Monday, 27 August 2012

नपुंसक- कविता


इतर वेळी शौर्याच्या , पराक्रमाच्या बाता मारणारे अतिरथी-महारथी एखाद्या बिकट प्रसंगी किती असहाय होऊ शकतात यावर भाष्य करणारी ही कविता............ 
एका सुनसान रस्त्यावर 
त्या चौघांनी तिला पुरते घेरले
मी तिच्यापासून थोड्याच अंतरावर गर्भगळीत
माझेच वस्त्रहरण झाल्यासारखा 
तिचे पंचप्राण डोळ्यांत उतरलेले
माझ्या डोळ्यांना आलेले लाचार अंधत्व 
त्यातील एकाचा चेहरा 
आता थोडा माझ्याकडेच
मी फ्रीझरमध्ये ठेवल्यासारखा 
जिथल्या तिथे घट्ट
आता तिच्या अन माझ्यामध्ये 
एक भरधाव गाडी 
तिच्या नखाची खूणही आता तिथून पुसलेली
मी आतून बाहेरून पंक्चरल्यासारखा 
कोसळून रस्त्यावर 
माझा घुसमटलेला कंठशोष 
C for Cat, D for Duck
आपण सारे फक्त नपुंसक.......
 

Tuesday, 21 August 2012

भारुड- ( महागाई, शिक्षण,लोकल आणि राजकारणाचे)


महागाई कोण वाढली आहे. रोजच्या जेवणात लागणाऱ्या वस्तूही किती महाग झाल्या आहेत.म्हणूनच एकमुखाने म्हणूया.........
भाज्या नको या बाई अन डाळी नको या बाई
रोजची ही महागाई, खिशाची होते सफाई
पावसाची दिरंगाई, हातातोंडाची लढाई
आता परकी झाली मंडई ..........||

जी गत भाज्यांची तीच गत शिक्षणाची. शिक्षणाचा नुसता पोरखेळ चालवलाय राज्यकर्त्यांनी . म्हणूनच...........
 Admission नको ग बाई आता डोनेशन नको ग बाई
शिक्षणाचा झाला चेंडू, ज्याच्या हाती तोच धोंडू 
पालकांना उखळी कांडू, बालपण जाई सांडू
फुले-कर्व्यांची सरली पुण्याई............||

मुंबईची 'लाईफलाईन' असे जिचे वर्णन केले जाते त्या लोकलने रोजचे येणे-जाणे किती कठीण झाले आहे. म्हणूनच...........
वेस्टर्न नको ग बाई मला सेन्ट्रल नको ग बाई
सीटसाठी चढाओढ, तुटे कधी ओव्हरहेड 
कधी स्फोट धडाधड, चोरट्यांची धडपड 
त्यात पावसाने केली धुलाई..............||

राजकीय पक्ष, मंत्री,सत्ता, निवडणुका,आश्वासने,भाषणबाजी,आपापसातील कुरघोड्या,पैशांसाठी लांड्यालबाड्या आणि कृतीशून्यता यांविषयी काय बोलावे? म्हणूनच...............
निवडणुका कशाला घ्याव्या? आश्वासने कशाला द्यावी?
घोषणा आणि गटबाजी, वरिष्ठांची हांजी हांजी 
वाईटासाठी  होती राजी, धानिकांपुढे करती जी जी 
ह्यांना जनतेची पर्वा नाही..........................||

Saturday, 18 August 2012

रेगमपध............


