Tuesday, 23 February 2016

'निरजा'च्या निमित्ताने ……


तिच्या वीर मृत्यू नंतर जवळजवळ तीस वर्षांनी तिच्यावर कुणाला तरी चित्रपट काढावासा वाटला. अर्थात हेही नसे थोडके! याबद्दल राम माधवानी यांचे खास आभार. 'मेकिंग ऑफ नीरजा' मध्ये तिच्या आईलाही बघण्याचा योग आला. हा चित्रपट रिलीज झाला पण दुर्दैवाने त्या आज तो बघायला हयात नाहीत. चित्रपटातील सर्वच कलाकारांनी आपल्या सहज अभिनयाने हा चित्रपट निश्चितच परिणामकारक केला आहे.       
पण अभिनयापेक्षाही इतिहास महत्वाचा आहे. तिची गोष्ट प्रेरणादायी आहे. मॉडेलिंग आणि हवाई सुंदरी या दोन्ही व्यवसायात स्थिरावू पाहणाऱ्या एका साध्या मुलीची ही गोष्ट आहे. नुकतेच पंख फुटलेले फुलपाखरू ज्या उत्सुकतेने भिरभिरत असते त्याच वयाची ही अल्लड नीरजा. तिच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळावर मात करून पुढील प्रवासाला आनंदाने आणि  उत्कंठेने सज्ज झालेली! तिच्या बोलक्या, पाणीदार डोळ्यांत लुकलुकणारे स्वप्नांचे सोनेरी काजवे. एका नव्या आयुष्याला पुन्हा एकदा नव्या उमेदीनिशी कवेत घ्यायला निघालेली नीरजा. आई, बाबा आणि भावांचे उत्कट प्रेम लाभलेली नीरजा.     
'Pan Am 73' वर फ्लाईट पर्सर म्हणून नियुक्त होण्याची तिची पहिलीच वेळ. त्यामुळे चेहरा आनंदाने ओतप्रोत भरलेला. तिची उत्कंठा शिगेला पोहोचलेली. तिच्याबरोबर तिची सारी स्वप्नेही हवेत उंच विहरत होती. कराची येथे विमान land झाले आणि नाट्यमय, जीवघेण्या प्रसंगांची मालिकाच सुरु झाली. आपले मनसुबे तडीस नेण्यासाठी या विमानातील प्रवाशांना आतंकवाद्यांनी वेठीस धरले. विमान hijack झाले. नीरजला याची कुणकुण लागताच तिने प्रथम विमानचालकांना हा धोक्याचा इशारा दिला. त्यांनी विमानाचा ताबा सोडला आणि विमान हवेत उडाल्यानंतर होऊ शकणारी मोठी दुर्घटना टळली. पण विमानात मात्र दहशतीचे थैमान सुरु झाले. आता हे विमान वैमानिक विरहित झाले होते. बाहेरून लष्कराची कुमक येउन विमानातील प्रवाशांची सुखरूप सुटका होण्याआधीच या अतिरेक्यांना त्यांचा कार्यभाग साधायचा होता. त्यांना अमेरिकनांचे पासपोर्ट हवे होते त्यामुळे या एअर हॉस्टेस करवी सगळ्यांचे पासपोर्ट जप्त करायला त्यांनी सुरवात केली. पुढील संकटाची चाहूल निरजाला लागली आणि तिने हेतुपुरस्सर अमेरिकनांचे पासपोर्ट अतिरेक्यांची नजर चुकवून सीटखाली टाकायला सुरवात केली. तिचा उद्देश लक्षात आल्यानंतर इतर एअर हॉस्टेसनी सुद्धा हाच पवित्रा घेतला. वैमानिक नसल्याने नियंत्रण कक्षाशी अतिरेक्यांचा संपर्क होत नव्हता. त्यासाठी त्यांना एका radio engineer ची आवश्यकता होती. पण नीरजाने त्या व्यक्तीस नजरेनेच आपली identity disclose करू नये असे सांगितले. नंतर एका मोक्याच्या क्षणी या engineer ला आपली identity उघड करावी लागली. त्याचा थोडाफार वापर करून घेऊन नंतर त्याचीही हत्या करण्यात आली. तीन लहान मुले या विमानातून प्रवास करत होती. नीरजा जणू या मुलांची पालक बनली. त्यांना प्रेमाने जवळ घेऊन तिने वेळोवेळी धीर दिला. सुटकेची आशा दाखवली. हे भीषण थरारनाट्य सतरा तास चाललं. एकूण ३७९ प्रवाशांपैकी ३५९ प्रवासी सुखरूप बाहेर निघू शकले तेही केवळ नीरजाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळेच! तिने emergency डोअर open केलं आणि आत चाललेल्या मृत्युच्या तांडवाला प्रवाशांच्या सुटकेने  प्रत्युत्तर दिलं. त्या तीन मुलांचा जीव वाचवताना तिला स्वत:चा जीव मात्र वाचवता आला नाही पण अनेकांना तिने पुनर्जन्म दिला. ज्या वीस एक जणांना आपला प्राण गमवावा लागला त्यांतील एक नीरजा होती पण त्या सर्वांपेक्षा ती सर्वस्वी वेगळी होती.  
तिच्या मृत्युनंतर एका भाषणात तिची आई म्हणाली, मी एक सर्वसामान्य आई आहे. इतर आयांसारखीच! कुठल्याही संकटाच्या क्षणी फक्त स्वत:चाच विचार कर म्हणून तिला सांगणारी. पण नीरजा मात्र वेगळीच निघाली. तिने इतरांचा विचार आधी केला. तिच्यापुढे भरपूर आयुष्य दोन हात पसरून उभं होतं पण अर्थहिन मोठं आयुष्य जगण्यापेक्षा तिने अर्थपूर्ण छोटं आयुष्य निवडलं. तिच्याबरोबर इतर एअर होस्टेस सुद्धा होत्याच की. पण 'जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिए' या सुपरस्टार काका म्हणजेच राजेश खन्नाचा डायलॉग ती खऱ्या अर्थाने जगली. ही उर्मी तिला तिच्यात स्त्रवत असलेल्या मानवतेने, संवेदनशीलतेने दिली. पडद्यावरील हिरोइन सोनम कपूर असली तरी अस्सल हिरोइन नीरजा आहे. तिने एवढ्या छोट्या वयात दाखवलेलं अतुलनीय धैर्य पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. तिची शौर्यगाथा आजच्या प्रत्येक तरुण-तरुणीला एक नवा संदेश देत राहील यात शंका नाही.   
माझ्याकडे संगीत शिकण्यासाठी एक इंजिनियरिंगचा अभ्यास करत असलेला विद्यार्थी येतो. हा चित्रपट बघताना तो खूप रडला. inspire झाला. ही हिरकणी इतकी वर्षे जनसामान्यांच्या नजरेला कशी पडली नाही याचे माझ्या इतकेच त्यालाही आश्चर्य वाटले. तो गमतीने मला म्हणाला, टीचर बॉलीवूड में कोई छिकता है तो news बन जाती है. खोट्या, बनावट हाणामाऱ्या करून, देशप्रेमाचा आव आणून केवळ स्वत:च्या तुंबड्या भरण्यापलीकडे ज्यांचं इतर काहीही कर्तृत्व नाही अशा अभिनेत्यांना आम्ही वर्षानुवर्षे नुसते डोक्यावर बसवून ठेवतो. त्यांची देवळे काय बांधतो, त्यांच्या पूजा काय करतो. पण अशी लाखातून एखादीच नीरजा येते आणि देव म्हणजे काय याची समक्ष प्रचीती देऊन जाते. नीरजा खऱ्या अर्थाने पूजनीय आहे.                            
तिच्या या 'आय हेट टियर्स' वाल्या attitude ला माझा सलाम!                               
          

