Monday, 13 February 2012

का रे भुललासी वरलिया रंगा?

एखाद्याने चेहऱ्याला वरून मेक-अप फासला म्हणून काही तो अभिनयसम्राट  होऊ शकत नाही. तंबोरयाची पोझ घेऊन बसलेला माणूस जोपर्यंत तोंड उघडत नाही तोपर्यंत कदाचित मी महान गायक आहे असा आभास निर्माण करण्यात यशस्वी होऊ शकतो. जातिवंत चित्रकाराची भाषा रंगाचा कुंचला आणि canvas आपापसात बोलके झाल्यावरच कळू शकते. वाघाचे कातडे पांघरले म्हणून वाघाची शूरता अंगी बाणता येत नाही. धनराशीत लोळणारयाला मखमली पलंगावर पडून झोपेचे सोंग वठवता येऊ शकते पण निद्रादेवीचे आणि त्याचे नाते घट्ट असेलच असे सांगता येऊ शकत नाही. बर्फीवरील चांदीचा वर्ख बघून बर्फीचा दर्जा ठरवता येत नाही. गुलाबाची कृत्रिम फुले घरातील फुलदाणी नक्की सजवू शकतात परंतु मनातील फुलदाणीला भावणारा सुवास निर्माण करू शकत नाहीत.
आजकाल माणसे एखाद्या वस्तूच्या अथवा व्यक्तीच्या बाह्यरुपावर चटकन भाळताना दिसतात. एखाद्याच्या रूपावरून, आर्थिक कुवतीवरून, सामाजिक प्रतिष्ठेवरून त्याचे मूल्यमापन केले जाते जे नेहमीच अचूक असू शकत नाही. व्यक्तीची आर्थिक क्षमता ही त्या व्यक्तीची बौद्धिक, वैचारिक पातळी मोजण्याची फुटपट्टी असू शकत नाही. फुगा जोपर्यंत फुगलेला असतो तोपर्यंतच तो आकर्षक वाटतो कारण त्याच्यातील आकर्षकता ही फक्त बाह्यरूपाने फुगण्यातच दृश्यमान होत असते. दही किती घट्ट लागले आहे हे समजण्यासाठी आपल्याला बरणीचे बंद झाकण उघडून बघायचे कष्ट घ्यावेच लागतात. वरकरणी सुंदर असलेली एखादी वास्तू आतून भकास,उदास, उजाड असू शकते. बाहेरून आधुनिक दिसणाऱ्या फ्रीजमधील थंड पाण्यापेक्षा बाहेरून ओबडधोबड दिसणाऱ्या माठातील पाणी शरीराला जास्त उपकारक ठरू शकते. आकर्षक वेष्टनात गुंडाळलेली एखादी वस्तू कदाचित शोभिवंत असू शकेल पण उपयोगी असेलच असे नाही. 
पुलंनी आपल्या एका पुस्तकात वसंतराव देशपांडे यांच्याविषयी लिहिले आहे की वसंताचे गायक म्हणून खरे सामर्थ्य दोन तंबोऱ्यांच्यामध्ये तो बसल्यानंतरच जाणवायचे. त्यावेळी एखादा राग आळवताना वसंता कुणीतरी वेगळाच होऊन जायचा. त्याची ती मूर्ती देव्हाऱ्यातील देवासारखी पूज्य वाटायची. रात्री मैफिल गाजवून सकाळी जेव्हा वसंता त्याच्या सायकलवर टांग मारून कारकुनी करायला निघायचा तेव्हा वाटायचे की काल जो गायला तो हाच होता का?  ज्या इमाने-इतबारे तो गायला त्याच इमाने-इतबारे त्याने नोकरीही केली. मी कोणीतरी मोठ्ठा गायक अशा भ्रमात तो कधी वावरला नाही आणि मी ऑफिसमध्ये जाऊन कारकुनी करतो ह्या जाणीवेने तो कधी शरमिंदा झाला नाही. तो आपले प्रत्येक काम सर्वस्व ओतून करायचा. श्रेष्ठता-कनिष्ठता या वर्गीकरणाला त्याच्या मनात कधी स्थान मिळाले नाही आणि म्हणूनच त्याच्यातील माणुसकीचे सत्व त्याला एक दर्जा बहाल करून गेले जो आमच्यातील मैत्रीचा एक दुवा होता.  
एखादी व्यक्ती सकृतदर्शनी  कशी दिसते, कशी भासते यावर अंदाज बांधणारे बहुतांश असतात. गरीब-श्रीमंत, चांगली-वाईट, उच्च-नीच अशी सगळी नामाभिधाने लावण्यासाठी सोपी असतात. त्यासाठी माणसांना विशेष कष्ट पडत नाहीत पण एखाद्याच्या अंतरंगात सुहृद होऊन डोकावणे हे सहजसोपे नसते. त्यासाठी लागणारा निखळ मैत्रीचा हात हा मनात कोणत्याही वर्गवाऱ्या कोणतीही किल्मिषे, कोणतेही पूर्वग्रह न ठेवता पुढे करावा लागतो.  विहिरीचा तळ शोधायचा असेल तर काठावर उभे राहून चालत नाही त्यासाठी खोल पाण्यात निधडेपणाने उडी घ्यावी लागते.  
आकाशात फुललेलं इंद्रधनुष्य सहज पाहता येतं पण माणसाच्या मनात फुललेलं इंद्रधनुष्य पाहायला प्रगल्भ दृष्टी लागते जी ह्या लौकिक गोष्टींच्या पलीकडील असते. देवाच्या मूर्तीला सोन्या-चांदीने मढविणारे पुष्कळ असतात पण मनातील भक्तीभावाचा अभिषेक करणारे क्वचितच सापडतात. कोणताही देव हा पैसे किंवा अलंकार याचा भुकेलेला नसून तो फक्त भावाचा भुकेलेला असतो हे समजण्यासाठी संत-साहित्य वाचायचे कष्ट माणसाला घ्यावे लागतात. जात-पात,वर्गवारी,उच्च-नीचता,आर्थिक भेदाभेद यांपलीकडे एखाद्याला समजून घेण्याची मानसिकता अभावानेच आढळते.  
माणसाकडे असलेली घर,बंगला,गाडी,ऐवज,स्थावर जंगम ही भौतिक सुखे पाहून दिपणारेच अधिक असतात. परंपरागत हक्काने आलेले अथवा माणसाने कमावलेले हे धन माणसाला वरपांगी ऐश्वर्य बहाल करू शकते पण मनाने ऐश्वर्यसंपन्न  असणारी माणसे ही येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरक ठरतात. पूज्य बाबा आमटे, मदर तेरेसा यांसारख्या विभूती जेव्हा या पृथ्वीतलावर जन्म घेतात तेव्हा त्यांच्या ऐश्वर्यसंपन्न विचारांमुळे, आचारांमुळे अनेकांना संजीवनी मिळते, त्यांच्या जगण्याला अर्थ प्राप्त होतो.  
आज माणूस दोन हात आणि दोन पायांनी जगातील सारी भौतिक सुखे ओरबाडू पाहतो आहे. पैशांनी माणसे विकत घेण्याची किमया त्याला साधली आहे. लोकांना आपल्यापुढे नमविण्याचे कसब त्याला बऱ्यापैकी अवगत झाले आहे. अनेक तात्कालिक आणि नाशवंत गोष्टींच्या आधारे गगनाला गवसणी घालण्यासाठी त्याचे आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. आपल्या मूल स्वरूपावर त्याने अहंमन्यतेची, व्यापारी वृत्तीची पुटे चढवली आहेत आणि आपल्या अंतर्यामी वसत असलेल्या त्या ईशस्वरूपाचा त्याला पूर्णत: विसर पडत चालला आहे.  
एका गावात असलेल्या देवळात महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांना दुग्धाभिषेक करण्यासाठी अनेक धनिकांची चढाओढ  लागली होती. सोन्या-चांदीच्या मोठ्या लोट्यांतून हे धनिक गाभाऱ्यातील पिंडीवर अभिषेक करत होते पण काही केल्या गाभारा भरत नव्हता. या रांगेमध्ये असलेल्या गोर-गरिबांकडे हे श्रीमंत अतिशय तुच्छतेने बघत होते. एक जख्खड म्हातारी या रांगेत कशीबशी उभी होती. तिच्याकडे एका फुटक्या पेल्यात जेमतेम दूध  होते. बऱ्याच वेळानंतर तिची पाळी आली. तिने देवाला भक्तिभावाने हात जोडले आणि म्हणाली,' घरी अन्नान्नदशा आहे. एकुलत्या एका गायीने दिलेल थोडं दूध उपाशी असलेल्या नातवाला पाजलं आणि उरलंसुरलं दूध घेऊन तुझ्याकडे आले आहे पण रागावू नकोस. आमच्यावर कृपा कर.' असे म्हणून तिने ते दूध पिंडीवर ओतले आणि अहो आश्चर्यम! गाभारा पूर्ण भरला. हा चमत्कार पाहून लोक तिच्या पायी पडू लागले.  राजाकरवी तिचा सन्मान केला गेला आणि या कुटुंबाच्या चरितार्थाची काळजी मिटली. 
या खुलभर दुधाच्या कहाणीचा आज लोकांना सोयीस्कररित्या विसर पडला आहे याचे वैषम्य वाटते.

