री भ्रूणहत्त्या. शहरी तसेच ग्रामीण भागांतून काही पिडीत महिला आमंत्रित केल्या होत्या. त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या कहाण्या ऐकताना मन हेलावून गेले. एक स्त्री साक्षर झाली की सारे कुटुंबच साक्षर होते असे म्हणतात. पण साक्षरतेचा, उच्चशिक्षणाचा आणि मानवी प्रवृत्तीचा दुरान्वयानेही संबंध नसतो असे हा कार्यक्रम पाहताना उमगले. 
आपल्याकडे स्त्री विवाह करून सासरी जायला निघाली की तिचे आई-वडील तिला सांगतात की आता सासर हेच तुझे सर्वस्व! तुझा नवरा, तुझे सासू-सासरे, दीर-नणंदा सांगतील तसे वाग. त्यांना नाराज करू नकोस. त्यांचा शब्द खाली पडू देऊ नकोस. माहेरची बेअब्रू होईल असे वर्तन तुझ्या हातून घडता कामा नये. पती हाच आजपासून तुझा परमेश्वर आहे. तू जन्मलीस या घरी पण आता  तुझी अर्थी निघणार तिथूनच! हे मुलीला सांगणारी खुद्द आईच असते. 'तुझ्यावर अन्याय झाला तर अजिबात गप्प राहू नकोस. आम्ही सारेजण तुझ्या पाठीशी आहोत. आमची काहीही मदत लागली तर नि:संकोचपणे अर्ध्या रात्री हाक मार असे सांगणारी आई अजून तरी जन्माला यायची आहे.' त्यामुळे आपल्या जन्मदात्रीच्या सांगण्यानुसार, बजावण्यानुसार नव-विवाहिता वागू लागते. अनेक वेळेस स्वत:च्या इच्छा मारून जगते. सासरच्यांसमोर ब्र काढण्याची तिची हिम्मत नसते. तिच्या पती परमेश्वराने- सासूने तिला कितीही अपमानित केले तरीसुद्धा तिच्या आईच्या शिकवणीप्रमाणे ती मूग गिळून गप्प बसते. यथावकाश ती गरोदर राहते आणि तिच्या आनंदाला पारावार उरत नाही. नव्या जीवाच्या गोड चाहुलीने तिचे मन प्रफुल्लीत होते. तिच्या सासूला मात्र घराण्याला कुलदीपकच हवा असतो. तिचे जे मत असते तेच तिच्या आज्ञेत असलेल्या मुलाचे मत असते. मग योजना आखल्या जातात. डॉक्टरांना विश्वासात घेऊन आणि त्यांचे खिसे गरम करून गर्भलिंगचिकित्सा केली जाते. तिच्या पोटात मुलगी वाढत असते. त्यामुळे हे बीज समूळ नष्ट करण्याचे बेत पक्के होतात. त्या स्त्रिला तिच्या पोटात दिसामाशी वाढत जाणाऱ्या बाळाचे कोण अप्रूप असते. हे बाळ म्हणजे मुलगा आहे की मुलगी हा प्रश्नच मुळी तिच्या दृष्टीने गौण असतो.  आपल्या रक्तामांसाचे कुणीतरी आपल्या पोटात हालचाल करते आहे हीच मुळी तिच्या दृष्टीने आनंदाची पर्वणी असते. सासू आणि नवऱ्याने आखलेल्या योजनेबद्दल ती अनभिज्ञ असते. एक दिवस उजाडतो. तिला हॉस्पिटलमध्ये काही टेस्ट्स करण्यासाठी म्हणून दाखल केले जाते आणि नेमका तोच दिवस तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळासाठी अखेरचा दिवस ठरतो.  त्या बाळाचा दोष फक्त एवढाच असतो की ती एक मुलगी असते. तिचा गर्भपात करण्याच्या कटात जे डॉक्टर सामील असतात त्यांच्यात स्त्रियाही असतात. अतिशय निलाजरेपणाने आणि कोडग्या, मुर्दाड मनाने हा गर्भपाताचा उपचार पार पडला जातो. हे ऐकून अंगावर सर्रकन काटा येतो पण जेव्हा एक स्त्रीच दुसऱ्या निष्पाप स्त्रीच्या हत्येला जबाबदार असते  हे पाहिल्यानंतर अशा स्त्रियांची शिसारी येते. 
अशा केसेस केवळ ग्रामीण भागांत घडत नाहीत तर शहरी भागांतही घडतात. अशिक्षितांच्या तसेच शिकालेल्यांच्याही घरी या घटना राजरोस घडतात. एखाद्या स्त्रीने हिम्मत करून मी माझ्या पोटातील मुलीला जन्म देणार असे सांगितले की मुलीच्या जन्मानंतर तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरु होतो. त्या मुलीला मारण्याचेही प्रयत्न केले जातात. पण या सगळ्या घटनांत घरातील वडीलधारी स्त्रीचा अर्थात सासूचा पुढाकार असतोच असतो. नवरा आणि मुलांवर ती हुकमत गाजवते. तिचा शब्द हा अंतिम असतो, निर्णायक असतो. ती स्वत: जरी स्त्री म्हणून जन्माला आली असली तरी आपल्या सुनेच्या पोटी स्त्री-रत्न जन्माला येऊ नये यासाठी ती विलक्षण प्रयत्नशील राहते. तिचा कितीही वेळा गर्भपात करायला लागला तरी चालेल पण तिने फक्त मुलालाच जन्म द्यायला हवा असे तिचे ठाम मत असते. तिला खोडून काढायची हिम्मत घरात इतरवेळी 'पौरुषत्व' गाजवणाऱ्या माणसांत नसते. सुनेला मुलगा होण्याचे चिन्ह दिसत नाही हे कळताच ती तिच्या मुलाच्या पुनर्विवाहाचा घाट घालते. पोटी जन्मलेला मुलगा उद्या बदफैली, व्यसनी निपजला तरी चालेल पण त्याने आपल्या घराण्याचा वारसा पुढे चालवायला हवा असा एक विचित्र आणि विकृत हट्ट या मागणीत असतो. 
वास्तविक पाहता नैसर्गिक रचनेनुसार, पोटात वाढणाऱ्या बाळाचे लिंग ठरवणारा हा पुरुषच असतो. स्त्रियांमध्ये फक्त 'एक्स' गुणसूत्रे असतात तथापि पुरुषांमध्ये 'एक्स' आणि 'वाय' अशी गुणसूत्रे असतात. पुरुषांतील एक्स गुणसूत्राचे स्त्रीच्या गुणसूत्राशी  मिलन झाले तर मुलगी होते आणि वाय या गुणसूत्राचे मिलन झाले तर मुलगा होतो. हे समजून न घेताच तू आमच्या घराण्याला मुलगा देऊ शकत नाहीस आणि म्हणून तू या घरात राहायला लायक नाहीस अशा शंख जो स्त्रीच्या नावाने केला जातो त्यात कितपत तथ्य आहे हे सुज्ञांनी पडताळून पाहावे. 
मुलगी सासरी आल्यानंतरही पैसे, चैनीच्या वस्तू, दागदागिने माहेराहून आणण्यासाठी तिच्यामागे तगादा लावला जातो. अगदी मुलगी कमावणारी असली तरी! माहेर सधन नसेल तर मग मुलीला उपाशी ठेव, तिला मारहाण कर, सारखे घालूनपाडून बोल, तिच्या माहेरच्यांचा उद्धार कर आणि अखेरीस तिला पेटवून दे असे उपाय सर्रास अवलंबले जातात. यात अग्रणी असते ती मुलीची सासू. आपल्या मुलीप्रमाणे वागवणे तर सोडाच पण साधे माणुसकीचे वर्तनही तिच्याशी कोणी करत नाही.  
विधवा स्त्रीला सण-समारंभात भाग न घेऊ देणे, वांझ स्त्रीला डोहाळेजेवण-बारसे अशा समारंभांना न बोलावणे हे काम स्त्रियाच पार पडत असतात. नहाण आल्यावर मुलीला इथे जाऊ नको , तिथे जाऊ नको, हे करू नको, ते करू नको असे सतराशे साठ निर्बंध टाकणाऱ्या स्त्रियाच असतात.  पूर्वीच्या काळात सतीची प्रथा, केशवपनाची प्रथा बंद करण्यासाठी लढणारे पुरुष होते. विधवा स्त्रियांच्या पुनर्विवाहाची संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात उतरवणारेही पुरुषच होते. घरातील प्रत्येक स्त्रीने शिक्षित व्हावे यास्तव झटणारेही पुरुषच होते. हुंडाबळीच्या आणि हुंड्याच्या प्रथेच्या विरोधात आवाज उठवणारे पुरुष होते. तिरसट आणि हेकेखोर असा लौकिक असलेले पण आपल्या बायकोने डॉक्टर व्हावे या ध्यासापोटी तिला सातासमुद्रापार पाठवणारे गोपाळराव जोशी तसेच आपल्या बायकोने उत्तम शिकून समाजात नव-विचारांचा प्रसार करावा यासाठी तिला शिक्षित करणारे नवमतवादी न्यायमूर्ती रानडे ही उदाहरणे स्त्रियांनी जरूर अभ्यासावीत. 
आज जर सुनेच्या पाठी सासू कोणत्याही प्रसंगात खंबीरपणे उभी राहिली तर अनेक विवाहितांना सन्मानपूर्वक जगता येईल. स्त्रीभ्रूणहत्येचा प्रश्नच निकालात लागेल. स्त्रियांचा यथोचित आदर करणे हे घरातील पुरुषांना क्रमप्राप्त होईल. आज कोणत्याही क्षेत्रात स्त्रिया पुरुषांपेक्षा तसूभरही कमी नाहीत. उलट स्त्रिया अनेक आघाड्या ज्या पद्धतीने कुशलतेने सांभाळतात ती कुशलता पुरुषांकडे औषधालाच सापडते. आपलं स्त्रीत्व आपण ज्या पद्धतीने स्वाभिमानाने सांभाळलं त्याचप्रमाणे आपल्या मुलीला आणि सुनेलाही ते तितक्याच अभिमानाने सांभाळण्यासाठी सहकार्य करण्यास ज्या दिवशी सासू पदर खोचून उभी राहील तो दिवस भारतीय इतिहासात सुवर्णक्षराने लिहिण्याजोगा असेल. 

