एक किलो जिव्हाळा अधिक एक किलो माधुर्य अधिक एक किलो संवेदना यांचा मिलाफ म्हणजेच नात्यांचं घट्ट श्रीखंड असं गृहीत धरलं तरीही त्यावर सुगंधी केशरी वर्ख चढविण्यासाठी मनातील अव्यक्त रूपातील भावनांची पखरण करण्याचा खटाटोप हा हवाच! आपली दुसऱ्याविषयीची भावना जोपर्यंत योग्य माध्यमाव्दारे जाहीररीत्या व्यक्त होत नाही तोपर्यंत त्या नात्याच्या कळ्या पूर्णपणे विकसित होत नाहीत.
आपल्या मराठी संस्कृतीत भावना व्यक्त करणे हा काही दखलपात्र गुन्हा मानला जातो की काय अशी मला नेहमीच शंका येते. एखाद्याचं कौतुक करायला आपण एवढे का कचरतो? केवळ अभिनंदनपर चार कोरडी वाक्ये फेकण्यात आपण धन्यता का मानतो? एखाद्या समारंभाच्या प्रसंगी एखाद्या विषयीची आपुलकी, प्रेम, निष्ठा व्यक्त करण्यासाठी आपण मागेपुढे का पाहतो? तुम्ही भले एखाद्याला स्तुतीसुमनांची आंघोळ घालू नका अरे पण चार-दोन प्रशंसापर वाक्यांचे शिंतोडेही त्याच्यावर उडणार नाहीत याची खबरदारी तुम्ही का घेता?
प्रगतीपुस्तकातून आपल्या मुलाने किंवा मुलीने कमी मार्क आणले की आपली जिव्हा तिखट बोलण्यासाठी किती लसलसते ते आठवून पहा. आपण अपमानकारक शब्दांची मुक्त उधळण करत आपल्या पाल्ल्याची कोणतीही गोष्ट ऐकून न घेता भावनांच्या हिंस्त्र डरकाळ्या फोडतो. तेच त्याने किंवा तिने चांगले मार्क मिळवल्यास आपली चांगल्या पद्धतीने व्यक्त होण्याची कक्षा आपण किती रुंदावतो? शब्दातून अथवा स्पर्शातून त्यांच्याविषयीचा अभिमान त्यांना जाणवू देण्याइतपत आपण सक्रीय होतो का?
किमती,महागड्या भेटवस्तू मुलांना देऊन जे साध्य होत नाही ते त्यांच्याविषयी वाटणाऱ्या भावना त्यांना जवळ घेऊन व्यक्त केल्यावर होतं. दोघांमधील नात्यांची वीण घट्ट करण्यासाठी पैशांचा नव्हे तर सु-संवादाचा दोर लागतो. दिखाऊपणाच्या भिंती या पोकळ असतात परंतु समंजसपणाचे लिंपण असलेल्या भिंती मात्र परिपक्व आणि भक्कम असतात.
सण-समारंभ येतात. माणसे भेटवस्तू देऊन, चार शब्द बोलून निघून जातात. समारंभ संपल्यावर एकाकीपणा आपल्याला खायला उठतो. जवळच्या वाटणाऱ्या माणसांनी आपापला वेळ, पैसा खर्च केलेला असतो. तरीही स्नेहाची, निखळ प्रेमाची ती जागा रिकामीच राहिल्यासारखी वाटते. शब्दांचे बुडबुडे केव्हाच हवेत विरून गेलेले असतात. आपण अपेक्षिलेल्या प्रेमाची, आपुलकीची झाक आपल्याला जमलेल्या डोळ्यांत अभावानेच दिसलेली असते. आत्तापर्यंत आपणही उपचारांचेच रतीब घातलेले असतात. स्पर्शातील उब,मुलायमता,तरलता माहित असूनही ती आपण इतरांना जाणवू दिलेली नसते. आनंदाच्या-दु:खाच्या प्रसंगी आपण तिथे फक्त आपली उपस्थिती असणे यालाच महत्त्व देत आलेले असतो. दुसऱ्याचा आनंद आपल्यामुळे कसा द्विगुणीत होईल किंवा त्याचे दु:ख कसे कमी करता येईल यासाठी आपण काही खास असे प्रयत्न केलेले नसतात. तसे करण्यामुळे आपली सहसंवेदना समृद्ध होईल याचाही आपण कधी फारश्या गांभीर्याने विचार केलेला नसतो.
आपल्याला पडत्या काळात सांभाळणाऱ्या, समजून घेणाऱ्या, धीराचे चार शब्द सांगून मनाला उभारी आणणाऱ्या आप्तेष्टाचे आपण जाहीररीत्या आभार का मानत नाही? कारण असे करणे आपल्याला एकतर कृत्रिम वाटत असावे किंवा असे आभार मानताना समोरचा आपल्यापेक्षा मोठा होतो आहे याचा आपल्याला मनोमन खेद वाटत असावा. स्वत:च्या अंगभूत कर्तृत्वाने, गुणाने जो ठसा उमटवतो, प्रतीकूलतेला स्व-प्रयत्नाने भेदतो त्याचेही जाहीर कौतुक करायला आपल्या जिभा का सरसावत नाहीत? आज आपल्याला त्याची जागा घेता येत नाही ही जाणीव आपल्याला बोचते का?
प्रत्येकानेच यावर आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज आहे. आपलं आयुष्य हा जिंकण्या -हरण्याचा आखाडा नसून नात्यांचे निसटत चाललेले,उसवत चाललेले धागे स्व-प्रयत्नांनी गुंफण्याची सुसंधी आहे. तेव्हा व्यक्त व्हायला शिका,शिकवा आणि सोन्यासारख्या नात्यांना झळाळी द्या!

No comments:
Post a Comment