Saturday, 11 February 2012

Just be yourself

I remember, a few days ago when actress Vidya Balan was being interviewed. Admiring her talent, the interviewer commented that there is nobody like Vidya Balan. Vidya instantly replied, 'but why anybody should be like Vidya Balan'? Nobody on the earth is just like you ; so be yourself.' I think this is a great message.
It is very easy to get influenced by others but it is difficult to get influenced by our inner thoughts. Most of the people behave in the way the others behave.We often get influenced by our near & dear ones, people surrounding us, superiors & celebrities we adore. To get impressed by a heroic personality is not at all an offense but to frame ourselves in others lifestyle is not worth appreciating.
Just because some salesman knocks at our door, are we going to buy the product just to increase his sales? Certainly not. Only when we are fully convinced about the utility of that product we shall think of buying it. A person smokes & drinks because his friends do so can not justify his vice. Just by aping others you are putting your body at a high risk. If your father is a doctor, it is not necessary for you to follow his footsteps unless & until your inner voice allows you to proceed on the same path. 
The way we think others can't. Our inspirations are different from others. Our liking & disliking differentiate ourselves from others. Some students have a great inclination towards Maths & Science while some students develop hatred towards these subjects. Some are much better in Social studies than others. You can't measure everyone's caliber using the same scale. Some are very sharp at musical notes while some can sketch with more fluency. Some are admirably good at kitchen work while some are efficient in handling external affairs. Animals behave through their instincts and we people fail to listen to our instincts. The natural force that exists inside us gets hardly any motivation. 
Because of peer, parental and/or social pressure many youngsters opt for demanding professional courses. Sometimes the calculations go wrong & frustration takes over you. Many of us do not take any efforts to explore ourselves. We have a treasure of things inside us but we always do the things at superficial level. To reach a desired goal it is essential for us to touch our instincts. 
The moss gathered over water is the external tinge & not the real colour of water. If we wish to see the real colour of water we should take efforts to dive deep. We always give undue importance to shallow things which give our lives a fake colour. 
Some of us follow certain customs, traditions just because others follow them. Most of the times it seems as if we have deliberately blindfolded our eyes.  Nobody wants to understand the exact reason for performing or following a particular act. We are just concerned with the outcome hoping that it works out smoothly. 
As a human being we have a privilege to think in a better way. To shape our lives in the way we wish. To design our lives for our betterment. To raise our lives in such a way that every aspect of our life grows brighter & brighter. To make our lives more meaningful. To accomplish the unfulfilled desires. To nourish & enrich our soul. To satisfy our existence on earth. To give our-self  the feeling of contentment. 
Your life is only & solely yours. Your existence on the earth is a reward.  Try to respect your life & put some efforts to uplift yourselves. Please do not embellish your spirit with artificial things that will snatch away from you the whole purpose of life. 