Monday, 30 April 2012

'जग' जीत सिंग .......

१५ एप्रिल २०१२ रोजी 'कलर्स' या वाहिनीवर 'यादों का सफर'  हा कार्यक्रम पहिला आणि आपल्या मृदू,मुलायम,तरल, भावनास्पर्शी आवाजाने लाखो रसिकांच्या मनावर गारुड करणाऱ्या जगजीतसिंगच्या आठवणीत मन हरवून गेले. आशयघन शब्द, त्या शब्दांतून अभिव्यक्त होणारे दु:ख, आणि साधे, सोपे संगीत आणि हे साकारणारा प्रभावी स्वर ही शिदोरी पाठीशी घेऊन  जगजीतने मार्गक्रमणा सुरु केली आणि बघता बघता असंख्य श्रोत्यांच्या मनात जगजीतची गझल अलवार जाऊन बसली. ती ऐकताना मन हळवे होत गेले, सुरांच्या आणि शब्दांच्या रेशमी लड्या त्याच्या गळ्यातून थेट रसिकांच्या हृदयात उतरल्या आणि त्या गझलांनी आपली तिथली बैठक पक्की केली.  
८ फेब्रुवारी १९४१ साली राजस्थान मधील श्री गंगानगर येथे एका सिख कुटुंबात जगमोहनने जन्म घेतला. नंतर त्याचे नामकरण  'जगजीत' असे करण्यात आले आणि खरोखरच जगजीतच्या आवाजाने जगाला गवसणी घातली. पुढे चित्रा सिंग या सुरील्या जोडीदाराच्या साथीनेच जगजीतने आयुष्याची वाट 'सूर' मयी केली. वडिलांनी त्याच्यातील सुप्त गुण हेरून त्याला सिख देवळांत जाऊन तसेच पं. छगनलाल शर्मा आणि उस्ताद जमाल खान या गुरुद्वयींकडे संगीताची दीक्षा घेण्यासाठी प्रवृत्त केले. जगजीतने काही स्टेज आणि रेडीओ परफॉरमन्सेस दिले. १९६५ साली जगजीताने मुंबईच्या दिशेने कूच केले. कलाकाराच्या अंगभूत गुणांना वाव देणारी मुंबापुरी त्याला खुणावत होती. 
सुरवातीस काही जिंगल्समध्ये आणि कोरसमध्ये गाण्याची संधी त्याला मिळाली. या दरम्यान जगजीतने आपले रूप पालटून टाकले. डोक्यावरील सिख पगडी आणि वाढवलेले केस या दोन्ही गोष्टींचा त्याग करून जगजीतने आपली नवी ओळख प्रस्थापित केली. एका गुजराथी चित्रपटात काम मिळवले. १९६७ साली चित्रा दत्त नावाची बंगाली जिंगल सिंगर जगजीतला भेटली. ती तिच्या व्यक्तिगत आयुष्यात अतिशय दु:खी होती. तिला एक मुलगी होती. पतीला रीतसर घटस्फोट देऊन तिने १९६९ साली जगजीतशी लग्न केले. या दाम्पत्याला एक मुलगा झाला. अजूनही संगीताच्या क्षेत्रात हे दोघेही स्ट्रगल करत होते. त्यांना योग्य सूर गवसला नव्हता. विशेषत: गझल गायनाच्या क्षेत्रात पाकिस्तानी सिंगर्सचा वरचष्मा होता, पगडा होता. 
१९७६ सालापर्यंत त्यांचा टेस्टिंग पिरीयड चालूच होता. या सुमारास त्यांचा 'द अनफरगेटेबल्स' हा आल्बम रिलीज झाला आणि अल्पावधीतच जगजीत आणि चित्रा लोकप्रिय झाले. त्यातील 'बात निकलेगी' या गझलेला खूप लोकप्रियता लाभली. आणि अशा तऱ्हेने या दाम्पत्याचा व्यावसायिक यशाच्या दिशेने प्रवास सुरु झाला. त्याचे सोलो आणि joint पर फॉरमन्सेस रसिकमनावर राज्य करू लागले. गझल गायनाच्या क्षेत्रातील एक मानाचा शिरपेच चाहत्यांनी जगजीतला बहाल केला.   
हिंदी चित्रपट सृष्टीशी जगजीतचा संबंध आला आणि अनेक उत्तमोत्तम गझला जगजीतच्या मखमली गळ्यातून रसिकहृदयी विराजमान झाल्या. 'तुमको देखा तो ये खयाल आया', 'कोई ये कैसे बताये के वो तनहा क्यों है', 'झुकी झुकी सी नजर', ' शाम से आंख में नमी सी ही', 'तुम इतना जो मुस्कुरा रहे हो', 'होशवालों को खबर क्या', 'वो कागज की कश्ती वो बारिश का पानी', ललत रागावर आधारित 'कोई पास आया सवेरे सवेरे', होठों से छू लो तुम' या आणि अशा असंख्य गझलांनी रसिकांचे कान तृप्त केले. हिंदी गझलांचे दालन समृद्ध केले आणि पाकिस्तानी गझलकारांचा रसिकमनावरील पगडा सैल केला. 
मुलगा विवेक याच्या अपघाती मृत्यूने आणि चित्राची मुलगी मोनिका हिच्या आत्मघाती मृत्यूने हे दाम्पत्य दु:खात होरपळून निघाले. चित्राने गाण्याला पूर्णविराम दिला तथापि जगजीत गात राहिला. शब्दांतून, सुरांतून याच्या मनातील व्यथा मूर्त करत राहिला. हृदयातील दु:खाच्या हारात गझलेला गुंफत राहिला. 
२००३ साली 'पद्म भूषण' पुरस्काराने जगजीतला गौरविण्यात आले. 
जगजीतच्या गझलगायनात कधीही स्वर-चमत्कृती नसायची.  प्रत्येक शब्दाला व्हेरिएशन घेऊन बघा मी कसा गातो ते असा आवही नसायचा. सरळ, साधी, ऐकताना सोपी वाटणारी चाल, सहज गुणगुणता येईल असे वाटणारी गझल जगजीत गायचा. सुरांशी अनावश्यक खेळ खेळत गझलेचा खरा लुथ्फ रसिकांपासून हिरावून घेण्याचे पाप जगजीतने केले नाही. जगजीतची गझल ताजी, टवटवीत, सुगंधी राहिली. मोगऱ्याच्या फुलांसारखी मनात दरवळत राहिली. हा शब्द-सुरांचा सडा श्रोत्यांच्या हृदयात आनंदाची पखरण अव्याहतपणे करत राहिला.  
'यादों का सफर' या कार्यक्रमान्तर्गत अनेक ख्यातकिर्त गायकांनी जगजितच्या गज़लेला, त्याच्या जीवनप्रवासाला सलाम केला. शफकत अमानत अली या पाकिस्तानी गायकाने 'शाम से आँख में नमी सी है' ही ग़ज़ल प्रभावीपणे साकारली, सोनू निगमने 'होशवालों को खबर क्या' ही ग़ज़ल तन्मयतेने म्हटली, 'प्यार का पहला ख़त लिखने में वक्त तो लगता है'  ही रिचा शर्मा हिने गायलेली ग़ज़ल दखलपात्र  होती. मात्र उस्ताद रशीद खान यांनी 'याद पिया की आये' ही ठुमरी ज्या नजाकतीने गायिली त्याला तोड नव्हती.  
जगजीत सिंग आज आपल्यात नाही हे जरी सत्य असले तरी त्याच्या मऊसुत -मुलायम आवाजाची मोहिनी रसिकांवर अनंत काळापर्यंत राहील.  

