Wednesday, 24 December 2014

मनाचा साबण ……।

'नाही निर्मळ हे मन काय करील साबण' ही ओळ लहान असताना वाचनात आली होती. त्या वेळेस मनाचा आणि साबणाचा काय संबंध एवढाच बालसुलभ प्रश्न मनात आला होता. अजूनही अनेकांच्या लेखी साबणाचा आणि शरीराचा संबंधच फक्त प्रस्थापित झालेला आहे. मन आणि साबण हा संबंध प्रस्थापित व्हायची आज गरज आहे.  कारण मलिन झालेलं शरीर स्वच्छ करण्यासाठी बाजारात अनेक  brands  चे साबण उपलब्ध आहेत पण आपलं मलिन  होत चाललेलं मन स्वच्छ करण्यासाठी आवश्यक असणारा साबण आपणच निर्माण करण्याची निकड आहे.   
रोज खराब झालेले कपडे साफ करणं, आंघोळ करून शरीर स्वच्छ ठेवणं ही कामे आपण करतच असतो. नव्हे ती आपली सवयच झालेली असते. पण आपल्यापैकी कितीजण त्याच तत्परतेने रोज आपले मन स्वच्छ ठेवतात? का कपड्यांची आणि शरीराची स्वच्छता लोकांच्या नजरेत येते म्हणून आपण ती करतो आणि मनाची येत नाही म्हणून ती करत नाही? जसा स्वच्छ शरीराचा प्रथम आपल्याला फायदा होतो तसा स्वच्छ मनाचा सुद्धा प्रथम आपल्यालाच फायदा होणार असतो.     
मन हे विचारांनी बनतं. जसे विचार तसे मन तयार होत असते. जन्मजात संस्कार आणि परिस्थिती विषयक ज्ञान यातून विचार निर्माण होत असतात. मूल मोठे होत असताना जी माहिती त्याला प्राप्त होत असते, जे अनुभव ते घेत असते त्याप्रमाणे त्याच्या बऱ्या-वाईट विचारांची जडणघडण होत असते. पण आपण जसजसे वयाने मोठे होत असतो तसतशा आपल्या ज्ञानकक्षा रुंदावत जातात. एखाद्या परिस्थितीचे आपण विश्लेषण करू शकतो. आपली आकलनशक्ती विस्तारते. योग्य विचारांची मांडणी आपण करू शकतो. विचारांना योग्य दिशा देऊ शकतो. विचारांना विवेकाची जोड देऊ शकतो. विकारी विचारांची बीजे समूळ उपटून टाकू शकतो. मग शकणे आणि होणे यातील अंतर कोणत्या कारणामुळे आपण कमी करु शकत नाही याचा सांगोपांग विचार होणे आपल्याला महत्वाचे वाटत नाही का?          
स्वत: कावीळ झालेल्याला सगळं जग पिवळ दिसतं अशी म्हण आहे. मग अशी विचारांची कावीळ आपण आपल्या शरीरात दिवसरात्र घेऊन फिरतो त्याचे काय? देवालयात जाताना शरीराची शुचिता तेवढी आपल्या लेखी महत्वाची असते पण आपल्या मनाची शुचिता देवदर्शन घेऊन बाहेरील बाकावर बसल्यानंतर मात्र सांडून जाते. अनेक सासवांना मुक्त कंठाने त्यांच्या सुनांची निंदा करण्याचे ते हक्काचे स्थान आहे असे वाटते. लग्न समारंभाला जाताना आपण शरीर नुसते स्वच्छ नाही तर सुशोभित आणि सुगंधित करून जातो. मनाचे सुशोभीकरण आपल्या लेखी अजिबात महत्वाचे नसते. तिथे गेल्यावर 'ए त्याच्या मानाने ती काही एवढी खास नाही' किंवा याउलट विधान आपण किती सहजतेने करतो. तिच्या अंगावर घातलेल्या दागिन्यांचा हिशेब करण्यात मन गुंतून जातं. देवाणघेवाणीची उघडउघड चर्चा करण्यात आपण रंगून जातो.  एखाद्याची बरकत बघून आपल्यला मनोमन त्रास होतो. एखाद्याचा त्रास बघून मनोमन आनंद होतो. मुलीला कामात दिलेली सूट आपण सुनेला अजिबात देत नाही. मुलीला बरे नसताना तिच्या डोक्यावरून मायेने फिरवलेला हात सुनेच्या डोक्यापाशी जाताना थबकतो. जातीधर्माच्या नावावर केल्या जाणाऱ्या अत्याचारात एक हात आपलाही असतो. विधवा स्त्रीचे मंगल प्रसंगी येणे आपल्याला खटकते. मूल नसलेल्या स्त्रीचे बारशाला हजर राहणे आपल्याला अस्वस्थ करते. विवाहितेचा जीवघेणा मानसिक आणि शारीरिक छळ करणाऱ्या माणसांमध्ये आपलाही सहभाग असतो. एखाद्याच्या तोंडचा घास काढून आपल्या तुंबड्या भरताना आपल्या वर येऊ पाहणाऱ्या विवेकाला आपण हेतुपुरस्सर दाबलेले असते. कुणीतरी आपल्याला नकार दिला म्हणून तिच्या आयुष्याचे तीनतेरा वाजवताना आपला सारासारविवेक आपण गहाण ठेवतो.   
हजारो लिटर दुग्ध वाया घालवून परमेश्वराला अभिषेक करण्याचे पुण्य आपल्याला प्राप्त करून घ्यायचेच असते पण तेच दूध दीन-गरीब,अनाथ मुलांना देऊन आपल्या पुण्यकर्माचे रांजण भरू देण्यास आपला नकार असतो. जाती-धर्माच्या नावाखाली एकमेकांच्या धर्मग्रंथांच्या श्रेष्ठ कनिष्ठतेचे विवरण  करताना आपली तोंडे थकत नाहीत पण  मानवतेचा धर्म पाळण्यास आपण बांधील नसतो. कोणत्याही देवाचे आणि धर्माचे आपल्या मनातील स्थान हे समाजमन कलुषित करून दंगे घडवून समर्थ असते. आपल्या जातीचा,विद्वत्तेचा,आर्थिक स्तराचा दंभ मानवतेची पाळेमुळे चिरडण्यास अग्रस्थानी असतो. मानवी मूल्यांचा ऱ्हास आपल्याला मान्य असतो पण आपल्या अ-मानवतावादी विचारांना तिलांजली देणे आपल्याला मंजूर नसते.       
ज्याप्रमाणे शरीरात मल साठून राहिल्यास त्याचे विष तयार होते त्याचप्रमाणे दुर्विचारांचा मल मनात साठून राहिल्यास संपूर्ण मन विषारी होते आणि समाजातील अनेक निष्पाप मनांना त्याचा दंश झाल्याशिवाय राहत नाही. मग हत्याकांडे होतात, नृशंस संहार होतात, पाशवी प्रहार होतात.    
विचार सुयोग्य दिशेने वळवले की मन भरकटत नाही. विचारांना योग्य आकार मिळाला की हातून घडणारी कृती उदात्त होते. विचारांच्या मुळांना चांगल्या संस्कारांचे खतपाणी घातले की आचार उत्तम होतो. एका निरोगी मनातून संघटीत निरोगी समाजमन तयार होण्यास मदत होते जे उन्नत जीवनाचे निदर्शक ठरू शकते व जे  अशा अनेक भरकटलेल्या आयुष्यांचे तारू विधायक दिशेला वळवू शकते.          

No comments:

Post a Comment