हल्ली जवळजवळ अनेक वाहिन्यांवर आध्यात्मिक बुवांचा सुकाळ झाला आहे. दिवस कसा घालवावा, दैनंदिन व्यवहार कसे करावेत, आचरण कसे ठेवावे अशा कैक गोष्टींसंबंधी हे बुवा उपदेश करत असतात. यांचा आलिशान थाट असतो. उत्तम बडदास्त असते. अनेक सेवक यांच्या दिमतीला असतात. हे महागड्या गाड्यांतून फिरतात. मोठमोठे हॉल, लाउडस्पीकर आणि भोवती जमलेले भक्तगण हे यांचे भांडवल असते. थोडक्यात यांचे अध्यात्म भलतेच गुबगुबीत, मखमली आणि ऐश्वर्यसंपन्न असते.
हे लोकांचे जगणे सुसह्य आणि सोपे करणार असतात. लोकांच्या मनात दडलेल्या असंख्य प्रश्नांना पूर्णविराम देण्याचे काम हे करणार असतात. लोकांना मानसिक आधार देणार असतात. यांच्याकडे येणाऱ्या जनसमुदायाकडे जर कटाक्ष टाकला तर असे लक्षात येते की यांच्या प्रवचनांना हजेरी लावणारी भक्तमंडळी ही चांगल्या सामाजिक वर्गातील असतात. चांगल्या आर्थिक स्तरातील असतात. शिक्षित असतात. नोकरदार आणि व्यावसायिक असतात.
सुस्थितीत असलेल्या लोकांनाही समस्या भेडसावतच असतात. त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांना या आध्यात्मिक बुवांकडे येणे क्रमप्राप्त असते. कुणाला जागेची, कुणाला पैशांची, कुणाला मुलाबाळांची, कुणाला आजाराची चिंता पोखरत असते. त्यांच्या काळज्या, त्यांच्या चिंता, त्यांचे व्यापताप या बुवांना सांगायला ही माणसे कोण आतुर झालेली असतात. आपल्याला हमखास उत्तर मिळेल व आपली चिंता समूळ नष्ट होईल अशी यांना शंभर टक्के खात्री असते.
आर्थिक सुस्थिती नसलेल्या माणसांसाठीही वेगळे बुवा-बाबा असतात. जितके दैन्य जास्त तितक्या अडचणी जास्त असतात. तितका स्वत:वरचा विश्वास डळमळीत होण्याचा संभाव जास्त असतो. आत्मविश्वास लयाला गेलेले, खंतावलेले, जिणे नकोसे झालेले मग अशा बुवा-बाबांच्या नादी लागतात. ते सांगतील ते यांच्यासाठी ब्रम्हवाक्य होऊन बसते. बाबांद्वारे दिले जाणारे उदी, अंगारे-धुपारे, गंडे-दोरे-ताईत, अंगठ्या यांच्यात ते मानसिक आधार शोधू लागतात. आपली वंचना होते आहे, आपण फसवले जात आहोत हे यांच्या गावीही नसते.
आपण सगळेच 'भगवान' असल्याची खात्री हे बाबा सर्व भक्तगणांना सतत देत असतात. जर प्रत्येक जणच भगवान आहे तर प्रत्येकाला त्याच्यातील सामर्थ्याची प्रचीती का येत नाही ? स्वत:च्या आत्मिक प्रगतीसाठी का कोणावर अवलंबून राहावं लागतं? परमेश्वरी चैतन्याचा अंश जर प्रत्येकात आहे तर मग त्यांची अनुभूती घेण्यासाठी कोणा बुवा-बाबांकडे जाण्याची गरजच काय? हे प्रश्न कुणालाच कसे पडत नाहीत याचे सखेद आश्चर्य वाटते.
एक बाई पृच्छा करते, 'मी खूप अडचणीत आहे, मला अमुक अमुक चिंता खूप भेडसावते आहे. बाबा अशा परिस्थितीत मी काय करू?' बाबा उपदेश करतात, ' तू तुझ्याहून जास्त अडचणीत असलेल्या लोकांकडे बघ. त्यांची दु:खे जाणून घे. तू आपोआप सुखी होशील.' बाबा इतक्या चलाखीने तिच्या वैयक्तिक प्रश्नाला बगल देऊन किंवा त्या प्रश्नावर कोणताही उपाय न सांगता तिला सुखी होण्याचा हा मूलमंत्र देतात. मुळातच सुख काय किंवा दु:ख काय या सापेक्ष संज्ञा आहेत. जसा कुणीतरी आपल्यापेक्षा अधिक सुखी असतो तसा कुणीतरी आपल्यापेक्षा जास्त दु:खीही असणारच! प्रत्येकाच्या सुख-दु:खाच्या कल्पनाही ज्याच्यात्याच्या असतात. आपण दु:खी का आहोत हे आपल्याव्यतिरिक्त इतर कोणालाही कळणे अवघड असते. पण बाबांनी दिलेल्या त्या 'हुशार' उत्तराने आपण भलतेच खुश होतो आणि बाबांवरील आपली श्रद्धा अधिक दृढ होते.