Thursday, 9 February 2012

थ्री चिअर्स फॉर युसुफ and प्रिया-'valentine' डे च्या निमित्ताने

युसुफ खान आणि प्रिया गोडबोले. दोघांची ओळख ऑफिसच्या निमित्ताने व्ही.टीला जाताना झालेली. ठराविक लोकल पकडताना दोघांची नजरानजर व्हायची. तो जेन्ट्स मध्ये आणि ती लेडीजच्या डब्यात! हळूहळू एकमेकांकडे बघताना चेहऱ्यावर हास्य दिसू लागले. तिची नोकरी नवीन होती. एकदा मोबाईलवर बोलत असताना ती चालत चालत platformच्या टोकाशी गेली. समोरून भरधाव लोकल येत होती. आणि क्षणार्धात ती खसकन मागे ओढली गेली. युसुफने जीवाच्या आकांताने तिला ओढले होते. परत असे करशील तर तुझा मोबाईल तुला परत मिळणार नाही अशी प्रेमाची धमकीही तिला मिळाली. या घटनेनंतर तिच्या मनात युसुफविषयी ओढ निर्माण झाली आणि त्याची परिणती दोघांच्या एकमेकांवरील प्रेमात झाली. 
आता ऑफिस व्यतिरिक्तही दोघे एकमेकांना भेटू लागले. एकमेकांना जाणून घ्यायचा प्रयत्न करू लागले. आपले प्रेम धर्मबाह्य असल्याने आपल्याला घरच्यांकडून संमती मिळणार नाही हे दोघे समजून होते. युसुफ एका चांगल्या कंपनीत वरच्या हुद्द्यावर नोकरीला होता. घरून परवानगी मिळणारच नव्हती त्यामुळे लग्न झाल्यानंतर राहायचे कुठे हा त्यांच्यापुढील यक्षप्रश्न होता. अखेर युसुफने त्याच्या अगदी जवळच्या मित्रांशी याबाबत सल्ला-मसलत केली आणि गृहकर्ज काढून नवे घर घेण्याचे निश्चित केले. नवे घर होईपर्यंत त्यांनी कटाक्षाने त्यांच्या प्रेमाची जाहीर वाच्यता करायचे टाळले. जानेवारी महिन्यात घराचा ताबा मिळाला. आवश्यक ते सुशोभीकरण झाले आणि १४ फेब्रुवारीला कोर्टात जाऊन विवाह नोंदणी करण्याचे ठरले. आता घरी सांगणे भागच होते.
अपेक्षेप्रमाणेच दोघांच्याही घरून या लग्नाला कडवा विरोध झाला. ती कोकणस्थ ब्राह्मण तर तो उच्चभ्रू मुसलमान. नातेवाईक, शेजारीपाजारी,समाज काय म्हणेल या भीतीने आणि धर्मांतराच्या संभाव्य धोक्यामुळे तिच्या घरच्यांनी तिला या लग्नापासून परावृत्त करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. त्याच्या आईने तर हिंदू सून मी माझ्या घरात येऊ देणार नाही असे निक्षून सांगितले. पण दोघेही आपापल्या निर्णयावर ठाम होते. अखेर काही मित्र-मैत्रिणींच्या साक्षीने १४ फेब्रुवारी रोजी युसुफ आणि प्रिया विवाहबंधनात बांधले गेले. त्यांचा त्यांच्या नवीन घरात प्रवेश झाला. आता त्यांच्या या नव्या विश्वात ते फक्त एकमेकांसाठी होते. 
लग्नानंतर नोकरी आणि घर अशी दुहेरी जबाबदारी प्रिया सांभाळू लागली. दोघांचे ऑफिस अवर्स जवळजवळ सारखेच होते. घरकामात युसुफही प्रियाला मदत करू लागला. ती कट्टर ब्राह्मण असल्यामुळे तिच्या घरी कधीही अंडेही शिजले नव्हते. युसुफ अट्टल मांसाहारी. एकदा प्रियाने युसुफला खुश करण्यासाठी अंड्याचे आमलेट करायचे ठरवले. तिने रेसिपी बघून घेतली. अंडे फोडून तव्यावर टाकले आणि त्या वासाने ती बाथरूम कडे धावली. त्या दिवसापासून युसुफने मांसाहार वर्ज केला. प्रियाने नमाज आणि रोज्याचे महत्व युसूफकडून समजावून घेतले. त्याला तोडकेमोडके मराठी येत होते पण तिच्या सान्निध्यात राहून तो बऱ्यापैकी मराठी बोलायला शिकला. दिवाळी आणि ईद असे दोन्ही सण त्याच्या घरात साजरे होऊ लागले. 
एकमेकांच्या आवडीनिवडी जपत त्यांचा संसार फुलू लागला. कोणत्याही अप्रिय विषयावर चर्चा करण्याचे दोघे टाळत. त्या दोघांचे जवळचे मित्र आणि मैत्रिणी सोडून त्यांच्या घरात इतर कुणीही फिरकले नव्हते. त्या दोघांच्या घरच्यांनी त्यांना जवळजवळ बहिष्कृत केले होते. एकदा तिची आई आजारी आहे असे तिच्या कानावर आल्यामुळे चिंतीत होऊन ती तिच्या आईला भेटायला गेली परंतु तिच्या तोंडावरच घराचा दरवाजा बंद केला गेला. ती घरी येऊन खूप रडली. युसुफनेही घरची खुशाली समजून घेण्यासाठी घरी एक-दोनदा फोन केला होता पण त्याच्या  घरच्यांनी त्याच्याशी संभाषण करण्याचे टाळले. घरच्यांना दुखावल्याचे शल्य दोघांच्याही मनात होते पण त्यांचाही नाईलाज होता.  