Monday, 11 January 2016

'सेल्फी'झम…….

कसलाही सारासार विचार न करता 'सेल्फी' काढण्याच्या नादात जे तरुण-तरुणी जिवावरचा धोका पत्करतात आणि इतरांचा जीव टांगणीला लावतात
त्या सर्व तरुण-तरुणींना उद्देशून    

नव्या युगाचे नवीन चाळे
फोटोसाठी झालेत खुळे
मृत्यू जिथे आवळतो फास
तिथे सुद्धा फोटोचा ध्यास
आत्ममग्नता की कमतरता
सुबत्तेतूनी येत भग्नता ?
छाताडावर ऐहिकतेच्या
चरचरते का कुठे न्यूनता?
सुंदर कपडे, सुंदर केस
लाटांवरती उठतो फेस
मित्रमैत्रिणींच्या रंगांनी
रंगून जातो अवघा देश
नवीन व्याख्या स्वातंत्र्याची
नवीन संथा तरुणाईची
असण्यापेक्षा दिसणे सुंदर
हीच पताका नवविजयाची   
'comment' आणि 'likes' वरती
अवलंबून माझी योग्यता
मीच फसविते मला पदोपदी
धरून आरसा भलतासलता
मोजमाप हे सौंदर्याचे?
का अघोरी आकांक्षांचे?
प्रत्यक्षाहूनी प्रतिमा सुंदर
हेच ब्रीद आता तरुणांचे
कधी सेल्फीने शोकप्रदर्शन  
कधी दिसे उत्तान आचरण
काय म्हणावे या वेडाला
 वर्खाचे सार्वत्रिक पूजन
जाणीव कोठे? कोठे गाभा?
देखाव्याची नुसती आभा
विचार होई विकार जेव्हा
क्षणात होते मलिन शोभा  
रिती शिदोरी संस्कारांची
भरली झोळी नवमूल्यांची
पायाखाली वाट आखतो
आम्ही विद्रूप सौंदर्याची

Sunday, 10 January 2016

रागाचे कलेवर……….

