Sunday, 18 December 2011

पतीचा छळवाद वर्षानुवर्षे निमुटपणे सोशीत जगणाऱ्या तमाम स्त्रियांना .........


कालपासून नुकतीच 'Life OK' नावाच्या channel वर सौभाग्यवती भव: ही मालिका सुरु झाली आणि वर्षानुवर्षे चावून चावून चोथा झालेला तो विषय पुन्हा एकदा ऐन प्रवाहात आला. स्त्री मग ती कुठल्याही सामाजिक, आर्थिक स्तरातील असो, छळवादासाठी तिचे स्त्री असणे हेच पुरेसे असते. चांगले सुशिक्षित,संस्कारित माहेर लाभलेली स्त्री या पुरुषी छळवादाला बळी पडू शकणार नाही याची हमी कोणीही देऊ शकत नाही.   
छळवाद हा मानसिक,शारीरिक अशा कोणत्याही प्रकारचा असू शकतो. मजा म्हणजे आर्थिक दृष्ट्या नवऱ्यावर अवलंबून नसणाऱ्या स्त्रियांच्या वाट्यालाही जर या यातना येत असतील तर ज्या स्त्रिया पूर्णपणे नवऱ्यावर अवलंबून आहेत त्यांच्या व्यथा काय वर्णाव्या?  
बायकोच्या माहेराकडून अवाजवी अपेक्षा ठेवणे, तिच्या माहेरच्यांचा सतत उद्धार करणे, बायकोच्या चारित्र्यावर संशय घेणे, तिचा सातत्याने इतरांसमोर मानभंग करणे, तिच्या उठण्या-बसण्याला मर्यादा घालणे, तिच्या बौद्धिक कुवतीची खिल्ली उडवून आसुरी आनंद घेणे, तिच्या छंदांवर, स्वातंत्र्यावर गदा आणणे, तिला एक निव्वळ हक्काची उपभोगाची वस्तू या दृष्टीकोनातून बघणे, तिला सतत घरकामात पिचत ठेवणे, मुलाबाळांची जबाबदारीही तिची एकटीचीच असल्यागत वागणे, वेळप्रसंगी तिला धमकावणे, तिच्या अंगावर हात टाकणे, तिला अर्वाच्य बोलणे, तिचे स्त्रीधन स्वत:कडे ठेवून तिला बाहेरचा रस्ता दाखविणे अशा अनेक प्रकारच्या छळवादांना स्त्रीला सामोरे जावे लागते.   
मुळातच स्त्री व पुरुष हे एकमेकांना पूरक असावेत, निसर्ग नियमांनुसार एकमेकांशी बध्द असावेत, एकमेकांच्या अपेक्षांची पूर्तता करत त्यांनी संसार सुकर करावा, पोटच्या मुलाबाळांना त्यांनी उत्तम घडवावे, जनमानसात आदर्श प्रस्थापित करावा, पुढील पिढ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, कौटुंबिक शुचिता,महत्ता जपावी यासाठी विवाहसंस्था अस्तित्वात आली. दोन घराण्यांचा मिलाफ, पुरुषाला स्त्रीचा व स्त्रीला पुरुषाचा आधार, स्त्री व पुरुष या दोघांकडील नातेसंबंधांचा मुलांना होणारा फायदा, मुलांना फुलण्यासाठी,सर्वार्थाने उमलण्यासाठी उपलब्ध होणारी कौटुंबिक पार्श्वभूमी याचा साकल्याने विचार करूनच लग्ने  ठरवली जातात. हे सर्व ज्ञात असूनही लग्न झाल्यानंतर माशी शिंकते आणि लग्न झाले नसते तर फार बरे झाले असते हा विचार असा छळवाद भोगणाऱ्या बायकांच्या मनात थैमान घालू लागतो.         
ही आपली हक्काची बायको आहे यापेक्षा ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे असा विचार खरोखर किती पुरुष करतात? तिने माझ्या घरच्यांची सेवा करावी अशी मागणी करणारे पुरुष बायकोच्या माहेरच्यांची सेवा किती तत्परतेने करताना दिसतात? ऑफिसमधून दोघेही सारखेच थकूनभागून घरी परतल्यानंतर पुढ्यात आयता चहा आणि गरमागरम खाणे या फर्माइशीचा  हक्क फक्त पुरुषांनाच का व कोणी दिला आहे? घरातील सर्व निर्णय घेण्याचा मक्ता फक्त पुरुषांकडेच का?  