म्हणता म्हणता त्यांच्या लग्नाला पाच वर्षे झाली आणि प्रियाला गोड चाहूल लागली. दोघेही हरखून गेले. बाळाची स्वप्ने रंगवू लागले. दिवस जसजसे भरत आले तसा प्रियाने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. एव्हाना त्यांचे कर्जही फिटत आले होते. युसुफ प्रियाला काही कमी पडू देत नव्हता. तिचे सगळे डोहाळे तोच पुरवत होता. तिला काय हवे काय नको यात तो जातीने लक्ष घालत होता. तिच्या वाट्याला जास्तीत जास्त आनंदाचे क्षण यावे यासाठी प्रयत्नशील होता. अधूनमधून मित्रमंडळी येऊन त्या दोघांची आस्थेने वास्तपुस्त करत होती. त्यांच्या घरच्यांनाही बाळाच्या आगमनाची बातमी या दोघांच्या मित्रांकरवी कळली होती परंतु दोघांच्याही घरून साधी चौकशी करायलाही कुणी फिरकले नाही. अखेर बाळाचे आगमन झाले. प्रियुल असे त्याचे नामकरण झाले. आई-बाबांचे बोट धरून प्रियुलची वाटचाल सुरु झाली. त्याला इतर नातेवाईक मंडळींचे कधीच दर्शन झाले नाही. आई-बाबा हेच त्याचे चिमुकले विश्व होते. 
दिवसामागून दिवस आणि वर्षामागून वर्षे गेली. प्रियुल पाच वर्षांचा होणार होता.. प्रियुलचा वाढदिवस आणि त्यांच्या लग्नाचा दहाव्वा वाढदिवस एकदम साजरा करण्याचे ठरले. मित्र-मैत्रिणींना आमंत्रणे केली गेली. प्रियुलचे लहानगे मित्रही येणार होते. युसुफ आणि प्रियाच्या मित्र-मैत्रिणींनी त्यांच्यासाठी सरप्राईज गिफ्टचे आयोजन केले होते. सगळे घर रंगीबेरंगी फुगे आणि माळांनी भरून गेले. जेवणाचा खास बेत आखला होता. भला मोठ्ठा केक टेबलावर प्रसंगाची शोभा वाढवत होता. पाहुणे यायला सुरवात झाली. घर गजबजून गेले. हास्याची कारंजी उडू लागली. केक कापायची वेळ झाली आणि लहानगा प्रियुल केक कापण्यासाठी पोझ घेऊन उभा राहिला. एवढ्यात प्रिया आणि युसुफला अनपेक्षित धक्का बसला. त्या दोघांचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले. समोर खान आणि गोडबोले कुटुंबीय हसतमुखाने हजर होते. प्रियाने इतक्या वर्षांच्या साचलेल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. ही अपरिचित मंडळी बघून प्रियुल प्रथम बावरून गेला पण मग त्यांची ओळख पटताच तितक्याच जोशात त्यांच्याशी मस्ती करू लागला. घराला खऱ्या अर्थाने घरपण आले. इतक्या वर्षांचा हरवलेला आनंद मनमुराद लुटण्याचा जो तो प्रयत्न करू लागला. ती विरहाची, दु:खद जाणिवांची मधली वर्षे आनंदकल्लोळात विरघळून गेली. युसुफ आणि प्रियाच्या मित्र-मैत्रिणींच्या अथक परिश्रमांना शेवटी यश मिळालं. खान आणि गोडबोले कुटुंबियाची भेट त्यांनी घडवून आणली आणि एकमेकांविषयीच्या गैरसमजाचे मळभ पुसले गेले. 
खरंच काय लागतं हो विवाह यशस्वी होण्यासाठी? फक्त एकमेकांवरील अतूट विश्वास आणि निरपेक्ष प्रेम. काही मोजक्या कपड्यांनिशी प्रियाने घर सोडलं तर युसुफनेही तेच केलं. पैसाअडका किंवा तिचे स्त्रीधनही तिने बरोबर घेतले नाही.  वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाची शिदोरीसुद्धा त्यांच्या नशिबात नव्हती. कुठलाही परंपरागत सोहळा नाही की हौसमौज नाही. तरीही त्यांचं लग्न यशवी झालं.  
लौकिकार्थाने किंवा वरकरणी अनेक लग्ने यशस्वी झाल्याचे आपल्याला वाटत असते. कारण गृहछिद्रे झाकण्याचे कसब अनेकांना अवगत असते. संसार होतात. नवरा-बायकोची, आई-वडिलांची कर्तव्ये पार पडली जातात. पण अशा संसारात राम असतोच असे नाही. अनेक वर्षे एकत्र राहूनही नवरा-बायकोचे चेहरे एकमेकांसाठी अनोळखीच असतात. मानसिक तादात्म्य साधले जात नाही. 
दाम मोजून घर खरेदी नक्की करता येऊ शकतं पण घरातील परस्परांचे सुख अबाधित ठेवणारी प्रेम नावाची गोष्ट जगातील कोणत्याही दुकानात उपलब्ध होऊ शकत नाही. तिची देवाणघेवाण ही भौतिक सुखा पलीकडची असते. अशा प्रेमाची जाणीव हा उत्तम मनुष्यत्वाचा सहज स्त्रोत असतो. अशा प्रेमाला कोणत्याही जातीपातींच्या, उच्च-नीचतेच्या,गरीब-श्रीमंतीच्या तराजूत तोलता येत नाही. पैसा व प्रतिष्ठा हे प्रेमाचे समीकरण होऊ शकत नाही. 
आणि म्हणूनच या 'valentine' डे च्या निमित्ताने अशा अनेक भावी युसुफ आणि प्रियासाठी आपण शुभेच्छा देऊया आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सारासार विचारशक्तीसाठी प्रार्थना करूया. 