"राग शिकवता की रागाची प्रेते शिकवता? ज्या रागांची नावे घेण्याचे आजही धाडस होत नाही, असे राग वर्षभरात कसे शिकवून होतात?" हे उद्विग्न पश्न विचारले आहेत गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांनी. एम ए, एम फिल झालेले विद्यार्थीही शास्त्रीय संगीताचा रियाज कसा करायचा हे प्रश्न विचारतात ही लज्जास्पद गोष्ट आहे. मुळात शाळा, कॉलेज, महाविद्यालये या सर्वच ठिकाणी काय प्रकारचे, काय दर्जाचे शास्त्रीय संगीत  शिकवले जाते यावर या निमित्ताने  एक भलेमोठे प्रश्नचिन्ह  निर्माण झाले आहे.        
मुळात आपण शास्त्रीय संगीत का शिकायचे हा विचार किती जण करतात? मला केवळ 'संगीत विशारद', 'संगीत अलंकार' या certificate चा धनी व्हायचे आहे अशी मानसिकता त्यामागे असते का हे प्रत्येकाने तपासून पाहण्याची गरज आहे. उत्तम शास्त्रीय गायक कोणाला व्हायचे आहे आणि उत्तम मार्क मिळवणारा परीक्षार्थी कोणाला व्हायचे आहे हे त्या त्या व्यक्तीच्या सांगीतिक जाणीवेप्रमाणे ठरवले जात असतेच. लिखित ज्ञान आणि मौखिक ज्ञान यात फरक हा असतोच. ज्याप्रमाणे साहित्य हा विषय घेऊन एम ए झालेला प्रत्येक विद्यार्थी हा लेखक होऊ शकत नाही त्याचप्रमाणे संगीत हा विषय घेऊन एम ए झालेला प्रत्येक विद्यार्थी गायक होऊ शकत नाही. ख्यालाचे पाढे गाणारे अनेक असतात पण दुसऱ्याच्या हृदयाला भिडणारे गाणे गाणारे हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच असतात. लोकानुरंजनासाठी चमत्कृतीपूर्ण गाणारे ढीगभर असतात परंतु घराण्याच्या प्रवाहाची चौकट न मोडता त्यातील सौंदर्याचे लालित्यपूर्ण दर्शन घडवणारे संख्येने खूपच कमी असतात.          
कोणत्याही प्रकारचे संगीत असो त्यासाठी रियाज हा अपरिहार्य असतो. मी गेली २० वर्षे सुगम संगीत शिकवते आहे. आजमितीला अनेक अनुभव माझ्या गाठीशी आहेत.  गाणं शिकणाऱ्याकडे संयम आणि चिकाटी तर हवीच पण गानसाधनेसाठी द्यावा लागणारा विशिष्ट वेळही हवाच. रियाज नक्की कसा करावा हे सांगणारा गुरुही हवाच. परंतु बदलत्या जीवनमानानुसार वेळ ही गोष्ट दुरापास्त होत चालली आहे. त्यामुळे शिकायची तर इच्छा आहे पण रियाजाला पुरेसा वेळ नाही अशी तक्रार ऐकू येते. शिवाय अनेक सक्रिय माध्यमांमुळे आज आपल्याला येत असलेले गाणे 'show case' करण्याची कोण चढाओढ  लागलेली असते. 'Instant ' हा शब्द अनेकांच्या आयुष्याचे अविभाज्य अंग होत चालला आहे. काय शिकवलं यापेक्षा किती शिकवलं याला अवास्तव महत्व दिलं जातं. किती महिन्यात गाणं शिकून तयार होता येईल हा प्रश्न अनेक इच्छुकांकडून विचारला जातो. स्पर्धांमध्ये पटकावलेली बक्षिसे हे यांच्या उत्तम गायकीवरील अधिकृत शिक्कामोर्तब असते. शिकणारा प्रदर्शनाच्या आहारी जातो आणि त्याची सांगीतिक वाढ खुंटते.  
शास्त्रीय संगीत हा आपल्या पूर्वजांकडून आपल्याला मिळालेला अमुल्य ठेवा आहे. प्रत्येक घराणे वेगळे, त्यांची राग सादरीकरणाची, ख्याल मांडण्याची पद्धत भिन्न असते. अमक्या घराण्याचे गाणे चांगले तमक्या घराण्याचे वाईट असे वादसुद्धा अनेकदा कानावर येतात. ऐकणाऱ्यांचे गट पडतात. शास्त्रीय संगीत केवळ प्रतिष्ठेखातर ऐकणारेही खूप आहेत. आज भीमसेन ऐकला, किशोरी ऐकली, काय गाते राव मालिनी राजूरकर, कशाळकरांचा  गौड सारंग ऐकलाय का?  संजीवचा मधुकंस आणि अश्विनीचा ललत जीवघेणा आहे रे. अशी मतांची कारंजी दुसऱ्याला प्रभावित करण्यासाठी नाहीतर आपण शास्त्रीय संगीताचे केवढे मोठ्ठे चाहते आहोत हे दाखवण्यासाठी चारचौघांत फवारली जातात. सवाई गंधर्व महोत्सव असो वा राम मराठे महोत्सव असो अनेकांना ते गाढ झोप येण्याचे हमखास ठिकाण वाटते ही अभिमानास्पद गोष्ट आहे काय?          
मारवा-सोहोनी, भूप-देसकार, भिन्न षड्ज-हेमंत या रागांच्या तफावतीच्या सीमारेषा इतक्या धुसर आहेत की एका रागातून दुसऱ्या रागात शिरणे सहज शक्य आहे. यामध्ये रागरसहानीचा मोठा धोका आहे. ह्या सारख्या रागांची मांडणी मोठ्या कौशल्याने करावी लागते. ह्या तफावती गळ्यात उतरवण्यासाठी  अथक परिश्रम घ्यावे लागतात. गळ्यालाही त्या विशिष्ट रागाचे वळण लागावे लागते. बरेच वेळा असं होतं की पेपरवरील थिअरी अचूक असते पण गळ्यातील थिअरी तिच्याशी तादात्म्य पावू शकत नाही. अनेक विद्यार्थी तेवढी तयारी झाली नाही या कारणास्तव ख्याल ताना वगळून गाताना ऐकले आहेत. तयारी नसताना असे अर्धवट गाणे गावेच का असा प्रश्न त्यांना कसा पडत नाही याचेच आश्चर्य वाटते.               
गाणे ही गुरुमुखातून प्रवाहित होणारी गोष्ट आहे. पण शिकवणारा झरा जर मूळचाची नसेल तर शिकणारयाच्या आत पाझरणारे पाणी सुद्धा अभिजात असेल याची ग्वाही कुणालाही देता येणार नाही. गान संस्कारांचा वटवृक्ष फोफावण्यासाठी जसे रियाजाचे खतपाणी आवश्यक आहे त्याचप्रमाणे उत्तम बियाणे पेरणेही तितकेच आवश्यक आहे. नाहीतर मग अशी रागांची निश्चेष्ट पडलेली कलेवरेच श्रोत्यांना ऐकू येतील.      

