Monday, 19 December 2011

हॉस्पिटल

माझ्या आत्याच्या 'Thalium' टेस्टच्या निमित्ताने मला माहीमच्या 'हिंदुजा' हॉस्पिटलमध्ये जाण्याचा योग आला. ही हिंदुजा हॉस्पिटलची वास्तू माहीम चौपाटीला जवळजवळ लागून आहे. हॉस्पिटल भव्य आहे, स्वच्छ आहे, टापटीप आहे ,शिस्तशीरही असावं बहुतेक!  थोडक्यात बघणेबल आहे. लीलावती,हिंदुजा,जसलोक,ब्रीच क्यांडी,अंबानी ही हॉस्पिटल्स सुद्धा अद्ययावत सोयींनी सुसज्ज आहेत, मुंबईची शान आहेत असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. पण तरीही हॉस्पिटल हे शेवटी हॉस्पिटलच! जे.जे. काय,वाडिया काय, के.ई.एम काय,नानावटी-कूपर काय किंवा लीलावती-हिंदुजा-अंबानी काय! ती काही प्रेक्षणीय स्थळे होऊ शकत नाहीत. एखाद्या रविवारी उठून आपण चला चला एक्सेलवल्डला जाऊया तद्वत चला चला आपण लीलावतीला जाऊया,हिंदुजाला जाऊया असं खासच म्हणणार नाही.       
या टेस्ट ज्या विभागात केल्या जातात तिथे आम्ही वेळेवर पोहोचलो. काउंटरवर पैसे भरले, पावती घेतली आणि आतमध्ये गेल्यावर रुग्णाची वैद्यकीय माहिती असलेला फॉर्म भरून दिला. सगळे सोपस्कार पार पडले आणि आता वेळ होती प्रतीक्षेची! थोड्याच वेळात माझ्या आत्याला टेस्टसाठी आतमध्ये नेण्यात आले आणि मी व माझी बहीण बाहेरील कक्षात बसून राहिलो. हॉस्पिटल भलतेच वातानुकुलीत असल्याने प्रचंड गारठा जाणवू लागला. हळूहळू इतर रुग्ण त्यांच्या त्यांच्या नातलगांसह येऊ लागले. आम्ही या वातावरणाला नवखे असलो तरी इतर मात्र बऱ्यापैकी सरावलेले असावेत. त्यांच्याकडे रिपोर्टच्या थप्प्या होत्या. मानसिक तयारी होती. आतील जीवघेण्या थंडीपासून स्वत:ला वाचवण्यासाठी त्यांनी शाली आणल्या होत्या. आजूबाजूला वावरणारे ज्युनियर डॉक्टरही त्यांच्या परिचयाचे होते.    
माझी मामेआत्या सुरतेची. तिचे जवळचे असे कुणी नाही. तिची वृद्ध आईही काही महिन्यांपूर्वी निवर्तलेली! आत्या मुलखाची घाबरट. तिच्या शरीरात तिच्या म्हणण्याप्रमाणे वस्तीला बरेच किरकोळ आजार. बीपी,डायबेटीस या तिच्या नातलगांनी केव्हाच वर्दी दिलेली! इसीजी काढला आणि स्ट्रेस टेस्ट करण्याचा सल्ला तिला दिला गेला. तिच्या मनात या स्ट्रेस टेस्ट विषयी प्रचंड भीती कारण तिच्या ओळखीचे तीनजण ही टेस्ट करतानाच गचकले होते. अन्जिओग्राफि करायची नव्हती त्यामुळे मग तिच्या वाट्याला ही 'Thalium' नावाची टेस्ट आली. तिच्या म्हणण्याप्रमाणे सुरतेला ह्या विशिष्ट टेस्टचं नावही कुणी ऐकलेले नाही. त्यामुळे मुंबईला येणं तिला भाग होतं. तिची काळजी, त्या अपरिचित टेस्ट विषयीची धाकधूक आमच्या मनात होती. 
तास झाला,दोन तास झाले तरी टेस्ट संपत नव्हती. ती फक्त एका रूममधून  दुसऱ्या रुममध्ये जाताना आम्हाला दिसत होती. इकडे ही प्रचंड वातानुकुलीत थंडी आमची टेस्ट घेत होती. शाली पांघरणारे आमची अवस्था नजरेने टिपत होते. अंगावर आलेले काटे पुन्हा पुन्हा निरखणे, उठून उठून बाथरुमला जाणे,डॉक्टर,नर्सेस,आया यांची धावपळ बघणे असा आमचा टाईमपास सुरु होता. आत्या बरी असेल ना, तिला काही होणार नाही ना, तिचे रिपोर्ट्स नॉर्मल येतील ना अशा चिंता करण्यातही बऱ्यापैकी वेळ जात होता.   