(आर.आर.खर्डे झी मराठी वाहिनीचे कार्यकारी निर्माते श्री.संदीप राजाध्यक्ष यांच्या केबिनमध्ये प्रवेश करते झाले.)
खर्डे - साहेब, दोन संहिता आहेत माझ्याकडे.
राजाध्यक्ष - बरं मग? 
खर्डे -  ऐकवू का?
राजाध्यक्ष - मी कामात खूप व्यस्त आहे.
खर्डे - अहो साहेब तुमच्या कामाचंच घेऊन आलोय.
राजाध्यक्ष - तुम्हाला आत कोणी सोडलं?
खर्डे -  हा काय प्रश्न झाला? अहो मी काय कुक्कुलं बाळ आहे का? स्वत:हूनच आलो.
राजाध्यक्ष - पाचकळपणा करू नका.
खर्डे -  साहेब मी सौजन्यपूर्वक सांगतोय. शिवाय मी 'बिनसे' चा कार्यकर्ता आहे. 
राजाध्यक्ष -  बोला काय काम आहे?
खर्डे - तेच ते. संहिता ऐकवायच्या आहेत.
राजाध्यक्ष - थोडक्यात सांगा.
खर्डे -  माझ्या पहिल्या संहितेचं नाव आहे 'रेगमपध'. 
राजाध्यक्ष -  हे असलं कसलं नाव?
खर्डे -  का? तुमचं 'सारेगमप ' नाही का?
 राजाध्यक्ष -  तेच जास्त समर्पक आहे.
 खर्डे -  कशावरून?
राजाध्यक्ष -  अहो ते पाच स्वर आहेत.
खर्डे -  मग रेगमपध हे स्वर नाहीत असं म्हणायचं आहे का तुम्हाला?
 राजाध्यक्ष -  पण या नावात मजा नाही.
खर्डे -  माझा कार्यक्रम हा विनोदी नसून संगीतावर आधारित असणार आहे.
राजाध्यक्ष -  पुढं बोला. 
खर्डे -  या कार्यक्रमात पाच परीक्षक असतील.
राजाध्यक्ष -  काय्य? वेड्यासारखे बोलू नका. झी ला परवडले पाहिजेत.
खर्डे -  ई ला  परवडतात तर झी ला का परवडू नयेत?
राजाध्यक्ष -  पुढे?
खर्डे -  यातले दोन स्थिर, दोन रोमिंग आणि एक परमगुरु.
राजाध्यक्ष -  मी जरा बाहेर जाऊन येतो.
खर्डे -  या ऑफिसमधलं सामान खूप किमती असेल ना? लवकर या.
राजाध्यक्ष -  (नाईलाजाने) बोला.
खर्डे -  ठिकठिकाणी आडगावात नसबंदीच्या कार्यक्रमासाठी जसे तंबू ठोकले जातात ना तसेच तंबू उभारून,  कर्ण्यामधून गावोगावी आवाहन करायचे. ज्या संगीतकारांकडे आत्ता म्हणावं तसं काम नाही त्यांना काम मिळेल आणि स्वस्तात आपली सोयही होईल. एकदा निवडीचं काम उरकलं की मग निवडलेल्यांना इथे बोलवायचं आणि  वेगवेगळ्या राउंड्स सुरु करायच्या. 
राजाध्यक्ष -  कळलं. पुढे सांगा.
खर्डे -  स्थिर परीक्षकांना संगीतातील फार काही कळण्याची अट नाही.
राजाध्यक्ष -  तुम्ही काय बोलताय ते कळतंय का तुम्हाला?
खर्डे -  नक्कीच. अहो, त्यांना नुसते फंडू, चाबूक, तोडलं, फोडलं, भन्नाट, नादखुळा एवढे शब्द आले की बस्स. त्यांनी फक्त प्रोत्साहनपर बोलायचं. या परीक्षकांनी डोक्याला फेटे आणि गळ्यात कंठे घालून आलंच पाहिजे. गाणं आवडलं की फेटा फेक,कंठा फेक झालं पाहिजे. रोमिंग परीक्षकांनी गाण्याचं साद्यंत विश्लेषण केलं पाहिजे. कितीही निरस आणि रटाळ वाटलं तरी श्रोत्यांनी ते निमूटपणे ऐकलं पाहिजे. 
 राजाध्यक्ष -  आणि परमगुरुंची भूमिका काय असली पाहिजे?  (शेवटी राजाध्यक्षांनी न राहवून तोंड उघडलंच.)
खर्डे -   (राजाध्यक्ष साहेबांच्या चुळबुळण्याकडे लक्ष न देता खर्डे म्हणाले ) सांगतो ना. या दोन स्थिर आणि रोमिंग परीक्षकांपेक्षा वेगळं मत परमगुरूंनी नोंदवायला हवं. controversies हव्यात. जळजळीत कटाक्ष हवेत.  Identity क्रायसिस हवा. सहभागी होणाऱ्यांची रडणी, रुसणी, धुसफुसणी हवीत. त्यांच्या घरच्यांचा खमंग फोडणीसारखा बाईट हवा.
राजाध्यक्ष - तुम्ही राजकारणातच रहा. हा तुमचा प्रांत नाही. (राजाध्यक्षांनी माफक सूड काढला)
खर्डे -  असं कसं? अहो, संगीताच्या प्रांतातील मंडळी नाही का राजकारणात लुडबुड करतात? निवडणुकांच्या रिंगणात उभे राहतात, प्रचारसभांना हजेरी लावतात, गल्लोगल्लीत घोषणा देत फिरतात. त्यांना राजकारणातील काही कळायची आवश्यकता असते का?
राजाध्यक्ष -( राजाध्यक्षांनी शुष्क झालेल्या ओठांवरून जीभ फिरवली, घामेजलेल्या चेहऱ्यावरून रुमाल फिरवला आणि स्वत:वर प्रयत्नपूर्वक ताबा ठेवत सौम्य शब्दांत खर्ड्यांना सांगितलं) आपण येऊ शकता. 
खर्डे -  ओ.के. तर आपण या प्रोजेक्टसंदर्भात  पुढील बोलणी करण्यासाठी लवकरच भेटू अशी आशा करतो. 
( प्रचंड आत्मविश्वासाने आणि विजयी मुद्रेने खर्डे संदीप राजाध्यक्ष यांच्या केबिनमधून बाहेर पडले). 



