अरे नव्वद टक्के मिळाले ना तुला मग आर्ट्सला का जातो आहेस अशी विचारणा सुशिक्षित म्हणवणारयांकडून केली जाते. वास्तविक पाहता कोणत्याही शाखेचे शिक्षण घेणे ही काही लज्जास्पद किंवा कमीपणाची गोष्ट नसते. ज्याला किंवा जिला कमी टक्के तीच मुलं फक्त आर्ट्स किंवा होम सायन्स घेणार असा काही राष्ट्रीय अथवा जागतिक नियम नाही. परंतु अनेक गोष्टींविषयीचे अज्ञान, अनभिज्ञता समाजात असते त्यामुळे मार्कांच्या टक्केवारीचा आणि शैक्षणिक शाखेचा संबंध अकारण जोडला जातो.
जेमतेम सत्तर टक्के मिळवणारा मुलगा सायन्स घेण्याच्या लायकीचा नसतो, तो फक्त आर्ट्स हीच शाखा निवडू शकतो हे कोणी ठरवायचं ? मुळातच शालान्त परीक्षेची टक्केवारी ही सरसकट सगळ्या विषयांची असते. गणित आणि शास्त्र या विषयांत उत्तम मार्क असूनही जर इतर विषयांत कमी मार्क मिळाले असतील तर त्याचा परिणाम एकूण टक्केवारीवर होतो. त्याचप्रमाणे भाषा किंवा सोशल स्टडीज मध्ये उत्तम मार्क पण गणित-शास्त्र या विषयांत कमी मार्क अशी परिस्थितीही असू शकते. शेवटी परीक्षा म्हणजे त्या त्या वेळी दिलेला एक परफॉरमन्स असतो. बऱ्याचदा एखाद्या विषयाची चांगली तयारी करूनही त्या विषयाचा पेपर मनासारखा जात नाही. उलटपक्षी एखादा विषय अगदी साधारणच तयार असला तरी त्या विषयाचा पेपर मात्र सोप्पा जातो. पश्नांचे काठिण्य किंवा सुलभता यावर लिहिलेल्या उत्तराचे भविष्य निश्चित होत असते.
मुळात आर्ट्स असो सायन्स असो वा कॉमर्स, मुलांनी अभ्यास करणे महत्वाचे असते. त्या त्या विषयावर मेहनत घेणे गरजेचे असते. विषय कोणताही असो तो समजून घेणे अत्यावश्यक असते. गणित-शास्त्राचा गंध नसलेली मुले ढ मग इतिसास-भूगोलाचा अथवा भाषेचा गंध नसलेली मुले कशी हुशार ठरतात? कोणत्या बेसिसवर असं ठरवलं जातं की सायन्स घेणारा तेवढा हाय प्रोफाईल , कॉमर्स घेणारा ओके ओके पण आर्ट्स घेणारे केवळ डाऊनमार्केट ? शिक्षणासारख्या पवित्र समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात ही लाजिरवाणी वर्गवारी का?
शालान्त परीक्षेत नेत्रदीपक मार्क मिळवलेले सगळेच काही भविष्यात हिऱ्यासारखे चमकताना आढळत नाहीत आणि भविष्यात हिऱ्यासारखे चमकणारे सगळेच काही सायन्स या शाखेचे असत नाहीत. सायन्स घेतलेत तरच भविष्य उज्ज्वल होईल असा 'सुविचार' फक्त मुलांच्या किंवा त्यांच्या पालकांच्या मनात असतो. स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी तो किंवा ती अमुक एका शाखेचीच असण्याची गरज नसते.
आपल्या देशात आर्ट्स या शाखेला मर्यादित ओपनिन्ग्ज आहेत हा ती शाखा निवडणारयाचा दोष असू शकत नाही. आपल्याकडे ह्युमन सायकोलॉजी एवढाच विषय मानसशास्त्र या विषयांतर्गत शिकवला जातो परंतु अनिमल सायकोलॉजी या विषयातील शिक्षण परदेशात उपलब्ध आहे. सोशल सायन्सेसच्या विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेसारख्या देशात प्रचंड संधी आहेत. विषय कुठलाही निवडा पण त्या विषयातील आपली गती, आपला अभ्यासू दृष्टीकोन महत्वाचा असतो.
शाळेपासून हे जे वर्गवारीचे बीज मुलांच्या कोवळ्या, निष्पाप मनात रोवलं जातं ते व्यक्तीच्या तसंच समाजाच्या दृष्टीने अतिशय हानिकारक असतं. 'अ' वर्गातील मुले ज्याप्रमाणे इतर तुकड्यांतील मुलांकडे तुच्छतेने पाहतात त्याचप्रमाणे सायन्स घेतलेली मुले आर्ट्स शाखेतील मुलांकडे पाहतात. हे अपरिपक्व विचारांचं फलित आहे. डॉक्टर झालेली मुले जेव्हा डॉक्टरकी स्वेच्छेने सोडून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करून तिथे यशस्वी होतात तेव्हा या यशाला कोणता निकष लावायचा? पालकही या शैक्षणिक वर्गवारीस स्वत:च्या वर्तनाने जाणते-अजाणतेपणी हातभार लावत असतात. शिक्षणाची शाखा कोणतीही असो तिचा यथायोग्य आदर केलाच पाहिजे. आपली वाट तेवढी उत्कर्षाची आणि इतरांची अपकर्षाची ही खोटी प्रौढी, अहंमन्यता नेस्तनाबूत व्हायला हवी.
मुलांच्या पंखांत जर प्रामाणिकपणाचे, मेहनतीचे, अभ्यासू वृत्तीचे बळ असेल तर त्यांची शैक्षणिक शाखा कोणतीही असो, त्यांची भरारी ही उत्तुंगच असेल !
No comments:
Post a Comment