Tuesday 18 October 2011

डोअरबेल आणि राशी


डोअरबेल वाजविण्याच्या विशिष्ट वैयक्तिक पद्धतीवरून राशी ओळखल्या जाऊ शकतात का? एकदा शरद उपाध्यांना विचारले पाहिजे. डोअरबेल हे  घरातील लोकांना दचकविण्याचे, घाबरवण्याचे  हत्यार आहे अशी मानसिक धारणा असणाऱ्याची रास कोणती? डोअरबेल हे घरातील लोकांशी लपाछपी खेळायचे साधन आहे अशी मनोभूमिका असणाऱ्यांची रास कोणती? या आणि अशासारख्या प्रश्नांची उत्तरे मेष ते मीन या बारा राशींमध्ये दडली आहेत का ते पडताळून बघूया.
 मेष राशीचे उतावळे नवरे दारावरची बेल इतक्या कर्कश रीतीने वाजवित असतील की घरातल्या आबाल-वृद्धांचे कान किटावेत.थांबणे हा मेष राशीचा स्थायीभाव नसल्याने जोपर्यंत दार उघडले जात नाही तोपर्यंत यांचा बेलवरचा हात निघत नसावा.राशीस्वामी मंगळाचा आक्रमकपणा डोअरबेल वाजवण्याच्या पद्धतीतून प्रत्ययास येत असावा.
वृषभ राशीच्या लोकांचे डोअरबेल वाजविणे काहीसे याप्रमाणे असावे असे वाटते. एकतर हे लोक जास्तीत जास्त मंजुळ आवाजाची डोअरबेल बसवून घेत असावेत. तीही अतिशय अलवारपणे वाजवून आपली रसिकता घरच्या जिवाभावाच्या माणसांना दाखवून देण्याचा यांचा प्रयत्न असतो. या रसिक शुक्राच्या प्रयत्नांवर बोळा फिरवणाऱ्या घरातल्यांच्या राशी असतील तर मात्र यांची अवस्था कठीण होऊ शकते.

मिथुन राशीचे लोक बेल वाजवून हळूच जिन्यात लपत असतील, पळून जात असतील असे वाटते. यात काही लोकांचा बुध नको तेवढा खेळकर असतो. खेळ केव्हा खेळावा आणि कोणत्या राशींच्या माणसांशी खेळावा हे तारतम्य यांनी राखले नाही तर दार उघडता क्षणी यांच्या चेहऱ्यावरील खट्याळ हास्य विरून जाऊ शकतं. 
कर्क राशीचे लोक डोअरबेलही भावनेने ओथंबून वाजवित असावेत. त्यांच्या चेहऱ्यावरील भावव्याकुळता डोअरबेलच्या माध्यमातून घरातील लोकांना कळावी असे त्यांना मनोमन वाटत असणार. त्यांच्या डोअरबेलचा आवाजही रडण्याच्या आवाजाशी साधर्म्य राखणारा असावा असे वाटते. घरात कोणत्या राशीच्या वल्ली नांदत आहेत यावरून त्यांच्या डोअरबेलला मिळणारा प्रतिसाद कसा असेल हे कळू शकते. 

सिंह राशीचे लोक राजेशाही थाटाची डोअरबेल घराला लावत असावेत. ही बेल ते अशा विशिष्ट पद्धतीने वाजवत असावेत की घराबाहेर राजकुमार आल्याची वर्दी त्या बेलने द्यावी. घरातील लोकांनी दार उघडताच आपल्याला मुजरा करावा, घरातील सिंहासनावर आपण विराजमान व्हावे, थंड, सुगंधी सरबताचा पेला आपल्या ओठांना लागावा अशी स्वप्ने ही माणसे बेल वाजविताक्षणी पाहत असावीत. शनीच्या राशीची उदासीन माणसे घरात असल्यास यांच्या स्वप्नांना खीळ बसू शकते.
कन्या राशीचे लोक डोअरबेल पुन्हा पुन्हा वाजवित असावेत. एकतर आपण बेल नीट वाजवली आहे की नाही याबद्दल ते नेहमीच साशंक असतात. घरातील माणसांना बेल ऐकू गेली असेल का? दुपारच्या वेळी ढाराढूर झोपलेल्या घरातल्यांना आपल्या बेल वाजवण्याने नक्की जाग येईल का? एखादा सेल्समन समजून त्यांनी आपण आल्याची दखलच घेतली नाही तर ? हे आणि अशासारखे कैक प्रश्न यांच्या मनात हलवायाच्या मिठायांवरील माश्यांसारखे घोंघावत असतात. बेल पुन्हा पुह्ना वाजवल्याने घरात कावलेल्या, चिडलेल्या माणसांकडून यांना चांगलीच तंबी मिळू शकते. 
तूळ राशीची माणसे आपण सकाळी घरातून निघताना घरातल्या माणसांचा मूड कसा होता हे calculate करून डोअरबेल वाजवतात. घरातल्यांचा मूड बरा होता हे आठवून बेल थोडी जलद वाजते, मूड बिघडला होता हे आठवल्यावर बेल जरा हळू वाजते, मूड फारच चांगला होता हे आठवल्यानंतर बेल तीन-चारदा वाजवली जाऊ शकते. थोडक्यात घरातल्यांचा मूड आणि बेलचा स्पीड यांचा ताळमेळ जमला पाहिजे हा यांचा कटाक्ष असतो. 