Wednesday, 6 January 2016

शाही विवाह सोहळे …….


लग्न सोहळा ही प्रत्येकाची खाजगी बाब असते मान्य. परंतु ज्या व्यक्ती आज देशाच्या राजकारणात, समाजकारणात सक्रिय असून महत्वाची पदे, स्थाने भूषवित  आहेत त्या व्यक्तींनीच या देशातील सामाजिक परिस्थितीचे भान न ठेवता कोट्यावधी रुपये नुसत्या विवाह सोहळ्यावर खर्ची करणे ही दुर्दैवाची गोष्टच म्हणावी लागेल. असे समारंभ नित्यनेमाने संपन्न होत असतात. दुष्काळग्रस्त जनतेच्या, आर्थिक दृष्ट्या कंगाल झालेल्यांच्या जखमांवर मीठ चोळत असतात.      
आपल्या देशात गरीब-श्रीमंतातील दरी इतकी मोठी आहे की अनेकांच्या घरात दोन वेळच्या अन्नाची भ्रांत आहे तर दुसरीकडे फक्त विवाह सोहळ्यावर खर्च करण्यासाठी आर्थिक गंगा दुथडी भरून वाहते आहे. हा एवढा पैसा कुठून येतो हा भाग अलहिदा पण तरीही हा इतका अमाप पैसा एखाद्या विधायक गोष्टीसाठी वळवण्याची मानसिकताच लोप पावली आहे हे मात्र खरे. एकीकडे 'नाम' सारख्या संस्था अनेकांच्या तोंडात अन्नाचे निदान दोन घास पडावेत यासाठी प्रयत्नशील आहेत, दुष्काळात होरपळून गेलेल्यांची घरे सावरावीत म्हणून त्यांना आर्थिक मदत देऊ करत आहेत तर दुसरीकडे आपण जणू या देशाचा भागच नाही, इथल्या आर्थिक परिस्थितीशी आपले काहीच देणेघेणे नाही, येथील जनतेच्या सुखदु:खाशी आपले काहीच सोयरसुतक नाही अशा थाटात हे सोहळे साजरे करून केवळ हौशीखातर आणि लोकांचे डोळे दिपावेत म्हणून कोट्यावधींचा चुराडा केला जातोय.     
विवाह समारंभ साजरे करायला आक्षेप असायचं कारण नाही पण या सोहळ्यावर किती पैसा खर्च करावा हे तारतम्य तरी बाळगाल की नाही? आज कमीत कमी गेली तीन-चार वर्षे तरी मराठवाडा दुष्काळाच्या छायेखाली आहे. शेतकऱ्याचे हाल कुत्रेही खाणार नाही अशी अवस्था आहे. वीज नाही, पाणी नाही, शेतीसाठी अवजारे नाहीत, पाउसपाणी नाही म्हणून पिके नाहीत, मुले-बाळे उपाशी, गुरांना खायला हिरवा चारा नाही, बहुतांश शेतकरी अथपासून  इतिपर्यंत सावकाराच्या कर्जात बुडालेले, उपासमारीने पोटे खपाटीला जाऊन हाडे वर आलेली, पैशाअभावी मुलांचे शिक्षण बंद, साधी आन्हिके उरकण्यासाठीही पाणी नाही अशी बिकट अवस्था, याचा परिणाम म्हणून अनेकांनी गळा आवळणाऱ्या फासाशी सख्य जोडलेले, निसर्गाचं बिघडलेपण आणि अनेक सधनांचे औदासिन्य यामुळे इथले अनेक श्वास अवघडलेले आहेत. 
ज्या जनतेच्या जीवावर आपण राज्य करतो,  ज्यांनी आपल्याला निवडून दिल्यानेच केवळ आज हे महत्वाचे स्थान आपल्याला प्राप्त झाले आहे त्या जनतेच्या दु:खावर डागण्या दिल्यासारखे शाही विवाह सोहळे पार पाडायचे हे म्हणजे एकप्रकारे त्या जनतेच्या असहायतेवर उपहासणेच नव्हे काय? अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांची रेलचेल, अठरापगड प्रांतांचे पदार्थ, पेये आणि त्यावर मनसोक्त ताव मारणारे सगेसोयरे, कोट्यावधी खर्च करून उभारलेली महाल सदृश्य वास्तू, लाखो फुलांच्या कमानी, बिछायती, अलिशान गाड्यांचे ताफे, नखशिखांत सोन्याने मढलेली मंडळी हे कितीही नेत्रसुखद वाटत असले तरी ज्या प्रांतात हा सोहळा संपन्न होतो आहे तेथील बिकट परिस्थिती सोयीस्कररित्या डोळ्याआड करणे असा त्याचा अर्थ होत नाही का?                          
अशा समारंभांना अंत नाही. असे सोहळे होतच असतात. आपण हळहळतो. ज्यांच्या मुखात दोन वेळचे अन्न जात नाही त्या आबालवृद्धांची चेष्टा केल्यासारखे वाटते.  एक प्रश्न मला राहून राहून विचारावासा वाटतो की ज्यांच्यासाठी हा एवढा घाट घातला जातो त्या उत्सवमूर्ती व्यक्तींच्या संवेदनाही तितक्याच बोथट असतात का? इतर आप्तस्वकीय या वारेमाप उधळपट्टीला आक्षेप कसा घेत नाहीत? इतकी भावनाशून्यता यांच्या ठायी असते का? भोवतालच्या सामाजिक परिस्थितीचे अजिबात भान न ठेवणे किंवा आर्थिक अडचणीत असलेल्यांची जराही कदर न करणे एवढाच राजकीय बाणा हे जपतात का? ह्या प्रश्नांचा जर गांभीर्याने विचार करणारा कुणी असता तर आपल्या आजूबाजूची परिस्थिती नजरेआड करून त्याने इतरांच्या दु:खावर आपल्या दांभिक ऐश्वर्याचा महाल कधीच उभा केला नसता. उलटपक्षी इतरांच्या कोमेजलेल्या अपेक्षांना आपल्या दातृत्वाचे खतपाणी घालून त्यांच्या स्वप्नांची इमारत त्याने बुलंद केली असती.  

