“It is not in the stars to hold our destiny but in ourselves.”
― William Shakespeare
"The only person you are destined to become is the person you decide to be.”
― Ralph Waldo Emerson
आपल्याकडे फार वर्षांपासून दोन समज समांतर चालत आलेले आहेत. एक म्हणजे 'या जगात जे काही घडते ते केवळ त्या विधात्याच्या मर्जीनुसार', आणि दुसरा समज असे सांगतो की ' जसे आपण पेरतो तसे उगवते,
( as you sow, so shall you reap) आपण हे दोन्ही समज आजमितीलाही उराशी बाळगून आहोत. पहिल्या समजानुसार आपल्या आयुष्यात जे काही बरे अथवा वाईट घडून गेले आहे,घडते आहे किंवा घडणार आहे त्याची संपूर्ण जबाबदारी त्या जगनियंत्याची! दुसऱ्या समजानुसार आपल्या आयुष्यात जे काही बरे अथवा वाईट घडून गेले आहे,घडते आहे किंवा घडणार आहे त्याची संपूर्ण जबाबदारी आपली. कारण जे कर्म आपण केले आहे तेच आज आपल्या दैवाच्या रुपात समोर येउन ठाकले आहे. यावर थोडे चितन केले तर असा निष्कर्ष सहज काढता येईल की हे दोन्ही समज किंवा दोन्ही विचारप्रवाह एकत्र work out होऊ शकत नाहीत. एकतर पहिला समज तरी खरा असू शकतो किंवा दुसरा. बहुतांश लोकांना पहिला समज जास्त सोयीस्कर वाटू शकतो कारण काहीही घडल्यास 'त्याची' जबाबदारी म्हणून हात झटकता येऊ शकतात. दुसरा समज जास्त तर्कशुध्द वाटत असेल तर त्यानुसार आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या बऱ्या -वाईट गोष्टींची जबाबदारी वा श्रेय फक्त आपलेच असू शकते.
आपण पेरलेले बीज काय दर्जाचे (quality ) आहे यावर त्याला येणारे फळ अवलंबून असते. साधा तांदूळ पेरला तर बासमती उगवू शकत नाही. इथे बीज पेरणे म्हणजे विचारांचे बीज पेरणे. भिंतीवर फेकलेला बॉल जेव्हा rebound होऊन परत येतो तेव्हा त्याचे फूल न होता तो त्याच स्वरुपात येतो. इथे बॉल हा ऋण म्हणजेच निगेटिव्ह विचारांचे द्योतक असेल तर त्याच दर्जाचे,प्रतीचे विचार परावर्तीत होऊन आपल्याकडे येतात. शब्दांपेक्षा विचारांमध्ये जास्त शक्ती असते. बरेच वेळा एखाद्या व्यक्तीसमोर शब्द चांगले बोलले जातात परंतु मनातील विचार मात्र त्या शब्दांशी विसंगत असू शकतात. म्हणजे वेष्टन चांगलं पण आतील वस्तू हीन दर्जाची असा प्रकार असू शकतो. शब्दांना चांदीचा वर्ख कितीही चढवला तरी आपल्या मनातील विचार energy च्या स्वरुपात त्या माणसापर्यंत पोहोचतातच. आपल्या वरवरच्या वाक्चातुर्यामुळे आपण या विचारांच्या energy चा दर्जा बदलू शकत नाही. परिणामी त्याच विचारांनी भारलेली उर्जा (energy ) आपल्याकडे परतून येते आणि यालाच आपण नशीब असे संबोधतो.
वैचारिक बैठक >विचार >शब्द >कृती >साचा >व्यक्तिमत्व असा हा एकंदर प्रवास असतो. अमुक एक विचार करणं, विशिष्ट शब्द उच्चारणं,त्याप्रमाणे कृती अथवा आचरण करणं हा एखाद्याच्या सवयीचा भाग होतो आणि मग यातूनच एक व्यक्तिमत्व आकाराला येतं. परंतु आपले व्यक्तिमत्व ही आपली निवड (choice ) असते. कारण यासाठी लागणारे raw material म्हणजेच वैचारिक बैठक (belief system ), विचार (thoughts ), शब्द (words ), कृती (action ) आणि साचा (pattern ) आपलेच असते. ज्या प्रकारचे विचार त्या प्रकारची उर्जा सभोवताली प्रक्षेपित होत असते. त्यामुळे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या बऱ्या -वाईट घटनांचे निर्माते आपणच असतो. हे एकदा मनोमन स्वीकारल्या नंतर आपल्या सत्कृत्यांची अथवा दुष्कृत्यांची जबाबदारी त्या परमेश्वराची साहजिकच राहत नाही.
