भीती ही एखाद्या व्यसनासारखी असते. ती जडली की जडली. व्यसनांनी शरीर पोखरले जाते आणि भीतीने मन! व्यसनमुक्ती केंद्रांप्रमाणे आता जागोजागी भीतीमुक्ती केंद्रेही उघडली गेली पाहिजेत.
हिंस्त्र प्राण्यांची अथवा खून-दरोड्यांची भीती सर्वव्यापी असते पण प्रत्येक व्यक्तिगणिक मात्र भीती कसलीही असू शकते. काळोखाची भीती असू शकते. एकटेपणाची भीती असू शकते. पुढे होणाऱ्या एखाद्या आजाराची भीती असू शकते. आगीची भीती असू शकते,पाण्याची भीती असू शकते. विमानाची भीती असू शकते. पोलिसांची किंवा तुरुंगाची भीती असू शकते. ( सामान्य जीवन जगणाऱ्यांच्या आयुष्यात हे क्षण जवळजवळ येत नाहीत तरीही) रेल्वे स्टेशनवरील गर्दीची, थरथरणाऱ्या पुलाची, खिसेकापूंची, कधीही होणाऱ्या बॉम्बस्फोटांची, गर्दुल्ल्यांची यापैकी कशाचीही वा सगळ्यांचीच भीती असू शकते. चाकू-सुऱ्या,नेलकटर,कात्री अशा धारदार वस्तूंची सुद्धा भीती असू शकते. कीटकनाशक औषधांची भीती असू शकते. बंद लिफ्टची भीती असू शकते. विजेच्या उपकरणांची भीती असू शकते. घरातील सिलेंडरची भीती असू शकते. सरकत्या जिन्याची भीती असू शकते.बंद थिएटरची भीती असू शकते. रस्ता क्रॉस करायची भीती असू शकते. डॉक्टरांकडे गेल्यावर इंजेक्शनची, तपासण्यांची, बिलाची, निदानाची भीती असू शकते. वाहनात बसल्यावर वाढणाऱ्या मीटरची भीती असू शकते. रस्त्यावरच्या मवाल्यांची भीती असू शकते. वरिष्ठांची भीती असू शकते. आपली आर्थिक,सामाजिक पत खालावण्याची भीती असू शकते. अशा अनेक भित्यांच्या सावटाखाली आपली जगणं नामक दैनंदिन मालिका चालू असते.
आपल्या भीतीचं मूळ शोधून काढायला यांपैकी कुणीच उत्सुक नसतो. उलटपक्षी या भितींच्या साम्राज्यात राहायला काहीना मनापासून आवडते. माझ्या एका आत्याला औषधाची गोळी गिळायची विलक्षण भीती वाटते. लहानशी गोळी जिभेवर ठेवूनही तिला ती यशस्वीरीत्या गिळता येत नाही. कितीही पाणी ढोसलं तरी गोळी काही घशाखाली उतरत नाही. गोळी कुटणे एवढाच पर्याय प्राप्त परिस्थितीत उरतो. तिच्या ह्या समस्येवर रामबाण उपाय कुठल्याही डॉक्टरकडे नाही. काही भीत्या तर खूपच मजेशीर असतात. एका बाईला म्हणे नुसती उशी दिसली तरी भीती वाटते. कुणीतरी तिच्या उरावर बसून त्या उशीने तिचा गळा दाबतंय असं काल्पनिक चित्र तिच्या डोळ्यांसमोर येतं. तिच्या घरच्यांची किती पंचाईत होत असेल याची कल्पनासुद्धा आपल्याला येणार नाही. एका तरुण मुलीला म्हणे चावीवाल्या खेळण्यांची भीती वाटते. ती आपल्या अंगावर येतील या भीतीने ती त्यांच्याकडे बघतही नाही. एका बाईला टोलेजंग पाळण्याची ( giant wheel ) भयंकर भीती वाटायची. तो वरून खाली येताना पहिला की तिच्या छातीत धडधड व्हायची आणि भीतीपोटी ती किंचाळायची. म्हणजे ते प्रत्यक्ष थ्रील अनुभवासाठी तिला पाळण्यात बसण्याची गरजच नव्हती. आमच्या नात्यातल्या एका माणसाला उंचावरून खाली पाहण्याची खुप भीती वाटायची. दहाव्या मजल्यावरून खाली नुसता दृष्टीक्षेप टाकला तरी आपण पडतोय या भीतीने हा गळाठून जायचा. एका माणसाला जिना चढताना आपल्या मागावर कुणीतरी आहे असं सारखं वाटायचं.
प्रत्येकाचा जन्म,सभोवतालचे वातावरण,वावरणारी माणसे,त्यांच्या बोलण्याचे विषय ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे प्रत्येकाभोवती भीतीचे अथवा सुरक्षिततेचे वलय तयार होत असते. भीतीचे वलय भेदून पुढे येण्याचा प्रयास करणारे थोडेच असतात. प्रत्यक्ष देवाचं वास्तव्य ज्या वास्तूत आहे ती वास्तू ज्यांना भयप्रद वाटते त्यांच्या भीतीचं निरसन कोणता देव करू शकेल?
No comments:
Post a Comment