Wednesday, 30 December 2015

८६ वर्षांचं बहरलेलं कवित्व ….


                                              गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे
                                             ज्याचे खरे न गाणे तो बेईमान आहे

या शब्दांप्रमाणे त्यांनी कवितेशी आणि गाण्याशी आत्यंतिक निष्ठा राखत आपल्या आयुष्याचेच गाणे केले. कवीच्या मनात गाणं असलं पाहिजे आणि गीतकाराच्या मनात कविता असली पाहिजे या पाडगावकरांच्या वाक्याने कविता आणि गीत या साहित्यप्रकारांचे एकमेकांशी नाते अधिक घट्ट केले.    

 'शुक्रतारा मंदवारा' या गीताने तर वर्षानुवर्षे अनेक युगुलांच्या मनात प्रेमाचा झरा वाहता ठेवला, त्यांच्या हृदयात बारमाही वसंत फुलवला आणि चांदण्यांची अव्याहत बरसात केली. 'डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी' या गाण्याने अनेकांची कातरवेळ अधिक गहिरी झाली. 'श्रावणात घननीळा' या गीताने अनेक रसिकांच्या मनातला मोरपिसारा सतत फुलत ठेवला.       
                                         अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेउनी जाती
                                         दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती

या ओळींनी एक चिरंतन वैश्विक सत्य सांगितलं.
                                         कुठे कुणाच्या घडल्या भेटी
                                        गीत एक मोहरले ओठी
                                       त्या जुळल्या हृदयांची गाथा सूर अजूनही गाती

अशासारख्या त्यांच्या अनेक भावूक गीतांनी शेकडो रसिकांच्या मनात कायमचं घर केलं ज्याचं मोल करता येणं केवळ अशक्य आहे. 