 
    



 


 

Thursday, 16 August 2012

वामनरावांचे पलायन.............एक किस्सा

सविताबाई कासावीस होऊन खोलीतल्या खोलीत येरझारा घालत होत्या. एकदम काहीतरी सुचून त्या व्हरांड्यात आल्या आणि घराबाहेरील कानोसा घेऊ लागल्या. त्यांची नजर अस्वस्थपणे चोहीकडे भिरभिरत होती. शेजारच्या पोतनीस आजींकडे गावाहून राहायला आलेला त्यांचा नातू, बंडू याने सविताबाईंची रडवेली नजर पाहत विचारले, काकू काय झालं ? 'आमचे वामनराव पळाले हो' सविताबाई हंबरडा फोडण्याच्या बेतात होत्या. झालं. बंडू धावत धावत आजीकडे गेला आणि म्हणाला, अगं आजी, शेजारच्या काकूंचे हे पळाले म्हणून त्या रडत आहेत.  अग्गोबाई! आजींनी ओठांचा मोठ्ठा चंबू केला. पोतनीस आजींचे डोळे बटाट्याएवढे विस्फारले. चहाचे आधण तसेच अर्धवट बंद करून ही बातमी सांगायला त्या जवळ जवळ पळाल्याच!  
थोड्याच वेळात ललिताताई, मंजुळावहिनी , गोडसे काकू, डिसोझा आण्टी, जयाताई, सुषमाताई, हजरनीस काका, वाकनीस काका, रेळे काका, पेंटर, अरोरा, मल्होत्रा, बिनीवाले अशा वीस एक माणसांचा गट माणुसकीला जागत एकत्र आला. त्यांचा मूक मोर्चा सविताबाईंच्या  घरापाशी येऊन थडकला. आपल्या व्हरांड्यापाशी आलेला जनसमुदाय बघून सविताबाईंना दु:खाचा मोठा उमाळा आला. समस्त बंधू-भगिनींना अशा प्रसंगी नेमके कसे वागावे याचा पूर्वानुभव नसल्यामुळे ते नुसतेच दु:खाचे भाव चेहऱ्यावर आणू लागले. 
तेवढ्यात रेळे आणि वाकनीस काकांच्या नेतृत्वाखाली काही मंडळी पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाली. 'तपस्या' सोसायटीतील एवढी ज्येष्ठ आणि सभ्य मंडळी एकाएकी पोलीस स्टेशनच्या दिशेने येत असल्याचे पाहून इन्स्पेक्टर कदम एकदम अटेन्शन मध्ये उभे राहिले. कांबळे आणि जाधव हवालदार त्यांच्यामागे गांभीर्याने उभे राहिले. मंडळींचे पडके चेहरे एका दृष्टीक्षेपात  कदमांनी ताडले. त्यांनी हलक्या आवाजात विचारले, काय घडले आहे? रेळेकाका पुढे सरसावले. अहो इन्स्पेक्टर, सविताबाईंचे  यजमान घरातून पळाले. बाकीची मंडळी गोंधळल्याचे , घाबरल्याचे, चक्रावल्याचे भाव चेहऱ्यावर बाळगून उभी राहिली. 
मंडळींशी चर्चेत वेळ न घालवता इन्स्पेक्टर कदमांनी रीतसर कम्प्लेंट नोंदवून घेतली आणि कदम आणि कांबळे यांनी इतर रहिवाशांसकट 'तपस्या' कडे कूच केले. या वेळेपर्यंत सोसायटीतील उरल्यासुरल्या रहिवाशांनाही सविताबाईंच्या घरातील अशुभाची चाहूल लागली होती. त्यामुळे जो तो सचिंत होऊन त्यांच्या घराभोवती ताटकळत उभा होता. इन्स्पेक्टर आणि हवालदार आल्यामुळे तेथील वातावरण एकदम तंग झाल्यासारखे वाटू लागले. प्रत्येकजण दुसऱ्याकडे पाहू लागला. कदमांनी सोसायटीतील मंडळींना बाहेरच थांबण्याचा इशारा केला आणि ते सविताबाईंच्या घरात प्रवेश करते झाले. 
काल रात्री ते घरीच होते का?  या कदमांच्या पहिल्या प्रश्नावर सविताबाईंनी फक्त मान हलवली आणि त्या हमसाहमशी रडू लागल्या. इन्स्पेक्टर कदमांची पोझिशन एकदम विचित्र झाली. त्यांनी हवालदार कांबळे यांना इशारा केला. बाई, मिळतील ते. रडू  नका. कांबळे जरा सहानुभूतीने म्हणाले. बरं, मला सांगा या घराला एवढं एकाच दार आहे का बाहेर जायला? कदमांनी विचारले. हो. पण यांना दरवाज्याची गरजच काय मुळी?  मी सांगते, ते भल्या पहाटे नक्कीच या समोरच्या खिडकीतून पळाले असणार. एव्हाना सविताबाईंचे डोळे रडून रडून सुजले होते. इन्स्पेक्टर कदमांनी आणि हवालदार कांबळे यांनी त्या खिडकीकडे पाहत एक आश्चर्योद्गार काढला. या खिडकीतून पळाले? कदमांनी पुन्हा एकदा अविश्वासाच्या सुरात विचारले. मला तरी तसंच वाटतंय बाई. त्यांचा वर्ण गोरा आणि डोळे घरे आहेत का? बरोबर. सविताबाई उत्तरल्या. उंची किती या कदमांच्या प्रश्नावर सविताबाईंनी  त्यांचा हात खूपच खाली नेला. कदम आणि कांबळे एव्हाना हवालदिल झाले होते. बरं , घरातून जाताना त्यांनी कोणते कपडे घातले होते? अहो, त्यांना कपडे घालायची सवय कुठे होती या सविताबाईंच्या उत्तरानंतर बाईंच्या डोळ्यात वेडाची झाक दिसते आहे का ते दोघे पाहू लागले. 
एवढ्यात सविताबाईंचे सुजून लाल झालेले डोळे आनंदातिशयाने लकाकले. त्या एकदम ओरडल्या, ते आले. ते आले. कदम आणि कांबळे एकदम त्या दिशेला बघू लागले पण त्यांन काहीच दिसू न शकल्याने सविताबाईंकडे ते संशयाने पाहू लागले. अहो बाई, कुठे आहेत तुमचे ते? कदमांनी काकुळतीला येऊन विचारले. अहो ते बघा तिथे, त्या छपरावर! आता मात्र धक्क्याने आपली वाचा बंद होते की काय असे दोघांना वाटू लागले. ते आ वासून छापराकडे पाहू लागले. तिथे एक गुबगुबीत, गलेलठ्ठ , पांढराशुभ्र बोका आपल्या मिशा चाटीत निवांतपणे बसला होता. 
ते बघा आमचे वामनराव. माझ्या लग्नात माझ्या सासूने मला ही अनमोल भेट दिली होती. हा बोका माझ्या सासरचा आहे म्हणून याचे नाव मी वामनराव ठेवले. आणि तुमचे यजमान? इन्स्पेक्टर कदमांनी न राहवून अखेरचा प्रश्न विचारला. ते गेलेत त्यांच्या मित्रांबरोबर सहलीला. दोन दिवसांसाठी. इन्स्पेक्टर कदम आणि हवालदार कांबळे दोघांनी एकदमच कपाळावर हात मारून घेतला आणि सभोवतालच्या गर्दीची यत्किंचितही दाखल न घेता त्यांनी तडक पोलीस स्टेशनच्या दिशेने धाव घेतली. 

