बैसतो मी देव्हाऱ्यात
सोन्या-चांदीच्या वेढ्यात
रोज उपास-तापास
नैवेद्यांचीही खैरात
भाळी माझिया चंदन
धूप-दीप, पुष्पमाला
बासनातल्या पोथीचा
कोंदाटून येतो गळा
फुले वाहता वाहता
तोंडी अश्लाघ्य व्यापार
जळमटे वर्तनाची
मला करिती बेजार
सून अथक रांधते
सासू तोंडाळ पिडते
लेक पुरता दुर्वास
मुले अविचारी भुते
कुठे मामला उलट
सून करी सासुरवास
आधुनिकता, विद्वत्ता
यांचा अनाठायी सोस
सणासुदीच्या दिवशी
भलतीच सजावट
माझ्या कृपादृष्टीसाठी
ह्यांची कोण खटपट
उसळतो गदारोळ
रात्रंदिस माझ्यापुढे
धक्काबुक्की, रेटारेटी
अंदाधुंदी चोहीकडे
लोटांगण माझ्यापुढे
डोळ्यांत छटा फसवी
होतो का कुणी संन्यासी
वस्त्रे नेसून भगवी?
भक्त भोग लावतात
नवसाचे बोलतात
वृष्टी लाचेची करत
माझ्यावर अव्याहत
नवी तऱ्हा क्यासेटची
पारायणे गायत्रीची
झाला देवांचा बाजार
घसरण पुण्याईची
काय पुजेची ही रीत
रूढ जनमानसांत ?
कसे उजळावे दीप
मांगल्याचे अंतरात ?
झालो पुरा हतबल
पण उठता येईना
आता गाठ माणसाशी
कुठे आधार दिसेना
कसा होऊ कृपावंत
किती आवरू प्रक्षोभ
देवत्वाचे हे प्रारब्ध
माझे मला लखलाभ
संकटे ही कोसळती
तरी उतती, मातती
माझ्यातल्या सामर्थ्याची
अशी येते का प्रचीती
होतो निवृत्त आता मी
द्यावी एवढीच भिक्षा
सुळावर देवपण
रद्द करावी ही शिक्षा
No comments:
Post a Comment