Sunday, 29 April 2012

Matrimony वरील काही 'आदर्श' प्रोफाईल्स

आपल्याकडे लग्न ही वधू-वरांसाठी योजलेली एक सर्वसंमत रीत आहे याकडे सोयीस्कररित्या डोळेझाक करून त्यांचे सो-कॉल्ड पालक वेड्यावाकड्या प्रोफाईल्सचे रतीब घालत असतात. या प्रोफाईल्समध्ये लिहिलेला तपशील आणि प्रत्यक्ष विवाह यामध्ये विचारांचे महदंतर असते. मुलांचे पालक तर आपला मुलगा लग्नाला उभा आहे म्हणजे आता 'ओन्ली स्काय इज द लिमिट' अशा अविर्भावात प्रोफाईल्स प्रसवत असतात. माझ्या मुलीसाठी मी आणि प्रामुख्याने ती गेली सहा-सात वर्षे  काही  'Matrimony sites' शी सतत संपर्कात आहोत. मुलाला मुलगी कशी हवी आहे याविषयीची माहिती तसेच मुलाची स्वत:ची माहिती या दोन गोष्टी महत्वाच्या! पत्रिका बघणे न बघणे हा सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न! त्या दोघांचे विचार एकमेकांशी जुळणे अत्यावश्यक आहे. त्यांनी एकमेकांना त्यांच्या गुण-दोषांसकट स्वीकारणे महत्वाचे आहे. त्यांचे शिक्षण जसे महत्वाचे तशी त्यांच्यातील एक माणूस म्हणून जपलेली गुणवत्ताही तितकीच महत्वाची आहे. कारण संसार हा शैक्षणिक कुवतीशी करावयाचा नसून मनातून उपजणाऱ्या प्रेमभावनेशी त्याची गाठ बांधावयाची असते. 
मुलाचे शिक्षण जास्त असेल कर त्याच्यावर जास्त प्रेम, मुलाचा पगार उत्तम आहे कर त्याच्यावर भरपूर प्रेम मग तो माजोरडा असेल, माणूसघाणा असेल, व्यसनी असेल तरी क्काही फरक पडत नाही हे विधान कितपत सयुक्तिक आहे? एखादी मुलगी मुलाला लग्नाच्या दृष्टीने बघते म्हणजे तो दिसायला कसा आहे? त्याची ओव्हरऑल personality कशी आहे? त्याचे विचार कसे आहेत? थोडक्यात तो एक माणूस म्हणून कितपत चांगला आहे? 'दाखव पगाराची स्लीप मगच लग्न करीन किंवा दाखव तुझी इस्टेट मगच लग्न करीन' असे म्हणणाऱ्या उपवर मुली अभावानेच आढळतात.  
हे असे असले तरीही लग्नाच्या बाजारात उतरलेला आपला उच्चशिक्षित आणि रग्गड पैसा कमावणारा मुलगा म्हणजे अनेक आई-वडिलांना सोन्याचे अंडे देणारी कोंबडीच वाटते. ठीक आहे वधू-वरांच्या पत्रिका तपासा, गुण-मेलन होते की नाही ते बघा, दोघांचे भावी आयुष्य चांगल्या रीतीने निभावणार असेल असे वाटल्यासच पुढे जा पण इतर बाबी ज्या त्या दोघांच्या प्रापंचिक आयुष्यात तसूभरही मोलाच्या नाहीत त्यांचे अवडंबर कशाला माजवायचे? आणि अनेक आई-वडील नेमके हेच करतात. 
आपल्या मुलासाठी मुलगी चांगली हवी याविषयी कोणाचेच दुमत असण्याचे कारण नाही पण तिने अल्पावधीत सगळ्यांशी adjust  केले पाहिजे, ती कितीही शिकलेली असली, नोकरी करणारी असली तरी ती गृहकृत्यदक्ष असलीच पाहिजे ही जबरदस्ती का? म्हणजे तुमच्या मुलाच्या खांद्याला खांदा लावून ती ऑफिसात जाणार, तसाच चांगला पगारही घेणार पण घरी आल्यावर मात्र तिने स्वत:ला गृहकृत्यांना जुंपून घ्यायचे आणि त्याने एसीत ऐसपैस पसरायचे हा कोणता न्याय? ती तुमच्या घरात आली म्हणजे तुमच्या हरकत घेण्याजोग्या सवयींनाही तिने समजून घ्यायचे आणि तिच्या हातून घडलेल्या एखाद्या नगण्य चुकीलाही तुम्ही गुन्ह्याचे स्वरूप द्यायचे ही कुठली रीत?  
आम्ही ब्राह्मणकुलोत्पन्न आहोत, आमचे गोत्र अमके आहे, आमच्या घराण्याचा इतिहास असा आहे, आमचे कुलदैवत हे आहे , आम्ही खानदानी, उच्चभ्रू आहोत, आमच्याकडे गाड्या, नोकर-चाकर आहेत,  एवढ्या ठिकाणी आमच्या इस्टेटी आहेत या भांडवलावर कोणतेही संसार सुखी होत नाहीत. मुलीची उंची, तिचा वर्ण, तिचे रूप, तिची जात, तिचे घराणे, तिचे शिक्षण आणि नोकरीतील मासिक पगार ह्या गोष्टी जुळल्यानंतर त्या दोघांचा संसार सुखी होईल याची ग्वाही कुणीही देऊ शकत नाही. त्यात मुलगा परदेशवाऱ्या करणारा किंवा तिथेच कायम वास्तव्यास असणारा असेल तर ह्या मात्या-पित्यांचा भाव आणखीच वधारतो. 
मुलगी चश्मेवाली नको. का बुवा? मुलगा चष्मेवाला असला तरी तो त्याचा रुबाब समजायचा. हे वर्गीकरण का? मुलीच्या डोळ्यांची ब्बुबुळे अमक्याच रंगाची हवीत, ती निखालस गोरी हवी, तिची फिगर उत्तम हवी, तिचे केस अशाच प्रकारचे हवेत, तिचे दात सरळ हवेत, तिचे ओठ वाजवीपेक्षा जास्त जाडे नकोत, ती सदासदैव हसतमुख हवी. अरे मुलगी म्हणजे काय दुकानातील शो-केस मधील एखादी वस्तू आहे का? की जिचे मूल्य फक्त तिच्या बाह्यस्वरूपावरच अवलंबून आहे? म्हणजे तुमचा मुलगा जाड भिंगाचा चष्मा वापरणारा ढापण्या असला तरी चालेल, त्याचा वर्ण सुरणाचा किंवा वांग्याचा असला तरी काही प्रॉब्लेम नाही, तुमच्या मुलाचा चेहरा आणि मान ह्यांच्यात distinguishing points नसले तरी चालतील, तुमच्या मुलाच्या दातांवर तंबाखूमुळे पिवळे डाग पडले असतील तरी चालतील. कोणत्या बेसिसवर? तो मुलगा आहे म्हणून? कुलदीपक आहे म्हणून? घराण्याचा एकुलता एक वारस म्हणून? 
ह्या सो-कॉल्ड उच्चभ्रू घराण्यातील मुलांच्या भविष्याची दोरी त्यांच्या आई-वडिलांच्या हातात असते. मुलगी नकटी वाटते नाकारा, सावळी दिसते नाकारा, बुटकी आहे नाकारा, तिचे घराणे आपल्यासारखे नाही नाकारा, तिचा पगार खास नाही नाकारा, तिचे गोत्र माहित नाही नाकारा, तिचे कुलदैवत शंकास्पद आहे नाकारा, ती जाडी वाटते नाकारा, तिच्याकडे चांगला मोबाईल नाही नाकारा अशी नकारघंटा हे माय-बाप सातत्याने वाजवत राहतात. आपल्या पोटी निपजलेला मुलगा हा जणू मदनाचा पुतळा आहे अशा भ्रमात हे माता-पिता असतात. सगळे उत्तम गुण त्याच्या ठायी मौजूद आहेत अशी आपली त्यांनी त्यांची समजूत करून घेतलेली असते. 
एरवी पत्रिका, कुंडली या शब्दांच्या वाऱ्यालाही न उभी राहणारी ही मुले लग्नाला उभी राहताच आई-वडिलांच्या मतासमोर आपली मान तुकवतात. आपले खाण्या-पिण्याचे सर्व चोजले येणाऱ्या मुलीने खुशीने संभाळावेत,  मुलांच्या संगोपनाची पूर्ण जबाबदारी तिने घ्यावी, आपल्या आई-वडिलांची, भावंडांची मर्जी तिने राखावी, त्यांची सेवा करावी,त्यांचा आदर करावा, तिने महिन्याचा पगार आपल्या हातात द्यावा,  माझ्या मित्रमंडळींना तिने सुग्रास खाऊ-पिऊ घालावे, घरी येणाऱ्या पाहुण्यांची व्यवस्थित सरबराई तिने करावी, सणवार-व्रते नेमाने पाळावीत अशा 'माफक' अपेक्षा ह्या नवरदेवांच्या असतात. थोडक्यात काय घरी-दारी तिने स्वत:ला पिसून घ्यावे आणि इतरांसाठी आपला देह चंदनासारखा झिजवावा अशा उच्च विचारांनी ही मुलाकडची मंडळी भारलेली असतात.
सुखी संसाराची समीकरणे २ अधिक २ चार या पद्धतीने सोडवता येत नाहीत. उत्तम राहते घर अधिक उत्तम पगार इज इक्वल टू सुखी, आनंदी संसार असे इक्वेशन मांडता येत नाही. संसार सुखाने, एकमेकांशी न भांडता कसा करावा हे शिकवणारी विद्यालये नसतात. लग्नातील होमात स्वत:विषयी बाळगलेला फाजील अहंकारही समर्पित करायचा असतो ही जाणीव ज्याची त्याला व्हावी लागते. बाह्य गोष्टींनी स्वत:ला आणि दुनियेला फक्त चार दिवस दिपवता येते पण संसाराचे चक्र सुयोग्य दिशेने फिरते ठेवायला काही चांगल्या आंतरिक उर्मींची गरज असते. 
तेव्हा अनेक अनावश्यक गोष्टींचा भरणा केलेली प्रोफाईल अपलोड करून त्यायोगे आपण मनाजोगती मुलगी सहज मिळवू शकू या भ्रमात वावरणाऱ्या समस्त मात्या-पित्यांना मी एवढेच सांगू इच्छिते की अशी माहिती द्या किंवा करून घ्या जी तुमच्या मुलाच्या आणि येणाऱ्या सुनेच्या संसारात उपयुक्त ठरू शकेल. जात-पात, प्रतिष्ठा-पत, शिक्षण, नोकरी,पगार, गाडी-बंगला, नोकर-चाकर, आर्थिक गुंतवणुका, इस्टेटी या बाह्य गोष्टी एका ठराविक मर्यादेपर्यंतच महत्वाच्या आहेत. 
संसाराचे शेत हिरवेगार दिसण्यासाठी आधी उत्तम विचारांचे बी पेरले गेले पाहिजे, त्याला तेवढ्याच उत्तम आचारांचे खत घातले पाहिजे तरच त्याला सौख्याच्या मोत्यांचे पिक येईल नाहीतर नुसती महागडी बाह्य फवारणी कुचकामी ठरेल.    