Saturday, 11 August 2012

नीला विधाते - कथा


डॉक्टर मी आत येऊ का ? मी नीला विधाते.
या. बसा. काय होतंय ?
उलट्या, चक्कर, डोकेदुखी आणि सारखी मळमळ.
तिच्या देखण्या चेहऱ्याकडे आणि तरण्याबांड शरीरयष्टीकडे  माझा सहेतुक कटाक्ष.
दिवस गेलेत?
स्त्री-पुरुष एकत्र येण्याशिवाय गर्भधारणा होणे असा निसर्गनियमाला अपवाद असणारा सिद्धांत 
आपण २१व्या शतकात मांडू शकू का ? 
तिच्या विचित्र प्रश्नात दडलेल्या संभाव्य उत्तराकडे मी आ वासून पाहताच राहिले. 
वास्तविक माझ्याकडे येणाऱ्या-जाणाऱ्या पेशंट्सची वर्दळ खूप. त्यामुळे विशिष्ट चेहरे लक्षात राहणे दुरापास्तच असते. शिवाय पेशंटच्या मनात दडलेल्या कैक विचारांचा थांग लावणे हा माझा पेशाही नव्हे. या पार्श्वभूमीवर नीला विधाते मला चांगलीच अस्वस्थ करून गेली.  तिच्या चमत्कारिक प्रश्नावर मी तिला काही विचारणार एवढ्यात ती खळखळून हसत मला म्हणाली, माझा नवरा माझ्याजवळ नाही या गोष्टीला चार वर्षे उलटली. माझा कोणी मित्र नाही, प्रियकर नाही. त्यामुळे आपण म्हणताय तशी शक्यता माझ्या बाबतीत संभवतच नाही.
अहो मग पित्त झालं असेल बहुतेक. मी तपासते आणि गोळ्या देते.   
गोळ्या खाऊन या पित्ताला म्हणजेच acidity ला आराम मिळेल असं खात्रीपूर्वक सांगता येईल का ?
तिच्या प्रश्नाचा मला जरा रागच आला. गोळ्या हव्यात की नकोत? लवकर बोला. मला पुढचे पेशंट्स पाहायचेत.
ते तर तुम्ही पहालच हो. पण मला प्लीज एका प्रश्नाचं उत्तर देता का?  Acidity चं नातं फक्त शरीराशी न जोडता मनाशी जोडता येईल का? मनात होणारी घालमेल, घुसमट , उलटसुलट विचारांमुळे होणारी जळजळ शरीरावाटे बाहेर पडते आहे असं म्हणता येईल का? माझ्या मते तरी ही मानसिक व्याधी आहे. 
Then I am very sorry. मी मानसोपचार तज्ञ नाही. यू मे गो. 
आभारी आहे. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. 
मी तिच्याकडे कुतूहलमिश्रित नजरेने बघत असतानाच ती उठली आणि चक्क दार उघडून बाहेर गेली. मी यांत्रिकपणे नेक्स्ट  म्हटले आणि इतर पेशंट्स पाहण्यात गढून गेले. 
काही दिवसांनंतरची गोष्ट. मी नुकतीच दवाखान्यातील पेशंट्स तपासून घरी आले. आता दुपारचे दोन-तीन तास तरी माझे हक्काचे होते. जरा विश्रांती घ्यावी म्हणून मी बेडवर पडले तोच दारावरची बेल वाजली. मी काहीशा त्रासिक चेहऱ्यानेच दार उघडले. 
दारात काहीसा परिचित वाटणारा सुहास्यवदन चेहरा. मी नीला विधाते.
माझा पत्ता.........
शांताबाईकडून घेतला. माझ्या कपाळावरील आठ्यांना तिचे शांतपणे उत्तर. 
इथे यावेळी यायचं कारण?
सहजच.
माझी ही वेळ विश्रांतीची आहे. माझी अलिप्तता बोलली. 
पण माझी गप्पांची. माझ्या रागालोभाची पर्वा न करता नीला एकदम आत आली. 
बसा. माझी अनिच्छा बोलली.  
माझी नजर तिच्या गळ्यातील मंगळसूत्राशी खिळलेली. 
काय पाहताय एवढं?
त्या दिवशी दवाखान्यात आल्यानंतरचे तिचे वागणे आणि आताचा तिचा हा आगाऊपणा मला बुचकळ्यात टाकत होता. तिच्या इथे येण्यामागचे प्रयोजन कळत नव्हते. 
अहो काय पाहताय?
मंगळसूत्राशी चाळा करण्यात गुंतलेल्या तिच्या हातांकडे मी बघत होते.  तिच्या व्यक्तीमत्वात दडलेले काहीसे मी नजरेने शोधू पाहत होते.  काही नाही. नवऱ्याने का सोडलं तुम्हाला? 
गैरसमज झालाय तुमचा. माझ्या नवऱ्याला म्हणजेच श्रीधरला मीच सोडलं. त्याने नाही. 
बेबनाव नक्की कशामुळे झाला? काहीतरी विचारणं भाग होतं म्हणून मी विचारलं.
त्याचे हुकुमशाही वागणं जे मला अजिबात पसंत नव्हते. 
घटस्फोट?
नाही. म्युचल सेपरेशन. आम्ही ठरवून एकमेकांजवळ राहत नाही.
मुलबाळ ?
सुदैवाने नाही.
एकट्याच राहता?
अर्थात. 