पाडगावकरांची प्रतिभा निसर्ग कवितेतून खुलली, प्रेम कवितेतून फुलली, भाव कवितेतून तेवली आणि गझलेतून निनादली.
                                      डोळ्यांत जन्म सारा दाटून डोह झाला
                                     अश्रूत चंद्र माझ्या विखरून रात्र गेली
 

                                                          किंवा
                                    बागेत अक्षरांच्या जन्मास फूल आले 
                                   अपुल्याच अंतरीच्या रंगात फूल न्हाले

ही व्यक्त होण्यातील उत्कटता त्यांच्या अनेक गझलांतून आणि भावकवितांतून जाणवत राहते.      

वास्तवावर उपरोधिक भाष्य करणारी त्यांची 'सलाम' ही कविता किंवा
                                   जेव्हा राजरस्त्यावर कोल्ह्यांचा महापूर येतो
                                   आणि एकामागून एक कोसळतात मूल्यांची मंदिरे

यासारखे  नीतिभ्रष्ट माणसांवर ओढलेले शाब्दिक कोरडे किंवा
                                        मी पाहिले काचेचे संत
                                        भुश्शाचे आत्मे भरलेले
                                       झोपेच्या शब्दगोळ्यांचे घाउक कंत्राटदार
                                       रेशमी नेसून प्रवचने करताना

या सारख्या पाखंडी अध्यात्मवाद्यांना सुनावलेले खडे बोल किंवा
                                      हिप्नोटीस्टांनी हुकुम केला
                                      एकसाथ द्वेष करा
                                     आम्ही करकरा चावले सामूहिक द्वेषाचे दात

यासारख्या राजकीय संदर्भ असलेल्या कविता पाडगावकरांच्या सर्वकष जाणीवेच्या साक्षीदार होत्या.  

                                     शब्द खोल कळलेल्या समजूतदार दु:खासाठी
                                     शब्द निष्पापांच्या घावावर बांधण्यासाठी
                                     शब्द कालच्या काळोखाच्या विध्वंसासाठी
                                     शब्द नव्या पहाटेच्या दुर्दम्य आश्वासनासाठी

असे असंख्य चपखल शब्द योजून ज्यांनी स्वप्रतीभेने कविता आणि गाणं रसिकहृदयी विराजमान केलं त्या शब्द्प्रभूला माझी ही छोटीशी आदरांजली!


Monday, 28 December 2015

'स्मार्ट सिटी' संकल्पाच्या निमित्ताने …….

भारतातील अनेक राज्यांना 'स्मार्ट सिटी' करण्याची अधिकृत घोषणा झाली आहे. पण जर बारकाईने पहिले तर यातील अनेक राज्यांतर्गत मुलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे, प्रदूषण, दारिद्र्य , भ्रष्टाचार, अत्याचार, अस्वच्छता व त्यामुळे होणारी रोगराई अशा अनेक अंतर्गत समस्यांनी कित्येक राज्यांना ग्रासलं आहे. या समस्यांचे निवारण न करता केवळ बाह्यस्वरूपी योजना अमलात आणणे हे म्हणजे हजारो व्याधींनी पछाडलेल्या व्यक्तीला केवळ उत्तम रंग-केश आणि वेशभूषा करून बसवल्यासारखे आहे.   
दिवसागणिक किंबहुना तासागणिक होणाऱ्या महिलांवरील अत्याचाराचे समूळ उच्चाटन करण्यास शासन असमर्थ ठरले आहे. कायद्यात कोणत्याही कडक शिक्षेची योग्य ती तरतूद नसल्यामुळे लहान बालिका ते वयोवृध्द महिला या अत्याचारांना सतत बळी पडत आहेत. घरी व दारी या वाढत्या पुरुषी अत्याचाराच्या कहाण्या फोफावत आहेत आणि कोणत्याही कडक कायद्याअभावी या  विकृत मानसिकतेचे तण माजले आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढतेच आहे. गरिबीला कंटाळून, रेल्वेचा पास काढायला पैसे नाहीत म्हणून, शाळेची फी भरायला पैसे नाहीत म्हणून, कुटुंबाचे पोट भरायला पैसे नाहीत म्हणून अनेकजण आपले वय विसरून आपली मान फासाच्या ताब्यात देत आहेत. सरकार मगरीचे अश्रू ढाऴण्यात आणि एकमेकांवर दोषारोप करण्यात व्यग्र आहे.       