हातवारे करणे, डोळे मिचकावणे, सारखे खांदे उडवणे, भक्तांनी हसत राहावे म्हणून प्रत्येक गोष्टच हसण्यावारी नेणे, भक्तांकडून देणग्या उकळणे, धनिक आणि निरुपद्रवी भक्त पुन्हा पुन्हा आपल्याकडे येत रहावा म्हणून नाना क्लुप्त्या योजणे आदी गोष्टी हे बुवा-बाबा नित्यनेमाने करत असतात. उंची रत्नजडीत सिंहासनावर बसून हे बाबा स्वत:ला खरोखरीच परमेश्वर समजायला लागलेले असतात. हे बाबा म्हणजे निरनिराळे आध्यात्मिक 'brands'
असतात. त्यांच्या नावाची पत्रके, पुस्तिका, मासिके, सी.डी. निघतात. उच्चभ्रू घराण्यातील, नामांकित क्षेत्रातील मंडळी ही यांची टार्गेट्स असतात. आम्ही लोकांची सेवा करतो असे म्हणत म्हणत हे बाबा लोकांनाच त्यांची सेवा करायला लावतात. 'जितकी सेवा तितके पुण्य' असा बाबांचा संदेश असतो. आपल्याला भरमसाट पुण्य मिळावे म्हणून हे धनिक त्यांच्या थैल्या जरा जास्तच सैल करतात आणि मग अशा अध्यात्म्याला आर्थिक सूज येते.
या सर्व बुवांनी किंवा बाबांनी जमवलेली माया करोडोंच्या घरात असते. लोकोद्धाराचा, जनोद्धाराचा,समाजकल्याणाचा वसा ज्यांनी घेतलेला असतो किंवा सामान्यांचे जे आध्यात्मिक हितकर्ते असे स्वत:ला म्हणवतात त्यांना हा अवाजवी माया जोपासण्याचा छंद हवाच कशाला? लोकांना अध्याम्याची संथा देणारा अंतर्बाह्य निर्मळ हवा, निरिच्छ हवा, नि:संग हवा. लोकांना ब्रम्हज्ञान देणारा आणि मायेचा उपासक ? उंची गाड्या, बेहिशेबी दौलत, जमिनी, श्रीमंती पण हिडीस शौक ही काही सच्च्या आध्यात्मिक गुरूंची लक्षणे नव्हेत.
आपण कोणाला आपल्या गुरुपदी बसू द्यायचं हा विचार सुज्ञांनी करावयाचा ! अध्यात्मज्ञान म्हणजेच आत्मज्ञान. ज्या गुरूचा शोध घेत आपण व्यर्थ अनेक बुवा-बाबांच्या मठांचे उंबरठे झिजवत असतो तो आध्यात्मिक गुरु आपल्या आत, आपल्या अंत:करणात सदा विराजमान आहे. असा हा परमेश्वरी चैतन्याचा स्त्रोत प्रत्येकाच्या आत स्त्रवत असताना अशा भौतिक भोगांना चटावलेल्या आध्यात्मिक बुवांचे दर्शन घेण्याची आवश्यकताच काय असा विचार करण्याइतपत आत्मभान येण्याची आज नितांत आवश्यकता आहे.
धन्यवाद निशाजी, आपण आपले जाज्वल्य विचार खूपच छान व स्पष्ट लिहिलेले आहेत खरच समाजातील या बुवा आणि आध्यात्म याविषयी चे अज्ञान आपण समाजापुढे मांडण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. परंतु याही पुढे जावून आपण खरे अध्यात्म काय असते व खरा देव काय असतो किंवा असतो कि नाही खरा धर्म किंवा खोटा धर्म याबद्दल हि थोडी माहिती किंवा आपला अनुभव येथे नमूद केला तर आमच्या सारख्या अज्ञानांना खूपच फायदा झाला असता. आणि खर सांगू तर आपल्याकडे खूप अलोकिक ज्ञान आहे असे समजवून परत भरपूर लोक आपल्या पर्यंत पोहचतील व परत एक आश्रम किंवा मठाची निर्मिती ओघानेच झाली असती. आपली कळकळ पाहून बरे वाटले परंतु सत्याचा उलगडा नाही होत म्हणून उदासीन हि वाटले. काय करावे जीवनातील दुख तर कमी असायलाच पाहिजे सर्वाना आनंद किंवा समाधान हवे आहे आणि काही केल्या ते मिळत नाही म्हणूनच समाज या असल्या बुवा व बाबांचा आधार घेतो ना ? कारण समाजाला हवा असतो वरवर चा आधार आणि बुवांना हवा असतो लोकिक आणि पैसा दोघांचेही काम होते.
ReplyDeleteम्हणून म्हटले आहे
पानी पिना छानके और गुरु करना पहेचान के
खरं तर संतांचे विचारच आपली समाजाला तारून नेवू शकतात खरी तळमळ संतांनाच होती
बुडता हे जन न देखवी डोळा म्हणुनी कळवळा येत असे
संतांचे विचार हेच मार्गदर्शक आहेत व त्यातुनच समाजाला खरे अध्यात्म काय खरा देव काय खरा धर्म काय याची जाणीव होईल व त्या परमेश्वराची प्रचीती येईल. असे वाटते.अर्थात हे माझे मत आहे.