डॉक्टर मी आत येऊ का ? मी नीला विधाते.
या. बसा. काय होतंय ?
उलट्या, चक्कर, डोकेदुखी आणि सारखी मळमळ.
तिच्या देखण्या चेहऱ्याकडे आणि तरण्याबांड शरीरयष्टीकडे माझा सहेतुक कटाक्ष.
दिवस गेलेत?
स्त्री-पुरुष एकत्र येण्याशिवाय गर्भधारणा होणे असा निसर्गनियमाला अपवाद असणारा सिद्धांत
आपण २१व्या शतकात मांडू शकू का ?
तिच्या विचित्र प्रश्नात दडलेल्या संभाव्य उत्तराकडे मी आ वासून पाहताच राहिले.
वास्तविक माझ्याकडे येणाऱ्या-जाणाऱ्या पेशंट्सची वर्दळ खूप. त्यामुळे विशिष्ट चेहरे लक्षात राहणे दुरापास्तच असते. शिवाय पेशंटच्या मनात दडलेल्या कैक विचारांचा थांग लावणे हा माझा पेशाही नव्हे. या पार्श्वभूमीवर नीला विधाते मला चांगलीच अस्वस्थ करून गेली. तिच्या चमत्कारिक प्रश्नावर मी तिला काही विचारणार एवढ्यात ती खळखळून हसत मला म्हणाली, माझा नवरा माझ्याजवळ नाही या गोष्टीला चार वर्षे उलटली. माझा कोणी मित्र नाही, प्रियकर नाही. त्यामुळे आपण म्हणताय तशी शक्यता माझ्या बाबतीत संभवतच नाही.
अहो मग पित्त झालं असेल बहुतेक. मी तपासते आणि गोळ्या देते.
गोळ्या खाऊन या पित्ताला म्हणजेच acidity ला आराम मिळेल असं खात्रीपूर्वक सांगता येईल का ?
तिच्या प्रश्नाचा मला जरा रागच आला. गोळ्या हव्यात की नकोत? लवकर बोला. मला पुढचे पेशंट्स पाहायचेत.
ते तर तुम्ही पहालच हो. पण मला प्लीज एका प्रश्नाचं उत्तर देता का? Acidity चं नातं फक्त शरीराशी न जोडता मनाशी जोडता येईल का? मनात होणारी घालमेल, घुसमट , उलटसुलट विचारांमुळे होणारी जळजळ शरीरावाटे बाहेर पडते आहे असं म्हणता येईल का? माझ्या मते तरी ही मानसिक व्याधी आहे.
Then I am very sorry. मी मानसोपचार तज्ञ नाही. यू मे गो.
आभारी आहे. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं.
मी तिच्याकडे कुतूहलमिश्रित नजरेने बघत असतानाच ती उठली आणि चक्क दार उघडून बाहेर गेली. मी यांत्रिकपणे नेक्स्ट म्हटले आणि इतर पेशंट्स पाहण्यात गढून गेले.
काही दिवसांनंतरची गोष्ट. मी नुकतीच दवाखान्यातील पेशंट्स तपासून घरी आले. आता दुपारचे दोन-तीन तास तरी माझे हक्काचे होते. जरा विश्रांती घ्यावी म्हणून मी बेडवर पडले तोच दारावरची बेल वाजली. मी काहीशा त्रासिक चेहऱ्यानेच दार उघडले.
दारात काहीसा परिचित वाटणारा सुहास्यवदन चेहरा. मी नीला विधाते.
माझा पत्ता.........
शांताबाईकडून घेतला. माझ्या कपाळावरील आठ्यांना तिचे शांतपणे उत्तर.
इथे यावेळी यायचं कारण?
सहजच.
माझी ही वेळ विश्रांतीची आहे. माझी अलिप्तता बोलली.
पण माझी गप्पांची. माझ्या रागालोभाची पर्वा न करता नीला एकदम आत आली.
बसा. माझी अनिच्छा बोलली.
माझी नजर तिच्या गळ्यातील मंगळसूत्राशी खिळलेली.
काय पाहताय एवढं?
त्या दिवशी दवाखान्यात आल्यानंतरचे तिचे वागणे आणि आताचा तिचा हा आगाऊपणा मला बुचकळ्यात टाकत होता. तिच्या इथे येण्यामागचे प्रयोजन कळत नव्हते.
अहो काय पाहताय?
मंगळसूत्राशी चाळा करण्यात गुंतलेल्या तिच्या हातांकडे मी बघत होते. तिच्या व्यक्तीमत्वात दडलेले काहीसे मी नजरेने शोधू पाहत होते. काही नाही. नवऱ्याने का सोडलं तुम्हाला?
मंगळसूत्राशी चाळा करण्यात गुंतलेल्या तिच्या हातांकडे मी बघत होते. तिच्या व्यक्तीमत्वात दडलेले काहीसे मी नजरेने शोधू पाहत होते. काही नाही. नवऱ्याने का सोडलं तुम्हाला?
गैरसमज झालाय तुमचा. माझ्या नवऱ्याला म्हणजेच श्रीधरला मीच सोडलं. त्याने नाही.
बेबनाव नक्की कशामुळे झाला? काहीतरी विचारणं भाग होतं म्हणून मी विचारलं.
त्याचे हुकुमशाही वागणं जे मला अजिबात पसंत नव्हते.
घटस्फोट?