अनेक वेळा काही सार्वजनिक कामांसाठी रस्ते उकरले जातात परंतु काम झाल्यानंतर मात्र त्या रस्त्यांची जी काही अवस्था होते ती बघण्यासाठी या महानगरपालिकेतील अधिकारी चुकूनही फिरकत नाहीत. हा असा रस्ता म्हणजे अनेक अपघातांना खुले निमंत्रण असते. येणारे जाणारेही मनातल्या मनात या अधिकाऱ्यांच्या नावाने बोटे मोडत राहतात आणि अशा अपघातप्रवण रस्त्यांवरून सर्व वाहनांची येजा तशीच चालू राहते.   
ठिकठिकाणी जाहीर समारंभ, सोहळे, जत्रा, मेळावे अव्याहत चालू असतात.  रोषणाईवर वारेमाप पैसा उधळला जातो. वीजही फुकट जाते. याशिवाय खरा उच्छाद असतो तो ठणठणा वाजणाऱ्या गाण्यांचा. उत्तम ऐकू येत असलेल्यालाही कर्णबधीर करतील इतक्या जोरात ही गाणी सुरु असतात. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांत कुणी नुकतीच जन्मलेली बालके किंवा रुग्ण असू शकतात. तक्रार केल्यास दमदाटीचे भय असते. या ध्वनी प्रदूषणाच्या समस्येवर अजून तरी कोणताही प्रभावी तोडगा निघाल्याचे ऐकिवात नाही.            
आता अट्टल गुन्हेगारांबरोबर शाळेतील शिक्षकही मुला-मुलींवर अत्याचार करण्यास सरसावत आहेत. वरून शिक्षकी पेशाचे वेष्टन घालून आत नराधम वावरत आहेत. सगळ्यात 'easy targets' म्हणजे लहान मुले व असहाय्य मुली. या मुलांच्या निरागसतेचा फायदा घेत या मुलामुलींना याच्या आयुष्यातून उठवून, त्यांचे भविष्य अंध:कारमय करून हे पापी उजळ माथ्याने समाजात वावरत आहेत. यांना कसलाही निर्बंध, धाक, वचक उरलेला नाही. भावी पिढीचे असे अतोनात नुकसान करणाऱ्यांना कायद्यात नक्की कोणती शिक्षा आहे?    
रस्त्यावर जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढीग व त्यावर सर्रास वावरणाऱ्या घुशी, कुत्रे , कीटक, साचलेल्या पाण्याची डबकी, उघडून ठेवलेली गटारे व त्यातून वाहणारी दुर्गंधी  आणि हे सर्व जातायेता अनुभवणारे पादचारी असे दैनंदिन दृश्य अनेक ठिकाणी पाहायला मिळते. स्वच्छ भारत अभियानाचे तीन तेरा वाजवणारी ही दृश्ये 'स्मार्ट सिटी' ची घोषणा करणाऱ्यांनी सोयीस्कर रित्या डोळ्यांआड केली आहेत का असा प्रश्न पडतो.     
देशाचे संरक्षण करणाऱ्या पोलिसदलाची अवस्था बरी म्हणण्याइतपत तरी आहे का? त्यांना राहायला चांगली घरे नाहीत, कसल्याही सोयी नाहीत, व्यवस्थित म्हणावा असा पगार नाही आणि त्यांच्यावर लादलेला कामाचा अतिरिक्त ताण हे सगळे केवळ मजबुरी म्हणून त्यांनी कधीपर्यंत सोसायचे? आपल्या मासिक पगारात जर त्यांना घरच्यांच्या किमान गरजाही भागवता येणार नसतील तर त्यांचा हात टेबलाखाली जायचा राहील का? म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार करावा असे मुळीच नाही पण त्यांना स्वत:च्या किमान गरजा पूर्ण करण्याचा हक्क तरी आहे की नाही? यासाठी कोण जबाबदार आहे?   
अनेक सरकारी शाळांची दुरावस्था, तिथे शिक्षण घेण्याऱ्या मुलांची हलाखीची स्थिती, कुपोषणामुळे बालकांचे ओढवणारे मृत्यू, अस्वच्छतेमुळे पसरणारी रोगराई, लहान मुलांची तस्करी, बालमजुरी, साक्षरतेपासून वंचित राहणारी अनेक मुले, अंधश्रद्धांच्या आहारी जाऊन घेतले जाणारे बालकांचे बळी, वाईट संगतीत फसली जाणारी शाळकरी मुले अशा अनेक समस्यांकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची आज गरज आहे अन्यथा देशाला पुढे घेऊन जाणारी ही भावी पिढी स्वत: तर अज्ञानाच्या अंधारात खितपत तर पडेलच पण देशाचे भविष्य सुद्धा अंध:कारमय झाल्याशिवाय राहणार नाही.          
शाळेत एखादा विषय कमी केला तरी चालेल पण मुलांना पर्यावरणाचे महत्व, सहृदयता, काही मुलभूत संस्कार जसे प्रेम, ममत्व, आदर, सहिष्णुता, मानवता यांचे शिक्षण मिळायलाच हवे जेणेकरून नुसतीच पैशांसाठी उरीपोटी घोडदौड करणारी मानवी यंत्रे निर्माण न होता त्यातून उद्याचे उत्तम मागारिक निर्माण होतील.    
वयोवृद्धांसाठी सुरक्षेचा प्रश्नही दिवसेंदिवस बिकट होतो आहे. वार्धक्यात अनेकांना घरी एकटे राहण्याचा प्रसंग येतो अशावेळी त्यांना सुरक्षेची नितांत आवश्यकता असते. केवळ काही पैशांसाठी आजवर अनेक वृद्धांची हत्या झाली आहे. यात फक्त बाहेरचेच नाहीत तर बरेचवेळा कुटुंबीयही सामील असतात. अनेक वृद्धांना वेळ कसा घालवायचा हा प्रश्न पोखरून टाकत असतो. यावर उपाययोजना आखली गेली पाहिजे. त्यांच्या अनुभवाचा तरुणांना फायदा होण्यासाठी शासनाने मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावीत म्हणजे त्याद्वारे या अनुभवी लोकांना इतरांसाठी काही केल्याचे समाधान मिळेल आणि आर्थिक  दृष्ट्याही  कोणावर अवलंबून राहण्याची पाळी त्यांच्यावर येणार नाही शिवाय वेळेचेही उत्तम नियोजन होईल.      
आजकालच्या तरुणांवर कामाचा अनावश्यक ताण असतो. त्यांच्या ऑफिसला जायच्या वेळा जरी निश्चित असल्या तरी यायच्या नसतात. सतत संगणकासमोर बसून डोळे आणि पाठ यांच्या व्याधी निर्माण होतात. 'targets' achieve करण्यासाठी जीवाचे रान करणारी ही तरुण पिढी अवघ्या तिशी-चाळीशीतच अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांनी ग्रस्त होते. वाढती महागाई, changed life style आणि बाहेर चाललेली जीवघेणी स्पर्धा यामुळे या तरुण पिढीची अतोनात दमछाक होते. ते कुटुंबालाही पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. घरचे सकस अन्न पोटात न जाता बरेचवेळा हॉटेल मधील अन्न, fast food खाउन पोटाची भूक शमवली जाते. मुलांनाही योग्य वयात त्यांच्या आई-वडिलांचा सहवास न मिळाल्याने ती हट्टी, बेपर्वा,
असंस्कारक्षम, संवेदना हरवलेली, कोरडी तसेच एकलकोंडी होऊन जातात. या सततच्या कामाच्या ओझ्याखाली अनेक शारीरिक आणि मानसिक व्याधींना आमंत्रण देणारया तरुण पिढीसाठी काही ठोस पावले उचलण्याची आत्यंतिक गरज आहे.                     