Saturday, 4 February 2012

फोटोशॉप - एक कल्पक खेळ

 मी 'DTP' चा कोर्स करत होते. 'Pagemaker', 'Coral Draw' आणि 'Photoshop' अशी तिन्ही तंत्रे ( techniques ) या अंतर्गत शिकवली जाणार होती. मी भलतीच उत्सुक होते. साधारण तीन एक महिन्यांचा हा कोर्स होता. पण माझी घोर निराशा झाली कारण केवळ 'टूल्स आणि टेक्निक्स' यापलीकडे विशेष काहीच शिकवले जात नव्हते. मुळातच एखाद्या टूलचा वापर हा नक्की कोणत्या कारणास्तव केला जातो किंवा जावा याविषयाची हवी तशी माहिती मिळत नव्हती. कोर्स संपत आला पण त्याविषयीच्या माझ्या ज्ञानात काही फारशी भर पडली नाही. 
या तिन्हींपैकी फोटोशॉपने मला  विलक्षण भुरळ घातली होती. त्यामुळे त्याविषयीची साद्यंत माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात मी होते. अखेर नेटवरून बरीच माहिती आणि फोटोशॉप ट्युटोरिअल्स बघायला मिळाली. फोटोशॉप animation मध्ये विशेष रुची निर्माण झाली. मी अनेक गोष्टी शिकत गेले. शिकता शिकता नवीन कल्पना डोक्याचा ताबा घेऊ लागल्या. आजकाल बहुतांश मुले व मोठी माणसे संगणक वापरतात. आपल्या कल्पनाशक्तीला चालना देऊन आपण याद्वारे अनेक गोष्टी साध्य करू शकतो. 
एक छोटेसे रोपटे मातीतून वर येण्याची प्रक्रिया आपण दाखवू शकतो. नुसत्या छायाचित्रापेक्षा रोपट्याच्या वाढीतील जिवंतपणा जास्त परिणामकारक वाटतो. 


'SIP' या शब्दातून प्रतीत होणारा अर्थ या animation द्वारे सजीव झाला आहे. शब्दांना strowberry चे  आवरण आहे. रंग आणि विशिष्ट गती वापरून ही अक्षरे दृश्यमान झाली आहेत.

मंदिराचे द्वार अलगद उघडले जाते आणि गाभाऱ्यातील 'कृष्ण-राधा' ही द्वयी आपले लक्ष वेधून घेते. कृष्ण-राधेचे चित्र आणि एक सुबक नक्षीकाम केलेले दार या दोहोंच्या माध्यमातून आपण आवश्यक तो परिणाम साधू शकतो. यात कृष्ण-राधेचे चित्र स्थिर तर दाराला गती आहे.
थिएटर मध्ये बसल्यानंतर मोठ्या पडद्यावर हलणाऱ्या प्रतिमांचा या animation मध्ये मी वापर केला आहे. नुसते थिएटर आणि मोठ्या स्क्रीनवरील स्थिर चित्र यांनी तो परिणाम साधला नसता. 


सर्वच मुलांना आवडणारी वेगवेगळी कार्टून्स या घड्याळात मी घेतली आहेत. आकड्यांच्या जागी कार्टून्स आणि फिरणारे काटे यामुळे या घड्याळाची शोभा वाढली आहे.  मुलांना घड्याळ बघायला शिकवताना याचा उपयोग करता येऊ शकेल तसेच मुलांना हे शिकणे रंजक वाटेल.

 ही फक्त काही उदाहरणे मी दिली आहेत. यात शिकण्यासारखे आणि स्वत:हून करण्यासारखे बरेच काही आहे. आपली कल्पकता वापरून जेव्हा आपण अशी animations तयार करतो तेव्हा त्यातून मिळणारा आनंद हा वेगळाच असतो. ह्याची अनुभूती सर्व आबालवृद्धांना येऊ शकते. आपल्या रोजच्या व्यापातला थोडा वेळ यासाठी काढा आणि बघा किती आणि कसा आनंद आपण मिळवू शकतो ते! विशेष करून माझे युवा पिढीला सांगणे आहे की आपला वेळ चांगल्या प्रकारे नियोजित करायला शिका आणि मनातल्या निसर्गदत्त सृजनशीलतेला, कल्पकतेला जास्तीत जास्त वाव द्या. 

