Wednesday, 23 November 2011

मुलगा-मुलगी

तुम्हाला मुलगा झाला आहे असं डॉक्टरीण बाईंनी सांगितल्यानंतर आईच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसतो. नुसत्या आईच्या चेहऱ्यावर नाही तर प्रसूतीची वाट बघत बसलेल्या आप्तेष्टांच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य दिसतं. लढाई जिंकल्याच समाधान त्यातून प्रतीत होतं.  मुलगी झाली अशी बातमी कानी पडताच आनंद होतो खरा परंतु त्या आनंदात काहीतरी निसटल्याच शल्य असतं. मुलगी-मुलगा यातील तफावतीला इथूनच तर खरी सुरवात होते. 

कुलदीपक जन्माला आल्याचा आनंद गगनात मावत नसतो. असे कुलदीपक मोठे होऊन आई-वडिलांची जबाबदारी झटकून,परदेशी जाऊन आपापला संसार थाटून राहिले तरीही घराण्याला शोभा आणण्यासाठी,वंश पुढे नेण्यासाठी मुलगा हा हवाच!
मुलींनी आई-वडिलांचे कितीही करायचा प्रयत्न केला तरी शेवटी त्या परक्याचे धन या बिरुदावलीखालीच राहतात. वास्तविक पाहता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज स्त्रियाही कामे करतात,जबाबदाऱ्या समर्थपणे पेलतात,घर आणि ऑफिस अशी दुहेरी  'टास्क' सांभाळतात. मुलांचे भविष्य घडवतात. असे असतानाही कर्त्याच्या भूमिकेचा मान मात्र  समाज पुरुषालाच बहाल करायला उत्सुक असतो. 
पुरुष आणि स्त्री मधला शारीरिक फरक वगळता आज स्त्री कुठल्याही पद्धतीने पुरुषापेक्षा कमी नाही. उलटपक्षी मानसिकदृष्ट्या स्त्रीच पुरुषापेक्षा जास्त खंबीर असते. स्त्रिया 'multi-tasking' जास्त उत्तम रीतीने करू शकतात. 
लहानपणापासून घरगुती लहानसहान कामे मुलींनाच शिकवली जातात. चहाच्या कपबश्या विसळणे,केर काढणे,जेवणाची ताटे घेणे, धुतलेल्या कपड्यांच्या घड्या करणे, फर्निचर पुसणे, झाडझूड करणे वगैरे. मुली वयात आल्यावर जास्त हसण्या-खिदळण्यावर निर्बंध येतात. मुलांशी बोलणे,गप्पा मारणे गैर समजले जाते. कपडे कोणते घालावे,कसे बोलावे, कसे चालावे,कसे वागावे याबद्दल शाळा घेतली जाते. दिवेलागणीनंतर बाहेर राहण्याची मुभा मुलींना फारशी दिली जात नाही. 'आज ना उद्या तुझं  लग्न होईल आणि तू दुसऱ्या घरी जाशील. तिथे असं वागून कसं चालेल?' ही समज मुलीला सातत्याने  देण्याचे महत्कार्य आई-वडील करत असतात. मुलाने मात्र घरी केव्हाही यावे,इतरांशी गप्पा-टप्पा हाणाव्या,घराच्या कामांमध्ये लक्ष घालू नये असा अलिखित नियम असावा. आजही ऑफिसमधून थकूनभागून आलेला नवरा घरी आल्यावर पंख्याखाली पाय पसरून पेपर वाचत बसतो आणि त्याच्या इतक्याच थकूनभागून आलेल्या बायकोकडून आयता चहा पिण्यात धन्यता मानतो वर पुन्हा एखाद्या चमचमीत डीशची फर्माईश करण्यातही त्याला गैर काहीच वाटत नाही.  घरची गाडी असल्यास बहुतेककरून  पुरुषच ती घेऊन ऑफिसला जातात आणि बायका मात्र लोकलमध्ये अनेकांचे धक्के खात लोंबकळत प्रवास करतात. 
सकाळी उठल्यापासून घरातील सगळी कामे बाईनेच हातावेगळी केली पाहिजेत असा नियम कोणत्या कायद्याच्या पुस्तकात आहे? जसा तिचा संसार असतो तसा आणि तेवढाच त्याचाही नसतो का? तिची मुले त्याचीही असतातच ना? मग त्यांना शाळेसाठी तयार करणे,त्यांचा नाश्ता,खाऊचा डब्बा तयार करणे,त्यांचा अभ्यास घेणे,त्यांची दुखणी-खुपणी काढणे,त्यांच्यावर चांगले संस्कार करणे ही जबाबदारी फक्त तिचीच कशी? त्याच्या आई-वडिलांना तिने मान देणे खचितच गरजेचे पण तिच्या आई-वडिलांना मान देणे त्याच्यासाठी कसे गरजेचे नाही?  
मुलगा आणि मुलगी म्हणून आपल्या मुलांना वाढवण्यापेक्षा त्यांना सुजाण नागरिक म्हणून घडवणे हे आई-वडिलांचे आद्य कर्तव्य असले पाहिजे असे मला वाटते. खाण्या-पिण्यासारख्या गोष्टींपासून  ते स्वत:च्या पायांवर भक्कम उभे राहण्यासाठी मुलगा-मुलगी हा निकष न लावता आई-वडिलांनी त्यांना सक्षम बनवले पाहिजे. वर्गभेद,वर्णभेद,लिंगभेद यांचा अतिरेक समाजहितासाठी घातक ठरू शकतो या गोष्टीचे भान असू द्यावे. दुर्लक्षित राहिलेली ,उपेक्षिलेली , फारकतीच्या झळा सोसलेली कोणत्याही घरातील,थरातील,स्तरातील मुलगी ही एकतर सोशिकतेच्या भावनेने अन्याय सहन करत आयुष्यभर पिचत राहते नाहीतर या समाजाप्रवाहाविरुद्ध बंड करून उठते. मुला-मुलींना संतुलित रीतीने,सम्यक भावाने जगायला शिकवणे हे ज्या दिवशी आई-वडील ठरवतील तो दिवस जगाच्या इतिहासातील 'सोनियाचा दिवस' ठरेल!  

No comments:

Post a Comment