Monday, 3 October 2011

रिक्षा येती दारा,तोचि दिवाळी-दसरा


एक वेळ सूर्य पश्चिमेला उगवेल, एक वेळ मुंगी मेरुपर्वत गिळेल, एक वेळ राखी सावंत शालीन वेशभूषेत दिसेल, एक वेळ गायक हरिहरन वेणी न घालता पुरुषी केशभूषा करेल परंतु रिक्षावाले आपल्याला हवी त्या वेळेस रिकामी रिक्षा आपल्या पुढ्यात थांबवतील याची अजिबात शाश्वती देता येत नाही. 
आपल्या नाकासमोरून रिक्कामी रिक्षा भरधाव घेऊन जाणे हा यांचा जन्मसिद्ध हक्क असल्यागत हे वागत असतात. संध्याकाळी मुंबईच्या लोकलमधून शरीराचं आणि डोक्याचं भजं करून आलेले लोक रिक्षाच्या शोधार्थ सैरावैरा पळत असतात. चुकूनमाकून एखादी रिक्षा समोर येते आणि आपण अधाशासारखे आतमध्ये उडी मारून बसतो. रिक्षावाला अत्यंत उर्मटपणे आपल्याला कुठे जायचे आहे असे विचारतो. आपण वृंदावन सोसायटी किंवा घोडबंदर रोड किंवा पोखरण किंवा आणखी काही तरी असे सांगून त्याच्या प्रतिक्रियेसाठी श्वास रोखून धरत पाहतो. आता त्याला त्याची रिक्षा लोकमान्य नगर, इंदिरा नगर,वागळे इस्टेट  या परिसरातच हाकायची असते. आपल्याला निमुटपणे रिक्षातून पायउतार व्हावे लागते. आपण ज्याठिकाणी राहत असतो तोच मुळी आपला अपराध असतो. आपल्याला बसच्या जीवघेण्या रांगेत थांबायचे नसते हा आपला दुसरा अपराध असतो. आपल्या का या प्रश्नार्थी शब्दाचे उत्तर द्यायला कोणताही रिक्षावाला बांधील नसतो हा आपला तिसरा अपराध असतो. आपल्याला आपल्या घरापर्यन्तचे  चार-पाच किलोमीटर अंतर पायी तुडवता येत नाही हा सुध्धा आपलाच अपराध असतो. या अशा साऱ्या अपराधांची शिक्षा आपल्याला रिक्षावाला नामक परमेश्वर देतच असतो. 
पावसाळ्यात रानातल गवत कसं माजत त्याप्रमाणे या रिक्षावाल्यांची माजोरडी वृत्ती पण फोफावते. मुसळधार पावसामुळे समोरचं सगळं अस्पष्ट दिसत असतं. रस्त्यावरची उघडी गटारे, खड्डे, उखडलेली जमीन, चिखल-राडा चुकवता चुकवता आपल्या आधीच नाकी नऊ आलेले असतात. समोरून येणाऱ्या रिक्षात कोणी बसलंय की नाही हे सुध्धा नीट दिसत नसते. आपण अंदाजाने हात हलवीत असतो आणि पदोपदी निराश होत असतो. एखादी रिक्षा आपलं भाग्याचं दार किलकिलं करून थांबल्यासारखी वाटते. आपण उत्साहाने पुढे सरसावतो. आपण पत्ता सांगताच वायुवेगाने रिक्षा भर पावसात अदृश्य  होते.  अपमानित,असहाय,हतबल,गलितगात्र झालेले आपण रिक्षावाल्याला मनोमन शिव्यांची लाखोली वाहण्या पलीकडे काहीही करू शकत नाही. पदरी गाडी बाळगणाऱ्या चाकरमान्यांचा आपण विलक्षण हेवा करायला लागतो. सणासुदीच्या दिवसातही फुलांप्रमाणे रिक्षावाल्यांचे भावही भलतेच वधारलेले असतात. आपल्याला ठाण्याच्या अंतर्भागात नक्की कुठे जायचं आहे या गोष्टीवर आपलं नशीब अवलंबून असतं. ती जागा, ते स्थळ जर रिक्षावाल्याला पसंत असेल तरच आपण तिथे पोहोचू शकतो. रिक्षावाल्याच्या मर्जीशिवाय आपल्याला प्रवासाचं दान पडू शकत नाही. काही वेळेस तर आपल्याला कुठे जायचं आहे हे टेलीपथीने  रिक्षावाल्याला कळलेलं असतं म्हणूनच आपण त्याला पत्ता सांगायच्या आधीच ती रिक्षा आपल्यासमोरून नाहीशी होते. आपण मात्र आपल्या नशिबाचा खरा सूत्रधार कोण या न मिळणाऱ्या प्रश्नावर माथेफोड करत राहतो.   
रिक्षावाल्यांचे सुसाट धावणारे मीटर ही एक वेगळीच आपत्ती असते. आपण रिक्षात बसलो की आपले डोळे मीटरला गोंद लावल्यासारखे चिकटतात. मीटर भराभरा बदलतो तसा आपल्या चेहऱ्याचा रंगही पालटायला लागतो. रिक्षावाला कसलं तरी गाणं गुणगुणत असतो आणि त्याची गानसाधना आपण भंग करतो. आपका मीटर फास्ट है, हे वाक्य आवाजातील समतोल साधत आपण उच्चारायचा प्रयत्न करतो. बैठना है तो बैठो नही तो उतर जाव हा त्याचा निगरगट्टपणाचा डोस आपण रिचवू शकलो तर आपले तारू इच्छित किनाऱ्याला लागू शकते अन्यथा आपल्या रागाला रस्त्याचा आधार घ्यावा लागतो. अशावेळी राग-क्रोध-संताप-चीड या रिपुंवर विजय मिळवणारे आपण एखाद्या संतासारखे भासू लागतो.  
तात्पर्य,लोकांचा  भर रस्त्यात धडधडीत अपमान करायचा असेल तर रिक्षा चालवायचे प्रशिक्षण घ्यायला हवे. 

No comments:

Post a Comment