Friday, 27 April 2012

माझा १०० व्वा ब्लॉग- १०० वर्षाच्या तरुणीस समर्पित .......

२७ एप्रिल १९१२ साली जन्मलेली ही सदाबहार तरुणी म्हणजे झोहरा सेहगल. वाढत्या वयाच्या दुपटीने वाढणाऱ्या उदासीनतेच्या छटांचा मागमूस तिच्या चेहऱ्यावर औषधालाही दिसत नाही. 'संध्याछाया भिवविती हृदया- लागले नेत्र रे पैलतीरी' असा आयुष्याबद्दलचा तिचा अप्रोच नाही. डोळ्यात खट्याळ हसू आणि चेहऱ्यावर मिश्कील भाव हे तिच्या शतकी आयुष्याचे भांडवल आहे. इतरांच्या टोप्या उडवण्यात ती तरबेज आहे. तिचा जीवन जगण्याचा उत्साह एखाद्या षोडषेलाही लाजवेल असा आहे. 'चीनी कम' मध्ये  'जिम जाओ जिम जाओ' म्हणून तिच्या ६४ वर्षीय मुलाच्या मागे तगादा लावणारी आणि 'सेक्स इन द सिटी' बघणारी झोहरा वास्तवात काही वेगळी नाही. आयुष्यातील चढ-उतारांच्या घसरगुंडीवर अमाप मजेने, आनंदाने, उत्साहाने हिंदोळणारी ही तरुणी म्हणजे जीवन कसे जगावे ह्याचा वस्तुपाठ आहे. 



