Thursday, 8 September 2011

दिवसाची सुरवात .............

सकाळच्या निवांत वेळी हातात गरमागरम वाफाळता चहा आणि पुढ्यात चहाइतकच ताजं वर्तमानपत्र हि सामान्य माणसाची सुखाची संकल्पना आता कालबाह्य झाली आहे असे म्हणायला हरकत नसावी. अशासाठी की आजच्या धकाधकीच्या जीवनात निवांत  वेळ ही गोष्ट इतिहासजमा झाली आहे . शिवाय सकाळी हातात येणारे वर्तमानपत्र हे आनंदाच्या नव्हे तर दु:खाच्या पुरवण्या घेऊन येते. 
 सकाळी हातातली कामं बाजूला टाकून वर्तमानपत्र उघडावं आणि निराश व्हावं असा हल्ली सतत अनुभव येत असतो. सत्तेसाठी चाललेल्या लांड्या-लबाड्या , राजकीय डावपेच , विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल , सर्व जीवनावश्यक वस्तूंचे चढते भाव, महागाईला कंटाळून संपविलेले आयुष्य, कर्जापायी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कौटुंबिक कलहातून होणाऱ्या हत्या , वाहनांचे भीषण अपघात व त्यात ठार झालेली मुले-माणसे, नापास झाल्याने आलेल्या वैफल्यातून मृत्यूला कवटाळणारी निष्पाप मुले, सामुहिक बलात्कारांचा रतीब, बॉम्बस्फोटात लुळी-पांगळी झालेली माणसे , सामान्य माणसांच्या डोक्यावरती घातपाताच्या टांगत्या तलवारी, पैशासाठी चोऱ्या-दरोडे, रस्त्यावर राहणाऱ्यांना निर्दयपणे आपल्या गाडीखाली चिरडणारे धनदांडगे, अंमली पदार्थांची तस्करी, रेव्ह पार्ट्यांमध्ये केलेला हैदोस, खच्चून भरलेल्या लोकलमधून पडून मरणारी माणसे, नक्षलवाद्यांच्या कारस्थानांना बळी पडणारे पोलीस व त्यांची उध्वस्त कुटुंबे, अतिरेकी पावसाने वाहून नेलेली गरिबांची घरे आणि त्यांची स्वप्ने, भूकंपाने जमीनदोस्त झालेल्या इमारती , ठिकठिकाणी दरडी कोसळल्याने वाहतुकीचा उडालेला बोजवारा, डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे पेशंट दगावण्याचे वाढलेले प्रमाण, पैशांच्या हव्यासापायी स्वत:ची नीती-चारित्र्य -बुद्धिमत्ता विकणारी माणसे, लोकांचे पैसे घेऊन पोबारा करणारे इस्टेट-एजंट , बेकारी,उपासमार,दारिद्र्य, तुंबलेली गटारे-नाले, प्रेमाला प्रतिसाद न मिळाल्याने संबंधित मुलीची केलेली पाशवी हत्त्या , एकट्या-दुकट्या बाईच्या घरी शिरून दागदागिने आणि पैशांच्या लोभापायी तिचा केलेला विकृत  खून, दुसऱ्याच्या बळकावलेल्या जमिनी, स्वच्छतेचे दुर्भिक्ष्य व त्यापायी फैलावणारी रोगराई,.कोर्टात वर्षानुवर्षे पडून असलेल्या केसेस आणि त्यापायी हतबल झालेले अशील, करिअररिस्ट आई-वडिलांच्या प्रेमापासून  वंचित राहिल्यामुळे एकलकोंड्या मुलांच्या वाढलेल्या मानसिक समस्या ,स्त्री-भ्रूणहत्त्या , बहुतांश स्टेशनवरील अरुंद पुलावरून रोज ये-जा करताना लाखो  घुसमटलेले-कावलेले जीव................................
या  सगळ्या बातम्यांमध्ये आनंददायी काय असते? बातम्या वाचायच्या ,पेपर हातावेगळा करायचा आणि स्वयंपाकघरात शिरून चुलीवरील आधणातून निघणाऱ्या वाफेसारखा एक कढत सुस्कारा सोडायचा. 
पण एखाद्या सणावाराला गणेशाची किंवा महिषासुरमर्दिनीची छबी मुखपृष्ठावर दिसते आणि नेहमीच निराश होणाऱ्या मनावर एक आशेचा प्रकाशदायी तरंग उमटतो. यापुढे तरी येणाऱ्या दिवसांची सुरवात चांगली होऊ दे अशी मी मनोमन प्रार्थना करते.

No comments:

Post a Comment