आज भगवत गीता हा राष्ट्रीय ग्रंथ व्हावा यासाठी अनेकजण हट्ट धरून बसले आहेत. कोर्टातही गीतेवर हात ठेऊन शपथ घेतली जाते. गीतेच्या तत्वज्ञानाचा उहापोह आजवर अनेक प्रकांड पंडितांनी केला आहे. पण यातील 'जो जन्मला त्याला मृत्यू निश्चित आहे व जो मृत्यू पावला त्याला पुनश्च जन्म निश्चित
आहे ' या भगवान श्रीकृष्णांच्या तत्वज्ञानावर खरोखर किती जणांचा विश्वास आहे? या जगात प्रत्येकाला फक्त एकदाच जन्म मिळतो असे गृहीत धरले तर मग प्रत्येकाचे आयुष्य इतके वेगळे कसे? एकाच घरातील भावंडाचे नशीब एवढे वेगळे कसे ? कुणी महालात तर कुणी झोपडीत, कुणी राव तर कुणी रंक,कुणी आस्तिक तर कुणी नास्तिक, कुणी संत तर कुणी राक्षसी प्रवृत्तीचे, कुणी सुखी तर कुणी दु:खी, कुणी शरीराने धडधाकट तर कुणी अपंग अशा असंख्य तफावती कशा? परमेश्वराला जर दयेचा,करुणेचा सागर मानले तर तो या तफावती कशा निर्माण करू शकेल? आपली सर्व लेकरे सुखी व आबाद रहावीत असेच त्याला वाटेल ना ? कर्मयोगाची महती सांगणारे भगवान श्रीकृष्ण, रामकृष्ण, विवेकानंद हे चुकीचे आहेत का?
पण स्वत:वर जबाबदारी घेतली तर आपले दैव बदलण्याची जबाबदारी सुद्धा आपल्यावरच येउन पडेल या भीतीने म्हणा आज कुठे काही खुट्ट झाले की माणसे वर बोट दाखवून मोकळी होतात. आज माणसे ही हृदय, मन असलेली संवेदनाशील व्यक्ती न राहता केवळ पैसे कमावण्याचे साधन होऊन राहिली आहेत. एवढे श्रम करून आणि वारेमाप पैसे कमावूनसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर कधी सुखशांती विलसताना दिसत नाही. जो तो फक्त अधिकाधिक पैसे आणि त्या पैशांनी मिळणारी भौतिक सुखे कमावण्याच्या नादात मग्न असतो. पैशाने अन्न मिळू शकेल पण पोटाला भूक असेल तर त्याचा उपयोग. पैशाने उत्तम प्रतीची मखमलीची बिछायत मिळेल पण त्यावर निद्रा आली तर तरच त्याचे महत्व. सर्व भौतिक वस्तू ही सुखाची साधने आहेत पण ते अंतिम सुख नव्हे. आणि म्हणूनच सगळे राजवैभव उपभोगूनही मानसिक आणि आत्मिक दृष्ट्या अतृप्त राहिलेला राजकुमार सिद्धार्थ सर्वसंगपरित्याग करून चिरंतन शांतीच्या शोधात निघाला आणि त्यातूनच गौतम बुद्धांचा जन्म झाला.
आज आजूबाजूची परिस्थिती जी बाजारू,हिंसक,विध्वंसक,विकृत,आपमतलबी होताना दिसते आहे ती अनेक सामुहिक विचारांचा परिपाक आहे. परिस्थिती बदलायची असेल तर आज आपले विचार बदलण्याची नितांत आवश्यकता आहे. यासाठी प्रत्येकानेच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सुखाचे आभास निर्माण करणाऱ्या मृगजळाच्या मागे धावण्यापेक्षा खरे सुख कशात आहे हे जाणून घेतले तर आयुष्य सुसह्य होण्याला मदत होईल. मुख्य म्हणजे पूर्वी घडून गेलेल्या गोष्टीवर आपला इलाज नसला तरी आज चांगले विचार व त्यानुसार आचार केला तर आपल्या सगळ्यांचेच भविष्य उज्ज्वल असेल हे सांगायला कोणत्याही तथाकथित ज्योतिषाची आवश्यकता भासणार नाही.
No comments:
Post a Comment