सहारणपूर , उत्तर प्रदेश हे झोहरा मुमताजचे  जन्मगाव. तिच्या सात भावंडांत ती तिसरी. दिवसाकाठी पाच वेळा नमाज पडणाऱ्या सुन्नी मुसलमान परंपरेची ती पाईक! बालवयातच तिच्या अवखळ आणि खट्याळ स्वभावाची चुणूक तिच्या आप्तांना अनुभवायला मिळाली. तिला झाडांवर चढण्याचा विलक्षण छंद! तिला मुलांचे खेळ खेळायला आवडत. तिने  'tomboy' असा लौकिक संपादन केला होता. अवघ्या वर्षाची असताना तिच्या डाव्या डोळ्याची दृष्टी गेली आणि ती दृष्टी परत आणण्यासाठी तब्बल ३ लाख एवढी प्रचंड किंमत मोजावी लागली. तरुण वयात आईच्या मायेला ती आणि तिची भावंडे पारखी झाली. आईच्या इच्छेनुसार 'क्वीन मेरी गर्ल्स कॉलेज', लाहोर इथे तिची शिक्षणासाठी रवानगी झाली. तेव्हा पडद्याची ( बुरख्याची) प्रथा ही कडक होती. कॉलेजचा सगळा स्टाफ इंग्लिश होता. तिच्या बहिणीचा फसलेला विवाह तिने पहिला आणि लग्नबंधनाच्या आहारी न जाता पुढे शिकण्याचा निर्णय तिने घेतला. ती पदवीधर झाली आणि तिच्या मामाने तिची रवानगी युरोपला केली. तिथे तिच्या मावशीने 'मेरी विंगमन' या नृत्यशाळेत तिला दाखल करण्याचा निर्णय घेतला. पडद्याच्या प्रथेमुळे तिला नृत्यशिक्षण घेता आले नव्हते. पुढील तीन वर्षे ड्रेसडन, जर्मनी येथे तिने आधुनिक नृत्याचे रीतसर शिक्षण घेतले. याच सुमारास प्रख्यात नर्तक उदय शंकर यांचा 'शिव-पार्वती' वर आधारित नृत्याविष्कार तिच्या पाहण्यात आला. ती मनोमन हरखून गेली. उदय शंकर यांना भेटली आणि भारतात परतल्यानंतर माझ्या नृत्यसंस्थेत तुला नोकरी देईन असे आश्वासन तिला त्यांनी दिले. पुढे तिने उदय शंकर यांच्या ग्रुपबरोबर नृत्यानिमित्ताने अनेक दौरे केले.
१९४० साली उदय शंकर यांच्या अल्मोरा येथील नृत्यसंस्थेत ती शिक्षिका म्हणून रुजू झाली. तिथे तिला कमलेश्वर सेहगल हा इंदोरचा तिच्यापेक्षा आठ वर्षांनी लहान असलेला संशोधक, नृत्यनिपुण  असा तरुण भेटला आणि तिने स्वत: मुस्लीम असूनही एका हिंदू तरुणाशी जन्मांतरीची लग्नगाठ जोडण्याचा अत्यंत धाडसी निर्णय घेतला. तिच्या घरच्यांनी सुरवातीस या लग्नास हरकत घेतली पण नंतर त्यांनी त्यांचा विरोध मागे घेतला. झोहाराने किरण आणि पवन अशा दोन मुलांना जन्म दिला. दरम्यानच्या काळात झोहरा आणि  कमलेश्वर हे दोघेही नृत्यदिग्दर्शक झाले होते. त्यानंतर दोघे लाहोरला परत आले आणि त्यांनी 'झोहरेश डान्स इंस्टीट्युट' ची स्थापना केली. त्यानंतर तिची बहिण उझरा बट्ट हिच्याप्रमाणेच झोहराने  'पृथ्वी थिएटर' मध्ये प्रवेश केला आणि नंतरची चौदा वर्षे नृत्याच्या निमित्ताने अवघा भारत पिंजून काढला. तिने 'इप्टा' साठी काम केले आणि निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले.   
बाजी, आवारा सारख्या चित्रपटांसाठी तिने नृत्य दिग्दर्शन केले. तुरुंगातील कैद्यांसाठीही तिने शोज आयोजित केले. १९५९ साली कमलेश्वरांना देवाज्ञा झाली आणि झोहरा दिल्लीत आली. तेथील नव्याने स्थापन झालेल्या 'नाट्य संस्थेची ती संचालिका झाली. तिला नृत्यासाठी स्कॉलरशिप मिळून ती लंडनला गेली. तिथे तिची ओळख भरतनाट्य करणाऱ्या राम गोपाल यांच्याशी झाली. Chelsea इथे तिने काही काळ नृत्य शिकवले. याच दरम्यान बीबीसी TV साठी तिने काही एपिसोड्सचे संचालनही केले. १९९० च्या आसपास ती भारतात आली आणि तिने काही फिल्म्स, TV शोज व प्लेज केले. पाकिस्तान दौरा केला. काही स्टेज परफॉरमन्सेस  दिले.   
झोहरा अनेक पारितोषकांनी सन्मानित झाली. १९६३ सालचे 'संगीत नाटक अकॅडमी अवार्ड' तिला मिळाले. १९९८ साली 'पद्मश्री' या किताबाने ती गौरवली गेली. २००१ साली 'कालिदास' सन्मानाची ती मानकरी ठरली. २००२ साली 'पद्म भूषण' हा मान तिला लाभला. २००४ साली 'संगीत नाटक अकॅडमी फेलोशिप' तिला मिळाली. २०१० साली 'पद्म विभूषण' हा किताब तिने पटकावला. 
अशी ही अभूतपूर्व झोहरा आणि तिचा हा सांस्कृतिक प्रवास! आज वयाच्या शंभराव्या वर्षीही तिला पाच फुट सहा इंच उंची, सुंदर फिगर आणि लांबलचक केस हवे आहेत. ज्या वयात नामस्मरण आणि पोथ्या हाच आयुष्याचा आधार असतो त्याहीपेक्षा जास्त वयात जोहरा सर्वस्वी वेगळी आणि उमेदीची स्वप्ने उरी बाळगते आहे. ईश्वर तिच्या सगळ्या इच्छा या पृथ्वीवरील एक स्पेशल केस म्हणून पुऱ्या करो हीच इच्छा आणि प्रार्थना! 