स्त्रीचे वैयक्तिक मत किती पुरुष ग्राह्य धरतात? बायकोचा आत्म-सन्मान ( self-respect ) पायदळी तुडवण्याचा, खच्ची करण्याचा खटाटोप न करणारे पुरुष किती आहेत? घर घेणे, घराचे सुशोभीकरण, आर्थिक गुंतवणुकी, मुलांचे शिक्षण, वाहनाची खरेदी अशा अनेक महत्वाच्या निर्णयाबाबत आपल्या बायकोशी सल्ला-मसलत करणारे नवरे किती आहेत? लग्न झाल्यानंतर बायकोने नोकरी करावी की न करावी, घरच्यांसाठी तिने नेमका किती वेळ आखून ठेवावा, स्वयंपाकपाणी स्वत: करावे की करवून घ्यावे, तिची एखादी आवड जोपासावी की न जोपासावी, सोशल नेट्वर्किंग वाढवावे की मर्यादित ठेवावे , कपडे-दागिने कोणते घालावेत, समाजात तिने कसे वावरावे याबाबतीतले निर्णय तिच्यावरच सोडण्यातली प्रगल्भता किती नवरे दाखवतात?        
लग्न झाल्यानंतर आपला नवरा ही काय वल्ली आहे हे बायकोच्या ध्यानात यायला लागते आणि मग तिच्या स्वभावानुसार तिची भूमिका ठरते. बंडखोर प्रवृत्तीची स्त्री नवऱ्याला त्याची चूक दाखवायला कमी करत नाही, त्याच्या पुरुषी अहंकारा विरुध्द सक्षमपणे उभी राहू शकते परंतु जन्मजात सोशिकपणाचे बाळकडू प्यायलेली स्त्री मात्र त्याच्या अहंकाराला कुरवाळत, समाजाला घाबरत त्या घर नामक कोंडवाड्यात पिचत राहते. दुर्दैवाने आजमितीला  स्वत:ला निराशेच्या गर्तेत लोटणाऱ्या, पिचून घेणाऱ्या स्त्रियांची संख्या लक्षणीय आहे. लोक काय म्हणतील,नातेवाईक काय म्हणतील,समाज काय म्हणेल याचा विचार करता करता स्वत:चे आयुष्य मात्र या स्त्रिया पणाला लावतात. आपण लग्न केल आहे म्हणजे पुढील शारीरिक,मानसिक अत्याचाराला आपण बांधील आहोत असा गैरसमज बहुतांश स्त्रिया करून घेतात. आपण एक स्वतंत्र व्यक्ती आहोत, आपण सुशिक्षित,सु-संस्कारित आहोत, आपण कुटुंबाचं एक अविभाज्य अंग आहोत, जसे आपण भावनिक दृष्ट्या नवऱ्यावर अवलंबून आहोत तसाच तोही आपल्यावर आहे, जसा तो आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे तशाच आपणही आहोत हा विचार करणाऱ्या स्त्रियांची संख्या आज नगण्य आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते.    
आपण जन्माला येतो तीच आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची पहिली खूण असते. आपल्या इच्छा-आकांक्षा, आपल्या आवडी-निवडी, आपली साध्ये यांच्यावर फुली मारून जे निरस आयुष्य आपल्या वाट्याला येतं ते जगण्यासाठी का  आपला जन्म झालेला असतो? पंख बांधलेला पक्षी इच्छा असूनही गगनभरारी घेऊ शकतो का?  आपलं आयुष्य आपण आनंदाने उपभोगावं आणि इतरांनाही त्यांचं आयुष्य आनंदाने उपभोगू द्यावं हे माणुसकीच व्रत प्रत्येकानेच घ्यायला हवं. दुसऱ्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय करणे तसेच दुसऱ्याकडून अन्याय मुकाट सहन करणे या गोष्टी भूषणास्पद नाहीत हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
तेव्हा पतीच्या जाचाला बळी पडणाऱ्या तमाम बायकांनो, वेळीच सावध व्हा! 

No comments:

Post a Comment