Friday, 3 February 2012

स्वातंत्र्य आणि आम्ही


पारतंत्र्याचे सावट I महत्प्रयासाने सरले 
स्वातंत्र्यदेवता प्रसन्न I झाली आम्हां....
बलिदानांची कुरणे  I  रक्ताचे शेतमळे 
साहसाच्या बागा  I  फुलत राहिल्या ...... 
जे न पहिले-साहिले   I  जे न कधी अनुभवले 
त्या सदगुणांचे माप  I   कैसे समजावे ......
आता समाज पोटार्थी  I  पिढ्या निपजती स्वार्थी 
संवेदनाशून्य हाती  I  राज्य पडावे ......
वरिष्ठांचे लांगुलचालन  I  उघडे सुखाचे दालन 
प्रतिष्ठेचे कवाड  I  आपसूक खुले.......
 भ्रष्ट झाले राजमार्ग  I  भ्रष्ट झाल्या पाउलवाटा 
डोंगराएवढ्या नोटा I मोजून घेती......
कुणी कुणाला शोषावे  I कुणी कुणाला भक्षावे 
अटीतटीचे सामने  I  रंगा येती ..........
कुठे जाज्वल्य अभिमान   I कुठे मुल्यांची जाणीव 
नीतिमत्तेचा पान्हा  I  आटला गा........ 
थोरामोठ्यांची भाषणे   I  स्वातंत्र्याशी देणे-घेणे 
राष्ट्रप्रेमाचे उखाणे  I  पंधरा ऑगस्टला .......
जोखुनी मतांचे हित   I  समाजाचे करती अहित 
तेच आज सिंहासनी  I   बैसलेले ........
झुलतो बळींचा झुला  I  पोटाला नसे खायला 
घेती टांगुनी फासाला I  नाईलाजे ........
बलात्कार, सूड, हत्त्या  I  रोजचीच नवी कथा 
अवजारे परजती   I  विकृतीची .......
दिनचर्या माणसाची I  ओझ्याच्या गाढवाची 
विचारशून्यता अंती  I अंगी आली .........
कुटुंबाचे जरी हे कर्ते  I  देशासाठी हे नाकर्ते 
अलिप्ततेची सोय  I  अनायासे झाली .........
यंत्रयुगाची साधने  I  आज विध्वंसाच्या खाणी 
मातृभूमिचीही मती  I  सुन्न व्हावी ........  
ह्याची देही ह्याची डोळा I   विनाशाचा हा सोहळा 
पाहतो हजारो वेळा  I  जळी-स्थळी आम्ही ..........
चोहीकडे अंध:कार  I  दहशतीचा महापूर 
आरशात दुर्भाग्याच्या  I  पाहतो स्वत:ला ..........
तरीही अजुनी जागी I  एक आशा पुसटशी 
कधीतरी एके दिवशी  I जागृती होईल ......... 
जग भासेल हे नवे  I  नव्या विचारांचे थवे
कृतीच्या पंखांवर  I  स्वार होतील......... 
गरीब-श्रीमंतांची दरी  I  सुशिक्षितांची बेकारी 
अहंमन्न्यांची माजोरी  I  मातीत मिळेल ..........
कोणाच्या महाकृपेने  I  असा दिस उगवेल 
ईश्वराच्या अस्तित्वाची  I  खूण आम्हां सापडेल .........



Thursday, 2 February 2012

चिमण्यांचे सुलभ प्रसूती गृह

अनेक वर्षांपासून माझ्या मनात एक इच्छा होती की  घराच्या बाल्कनीत 'Sparrow Shelter' असावे जेणेकरून खूपशा चिमण्या खाऊ-पिऊ करण्यासाठी येतील आणि माझे घर त्यांच्या चिवचिवाटाने गजबजून जाईल. ती इच्छा काही कारणाने पूर्ण होऊ शकली नाही पण काही चिमण्या मात्र  बाथरूमच्या खिडकीबाहेर आपल्या आगमनाची वर्दी देऊ लागल्या. 
काही चिमण्यांनी त्यांच्या बाळंतपणासाठी माझ्या बाथरूमबाहेरील जाळीच्या खिडकीची निवड केली. एक चिमणा अनेकदा 'सर्व्हे' करण्यासाठी तासनतास खिडकीवर येऊन  बसायचा. मुळातच ही जागा पिल्लांसाठी कितपत सुरक्षित आहे, येथे उत्तम आणि भक्कम घरटे बांधता येईल का याचा अंदाज  तो घेत असावा. आपण कसे नवीन जागा घ्यायची म्हटली की आजूबाजूची वस्ती, शेजारीपाजारी, एकंदर सुखसोयी, वीज-पाणी अशा गोष्टींचा विचार आधी करतो त्याचप्रमाणे त्यांचे काहीसे असावे. तथापि चिमण्यांना या तात्पुरत्या का होईना पण राहत्या घरासाठी कम प्रसूतिगृहासाठी छदामही मोजायला लागणार नव्हता.  