सासरची मंडळी, तुमचे आई-वडील वगैरे......
त्यांच्याशी माझं पटत नाही.
तुमच्या घरच्यांशीही नाही?
नाही. कारण मी घेतलेला निर्णय त्यांना मान्य नाही. त्यांना मी टिपिकल, चाकोरीबद्ध पद्धतीने संसार करणारी म्हणून अपेक्षित होते पण मी तशी नाही. 
म्हणजे नेमकं काय?
म्हणजे नवरा कसाही असला तरी हुं की चू न करणे, त्याच्यासाठी तिन्ही त्रिकाळ स्वयंपाकघरात राबणे, एखाद्या आज्ञाधारी सुनेप्रमाणे सर्व व्रतवैकल्ये, उपासतापास करणे, जे जे होईल ते ते निमुटपणे सहन करणे, अन्याय झाला तरी त्याविरुद्ध ब्र ही न काढणे इत्यादी इत्यादी. 
पण तुझ्यावर अन्याय झाला म्हणजे नक्की काय झालं ?
आमचं लग्न झाल्यानंतर माझे सर्व छंद, आवडीनिवडी बंद झाल्या. माझे गाणे बंद झाले, लायब्ररी बंद झाली, पेंटिंग बंद झाले. मित्र-मैत्रिणींना भेटणे अवघड झाले. सहली बंद झाल्या. नाटक-सिनेमे बंद. 
कारण?
संसार. आता मी संसारी स्त्री होते. नवऱ्याला खूष ठेवणे, सासरच्यांची सेवा करणे हे माझे परम कर्तव्य होते. माझ्या सगळ्या वैयक्तिक आवडीनिवडी  आमच्या संसाराच्या मूळावर येतील असे ज्याला त्याला वाटत होते. त्याचे मात्र सारे यथास्थित चालू होते.  त्याच्या कोणत्याही छंदात जराही खंड नव्हता. ऑफिस, मित्र, छंद आणि घरी आल्यानंतर हमखास दिमतीला असणारी हक्काची बायको. वेळच्या वेळी गरमागरम नाश्ता, जेवण देणारी, त्याच्या मित्रांची, नातलगांची सरबराई तत्परतेने करणारी, त्याच्या आई-वडिलांना हवं नको ते बघणारी एक अत्यंत हक्काची खास वस्तू माझ्या रूपाने त्याच्याकडे होती जी त्याला हवी तिथे मिरवता येणार होती आणि हवी तशी वापरता येणार होती.    
घरी कधी तंबोरा काढून रियाजाला बसले की याच्या हाकाट्या सुरु. हे दे आणि ते दे. रात्री बिछान्यावर लवंडल्यानंतर जरा आवडीचं पुस्तक हातात घे की याचं प्रेम नेमकं तेव्हाच उफाळून येणार. पार्ट टाईम जॉब घेतला तोही त्याला रुचेनासा झाला. एकमेकांतील कुरबुर हळूहळू वाढू लागली. कधीकधी आमच्यातले संघर्ष विकोपाला जायचे. मी त्याच्या 'रांधा वाढा आणि उष्टी काढा'  या सो कॉल्ड संस्कृतीत पूर्णपणे मिसफिट होते. म्हणून मग एक दिवस मीच त्याला सांगून टाकले,  आपली दोघांची बौद्धिक कुवत, वैचारिकता आणि समंजस वृत्ती यांत जमीन-अस्मानाचे अंतर आहे. तेव्हा आपल्या संसाराला 'तडजोड' या तकलादू आणि गोंडस नावाखाली किती दिवस झाकायचं ? आपण दोघांनी एकमेकांना जाणीवपूर्वक  सोडल्याशिवाय या संघर्षाला पूर्णविराम मिळणार नाही. यापुढे आपल्यातले नातेसंबंध संपले. जो तो आपापल्या मार्गाने जायला मोकळा आहे. 
अतिशय शांतपणे, भावनांचे अवडंबर न माजवता नीलाने तिचे मन  माझ्याकडे मोकळे केले. 
चहा घेतेस? माझ्यातला वयाचा अधिकार व आपुलकी बोलली.
आत्ता नाही. पुन्हा येईन. अशीच केव्हातरी. येते. नीला विधाते निघून गेली. खरोखरीच मला अंतर्यामी अस्वस्थ करून. माझ्या असंख्य प्रश्नांना अनुत्तरीत ठेवून. नीला विधाते नक्की कशी आहे? मी मला अगणित वेळा विचारलेला हा प्रश्न. तिच्या नवऱ्याच्या विरहाने दु:खी की स्वातंत्र्याच्या अबाधितपणामुळे सुखी? 
नीला विधाते ही एक प्रवृत्ती आहे. दुर्मिळ नसली तरी सहजी न सापडणारी. अशा कितीतरी भावी नीला विधाते आज या क्षणी जगात वावरत असतील. वैयक्तिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी धडपडत असतील. यातील काही आतल्या आत उरस्फोड करत असतील तर काही प्रकटपणे. यातील एखादीच नीला विधाते धिटाईने पुढे येईल आणि म्हणेल, 'रांधा वाढा आणि उष्टी काढा' या तुमच्या सनातन संस्कृतीत मी पूर्णपणे मिसफिट आहे. तेव्हा................    