एका विशिष्ट प्रकारचं रसायन किंवा द्राव नसांद्वारे शरीरात सोडला जातो आणि मग त्याबरहुकूम हृदयातील हालचाली सूक्ष्मरित्या टिपल्या जातात. स्क्रीनवर सगळ्या घडामोडी रुग्णाला पाहता येतात. या घडामोडींचा तपशील म्हणजे रिपोर्ट. तो उलगडून सांगण्यासाठी निष्णात डॉक्टर्स असतातच! नंतर त्यानुसार पुढील उपाययोजना केली जाते. त्यामुळे ही टेस्ट होऊन,त्याचे रिपोर्ट्स येऊन, त्या रिपोर्टमध्ये काय दडलेलं आहे हे जोपर्यंत डॉक्टर सांगत नाहीत तोपर्यंत अनेक शंका-कुशंकांना जागा होती. अनुकूल-प्रतिकूल विचारांना थारा होता. आत्याचा घाबरलेला चेहरा सारखा नजरेसमोर येत होता. तसं तिचं काही वाईट होणार नाही असं मन म्हणत असतानाच असं काही झालंच तर प्रथम कुणाला सांगायचं याच्या नोंदीही मनातल्या मनात तयार होत होत्या. 
तिथे नेहमीच येणारे जरा खाली जाऊन चहा वगैरे घ्या म्हणजे बरं वाटेल असा सल्ला देत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. आम्ही खाली गेलो आणि पोटाला चहा-खाण्याचा आधार दिला. थंडीची भीषणता थोडी कमी झाली. पायही मोकळे झाले. दिवस वर येत होता तशी लोकांची वर्दळही वाढत होती. बरेच लोक बाहेर तिष्ठत बसले होते. काही समुद्र न्याहाळत डोळ्यातल्या पाण्याला वाट करून देत होते. पोर्चमध्ये गाड्याच गाड्या उभ्या होत्या. तो नजारा काही वेळ बघितला आणि आम्ही पुह्ना वर आलो. वरच्या परिस्थितीत जराही बदल नव्हता. स्वागत कक्षात माणसे खोळंबली होती. आतमध्ये रुग्णांच्या टेस्ट सुरूच होत्या. अंगाभोवातीच्या शाली आणखीनच घट्ट झाल्या होत्या. आमच्या प्राक्तनात आणखी कुडकुडणे लिहिलेले होते. 
एका गुजराती कुटुंबातील स्त्री आजारी होती. तिच्या पोटात ट्युमर होता. दोन वर्षांपासून अनेक टेस्ट होत होत्या. अनेक डॉक्टरांचे उंबरठे झिजवूनही हा ट्युमर काढावा की न काढावा याविषयी एकवाक्यता होत नव्हती. त्या रुग्णाची फाईल वेगवेगळ्या रिपोर्ट्सनी ओसंडून वाहत होती. डोळे मिटून शांत बसणे, देवाचे नाव आळवणे,पुन्हा एकदा रिपोर्टची प्रतीक्षा करणे यापलीकडे त्या कुटुंबाच्या हातात काहीच नव्हते. एका लहान मुलीला किडनीचा आजार होता. तिच्या सततच्या होणाऱ्या टेस्ट मुळे त्या मुलीचे आई-वडील हैराण झाले होते. मुलीला आपल्याला सारखे सारखे इकडे का आणले जाते हे कळण्याइतपत  ती मोठी नसल्याने रडत होती आणि आई-वडिलांच्या विमनस्कतेत भर पडत होती. या आजारावर उपाय शोधण्यात डॉक्टरांना यश आलं नव्हतं. कसनुसा झालेला तिच्या आईचा चेहरा, तिच्या डोळ्यांत वारंवार येणारं पाणी बघताना आम्हाला गलबलून येत होतं. या हॉस्पिटलच्या पोटात अशा कितीतरी  करुण  कहाण्या दडलेल्या होत्या. 
सरतेशेवटी आमची सहा ते सात तासांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली आणि माझी आत्या त्या टेस्ट मधून तावून सुलाखून सुखरूप बाहेर आली. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट्स मिळाले, ते नॉर्मल असल्याची ग्वाही डॉक्टरांनी दिली आणि विजयी मुद्रेने माझी आत्या सुरतेला परतली देखील! तिथल्या भयानक थंडीचे परिणाम मात्र नंतर आठवडाभर सर्दी-खोकल्याच्या रुपात आम्हाला भोगायला लागले. 
त्या रात्री झोपताना या अशा हॉस्पिटल्स मधलं जग पुन्हा अनुभवायची पाळी आणू नकोस अशी प्रार्थना करायला मी विसरले नाही.

No comments:

Post a Comment