Sunday, 11 December 2011

राजकारण्यांचा 'The End' नसणारा सुपर 'डर्टी' पिक्चर

'बालाजी' निर्मित आणि विद्या बालन 'हिरो' असलेला डर्टी चित्रपट अडीच तासात संपण्याची शाश्वती आहे परंतु सत्ताधारी आणि विरोधक जनतेला दाखवत असलेला सुपर डर्टी चित्रपट कधीही समाप्त होण्याची शाश्वती नाही. पोटाची भूक शमविण्यासाठी आणि पैसा व प्रसिद्धीची लालसा असणारी 'सिल्क' अध:पतनाच्या खाईत लोटली जाते, परतीचे मार्ग केव्हाच बंद झालेले असतात, तिच्याकडे बघण्याची समाजाची दृष्टी निव्वळ एक भोगवस्तू  एवढीच आहे हे ही तिला कळून चुकते आणि मग व्यसनाधीन सिल्क  स्वत:चे अस्तित्व या जगातून कायमचे पुसून टाकते. पण हे अस्तित्व पुसून टाकताना एकवार आपली साडीतली सोज्वळ प्रतिमा  ती आरशात न्याहाळते. अंगावरचे कपडे बेधडकपणे उतरवून लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिटवणारी सिल्क स्वत:ला अंगभर कपड्यांत शेवटची साठवू पाहते. तिची ही केविलवाणी धडपड पाहताना अंगावर काटा उभा राहतो. या शोकांतिकेला पैसे मोजून प्रेक्षक अडीच तास इच्छा असेल तर स्वीकारतात पण वर्षानुवर्षे सामान्य जनतेला नागवे करून स्वत:चे स्विस बँकेतील खाते फुगावणाऱ्या राजकारण्यांना मात्र लोकांची इच्छा असो व नसो स्वीकारावेच लागते. 
भ्रष्टाचाराच्या कुविख्यात मार्गावरून चालतानाही आपले पाऊल वाकडे पडते आहे याची क्षिती राजकारण्यांना वाटत नाही. सामाजिक,नैतिक अध:पतन वगैरे शब्द यांच्या शब्दकोशातून कायमचे गायब झालेले असतात. एकमेकांवर दोषारोप करून शाब्दिक वस्त्रहरण करणे, देशातील जनतेला सतत असुरक्षिततेच्या वातावरणात अडकवून ठेवणे, देशातील अति गंभीर समस्यांचे तातडीने निवारण करण्यात प्रचंड चालढकल करणे, देशांतर्गत जातीयतेची बीजे रोवून एकात्मतेची शकले पाडणे आदी कार्यक्रम राजकारण्यांच्या अजेंड्यावर सर्वप्रथम असतात. मोठमोठी भाषणे ठोकून जनतेला प्रभावित करायचे, मोठमोठी आश्वासने देऊन कामकरी,चाकरमानी यांना तात्पुरते खुश करायचे, सवलतींचे आमिष दाखवून गरिबांना आपल्याच पक्षाला मते द्यायला प्रवृत्त करायचे, सोयीसुविधांची आकर्षक चित्रे जनतेच्या डोळ्यांना दाखवायची, अमका कर तमका कर जनतेवर लादून स्वत: मात्र करबुडव्याची भूमिका बजावायची, भारताचे शांघाय करायच्या कैफात सामान्यांच्या प्रश्नांकडे सोयीस्कररित्या डोळेझाक करायची असे हे या सुपर डर्टी चित्रपटाचे न संपणारे कथानक आहे.
देशाच्या कोपऱ्यात कुठेही आणि केव्हाही घडणाऱ्या अपघातांचे,घातपातांचे भांडवल करून राजकारणातील उंट,घोडे,हत्ती,प्यादी यांच्यावर मात करायची हा ही वर्षानुवर्षे खेळला जाणारा राजकारण्यांचा मनोहारी खेळ आहे.  लोकांचे जीव जातात, माणसे लुळी -पांगळी  होतात, कुणाच्या कुटुंबातला आधार जातो, कुणी देशाच्या रक्षणासाठी कामी येतात, कुणी अनपेक्षित धक्क्याने मानसिक संतुलन हरवून बसतात पण यापैकी कुठल्याही समस्येशी या पुढाऱ्यांचे,नेत्यांचे देणेघेणे नसते. निवडणुका जवळ आल्या की निरनिराळी कधीच पूर्ण न होणारी आश्वासने द्यायची, जनतेपाशी मतांची भिक मागायची, रस्त्यातील खड्डे बुजवण्याची नाटके करायची, तेवढ्यापुरते कचऱ्यांचे ढिगारे जनतेच्या दृष्टीआड करायचे, नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ते उकरायचे,  दोन-चार बसेस,लोकल जादा सोडायच्या हा यशाचा हमखास मार्ग जवळजवळ बहुतांश राजकारणी थोड्याफार फरकाने अवलंबत असतात. 
याच राजकारण्यांच्या कृपेमुळे शिक्षणव्यवस्था भ्रष्ट होते, डोनेशन घेण्याची व्याधी तिला कायमची जडते, जीवघेण्या शैक्षणिक शर्यतीत अनेक निष्पाप विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडते, अभ्यासाच्या अवाजवी दबावाखाली आत्महत्यांचे पेव फुटते, शेतकरीराजा कर्जाच्या बोज्याखाली त्याचा जीव जाईपर्यंत पिचत राहतो, स्वत:चा जीव घेण्याची कल्पना त्याच्या डोक्याचा ताबा घ्यायला लागते, त्याच्या बायको-मुलांचा विचार न करता तो फक्त स्वत:च्या मृत्यूचा स्वार्थी विचार करू लागतो, निराशेच्या गर्तेत सापडलेल्या जीवांना व्यसने जिवाभावाची वाटू लागतात, कंपन्या बंद झालेले चाकरमानी कुटुंबासकट रस्त्यावर येतात, बॉम्बस्फोट, गोळीबार, राडे-दंगली  आपण कायमच असुरक्षित  असण्याची हमी देतात, जातीयवाद,प्रांतीयवाद  आपल्या उरावर बसतो, महागाई महामारीसारखी पसरून सगळ्यांचेच आर्थिक शोषण करते, गल्लोगल्ली साठलेला कचरा, वेगवेगळी प्रदूषणे जनतेला आजारी पडण्यास समर्थ ठरतात, हॉस्पिटल ही वास्तू एखाद्याला रोगातून मुक्त करू शकते पण हलगर्जीमुळे ओढवलेल्या अपघाताच्या योगातून सोडवू शकेल याची हमी देता येत नाही, लाचखोरी,चोरी,दलाली,अफरातफर ही कृत्ये सन्माननीय वाटू लागतात, भ्रष्टाचार केलेले,बलात्कार केलेले,हत्या केलेले  अपराधी एखाद्या हिरोच्या अविर्भावात वावरताना आढळतात.
डर्टी पिक्चरमधील सिल्कला निदान शेवटच्या क्षणी तरी स्वत:ची अंगभर साडीतली प्रतिमा न्याहाळावीशी  वाटते परंतु स्वत:ची मलीन झालेली प्रतिमा ओळखून ती सुधारण्यासाठी लागणारी निकोप  आणि धीट दृष्टी राजकारणी केव्हाच गमावून बसले आहेत.

No comments:

Post a Comment