मंगळ

तुम्हाला मंगळ आहे असे जाणकारांनी सांगितल्यावर अनेकजण मनातून चरकतात.. मग यावर काय उपाय आहे , कोणता खडा घालू, कोणती उपासना करू अशी पृच्छा सुरु होते. तथापि मंगळ आहे म्हणजे नक्की काय याचा मागोवा घेणारे संख्येने फार कमी आढळतात. विवाह जमविण्याच्या मार्गातील हा एक मोठा अडथळा आहे अशी अनेकांची पक्की खात्री झालेली असते.
तुमच्या जन्मकुंडलीत बाराव्या स्थानी (व्यय), पहिल्या स्थानी (लग्न), चतुर्थ, सप्तम आणि अष्टम स्थानी मंगळ स्थित असता मंगळदोष आहे असे समजले जाते. पण या मंगळाच्या प्रतिकूलतेची टक्केवारी मात्र इतरही अनेक गोष्टींवर अवलंबून असते. मंगळ कोणत्या राशीत, कोणत्या नक्षत्रात, कोणत्या ग्रहाच्या अंशात्मक युतीत अथवा प्रतियोगात, केंद्रयोगात या योगांवरून त्याची बरी-वाईट फळे देण्याची क्षमता ठरवली जाते. यांशिवाय मंगळाच्या दृष्ट्याही तपासणे गरजेचे असते. मंगळाच्या बाल, कुमार, वृद्ध अवस्थाही समजून घेणे इष्ट असते. मंगळावर होणारे शनीसारख्या अथवा गुरूसारख्या ग्रहांचे दृष्टीयोग अभ्यासावे लागतात. मंगळ-राहूचे नाते तपासणेही अत्यावश्यक ठरते. इतक्या सगळ्या बाबींचा साकल्याने विचार केल्यानंतर मग एखाद्या निश्चित अशा निष्कर्षाप्रत येता येणे शक्य असते. पण याचा अर्थ असा नव्हे की इतर स्थानी मंगळ असता त्याचे सगळे अनुकूलच परिणाम दिसून येतात. काही जाणकार द्वितीय स्थानातील म्हणजेच कुटुंब स्थानातील मंगळ प्रतिकूल मानतात. 
मुळात मंगळ हा तामसी प्रकृतीचा ग्रह आहे. पण म्हणून मंगळ सर्वार्थाने वाईट होत नाही. तो अविचारी आहे पण तो साहसीसुद्धा आहे. शस्त्रास्त्रांचा कारक ग्रह मंगळ शूर योद्धेही निर्माण करेल आणि प्रचंड नरसंहार करणारे अतिरेकीही निर्माण करेल. मूळ नक्षत्रातील मंगळ एखाद्या शल्यविशारदाच्या हाताला अमाप यश देईल तर हाच मूळ नक्षत्रातील मंगळ वाणीशी संबंधित स्थानात असता माणसाला अत्यंत तिखट आणि अर्वाच्य जीभ देईल. बुधासारख्या ग्रहाच्या युतीत असता जशी टीकाखोर वृत्ती देईल तशी गणिती बुद्धी आणि हजरजबाबी वृत्तीही देईल. शुक्राच्या योगात कामभावनेचा अतिरेक करेल पण  खेळाडूस पोषक असे नैपुण्यही देईल. उच्च राशीतील ( मकर ) मंगळ चांगली श्रेणी देईल तर नीच राशीतील (कर्क) मंगळ चांगली फळे देण्यास असमर्थ ठरेल. मंगळाचा लढाऊ बाणा रणभूमी गाजवेल पण तोच बाणा घराच्या भिंती उध्वस्त करून टाकेल.  स्फोटक गोष्टींचा, आगीचा, उष्णतेचा कारक ग्रह मंगळ आहे तर  अंगभूत व्यायामाचा, कसरतीचा, कुस्तीचा कारक ग्रहही हाच आहे.  सुदृढ प्रकृती बहाल करणारा मंगळच असतो आणि उष्णतेचे विकार देणाराही मंगळच असतो. पुढचा मागचा विचार न करता संकटात सर्व-शक्तीनिशी झोकून देणारा मंगळ असतो तर आगीचे, स्फोटाचे प्राणभय निर्माण करणारही मंगळच असतो. 
नाण्याला जशा दोन बाजू असतात त्याचप्रमाणे प्रत्येक ग्रहाला धन आणि ऋण अशा दोन बाजू असतात. चांगल्या स्थानात, चांगल्या राशीत, चांगल्या नक्षत्रात आणि इतर ग्रहांच्या चांगल्या योगांत असलेला ग्रह सर्वसाधारणपणे चांगली फळे देण्यास समर्थ असतो. प्रत्येक ग्रहासाठी सु-स्थाने आणि दु-स्थाने वेगवेगळी असतात. चांगली-वाईट राशी, नक्षत्रे वेगवेगळी असतात. स्थानपरत्वे मिळणारी फळेही भिन्न असतात. 
प्रखरता,  दाहकता, निश्चयाचे तेज, ओजस्विता , पेटून उठण्याची जिद्द ही मंगळाची बलस्थाने होत. पण राशी, नक्षत्रे अथवा इतर ग्रहांचे सहकार्य लाभले नाही पण त्याच्या या अंगभूत गुणांवर पाणी पडते आणि साहसाची जागा भित्रेपणा घेतो. कणखरता आणि शौर्य या सद-गुणांचा लोप होऊन अस्थिरता, भ्याडपणा, कचखाऊ वृत्ती अंग वर काढते. वाणी ओजस्वी न होता दुर्बल होते. रिपुंना पराजित करण्यास सरसावणारा मंगळ कुणाच्यातरी पदराआड लपण्यास अधीर होतो. निर्भीड विचारांची जागा मुळमुळीत विचार घेतात. देशाचे संरक्षण करण्यास आणि देशद्रोह्यांचा बिमोड करण्यास आघाडीवर असलेला मंगळ देशविघातक कृत्यांचा आसरा घेताना आढळतो. 
मुळातच मंगळाची वृत्ती ही एक घाव दोन तुकडे करण्याची असल्याने आणि 'तोडफोड' हेच त्याचे स्वाभाविक धोरण असल्याने असा हा मंगळ दुस्थानात, वाईट ग्रहयोगात किंवा वाईट राशी-नक्षत्रात असता त्याची वाईट बीजे अंकुरित होतात. त्यामुळे घटस्फोटाकडे, माणसे तोडण्याकडे या ग्रहाचा कल असतो. चतुर्थ स्थानातील मंगळ घरातील वातावरण सतत संतप्त ठेवण्यात यशस्वी होतो. घरात अथवा आईशी वाद-विवाद, भांडणे किंवा जमिनीवरून ( इस्टेटीवरून) कोर्ट-कचेऱ्या हे या मंगळाचे दृश्य परिणाम असतात. पण चतुर्थातील सु-स्थित मंगळ हा भू म्हणजेच जमिनीची मालकीही नि:संशयपणे प्राप्त करून देतो. सप्तम स्थानातील दु-स्थित मंगळ हा वैवाहिक सुखावर विरजण पाडतो. एकमेकांशी न पटण्याचे पर्यावसान घटस्फोटात होऊ शकते. सप्तम स्थानातील प्रतिकूल नक्षत्र-राशीतील मंगळ जोडीदारास अपघातभय दर्शवतो. पण या स्थानातील  सु-स्थित मंगळ कर्तृत्ववान, कणखर, सक्षम जोडीदारही दर्शवतो.  
हा मंगळ भावना-संवेदनाशून्य नसला तरी हा शारीरिक स्तरावर (फिजिकल लेव्हलवर) जास्त कार्यरत (active)असल्याने ही माणसे भावनांच्या सहजी आहारी जाणारी नसतात. यांचा 'practical approach' जास्त प्रकर्षाने दिसून येतो. या मंगळात सोशिक वृत्ती अभावानेच आढळून येते. जे पटणार नाही त्याला हा मंगळ जोरदार विरोध केल्यावाचून राहत नाही. हा मंगळ हुकुमशाही वृत्तीचा निदर्शक असतो. सेनापती असतो. लोकनायक असतो. जन-नेतृत्व स्वीकारण्यास सदैव उत्सुक असतो. लोक-भावना भडकवण्यासाठी जागृत असतो. शस्त्रांचे सान्निध्य त्याला आवडते. रणभूमीवर त्याच्या सामर्थ्याला वेगळीच झळाळी येते. या मंगळाची अंगकांती एखाद्या तप्त लोहासारखी असते. त्याच्या विचारांत उष्ण लाव्हा खदखदत असतो. अशा मंगळाच्या शौर्याला, क्षमतेला, अंगभूत स्वभावाला जर पोषक दिशा, भूमी आणि परिस्थिती लाभली नाही तर त्याची प्रखरता , दाहकता घरच्या घरीच वणव्यासारखी पसरू शकते आणि तीत नात्यांची राख-रांगोळी झाल्याशिवाय राहत नाही. 
तथापि शनी-गुरु सारख्या ग्रहांच्या योगांत अथवा दृष्टींत या मंगळाचे अवगुण थोडे शमू शकतात. त्याच्या दाहकतेस, विघातक, विध्वंसक वृत्तीस थोडा चाप बसू शकतो. शनीसारखा संयमी, धीरगंभीर आणि शीततत्वाचा ग्रह मंगळासारख्या अग्नितत्वाच्या प्रवृत्तीस काही प्रमाणात शांत करू शकतो. गुरूची सात्विकता, सहिष्णू आणि विवेकी वृत्ती मंगळाच्या अतिरेकाला, अतिक्रोधाला चांगले वळण लावू शकते.    
असा हा साधक-बाधक मंगळ! कधी शत्रूंना चारी मुंड्या चीत करून आपल्या शौर्याचे रणशिंग फुंकणारा तर कधी समाजविघातक कृत्ये करून आपल्याच देशात रक्ताचे पाट वाहणारा! समाज संवर्धनासाठी, धर्म प्रसारासाठी विवेकानंदांच्या ओजस्वी वाणीतून दुमदुमणारा तर हिटलर, स्टालिन, मुसोलिनीच्या रूपाने भयंकर नरसंहार घडवणारा ! कधी एखाद्या कुशल सर्जनच्या बोटांतून रोग्याला नव-संजीवन देणारा तर कधी याच शस्त्रास्त्रांनी निरपराध्यांचा शिरच्छेद करणारा!  कधी देशाचे प्राणपणाने संरक्षण करणारा तर कधी देशांतर्गत भीषण बॉम्बस्फोटांनी मानवी देहाच्या चिंधड्या उडवणारा! कधी आपल्या वैचारिक प्रखरतेने अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरांचा बिमोड करून नव-विचारांचा पायंडा घालणारा तर कधी याच रुढींच्या, चालीरीतांच्या आधाराने आपल्याच रक्तातील नात्यांचे शिरकाण करणारा!    
बुधाइतकाच पृथ्वीच्या जवळ असलेला हा मंगळ जितका जास्त अभ्यासाल तितका जास्त उलगडेल! 





