ज्या महर्षी व्यासांनी महाभारताची अलौकिक रचना करून माणसाला त्याच्या मनातील महाभारताकडे डोळसपणे पाहायला शिकवलं त्या व्यासमुनींना माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार!
ज्या मातेच्या गर्भाशयाच्या आधारे मी माझे या पृथ्वीवरील अस्तित्व निश्चित करू शकले त्या माझ्या जन्मदात्रीस माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार!
संगीतातील सात स्वरांची बाराखडी मी ज्यांचे बोट धरून गिरवण्यास प्रवृत्त झाले त्या माझ्या जन्मदात्याला माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार!
ज्यांनी माझ्या अक्षरांना सुबक वळण लागावे म्हणून अतोनात परिश्रम घेतले त्या माझ्या दादा आजोबांना माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार!
अभ्यासाचे आणि माझे नाते प्रयत्नपूर्वक अधिकाधिक घट्ट करणाऱ्या माझ्या नाना मामाला माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार!
आकाशवाणी (रेडिओ ) या प्रसारमाध्यमाद्वारे माझ्या अंगभूत कलागुणांना वाव मिळवून देणाऱ्या माझ्या शरयू आत्यास माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार!
माझ्यातील कविमनाला सक्षम करत माझ्या काव्यरचना जास्तीत जास्त सकस आणि संमृद्ध होण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या बालमोहन शिक्षिका चौबळ बाई आणि रुपारेल कॉलेजमधील प्राध्यापक आदरणीय जोग सर यांना माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार!
ज्यांच्या पुस्तकातील रेखाटनाने प्रभावित होऊन चित्रकला हा जिचा विषय नाही अशा मला बऱ्यापैकी व्यक्तिचित्रे रेखाटता आली त्या आदरणीय सुबोध नार्वेकरांना माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार!
ज्या परिस्थितीने मला डळमळणाऱ्या पायवाटेवर खंबीरपणे पाय रोवण्यास शिकविले त्या परिस्थितीला माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार!
ज्या कलांनी आयुष्याच्या प्रत्येक कडू-गोड वळणावर मला निष्ठेने जी संगतसोबत केली त्या सर्व कलांना माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार!
ज्या पुस्तकांनी माझ्या सख्याची भूमिका बजावत मला जीवनाचा विविधांगी आस्वाद घ्यायला शिकवलं आणि माझं एकाकीपण सुलभ, सोपं, आनंदमय आणि प्रकाशमय केलं त्या सगळ्या पुस्तकरूपी गुरूंना माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार!
दु:ख, अगतिकता, नैराश्य, असुरक्षितता यांचे कवच प्रयत्नपूर्वक भेदायला शिकवून ज्यांनी मला आनंदाच्या पायवाटेवर चालायला प्रवृत्त केलं त्या माझ्या दोन मुलींप्रतही माझी कृतज्ञता!
अहंकार, अंधश्रद्धा, अप्पलपोटेपणा, प्रतिगामित्व यांच्या आहारी मला न जाऊ देणाऱ्या माझ्या सद्सदविवेकबुद्धीस माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार!
माझ्या हक्काच्या चार भिंतींना घरपण बहाल करणाऱ्या प्रत्येक लहान-मोठ्या वस्तूस माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार!
ज्या पांडूने त्याच्या निरागस डोळ्यांतून आणि लोभस वृत्तीतून त्याच्याविषयी तसेच इतर प्राणीमात्राविषयी माझ्या मनात प्रेम आणि जिव्हाळा उत्पन्न केला त्या पांडूला ( माझा अत्यंत लाडका कुत्रा) माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
ज्या कलाकारांनी मला त्यांच्या कलेतून सतत आनंद दिला आणि जीवन पूर्णांशाने जगण्याची उमेद दिली त्या सर्व कलाकारांना माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
ज्या मुरब्बी राजकारण्यांनी माणसाने कसे असावे यापेक्षा कसे असू नये याचा सातत्याने वस्तुपाठ दिला त्या समस्त राजकारण्यांना माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
ज्या वाद्याने माझ्यातील संगीतकार जागवला तसेच माझ्या जगण्याला एक सुनिश्चित अशी दिशा दिली त्या संवादिनीस माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
माझ्या शरीरातील अवयवांनी मला आतापर्यंत निरोगी आणि स्वस्थ आयुष्य जगण्यात जी मोलाची साथ दिली त्यांना माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
ज्या निसर्गाने मला इतरांना दोन्ही हातांनी भरभरून देण्याची जी संथा दिली त्या प्रज्ञावंत निसर्गाला माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
अशा उल्लेखिलेल्या आणि अनावधानाने न उल्लेखिलेल्या सर्व ज्ञात आणि अज्ञात गुरूंना माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार- आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने!
No comments:
Post a Comment