Thursday, 2 August 2012

चौपाटी



बऱ्याच वर्षांनी एकेकाळी नेहमीच्या वाटणाऱ्या चौपाटीवर 
पाउल टाकले आणि...............
भेळेतले चुरमुरे, शेंगांची टरफले, आईस्क्रिमचे चमचे 
वाळू इतकेच पायाला चिकटले  
समुद्रातील प्रपातकारी लाटांच्या गर्जना ऐकण्यास 
कान आतुर होतात तोच ...........
घोड्यांचे खिंकाळणे, फेरीवाल्यांच्या आरोळ्या आणि 
कर्णकर्कश्य पिपाण्यांनी कानांना फितवले  
एखाद्या निवांत जागी बसावे या इच्छेने 
नजर सर्वत्र भिरभिरू लागली 
तोच कोपऱ्या कोपऱ्यातून दडलेला बीभत्स निवांतपणा 
एकदम अंगावर आला .............
समुद्रातील खाऱ्या पाण्याचा वास नाकाला स्पर्शण्याआधीच  
फिरत्या गाड्यांतून दरवळणारे आंबट-तिखट वास 
नाकातून थेट पोटात शिरू लागले .........
तशातही वाळूत क्षणभर बसण्याच्या इर्षेने 
विसावले खरी परंतु ..........
शेजारी पडलेल्या खरकट्या कागदांनी , पुढाऱ्यांच्या आश्वासनपत्रांनी  
आणि जाहिरात पत्रिकांनी त्यांची येथील बैठक पक्की केली होती  
कुठेतरी वाळूचे किल्ले सांधायचा 
अयशस्वी प्रयत्न चालला होता 
कोण नवरा-बायकोत प्रापंचिक समस्यांचा 
उहापोह चालला होता ...........
चक्रात बसलेल्या मुलांच्या गगनभेदी किंकाळ्या 
शांतता भेदून जात होत्या 
तर कुठे डास, ढेकूण, पाली, झुरळे . चे निर्दालन करणारी 
हमखास औषधे इच्छुकांच्या गराड्यातून निनादत होती  
कुठल्यातरी कोपऱ्यात, कोणत्यातरी 'अबक' नामक युनियनची 
भेळेपेक्षाही तिखट आणि शस्त्रापेक्षाही धारदार चर्चा रंगली होती 
मी मनाच्या अदृश्य कोपऱ्यात साठवलेली 'ती' चौपाटी 
आता कायमची रिती झाली...........   












आम्ही बुवा............

