Wednesday, 5 October 2011

भोंडला आउट दांडिया इन


पाटावर गजराजांच सुरेख चित्र काढलेलं आहे. त्यावर हळदी-कुंकू-फुलं वाहून सुवासिनी पूजा करताहेत. नऊवारी साडी,नाकात नथ या पेहरावात सगळ्या माहेरवाशिणींनी पाटाभोवती फेर धरला आहे. ऐलमा पैलमा गणेश देवा, झिपर कुत्र सोडा ग बाई सोडा, सासूबाई सासूबाई मला आलं मूळ, एक लिंबू झेलू बाई, कारल्याचा वेल लाव ग सुने, यादवराया राणी रुसुनी बसली कैसी अशी भोंडल्यातील परिचित गाणी कानी पडताहेत. रोज एक याप्रमाणे नवव्या रात्री नऊ गाणी म्हणून या भोंडल्याची सांगता होते आहे. रोज वेगवेगळी खिरापत होते आहे. सासवा, सुना, लेकी, त्यांच्या मुली सगळ्या मिळून भोंडल्याचा आनंद लुटत आहेत हे दृश्य आता शहरांतून हद्दपार झाले आहे. 'डिस्को-दांडिया' नावाच्या आधुनिक नृत्यप्रकाराची जिथेतिथे चलती  आहे.  
पूर्वीच्या काळी बायका घराच्या चार भिंतींमध्ये बंदिस्त असायच्या. त्यांची विरंगुळ्याची साधने फार मोजकी होती. त्यामुळे सणासुदीच्या निमित्ताने बायका एकत्र यायच्या. स्वत:ची सुखदु:खे गाण्यांच्या माध्यमातून एकमेकांबरोबर त्या 'शेअर' करायच्या. साड्या,आभूषणे ही त्यानिमित्ताने नटण्याची पर्वणी ! यजमानीण बाई म्हणजे जिच्या दारात भोंडला व्हायचा ती खिरापत करायची व ती झाकून ठेवायची. भोंडला खेळून झाल्यावर साऱ्या पोरीसोरींनी ती खिरापत ओळखायची. खिरापतीचा आस्वाद घेतल्यानंतर त्या दिवशीचा भोंडला संपायचा. अशी ही महाराष्ट्रीयन भोंडल्याची परंपरा! आता फक्त काही वाहिन्यांवर जी सणांची साथ पसरलेली असते त्या त्या वेळापुरते हे भोंडल्याचे दृश्य कधीतरी बघायला मिळते. नाहीतर आजकाल मराठी मुलीही भोंडल्यापेक्षा  दांडिया 'प्रिफर' करतात. 
नवरात्र सुरु झाली की जिथेतिथे या दांडियाचे भलेमोठ्ठे फलक लागतात. त्यावर राजकारणी,स्पोन्सरर्स यांची नावे असतात. मुली-मुले गुजराथी पेहरावात नटून-थटून, हातात दांडिया घेऊन खेळण्यास सज्ज होतात. व्यासपीठावर स्पीकर्स आधुनिकतेच्या गोंडस नावाखाली युवापिढीला मोहून टाकणारी कर्कश्य गाणी फेकत असतात. अभूतपूर्व जल्लोषात दांडिया सुरु होतो. दांडिया ग्रुप्सच्या सामाजिक इभ्रतीप्रमाणे कधी मंचावर दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक अवतरते आणि दांडिया हिट होतो.  स्पर्धा आयोजित केल्या जातात. विजेत्या ग्रुपवर बक्षिसांची खैरात होते. गुजराथी पारंपारिक गरबाही फार कमी ठिकाणी खेळला जातो. 
जागर करून देवदेवतांचा आशीर्वाद घेण्याची सर्वमान्य पद्धत आता मागे पडली आहे. सणांच्या नावाखाली त्या त्या प्रचलित प्रथेचे भांडवल कसे करता येईल यासाठी काही समाजातील घटक खपत असतात. दहीहंडी,गणेशोत्सव,नवरात्र हे देशव्यापी सण 'कमर्शिअलाईज' करण्याची प्रवृत्ती जागोजागी फोफावत चाललेली आहे. वाहत्या गंगेत हात धुवून घेणे म्हणजे काय ते ह्या खास लोकांकडून शिकण्यासारखे आहे. शहरातून बहिष्कृत झालेला भोंडला आणि शहराने अंगिकारलेला दांडिया हे आजच्या भारतीय संस्कृतीचे खरे स्वरूप आहे.     


No comments:

Post a Comment