वृश्चिक राशीचे लोक एखाद्यावर जन्मोजन्मीचा सूड उगवल्यासारखी डोअरबेल वाजवतात. दार लवकर उघडले गेले नाही तर आतल्या माणसांची खैर नसते. पदोपदी भांडणे, निराश होणे, एककल्ली वागणे, विक्षिप्त असणे या रसायनातून वृश्चिक मन तयार झालेले असते. त्यांच्या विखारी नांग्या समोरच्याला दंश करायला तत्पर असतात. त्यामुळे बेल वाजवण्याच्या पद्धतीवरून घरातील अनुभवी लोकांनी दार पटकन उघडावे आणि स्वत:चे रक्षण करावे.    
धनु राशीचे लोक मूड चांगला असल्यास डोअरबेल सुसह्य वाजवतात पण मूडचे खोबरे झाले असल्यास डोअरबेल भयानक प्रकारे वाजवू शकतात. ते त्यावेळी माणूस आहेत की घोडा यावर बरेच काही अवलंबून असते. घरातील माणसांना  योग्य ट्रेनिंग मिळाल्यास दारावर माणूस आला आहे की घोडा हे त्यांना लगेचच कळू शकते. 
मकर राशीचे लोक डोअरबेल वाजवतानाही उत्साह दाखवीत नाहीत. आता घरापर्यंत आलो आहोत तर घरातल्यांना आल्याची वर्दी देणे भाग आहे अशा कंटाळवाण्या भूमिकेतून यांच्या हातनं बेल एकदाची वाजते. आत दुसरी मकर रास असेल तर दार बऱ्याच वेळाने , उदासीन चेहऱ्याने उघडले जाते. पण त्यावर यांचे काहीच म्हणणे नसते. काही म्हणण्यापुरतेही तोंड उघडायचा यांना विलक्षण कंटाळा असतो. जीवावर येऊन बेल वाजवणे म्हणजे काय हे फक्त मकर राशीच्या माणसांनाच कळू शकते.
कुंभ राशीची माणसे डोअरबेल वाजवताना एखाद्या गहन विचारात गढली असण्याची शक्यता असते. कदाचित त्यामुळे दुसऱ्याच घराची बेल वाजवली जाऊ शकते. यांच्या स्वभावाप्रमाणे दारावरची बेलही धीर-गंभीरपणे वाजते. दार उघडल्यानंतर समोरच्याची साधी दखलही न घेता आत येत ही माणसे आपल्याच विचारात हरवतात. हसण्याचे यांना वावडे असते. विनोद यांचा शत्रू असतो. खेळीमिळीच्या वातावरणाचा यांनी धसका घेतलेला असतो. " मेरी तनहाई और मै" हे यांचे ब्रीदवाक्य असते. 

मीन राशीचे लोक आपण डोअरबेल वाजवली आहे की नाही हेच विसरून जातात. त्याचवेळी शेजाऱ्याशी बोलणे चालू असते किंवा मोबाईल चालू असतो त्यामुळे आपण बेल वाजवण्याची कृती नक्की केली आहे की नाही हे परत एकदा बेल वाजवून पारखले जाते. घरात हिंस्त्र राशी वावरत असतील तर बिकट प्रसंगाला यांना सामोरे जावे लागते. पण अनुभवातून ही माणसे काहीही न शिकता परत परत त्याच चुका करत राहतात आणि इतरांचा रोष ओढवून घेतात. 
यापुढे ज्योतिषाची डोअरबेल विशिष्ट पद्धतीने वाजल्यास बाहेर कुठल्या राशीची व्यक्ती अथवा वल्ली आली आहे हे ओळखण्याचा प्रस्तुत लेखावरून त्याने किंवा तिने रीतसर अभ्यास करावा आणि या शास्त्राच्या कक्षा अधिक रुंद कराव्यात ही विनंती!

No comments:

Post a Comment