Tuesday, 24 April 2012

काकस्पर्श

या शीर्षकाचा महेश मांजरेकर कृत चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे असे ऐकिवात आहे. असो. साधारणत: श्राद्धसंस्कारांच्या वेळी, पिंडदान करतेसमयी या काक म्हणजेच कावळ्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते. कावळा पिंडाला शिवला की मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा अडकलेला श्वास मोकळा होतो. तिची किंवा त्याची पश्चात काही इच्छा, वासना राहिली नसावी म्हणूनच तर इतक्या लवकर पिंडाला कावळा शिवला अशी आपण आपली समजूत करून घेतो. ( कावळा पिंडाला लवकर शिवला नाही तर दर्भाचा कावळा करून त्यास पिंडाला शिवायला लावणे अशीही सोय असतेच की!) 
वास्तविक पाहता इच्छा, वासना असते म्हणूनच जन्म-मृत्युच्या भोवऱ्यात माणूस पुनश्च गटांगळ्या खात असतो. अगदी म्हातारा होऊन जरी माणूस गेला तरीही त्याची काहीतरी इच्छा ही उरलेली असतेच. काहीतरी शिकायचे, कुणाशीतरी बोलायचे, कुणाची माफी मागायची राहून गेलेली असते.आयुष्यभर पैसा पैसा करत वेडीवाकडी वणवण केलेली असते. वारेमाप खस्ता खाल्लेल्या असतात. निवांत क्षण असे आयुष्यात फारसे वाट्याला आलेलेच नसतात. रिटायर्ड आयुष्य असे घालवू न तसे घालवू असे मनसुबे कित्येकदा रचलेले असतात. पाण्याच्या सपाट्याने नितळ वाळूवरील अक्षरे एकदम पुसून जावीत असेच काहीसे भाग्य त्या मनसुब्यांच्या वाट्याला आलेले असते. आपण रिटायर होतो काय आणि अवघ्या सहा महिन्यांनी पत्नीचा देहांत होतो काय! क्षणार्धात मुलगा-सून आणि त्यांचा संसार आपल्याला एकदम परका वाटू लागतो. त्यांचे आणि आपले ट्युनिंग जमूच शकत नाही असे वाटू लागते. आपला नातू लहान असेपर्यंत आपल्या अवतीभवती घोटाळत असतो. पण कालौघात तोही मोठा होतो आणि आपले वर्तुळ आपल्यापुरते सीमित होऊन जाते. 
माणूस कोणत्याही वयात गेला तरी शोक हा होतोच. वय वेगळे असते, मृत्यूची निमित्ते वेगवेगळी असतात पण जी नाती आपण आयुष्यभर जोपासलेली असतात त्या नात्यांपासून सहजासहजी विरक्त होता येत नाही. सण-समारंभ, नैमित्तिक कर्मकांडे, पूजाअर्चा या प्रथांकडे निवृत्त मनाने पाठ फिरावावीशी वाटत नाही. एखाद्या म्हाताऱ्या आजींचे मनही लोणच्याच्या बरणीपाशी , ताक-दह्याच्या घुसळणीपाशी सारखे घुटमळत राहते. ऑफिसमधून सन्मानाने निवृत्त झालेला किंवा झालेली प्रपंचातून कृतार्थ मनाने निवृत्ती स्वीकारू शकत नाही. कितीही पोथ्या वाचा, कीर्तने करा, पारायणे करा, प्रवचनाला जा, मनाला वानप्रस्थाश्रमी होणे मान्य नसते.  त्यामुळेच माणूस गेला आणि त्याच्या पिंडाला कावळा शिवला म्हणजे त्याची कोणतीही इच्छा-वासना अपुरी राहिली नाही हे तितकेसे तर्कसंगत वाटत नाही. 
एवढ्या मोठ्या विश्वात अगदी नगण्य रूपाने आपण वावरत असतो. आपले अस्तित्व एखाद्या छोट्याशा ठिपक्याएवढे असते. एखाद्या मोठ्या मॉलमध्ये शिरताक्षणी लहान मूल अगदी झपाटून जाते. प्रत्येक खेळणे त्याला बोलावत असते. त्याच्या आई-वडिलांच्या खिशाचा विचार त्याच्या चिमुकल्या मनात डोकावतही नाही.त्याला जे पाहिजे त्यासाठी ते एकतर हट्ट तरी करते अथवा आपल्या गोड बोलांनी ते खेळणे मिळवते. पण एक खेळणे जरी मिळाले तरी त्याचे मन मात्र अनेक खेळण्याभोवती गुंतून पडलेले असते. पुढच्या वेळेस कोणते खेळणे घ्यावयाचे याबद्दलचे बेत त्याचे मन रचत असते. या विश्वाच्या अफाट पसाऱ्यातील आपणही मुलच असतो. अनेक विलोभनीय दृश्ये ,ठिकाणे  आपल्याला पहायची असतात, यशाची अनेक शिखरे आपल्याला सर करायची असतात, लौकिकाच्या, प्रतिष्ठेच्या, बरकतीच्या मार्गावरील कैक खेळणी आपल्याला खुणावत असतात. सुबत्तेच्या पायघड्यांवरून आपल्याला मार्गक्रमणा करायची असते,  घरीदारी आनंदाच्या कारंज्यात आपल्याला डुंबायचे असते. पण नशिबाचे, नियतीचे बेत मात्र गुलदस्त्यात असतात. त्याची उकल आपल्याला वर्षागणिक आणि वयागणिक थोडीबहुत होत जाते. काही स्वप्ने पूर्ण होतात तर काहींना तिलांजली द्यावी लागते. आज ना उद्या हे करू असे म्हणताना आयुष्य वाळूच्या कणासारखे मुठीतून झरझर निसटत जाते. 
अनेक वर्षे बायका आपल्या इच्छा-आकांक्षा ओठांबाहेर न येऊ देता मन मारून जगलेल्या असतात. पतीसाठी करणे, मुलांसाठी करणे यात पाउण आयुष्य निघून गेलेले असते. म्हातारपण हे जणू पोथ्या-प्रवचनासाठीच आरक्षित केल्यासारखे या बायका जगत असतात. अनेक गोष्टींचा आस्वाद घ्यायचे राहून गेलेले असते. खेळ-साहित्य-गाणे-चित्रकला-पाककला-भरतकाम-अभिनय हे आणि असे अनेक वैयक्तिक छंद जोपासायचे राहून गेलेले असतात. नंतर करू, नंतर करू असा विचार करता करता आयुष्याची संध्याकाळ झालेली असते. आता उरलेला वेळ नामस्मरणात घालवावा असा त्यांच्या परीने सुज्ञ विचार बायकांनी जरी केला तरीही मनाच्या तळाशी या न केलेल्या पण त्यावेळी कराव्याशा वाटलेल्या गोष्टी ठाण मांडून असतातच! कुठे चांगले चित्र-प्रदर्शन पहिले अथवा कुणा नामवंताच्या गाण्याला हजेरी लावली की मनोमन आपण शिकलो नाही याची खंत वाटतेच वाटते. पूर्तता न झालेल्या या सर्व इच्छांची उजळणी मनातल्या मनात अव्याहत होत राहते. 
ज्या व्यक्तीच्या वासनांचा संपूर्णपणे क्षय झाला आहे अशी व्यक्ती एकतर या भूतलावर सापडणे अशक्यप्राय गोष्ट आहे अथवा ही व्यक्ती प्रापंचिक चौकटीतून सर्वस्वी मुक्त होऊन परमार्थाच्या मार्गावर चालली आहे असे मानायला हरकत नाही. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत एखादीतरी क्षुल्लक का होईना इच्छा ही राहतेच! कुणाला नातवंडाचे तोंड बघायचे असते, कुणाला परदेशात कायमच्या स्थायिक झालेल्या आपल्या मुलाला डोळे भरून पहायची इच्छा असते, कुणाला आपल्या मुलाला आयुष्यात यशस्वी झालेले पाहायचे असते तर कुणाला आपल्या मुलाला व्यसनमुक्त झालेले! अगदी गंभीर आजारी असलेल्या माणसालादेखील  विशिष्ट पदार्थ खायची प्रचंड इच्छा होते. ते पदार्थ त्याच्यासाठी वर्ज्य असे तरी! जसे मूल जन्म घेते तशा मनातील इच्छाही जन्म घेतात. कालपरत्वे मुलाचा माणूस होत जातो आणि मनातील इच्छांचा आवाका वाढत राहतो. माणसामाणसागणिक इच्छा जरी भिन्न असल्या तरीही त्याची पूर्तता करण्यासाठी माणूस कधी स्वत:शी, कधी परिस्थितीशी तर कधी  अवतीभवतीच्या माणसांशी झुंजत  राहतो. तरीही काही इच्छा या अपूर्णच राहतात. 
शेवटी देह म्हणजे या इच्छांची पूर्तता करण्याचे एक माध्यम असते. वर्षानुवर्षांच्या, जन्मानुजन्मांच्या आत्म्यावर झालेल्या संस्कारांतून या इच्छा-वासना उदय पावलेल्या असतात. जोवर शरीर असते तोवर या इच्छांना मूर्त स्वरूप लाभणे शक्य असते. ज्या क्षणी देहातून प्राण म्हणा किंवा जीव म्हणा निघून जातो आणि लौकिकार्थाने शरीर अचेतन होते त्या अवस्थेत कोणत्याही इच्छांची पूर्तता होणे हे संभव नसते. पण अमूर्त स्वरुपात, साठवणीच्या रुपात या इच्छा-वासना असतातच! त्याचा क्षय होत नाही फक्त आता त्या माध्यमाअभावी प्रकट होऊ शकत नाहीत.  ज्या अंतस्थ प्रेरणा घेऊन माणसे यशाची शिखरे पादाक्रांत करतात त्या प्रेरणांचा उगम कोठून होतो? कुणाला आकाशातील ग्रहगोल अभ्यासावेसे वाटतात तर  कुणाला या ग्रहगोलांचे मानवी आयुष्यातील महत्व जाणून घ्यावेसे वाटते. नेमके अमुक एकाच विषयाचे मनन किंवा अध्ययन आतील प्रेरणेशिवाय होणे हे असंभव आहे. ही आतील प्रेरणा , हा स्त्रोत नक्की येतो कुठून? याविषयी अनेकजण अनभिज्ञ राहणेच पसंत करतात. अंतर्मन, सिक्स्थ सेन्स, इंट्युशन या शब्दांचा नक्की आधार कोणता? बरेचजण या अंतस्थ उर्मींना उपहासिक दृष्टीने  बघतात. पिंडाला कावळा शिवला त्यामुळे आता मृत व्यक्तीची कोणतीही इच्छा शिल्लक राहिली नाही असे मानणारे प्रतिगामीच आज संख्येने अधिक आहेत. 
देह निवर्ततो, इच्छा नाहीत. शरीराचे निर्वाण होते, वासनांचे नाही. कारण प्रत्येक शरीरागणिक जर मानवी इच्छा-वासनांचाही क्षय झाला असता तर नरजन्माचे प्रयोजनच उरले नसते. काही महापुरुषांनी लोककल्याणासाठी देह धारण केला तर काही नराधमांनी मानवतेला पायदळी तुडवण्यासाठी! चौऱ्याऐंशीलक्ष योनीं फिरून येणारा मानवाचा जन्म हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. या अशा अनेक जन्मांतील बऱ्या-वाईट संस्कारांची बीजे मनुष्य जन्माबरोबर इच्छा-आकांक्षांत परावर्तीत होतात. या जन्मात ज्या इच्छा केवळ बिजस्वरुपातच राहतात त्यांच्या पूर्ततेसाठी पुनश्च देह धारण करणे क्रमप्राप्तच असते. भगवान श्रीकृष्णांनी पार्थाला केलेल्या गीतोपदेशात ते म्हणतात, 'जो जन्माला आला त्याचे मरण निश्चित आहे आणि जो मृत्यू पावला त्याचा जन्मही निश्चित आहे'. कोर्टात खरे बोलण्यासाठी या गीतेच्या महान ग्रंथाचा उपयोग केला जातो पण त्यात सांगितलेले तत्वज्ञान मात्र बहुतेककरून डोळेझाक करण्यासाठीच असते, ते आचरण्यासाठी नसते असा कित्येकांचा  एक गोड गैरसमज असतो.  
त्यामुळे मरणोत्तर काकस्पर्श हा माणसांत लपलेल्या इच्छा-वासनांची जाणीव करून देणारा असतो, त्यांना पूर्णविराम देणारा नसतो. 