नाही. म्युचल सेपरेशन. आम्ही ठरवून एकमेकांजवळ राहत नाही.
मुलबाळ ?
सुदैवाने नाही.
एकट्याच राहता?
अर्थात.
सासरची मंडळी, तुमचे आई-वडील वगैरे......
त्यांच्याशी माझं पटत नाही.
तुमच्या घरच्यांशीही नाही?
नाही. कारण मी घेतलेला निर्णय त्यांना मान्य नाही. त्यांना मी टिपिकल, चाकोरीबद्ध पद्धतीने संसार करणारी म्हणून अपेक्षित होते पण मी तशी नाही.
म्हणजे नेमकं काय?
म्हणजे नवरा कसाही असला तरी हुं की चू न करणे, त्याच्यासाठी तिन्ही त्रिकाळ स्वयंपाकघरात राबणे, एखाद्या आज्ञाधारी सुनेप्रमाणे सर्व व्रतवैकल्ये, उपासतापास करणे, जे जे होईल ते ते निमुटपणे सहन करणे, अन्याय झाला तरी त्याविरुद्ध ब्र ही न काढणे इत्यादी इत्यादी.
पण तुझ्यावर अन्याय झाला म्हणजे नक्की काय झालं ?
आमचं लग्न झाल्यानंतर माझे सर्व छंद, आवडीनिवडी बंद झाल्या. माझे गाणे बंद झाले, लायब्ररी बंद झाली, पेंटिंग बंद झाले. मित्र-मैत्रिणींना भेटणे अवघड झाले. सहली बंद झाल्या. नाटक-सिनेमे बंद.
कारण?
संसार. आता मी संसारी स्त्री होते. नवऱ्याला खूष ठेवणे, सासरच्यांची सेवा करणे हे माझे परम कर्तव्य होते. माझ्या सगळ्या वैयक्तिक आवडीनिवडी आमच्या संसाराच्या मूळावर येतील असे ज्याला त्याला वाटत होते. त्याचे मात्र सारे यथास्थित चालू होते. त्याच्या कोणत्याही छंदात जराही खंड नव्हता. ऑफिस, मित्र, छंद आणि घरी आल्यानंतर हमखास दिमतीला असणारी हक्काची बायको. वेळच्या वेळी गरमागरम नाश्ता, जेवण देणारी, त्याच्या मित्रांची, नातलगांची सरबराई तत्परतेने करणारी, त्याच्या आई-वडिलांना हवं नको ते बघणारी एक अत्यंत हक्काची खास वस्तू माझ्या रूपाने त्याच्याकडे होती जी त्याला हवी तिथे मिरवता येणार होती आणि हवी तशी वापरता येणार होती.
घरी कधी तंबोरा काढून रियाजाला बसले की याच्या हाकाट्या सुरु. हे दे आणि ते दे. रात्री बिछान्यावर लवंडल्यानंतर जरा आवडीचं पुस्तक हातात घे की याचं प्रेम नेमकं तेव्हाच उफाळून येणार. पार्ट टाईम जॉब घेतला तोही त्याला रुचेनासा झाला. एकमेकांतील कुरबुर हळूहळू वाढू लागली. कधीकधी आमच्यातले संघर्ष विकोपाला जायचे. मी त्याच्या 'रांधा वाढा आणि उष्टी काढा' या सो कॉल्ड संस्कृतीत पूर्णपणे मिसफिट होते. म्हणून मग एक दिवस मीच त्याला सांगून टाकले, आपली दोघांची बौद्धिक कुवत, वैचारिकता आणि समंजस वृत्ती यांत जमीन-अस्मानाचे अंतर आहे. तेव्हा आपल्या संसाराला 'तडजोड' या तकलादू आणि गोंडस नावाखाली किती दिवस झाकायचं ? आपण दोघांनी एकमेकांना जाणीवपूर्वक सोडल्याशिवाय या संघर्षाला पूर्णविराम मिळणार नाही. यापुढे आपल्यातले नातेसंबंध संपले. जो तो आपापल्या मार्गाने जायला मोकळा आहे.
अतिशय शांतपणे, भावनांचे अवडंबर न माजवता नीलाने तिचे मन माझ्याकडे मोकळे केले.
चहा घेतेस? माझ्यातला वयाचा अधिकार व आपुलकी बोलली.
आत्ता नाही. पुन्हा येईन. अशीच केव्हातरी. येते. नीला विधाते निघून गेली. खरोखरीच मला अंतर्यामी अस्वस्थ करून. माझ्या असंख्य प्रश्नांना अनुत्तरीत ठेवून. नीला विधाते नक्की कशी आहे? मी मला अगणित वेळा विचारलेला हा प्रश्न. तिच्या नवऱ्याच्या विरहाने दु:खी की स्वातंत्र्याच्या अबाधितपणामुळे सुखी?
नीला विधाते ही एक प्रवृत्ती आहे. दुर्मिळ नसली तरी सहजी न सापडणारी. अशा कितीतरी भावी नीला विधाते आज या क्षणी जगात वावरत असतील. वैयक्तिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी धडपडत असतील. यातील काही आतल्या आत उरस्फोड करत असतील तर काही प्रकटपणे. यातील एखादीच नीला विधाते धिटाईने पुढे येईल आणि म्हणेल, 'रांधा वाढा आणि उष्टी काढा' या तुमच्या सनातन संस्कृतीत मी पूर्णपणे मिसफिट आहे. तेव्हा................
No comments:
Post a Comment