ठिकाण निश्चित झाले आणि काड्या, कापूस, पिसे याची आयात होऊ लागली. काड्यांची रचना काही कारणाने मनाजोगती झाली नाही की चिमणी किंवा चिमणा ते काम थांबवून विचारमग्न होत असे.  कदाचित घरट्याच्या रचनेबद्दल त्यांचे एकमत होत नसावे. बांधलेले अर्धवट घरटे तसेच सोडून देऊन ते थोडे वरचे ठिकाण निवडायचे. अखेर त्यांच्या अथक परिश्रमाने ते घरटे बांधले गेले आणि पोटुशा चिमणीबाई तिथे वस्तीला आल्या. चिमणा घरट्या बाहेर राहून सर्व काही आलबेल असल्याचा कानोसा घेत असे. अवघडलेल्या चिमणीला चारापाणी देण्याच्या व्यवस्थेत गढलेला असे. चिमणी जिथे तिच्या पिल्लांना जन्म देणार होती त्या जागी मऊमऊ कापसाची बिछायत घातली होती. बाजू टोचू नयेत म्हणून पिसांचे आच्छादन होते. इतका सगळा विचार झाल्यानंतर चिमणीबाई अंडी देण्याच्या मार्गाला लागल्या. चिमण्याचा सक्त पहारा होता. घरात राहणाऱ्यांनाही त्यांचा प्रसूती सोहळा दिसणार नाही याची व्यवस्थित काळजी घेतली गेली होती. अंडी दिल्यानंतर ते उबवण्याचे काम सुरु झाले. चिमणी-चिमण्याच्या न समजणाऱ्या संभाषणाव्यतिरिक्त मला काही दिसू शकत नव्हते. काही दिवसांनी अगदी बारीकशा आवाजातील चिवचिव ऐकू आली. मी आणि माझ्या मुलींनी उत्सुकतेपोटी घरट्याकडे बघितले पण पिल्ले छोटी असल्याकारणाने दिसू शकली नाहीत. आता पिल्लांचे भरणपोषण अगदी जोमाने चालू झाले. चिमणा घरट्या बाहेरून चिमणीच्या चोचीत खाऊ देत असे आणि ती तिच्या पिल्लांना तो भरवत असे. हळूहळू त्या पिल्लांची चिमुकली डोकी वर आली. त्यांच्या कोवळ्या लालबुंद चोची कायम आ वासलेल्या असत. विलक्षण अधीर होऊन ते चाऱ्याची वाट बघत. चिमणा खाऊ घेऊन आला की एकाच हलकल्लोळ होत असे. चिमणीच्या चोचीत खाऊ आला की आधी मला, आधी मला असं जणू काही ती पिल्ले ओरडून सांगत असावीत. पिल्लांची बडदास्त अगदी चोख होती. चिमणा-चिमणीला जरा म्हणून उसंत नव्हती. ती पिल्ले सदानकदा भुकेलेली असायची. त्याच्या चोचीत चारा घालेपर्यंत त्यांची चिवचिव शांत होत नसे. अखेर काही दिवसांनी एकदम ही चिवचिव शांत झाली आणि चार दिवसांचे पाहुणे भुर्रदिशी उडून गेले. आम्ही हिरमुसलो कारण आता ते घरटे रिकामे आणि सुनेसुने वाटत होते. पण आमची ही मनस्थिती काही दिवसच टिकली कारण त्या आयत्या बांधलेल्या घरट्यातच दुसऱ्या जोडप्याची हालचाल सुरु झाली.   
यथावकाश अनेक चिमण्यांची बाळंतपणे त्या घरट्यात सुखरूपपणे पार पडली. आयत्या घरट्यात अनेक चिमण्यांनी घरोबा केला. पण काही महिन्यांनी मात्र त्या बांधलेल्या घरट्यावर दुसऱ्या नवीन घरट्याचे बांधकाम सुरु झाले. त्याच प्लॉटवर 'डुप्लेक्स' घरटे बांधून झाले आणि काही बाळंतपणे या नवीन घरट्यात झाली. रात्री 'नाईट वॉचमन' म्हणून चिमणा यायचा आणि घरट्याच्या सुरक्षिततेची टेहळणी करत राहायचा. त्याने 'NOC' दिल्यावर मग चिमण्या आपले बस्तान मांडायच्या. अंड्यातून पिल्ले बाहेर यायची. काही दिवस चिवचिवाट करून मग तीही उडून जायची. आजही हे सत्र अव्याहत चालू आहे. रात्रीचा चिमणा येऊन घरट्याबाहेर बसला की आम्हाला समजते की लवकरच हे घरटे चिवचिवाटाने गजबजणार आहे. अशा वेळी मी कविता गुणगुणायला लागते.
माझिया घरात चिमण्या आल्या   
घराचे गोकुळ करून गेल्या 
आनंदाची पिसे, सुखाचा चारा 
माझिया दारात खोवून गेल्या 
निरागस, कोवळ्या स्वरांचा गंध 
माझिया मनात लिंपून गेल्या 
मायेच्या उबेचे, मायेच्या छायेचे
पांघरूण मनावर अंथरून गेल्या 