Thursday, 19 April 2012

उन्हाळी वरदान

प्रत्येक सिझनला एकेक आजार नेमून दिलेले आहेत. थंडी-पावसाळ्याकडील आजार हे साधारणत: ताप-सर्दी-खोकल्याशी संबंधित असतात. उन्हाळ्यातील आजार हे उष्णतेच्या विकारांशी! ठुसठूसणारी गळवे ही उन्हाळ्याने दिलेली एक मौलिक व्याधी आहे. ही वेदनादायी गळवे शरीरावर कुठेही बिनदिक्कत त्यांचा हक्क सांगू शकतात. त्यांच्यावर औषधी लेप लावा,त्यांना शेका, त्यांना गोंजारा शरीराला अथक वेदना देण्याचा त्यांचा परिपाठ सुरूच राहतो, परिपाठाच्या काढ्यालाही न जुमानता!
सध्या अशा एका गळवाने माझ्या नाकात त्याचे बस्तान मांडले आहे. सुरवातीस नाकात थोडे दुखू लागल्यावर मला वाटले की माळीण आली आहे. मग मी हुंगायला म्हणून गजरा आणला. खोल श्वास घेत गजरा हुंगला खरा पण त्याने नाकामध्ये दुखायचे काही थांबले नाही. त्यानंतर अधिकच दुखू लागले आणि मी नॉस्टेल्जीक झाले. मला माझे लहानपण आठवले. माझी वार्षिक परीक्षा जवळ यायची आणि न चुकता हे गळू माझा कान, माझे नाक, माझा डोळा किंवा माझी पाठ शोधायचे. डोळ्यावर गळू मिरवत मी अनेकवेळा परीक्षा दिलेल्या आहेत. केस सारखे करताना म्हणा किंवा कोणाचा सहज थोडा जरी धक्का लागला की ही गळू नावाची व्यथा आपले अस्तित्व भयंकररित्या जाणवून द्यायची. मग कोणी म्हणतंय म्हणून चंदनाचा लेप लाव, कैलास जीवन लाव, बर्फ फिरव, कधी कोणी सुचवलं म्हणून पापड (मिरीचा) ओला करून त्याचे पोटीस लाव असे नाना प्रकार करूनही गळू 'जैसे थे' च असायचे. अखेर गळू माझा नाद सोडत नव्हते म्हणून मग मीच त्याचा नाद सोडून देऊ लागले. त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागले. ठुसठूसणाऱ्या वेदनांचे स्वागत करू लागले. 
या गळू नामक व्याधीने शरीरावरील आपली जागा एकदा पक्की केली की मग त्या दृष्टीने त्याच्या हालचाली सुरु होतात. ती जागा लालसर होते. तिथे दुखू लागते. हळूहळू त्या व्याधीला एक निश्चित आकार येतो. छोट्या डोंगराचा! वर त्याचे तोंड असते. लालसर-पिवळ्या रंगाचे, त्यावर एक ब्युटी-स्पॉट सारखा काळ्या रंगाचा ठिपका उगवतो. आजूबाजूचा भाग हाताला गरम लागतो आणि थोडा सूजट दिसतो. त्या व्याधीचे हे रूप आपण येत-जाता न्याहाळत बसतो. चेहऱ्यावर गळू दिसले की जो तो हे काय आलंय गं  हे त्या बिरबलाच्या गोष्टीतील आंधळ्या डोळसांसारखे प्रश्न विचारत राहतो. गळू ठणकू लागते आणि आपल्या शरीराला ठणकणे ही एकच गोष्ट इमाने-इतबारे करता येते असे आपल्याला वाटते. उठता-बसता आई गं, आ अशी बाराखडी सुरु होते. लोक निरनिराळे उपाय सुचवत राहतात आणि आपण ते श्रद्धेने करत राहतो. आपल्या आधीच ठणकणारया गळवाला कुणाचा चुकूनमाकून हात लागायला नको म्हणून आपण त्याला विलक्षण जपत असतो. ते दिसामाशी तट्ट फुगत राहते आणि आपण असहाय होऊन जातो. 
अखेरीस त्याला हवे तेव्हाच ते आपली पाठ सोडते आणि इतके दिवस आपली झालेली वेदना परकी होते. आपण गळूमुक्त होतो. आपण साडी-खरेदी एन्जॉय करू शकतो. आपण टी.व्ही वरील सास्वा-सुनांची भांडणे आता चवीने बघू शकतो. आपण मैत्रिणींबरोबर आनंदाने गॉसिप करू शकतो. आपण भाजी विक्रेता,फळवाला,रिक्षावाला, बस कंडक्टर, वाणी, मोची, दूधवाला,धोबी अशा लोकांशी हिरीरीने वादू शकतो. आपल्या या आनंदावर इतके दिवस गदा आलेली असते. कारण कुठेही गेलं तरी गळू ही एक वेदना आपल्याला व्यापून दशांगुळे उरलेली असते. त्यामुळे आपल्या स्वाभाविक उर्मी दबून गेलेल्या असतात. आपला चेहरा वस्तू-संग्रहालयातील एक नमुना झालेला असतो.  
या दरम्यान बाह्योपचार तर सुरु असतातच शिवाय आपण सतत दुध-दही-ताक रिचवत असतो. फळांचे रस पीत असतो. सब्जा -तुळशीचे बी यांना प्राधान्य देत असतो. बर्फाने शेकत असतो. गारेगार गोष्टींचा भडीमार करत असतो. ठणकणारे गळू कालांतराने  भुईसपाट, चारी मुंड्या चीत होते आणि आपल्याला विजयोन्माद होतो. त्याला कसे पिटाळून लावले याच्या सुरस कहाण्या आपण इतरांना सांगण्यात गर्क असतो आणि एखाद्या बेसावध क्षणी मागील दराने सर्दी आल्याची वर्दी देते. आपले नाक गळक्या पाईपलाईन सारखे वाहू लागते. आता दुध -हळद आणि अशा अन्य कोणत्या उपायांनी सर्दीला पिटाळून लावायचे या विवंचनेत आपण हरवून जातो.