'आम्ही बुवा' या संस्कृतीत बसणारे, या पठडीतले माझ्या परिचयाचे काहीजण आहेत.  त्यापैकीच हे अमुक कुटुंब. 'आमच्याकडे', 'आम्ही बुवा', 'आम्ही किनई', 'आमच्या घरात' अशा आदरार्थी बहुवचनाने सुरवात करून ही माणसे आगंतुकपणे काही स्टेटमेंट्स करत असतात. घरातले कर्ते पुरुष, स्त्रिया, मुले सर्वजण मोठ्या उत्साहाने या 'आम्ही बुवा' संस्कृतीत सामील झालेले असतात.    
कधी आपली आणि ह्यांची भेटगाठ झालीच तर आपली चहाची वेळ यांच्या भलतीच अंगावर येते. आपले वेळी-अवेळी झोपणे-उठणे यांच्या पचनी पडत नाही. रात्री उशिरापर्यंत आपला टी.व्ही. चालू असल्याचा यांना मानसिक त्रास होतो. कधी चुकून आपल्या दैनंदिनीतील काही तपशील यांना कळताच ' आम्ही बुवा अमक्या वेळी हे कधीही करत नाही' किंवा 'आमच्यात अशी रीत नाही'  अशी प्रतीवाक्ये न चुकता प्रतीपक्षाकडून  येतातच!     
एकदा  मी सायंकाळी आरामात बसून छानसे पुस्तक वाचत असताना त्या 'आम्ही बुवा' कुटुंबातले गृहस्थ दत्त म्हणून हजर झाले. माझे तसे संध्याकाळच्या वेळी आरामात बसून वाचणे त्यांना खटकले असावे. काय वाहिनी स्वयंपाक झाला वाटतं? त्यांनी न राहवून विचारलं. छे हो. अजून सुरवात कुठे केली आहे स्वयंपाकाला? माझे यजमान साडेनऊ शिवाय जेवत नाहीत . तीच वेळ मुलांच्या जेवणाची. मग करायचं काय लवकर जेवण करून? मी उत्तरले. बसा ना. चहा घ्या थोडा. मी पटकन करून आणते. आत्ता? या वेळी? एखादं महान, घोर पातक झाल्यासारखं ते गृहस्थ ओरडले. आमच्याकडे चहा फक्त एकदा. दुपारी तीन वाजता.  त्यानंतर आजतागायत दुसऱ्या वेळेस चहा घेतल्याचे मला स्मरत नाही. भलत्यासलत्या वेळेस चहा घेणे प्रकृतीला चांगले नसते  बरं का वाहिनी! भूक मरते त्यामुळे शिवाय रात्री झोपही चांगली लागत नाही. आमच्या घरी सात वाजता आम्ही जेवतो. आमच्याकडे पहिल्यापासून हीच पद्धत आहे . त्यांनी अकारण स्वत:च्या मतांची पिंक टाकली. ते वृद्ध गृहस्थ बाटलीभर उपदेशाचा रतीब घालून आणि  वाचायला कसलेसे पुस्तक देऊन गेले.     
मला हा सगळाच प्रकार हास्यास्पद वाटला. आम्ही असं करतो , आम्ही तसं करतो अशी विधाने येता जाता  करून ही माणसे  नक्की काय साध्य करतात कोण जाणे?  प्रत्येकाच्या घरातली रीतभात वेगळी, विचारांची बैठक वेगळी, आचरणाचे नियम वेगळे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रत्येकाचा आयुष्य जगण्याचा दृष्टीकोन वेगळा ! तो चांगला किंवा वाईट हे ठरवण्याचा अधिकार इतरांचा नसतो. आपली जीवनपद्धती ज्याने त्याने आखावी, अमलात आणावी त्यासाठी अमुक एक निकष लावण्याची गरजच काय? पण नाही. या 'आम्ही बुवा' प्रकृतीआड लपलेली विकृती  दुसऱ्यांना जाणूनबुजून दाखवण्याचा यांना कोण अट्टाहास असतो. यांच्या संपूर्ण कुटुंबालाच या 'आम्ही बुवा' ची विलक्षण बाधा झालेली असते.  