महागाई कोण वाढली आहे. रोजच्या जेवणात लागणाऱ्या वस्तूही किती महाग झाल्या आहेत.म्हणूनच एकमुखाने म्हणूया.........
भाज्या नको या बाई अन डाळी नको या बाई
रोजची ही महागाई, खिशाची होते सफाई
पावसाची दिरंगाई, हातातोंडाची लढाई
आता परकी झाली मंडई ..........||
जी गत भाज्यांची तीच गत शिक्षणाची. शिक्षणाचा नुसता पोरखेळ चालवलाय राज्यकर्त्यांनी . म्हणूनच...........
Admission नको ग बाई आता डोनेशन नको ग बाई
शिक्षणाचा झाला चेंडू, ज्याच्या हाती तोच धोंडू
पालकांना उखळी कांडू, बालपण जाई सांडू
फुले-कर्व्यांची सरली पुण्याई............||
मुंबईची 'लाईफलाईन' असे जिचे वर्णन केले जाते त्या लोकलने रोजचे येणे-जाणे किती कठीण झाले आहे. म्हणूनच...........
वेस्टर्न नको ग बाई मला सेन्ट्रल नको ग बाई
सीटसाठी चढाओढ, तुटे कधी ओव्हरहेड
कधी स्फोट धडाधड, चोरट्यांची धडपड
त्यात पावसाने केली धुलाई..............||
राजकीय पक्ष, मंत्री,सत्ता, निवडणुका,आश्वासने,भाषणबाजी,आपापसातील कुरघोड्या,पैशांसाठी लांड्यालबाड्या आणि कृतीशून्यता यांविषयी काय बोलावे? म्हणूनच...............
निवडणुका कशाला घ्याव्या? आश्वासने कशाला द्यावी?
घोषणा आणि गटबाजी, वरिष्ठांची हांजी हांजी
वाईटासाठी होती राजी, धानिकांपुढे करती जी जी
ह्यांना जनतेची पर्वा नाही..........................||
No comments:
Post a Comment