Wednesday, 1 February 2012

कथा चौघींची.........


मीरा, कांचन, प्रणाली आणि दीप्ती कल्याणकडून सी.एस.टीकडे असा नोकरीच्या निमित्ताने रोज प्रवास करणाऱ्या! चौघीही विवाहित. प्रवासाच्या निमित्ताने रोज एकमेकींशी भेट होत राहिली आणि त्याचे गाढ मैत्रीत रुपांतर झाले. आचार-विचारांची नाळ जुळली आणि मैत्रीचे धागे घट्ट होत गेले. सार्वजनिक सुट्ट्या नकोशा वाटायला लागल्या. लोकलचे वेळापत्रक अनेक वेळा बिघडले पण एकमेकांशी भेटण्याचे वेळापत्रक त्यांनी बिघडू दिले नाही.  
आज मीराचा वाढदिवस होता. लोकलमध्ये जागा पटकावल्यानंतर कांचन, प्रणाली आणि दीप्ती यांनी मीराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. काही वेळाने डबे उघडले गेले. पुलाव, थालीपीठ आणि गोड शिऱ्याचा वास सगळ्या डब्यात दरवळला. मीराच्या आवडीचे पदार्थ आवर्जून केले गेले होते. मीराची वाचनाची आवड लक्षात ठेऊन तिच्यासाठी छान पुस्तके आणली होती. मीराला भरून आले. तिच्या सासरी तिच्या वाढदिवसाला काडीइतकेही महत्व नव्हते किंबहुना तिचा वाढदिवस कुणाच्या खिजगणतीतही नव्हता. घर नवरा, सासू-सासरे, दीर-नणंद यांनी भरलेले असूनही ती एकटीच होती. नवऱ्याची हुकुमशाही, सासूच्या तोंडाचा दांडपट्टा, नणंदेचे कुजकट शेरे ती निमुटपणे लग्न झाल्यापासून सहन करत होती. दीर त्यामानाने वागायला जरी बरा असला तरी कौटुंबिक गोष्टींत अजिबात लक्ष घालणारा नव्हता. तो जास्तीत जास्त वेळ घराच्या बाहेरच असायचा.  आई-वडील हयात नसल्याने तिला भावनिक आधार द्यायलाही कुणी नव्हते. तशातच कांचन, प्रणाली आणि दिप्तीशी ओळख झाली आणि एकाकीपणाच्या भावनेचा लवलेशही राहिला नाही. प्रासंगिक सुख-दु:खांची, विचारांची देवघेव होत राहिली आणि मनाला उभारी आली. मीराच्या पाणावलेल्या डोळ्यांनीच तिच्या जिवाभावाच्या मैत्रिणींचे अनौपचारिक आभार मानले. 
कांचनच्या माहेरी तिचे फक्त आई -वडील. तिला भावंड नव्हते. त्यात कांचनची आई हृद्रोगाने आजारी. घरी तिची शुश्रुषा करायला, काळजी घ्यायला, जेवण करायला कुणी नाही. वडलांना झेपेल इतपत ते कामं करायचे. पण आईच्या खाण्या-पिण्याची काळजी घेणे, तिचं पथ्यपाणी सांभाळणे, वेळेवर औषधे देणे याची व्यवस्था तिलाच करायला लागायची. आईचा आणि  वडिलांचा स्वयंपाक करणे आणि आईचे  औषधांचे, खाण्याचे, विश्रांतीचे वेळापत्रक लिहून ते वडिलांजवळ देणे हे तिला नित्यनेमाने करायला लागायचे. तिचं सुदैव एवढंच होतं की सासर आणि माहेर हाकेच्या अंतरावर होतं. नवरा बऱ्यापैकी समंजस होता पण तिच्या सासूला मात्र ती आईची सेवा करायला सारखी माहेरी जाते याचा खूप राग यायचा. त्या तिला बोलायची एकही संधी सोडायच्या नाहीत. ती मात्र खालमानेने त्यांची बोलणी ऐकत घरातील कामे हातावेगळी करत रहायची. सासरची आणि माहेरची अशी दुहेरी कसरत तिला सतत करायला लागत होती आणि त्याचा परिणाम तिच्या तब्येतीवर होत होता. पण मैत्रिणी भेटल्या की तिला होणारा मानसिक त्रास कुठल्या कुठे पळून जात असे. त्यांच्याशी गप्पा मारल्यावर , आपलं मन मोकळं केल्यावर तिला खूपच हलकं वाटायचं आणि त्या क्षणी तरी ती आपल्या सुखाचा हेवा करायची. 
प्रणालीचे लग्न होऊन चार वर्षे लोटली होती. तिला मूल होत नव्हते. वैद्यकीय प्रयत्न चालूच होते पण प्रयत्नांना म्हणावे तसे यश येत नव्हते. घरी रोज एकदा तरी या विषयावर चर्चा व्हायची. जणू यात आपलाच दोष आहे अशा प्रकारची अपराधी भावना तिला वाटू लागायची. सण-समारंभांना गेल्यावरही कोणाकडून तरी या विषयाची तार छेडली जायची. विशेषकरून  डोहाळजेवणाचे किंवा बारशाचे बोलावणे आले की ती मनोमन घाबरून जायची. तिला कुठेच जाणे नकोसे वाटायचे. माहेरी गेली की हाच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारून तिला आई बेजार करायची. नातेवाईक मंडळींच्या नजराही आताशा तिला खटकायला लागल्या होत्या. तिचं आई होण्याचं स्वप्न प्रत्यक्षात केव्हा उतरणार याचं समाधानकारक उत्तर कुणाकडेही नव्हतं. तिचं नैराश्य, तिचं वैफल्य मैत्रिणी समजून घेऊन तिला वेळोवेळी धीर देत होत्या. तिच्यासाठी आपापल्या कुलदैवतेकडे प्रार्थना करत होत्या. ती सदैव प्रसन्न, आनंदी राहावी म्हणून प्रयत्न करत होत्या. त्यामुळे मैत्रिणींचा आधार तिला सगळ्यात जवळचा वाटत होता. 
दीप्तीची कहाणी वेगळीच होती. तिच्या सासरी ती, नवरा आणि सासरे एवढीच माणसे. नवऱ्याला कामानिमित्त बऱ्याचदा टुरिंग असायचे. नवरा घरात असताना ती खुशीत असायची पण तो बाहेरगावी गेल्यानंतर तिला एकदम असुरक्षित वाटायचे. तिच्या सासऱ्याची नजर चांगली नव्हती. त्यामुळे ती स्वयंपाकघरात असताना ते आले की एकदम सावध व्हायची. मोबाईल ती सतत जवळ बाळगायची. त्यांचा घरातला वावर तिला विलक्षण अस्वस्थ करत होता. ती कामापुरतं जुजबीच त्यांच्याशी बोलायची आणि काम होताच आपल्या बेडरूममध्ये शिरून दाराला आतून कडी लावून घ्यायची. अशा अनेक रात्री तिने इच्छेविरुद्ध जागत काढल्या होत्या. आई-बाबांना या वयात चिंता नको म्हणून ती त्यांना काही सागत नसे आणि नवऱ्याला सांगितले तरी तो यावर कितपत विश्वास ठेवेल याबद्दल ती साशंक होती. शिवाय आपल्या नवऱ्याचे आणि आपले संबंध यामुळे बिघडू नयेत म्हणून ती अनेकदा बऱ्याच गोष्टी त्याच्यापासून लपवून ठेवायची. मीरा, कांचन, प्रणालीशी बोलल्यानंतर तिला एकदम मोकळे वाटायचे. शिवाय घरी असते तसे मानसिक दडपण मैत्रिणींच्या सान्निध्यात जाणवायचे नाही. तिला लोकल आणि ऑफिस हीच सुरक्षित ठिकाणे वाटायची.  
सभोवतालच्या त्रासांना, संकटांना, समस्यांना तोंड देत या चौघींनी एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवला होता. त्यांची मैत्रीवरची श्रद्धा अतूट होती. एकमेकींच्या आधाराने त्यांना भेडसावत असलेले प्रश्न थोडे सुसह्य झाले होते. एकमेकींचा हात हातात घेऊनच त्यांना आयुष्यातील कोडी सोडवायची होती. सुंदर भविष्याची स्वप्ने रेखाटायची होती अन त्यासाठी त्या मैत्रीबद्ध होत्या.
सगळ्यांच्याच पायाखालची वाट मखमली नसते. वाटेवरील दगड-धोंड्यांतून,काट्यांतून अनेकांना मार्गक्रमणा करावी लागते. अशावेळी गरज भासते ती सोबतीची. डोईवरील दाहकता सुसह्य करणाऱ्या क्षणांची. मनाला सुखावणाऱ्या शितलतेची. जखमेवर अलगदपणे पसरत जाणाऱ्या एखाद्या मलमाची. चित्तवृत्ती उल्हासित करणाऱ्या एखाद्या लकेरीची. अशावेळी प्राजक्ताच्या सड्याची सौंदर्यानुभूती अशी निखळ मैत्री देते आणि चिखलातून स्वत:चे अस्तित्व टिकवत इतरांना निर्मळ आनंद देणाऱ्या कमळाचे रहस्य आपल्याला उमगून जाते.