या बाधेचा उपद्रव आमच्यासारख्या अनेकांना अनेकदा होत असतो. तुम्ही अमुक अमुक वेळी नक्की काय करता हे बघायला कोण रिकामे आहे? जो तो आपणहून मांडलेल्या जीवनसिद्धांतावर आयुष्याची गाडी चालवतो, काही हाकतात, काही रेटतात. पण दुसऱ्यांनी अंगिकारलेल्या जीवनपद्धतीचे निकष लावून स्वत:चे संसार सुकर होत नसतात हे यांना कोण आणि कसे समजावणार?   
एक दिवस मी काही कामानिमित्त दुपारी यांच्याकडे गेले. दार त्रासिक चेहऱ्याने उघडले गेले. घरात अंधार होता. या कुटुंबातील सदस्यांची झोपमोड करण्याचे पाप मी केले होते. आमची ही झोपण्याची वेळ आहे. हे स्वागताचे वाक्य ऐकून मी माघारी फिरले. या घरातील नव्या सुनेने विळीऐवजी हातात सुरी घेतली तेव्हा 'आपल्याकडे सुरीने चिरण्याची पद्धत नाही, विळीच वापर' अशी सासूने शिकवण व समाज दिल्यापासून सून नम्रतेने विळी वापरू लागली आणि सुरीपेक्षा विळीच कशी चांगली हे तिच्या  मैत्रीणीना 'आम्ही बुवा' संस्कृतीतून पटवून देऊ लागली.         
आमच्या वरण-भात संस्कृतीवर हे कुटुंब असेच विलक्षण नाराज. आमच्याकडे वरण कुणालाच आवडत नाही. वाटलेल्या आमट्या, भजी, तळलेली कापं  यांच्याशिवाय आमचे पान हलत नाही. मस्याहाराचे आम्ही भोक्ते. शाकाहार कसा काय तुम्हाला आवडतो बुवा अशा अर्थाचा प्रश्न सदैव या 'आम्ही बुवा ' कुटुंबाच्या डोळ्यांत. म्हणजे वरण-भात खाऊन तृप्तीने ढेकर देणारे आम्ही आणि सगळे साग्रसंगीत जेवूनही यांच्या घशात कायम ढेकर अडकलेला. ज्याला जे रुचेल, पचेल तेच तो खातो आणि मानवेल तसेच वागतो हे यांना मान्य नाही.      सुनेने कष्टाने शिजवलेले अन्न बरे झाले नाही म्हणून कटकट करत खाण्याची यांची पद्धत. रात्री नऊ नंतर विरंगुळा म्हणून श्रमपरिहार म्हणून लावलेला टी.व्ही. शिस्त या बोजड नावाखाली बंद करायची यांची पद्धत. स्वत:च्या जीवनमूल्यांचा उदोउदो करून त्यापायी इतरांचे जीवनरस शोषून घेण्याची यांची पद्धत. आपणच नियम लागू करायचे आणि इतरांनी ते कसोशीने पाळण्याचा आग्रह धरायचा. कोणत्याही परिस्थितीत 'आम्ही बुवा' ही पठडी सोडायची नाही. इतरांचे आयुष्य आनंदी नाही असा उगीचच पोकळ भ्रम निर्माण करून  त्यात आपल्या आनंदाची किरणे शोधायची .            
एका रविवारी सकाळी मी सोफ्यावर बसून चहाचा आनंद लुटत होते. समोर टी.व्ही.चालू होता. दारावरची बेल वाजली. दारात 'आम्ही बुवा' होते. माझ्या अवताराकडे एक दृष्टीक्षेप टाकत त्यांनी विचारले, साहेब उठले नाहीत का ? आमच्याकडे रविवारी लवकर उठण्याची पद्धत नाही. माझ्या या उत्तराने सणसणीत चपराक बसल्यासारखे ते वृद्ध गृहस्थ चपापले. 'आम्ही बुवा'......... माझं पुढलं वाक्य पूर्ण होईपर्यंत त्या सदगृहस्थांनी तेथून केव्हाच पोबारा केला होता.