Thursday, 28 June 2012

मका खाणारी मांजर

पूर्वी मांजरांचे passion उंदीर हे होते. हल्लीच्या मांजरी उंदरांच्या वाट्याला जातच नाहीत. कदाचित त्यात ते थ्रील उरले नसावे. मासळीबाजारात कोळणींच्या पायाशी बक्कळ मांजरी घोटाळताना दिसतात. मासा आणि मांजर हे एक अभेद्य असे नाते आहे. बाळगोपाळांच्या पुस्तकातल्या मांजरी ह्या बहुतेक करून वाडग्यात ठेवलेले दुध पिताना दिसतात. मुलांनीही दूध प्यावे असा संदेश या मांजरीन्करवी मुलांना दिला जात असावा. जाहिरातीतील मांजरी 'व्हिस्का' या नावाचे फूड खातात. या मांजरींचे सोशल स्टेटस इतर मांजरीन्पेक्षा वरचे असते. 
माझी एक आत्या सुरतेला राहते. तिला समजायला लागल्यापासून तिच्या घरी मांजरींचा राबता आहे. माझी ही आत्या आणि मांजर हीच मुळी द्विरुक्ती आहे.  माझी आजी आत्याला माऊ म्हणूनच संबोधायची. आजपर्यंत विविध जातीच्या मांजरींनी माझ्या आत्याच्या घरी येऊन आपली वर्णी लावली आहे. त्यामुळे आम्हाला कुठेही मांजर दिसले की या सुरतेच्या आत्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही.  आज माझी आत्या साठीची आहे. तरी अजूनही मांजरांनी तिची पाठ काही सोडलेली नाही. तिचे घर हे जणू काही आपल्याला आंदण मिळाले आहे अशा अविर्भावात ह्या मांजरी तिच्या घरात हिंडत असतात. घरातल्या सोफ्यावर बसण्याचा पहिला मान त्यांचा असतो. घरी आलेल्या पाहुण्यांनी कुठे बसावे बरे हा विचार करण्यात या मांजरी बिलकुल आपला वेळ खर्ची घालत नाहीत. ते त्यांचे बघून घेतील असा एकूण त्यांचा तोरा असतो. सोफ्यावर थोड्याशा जागेत आपण आपलं बस्तान बसवावं तर सोफ्यावर ऐसपैस पसरलेली मांजर आपल्याकडे रागावून बघत राहते. तिच्या या रोषाचा सामना करण्याइतके धीट आपण खचितच नसतो त्यामुळे मग आपल्याला बसण्यासाठी इतर ऑप्शनचा विचार करावा लागतो. 
माझी आत्या मांजरींशी खूप खेळते. त्यांच्याशी गप्पा मारते. प्रसंगी त्यांना रागावते, क्वचित एखादी चापटीसुद्धा मारते. पण या गोष्टीचे मांजरींना जराही वाईट वाटत नाही. आम्ही चार दिवस आत्याकडे राहायला म्हणून गेलो होतो. त्यावेळेस एक मिनू नावाची मांजर आत्याकडे यायची. ह्या मिनूला इतर खाद्यपदार्थांचे जरा वावडेच होते. माझी आत्या पूर्णत: शाकाहारी असल्याने तिच्याकडे येणाऱ्या मांजरींच्या मांसाहारी अपेक्षा नसायच्या. पण दूध, दहीभात असे सर्वसाधारण मांजरींचे आवडते पदार्थही तिला रुचायचे नाहीत. गोड पदार्थही तिच्या खास आवडीचे नव्हते. पण ज्या एकमेव पदार्थाची ती जबरदस्त fan होती तो पदार्थ म्हणजे मक्याचे कणीस आणि तेही अमेरिकन स्वीट कॉर्न ! ती आली की घरभर आधी कणीस शोधत, हुंगत रहायची. आत्याने कणीस उकडायला लावलेलं असायचं. त्या वासाने तिच्या तोंडाला पाणी सुटायचं.  ती ते कणीस पूर्ण उकडून होईपर्यंत घरात येरझारा घालत रहायची. एकदा का ते कणीस कुकरमधून तिच्या प्लेटमध्ये आलं की ती विलक्षण खुशीत यायची. ते गरमागरम कणीस निवावे म्हणून ती ते तोंडाने इथून तिथे ढकलत रहायची. आता ते कणीस आणि ती या व्यतिरिक्त तिला इतर जगाचं भानच नसायचं. त्या कणसाचा आस्वाद घेतल्यानंतरच मग मिशा चाटत ती मान वर करायची आणि सोफ्यावर पहुडायची.  त्या खाल्लेल्या रिकाम्या कणसाशीही ती बऱ्याचदा खेळत रहायची. पण बाहेर मक्याचे सोललेले दाणे मिळतात ते ती खायची नाही. अख्खे मक्याचे उकडलेले कणीस हे तिच्या लेखी परब्रम्ह!    
आज मिनू हयात नाही तरी मक्याच्या कणसाशी निगडीत असलेल्या तिच्या आठवणी पावसाळ्यात मक्याच्या गाड्या लागल्या की उफाळून वर येतात. गाडीवरील मक्याच्या कणसाची 'ब्रान्ड अम्बेसेडर ' म्हणून ती नक्की शोभली असती. 


No comments:

Post a Comment