तसा लग्नाचा मौसम बारमाही असतो. रस्ता,लोकल,बस,रिक्षा अशा सगळ्या ठिकाणी नटून -थटून चाललेल्या रमण्या दिसतात. लग्नाचे छोटे-मोठे हॉल तीनशे पासष्ट दिवस बुक्ड असतात. इमारतींना बाहेरून केलेली रोषणाई, सजविलेल्या गाड्या , फटाक्यांच्या माळा अशा अनेक रूपांनी लग्न आपल्या समोर उभं ठाकत असतं. लग्न ठरतं आणि मग खरेद्यांना नुसता उत येतो. केळवणांचा घाट वधू-वराच्या कंठाशी अन्न येईस्तोवर घातला जातो. आधी तो साखरपुडा नावाचा लग्नाचा ट्रेलर होतो. मग प्रत्यक्ष लग्न हा चलतचित्रपट सुरु होतो. ब्युटी पार्लरे ओसंडून वाहू लागतात. जो तो केशभूषा-वेशभूषा या चिंतनात मग्न होतो. बुफेचा बहुढंगी मेनू ठरविला जातो. वधू-वरांची सिंहासने, त्यामागची सजावट, भटजी नावाची संस्था, वातानुकुलीत हॉल, हळदी-कुंकू-अत्तर-पेढे वाटणाऱ्या गौरांगिनी, थंड पेये, स्टार्टर्स वितरीत करणारे, खास पाहुण्यांच्या देखभालीसाठी काही खास माणसे असा सगळा जामानिमा असतो.
अभूतपूर्व असा लग्नाचा दिवस उजाडतो. यजमानांचे घर नुसते रंगीबेरंगी पिशव्या आणि खोक्यांनी भरून गेलेले असते. एकेकाच्या आंघोळी आटोपता आटोपता घड्याळाचा काटा भराभरा पुढे सरकत असतो. यानंतरचा वेळ साजश्रुंगारावर खर्च होणार असतो. या पुढील आपत्तीला घाबरत एखादी म्हातारी आजीबाई आतून अगं, लवकर आटपा, निघायची वेळ झाली असे ओरडत राहते पण तिच्या ओरडण्याला कोणीही फारश्या गांभीर्याने घेतेलेले नसते. सगळ्यांचे सगळे आटोपेपर्यंत मुहूर्ताची वेळ टळते की काय या विचाराने घरातील ज्येष्ठ घामाघूम होतात. पण घरातील भगिनीकृपेने हॉलकडे कूच करण्याचा हिरवा कंदील मिळतो.
हॉलमध्ये साड्यांवर मारलेल्या परफ्युमचा , एसीवर फवारलेल्या सुगंधाचा,गजरयांचा,फुलांचा,नाश्ता-जेवणाचा असा संमिश्र दरवळ पसरलेला असतो. काही पाहुणे अगोदरच आलेले असतात. त्यांनी यजमानांच्या आगमनाची वाट न पाहताच नाश्याच्या टेबलाकडे धाव घेतलेली असते. थंड पेयांची फिरवाफिरवीही सुरु झालेली असते. दोन्ही पक्षाकडील लोकांची लगबग सुरु झालेली असते. अनुभवी माणसे त्यांना सूचना देत आपापला भाव वधारून घेत असतात. फोटोग्राफर क्लिकच्या प्रतीक्षेत असतात. काही माफक विधी पार पडल्यानंतर स्टेजवरील दोन भटजी एकदम उठून आंतरपाट धरतात. जो तो मुठीत लपविलेल्या रंगीत अक्षताची उधळण वधू-वरांच्या डोक्यावर करण्यास पुढे सरसावतो. करवल्या वधू-वरांच्या मागे आपल्या भविष्याचे असेच काहीसे स्वप्न पाहत अमाप उत्साहाने उभ्या राहतात. वधूची आई स्टेजवरून काही काळापुरती नाहीशी होते. भटजी मंगलाष्टके माईकवरून रेकतात. काही उत्साही मंडळी भटजी बरोबर त्यांचेही कानाला झिणझिण्या आणणारे गानकौशल्य दाखवतात. एकदाचे लग्न लागते. सी.डी वर ढोलताशे वाजतात. अक्षता टाकून टाकून दमलेली मंडळी एकदाची खुर्चीवर विसावतात. एव्हाना खुर्च्यांच्या मागे बुफेच्या टेबलावर आकर्षक भांड्यांतून जेवणाची मांडणी सुरु झालेली असते. जेवणाच्या वासाने पोटात भूक खवळलेली असते. पेढे खाऊन झाल्यावर आता काय करायचे हा प्रश्न बहुतेकांना पडलेला असतो. तिथे स्टेजवर वधू-वराकडील मंडळी विवाहोत्तर विधी उरकण्यात बिझी असतात. तेव्हा या पार्श्वभूमीवर लोकांच्या माना थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने पाठी वळून जेवणाचा अंदाज घेत असतात. काहींना जांभया येत असतात. काहीजण कंटाळलेल्या चेहऱ्याने कधी एकदाचा जेवतो आणि घरी जाऊन पसरतो असे स्वगत बोलत असतात. काही वेळासाठी वधू-वर स्टेजवरून दडी मारून त्यांच्या त्यांच्या खोल्यांमध्ये अंतर्धान पावतात. यजमान पाहुण्यांना आता जेऊन घ्यायला हरकत नाही असे सांगतात आणि बुफेच्या टेबलांवर अचानक विलक्षण कल्ला होतो. लोक जेवणाच्या ताटांच्या दिशेने पी.टी.उषेपेक्षाही जोरात धावतात. आपला सामाजिक,आर्थिक स्तर विसरण्याची ही एक सर्वमान्य जागा असते. अनेक पदार्थांची रेलचेल असते. आपल्या बिचाऱ्या एकुलत्या एका पोटावर ताण येतोय का नाही ह्याकडे कानाडोळा करत समोरचे फुकटात मिळालेले अन्न ज्याला त्याला हापसायचे असते. त्यात आहेराची भानगड नसेल तर सोन्याहून पिवळे! मुख्य जेवणानंतर आईस्क्रीम, तांबुल सेवन होते आणि एक लग्न सबंध पचविल्याचे समाधान पाहुण्यांना मिळते.
आता एवढे भरपेट जेवण झाल्यानंतर वधू-वरांना आहेर आणि आशीर्वाद देण्यासाठी भल्यामोठ्या रांगेत उभं राहायचं अनेकांच्या जीवावर आणि डोळ्यांवर आलेलं असतं. त्यात पुन्हा स्टेजवर भेटायला जाणाऱ्या प्रत्येक ग्रुपचा फोटो! त्यात प्रत्येकाच्या आकारमानाप्रमाणे काहीजण फोटोत येणार नाहीत म्हणून त्यांचे वेगळे फोटो ! त्यामुळे उपाशीपोटी,थकलेले वधू-वर , झोपाळलेले पाहुणे आणि सकाळपासून फोटो काढून काढून थकलेला फोटोग्राफर या रसायनातून फोटो निघतात.
अशी लग्ने बारमाही चालू राहतात. केशभूषा-वेशाभूषांना अंत नसतो. वधूवरांना आशीर्वाद आणि आहेर देण्यात रस असो वा नसो, अनिर्बंध जेवण्याचा हक्क आम्ही असाच बजावीत राहतो.
No comments:
Post a Comment