याशिवाय सार्वजनिक ठिकाणी उत्तम आणि स्वच्छ प्रसाधनगृहे उभारण्याची आवश्यकता आहे जेणेकरून रस्त्यावर इतरत्र घाण होणार नाही. चाकरमान्यांच्या प्रवासांतर्गत सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली पाहिजे जेणेकरून कामाच्या वेळा कोणत्याही असोत त्यांना प्रवासाचे आणि प्रवाशांचे  भय वाटणार नाही.          
आजमितीला अशा कैक समस्या आपल्या कराल दाढा उघडून उभ्या आहेत. त्यांचे वेळीच निराकरण करण्यात सरकारचे आणि पर्यायाने जनतेचे हित आहे. या समस्या तशाच ठेऊन स्मार्ट सिटी योजना राबवाल तर भविष्यात ही सिटी सगळ्याच निकषांवर 'poor' सिटी म्हणून घोषित करावी लागेल.   

Thursday, 24 December 2015

माझ्यातील 'मी' ची खरी ओळख …

मी कोण आहे  किंवा कोहं यासारख्या प्रश्नांची कोडी सोडवता सोडवता केस पांढरे होतात. सगळ्यांनाच असे प्रश्न पडतात असेही नाही. पण खरंच माझ्यात वसणाऱ्या या 'मी' ची ओळख जर आपण कुतुहलापोटी का होईना पण करून घेतली तर आपले आयुष्य रंजक व्हायला मदत होईल. धर्मभेद, जातीभेद, श्रेष्ठ-कनिष्ठ यांच्यातील वाद संपुष्टात येतील. प्रत्येकाची इहलोकीची यात्रा सुखकर होईल.         
जन्मत: आपल्याला शरीर मिळतं. पण हे शरीर म्हणजे मी आहे का? यथावकाश या शरीराला एक नाव मिळतं. मग हे नाव म्हणजे मी आहे का? आपल्याला नाती मिळतात. पालक मिळतात.  मित्र-मैत्रिणी मिळतात.  आपल्याला शिक्षण मिळते. डिग्री मिळते. नंतर नोकरी मिळते. नात्यांचा परीघ वाढत जातो. लग्न होते. घरी-दारी आपल्या संपर्कात येणाऱ्या माणसांची संख्या वाढतच जाते. मग काही काळानंतर आपल्याला मुले होतात. संसार विस्तारतो. तारुण्याकडून आपण प्रौढत्वाकडे झुकतो व नंतर वृद्धत्वाकडे. आता नातवंडे आपल्या अवतीभवती वावरू लागतात. आपली आजी-आजोबांची धुरा आपण आनंदाने सांभाळू लागतो. बाल्य-तारुण्य-प्रौढत्व-वार्धक्य या अवस्थेनंतर या शरीरावरील आपला हक्क डळमळीत व्हायला लागतो आणि कधीतरी या शरीरातील 'मी' चा प्रवास संपून जातो. पण 'मी' मात्र संपत नाही. ही यात्रा युगानुयुगे सुरूच राहते.                     
'Energy can never be created and destroyed' हे वाक्य आपण विज्ञानाच्या संदर्भात अनेकदा ऐकलेले असते. परंतु माझ्या शरीरातील 'मी' म्हणजे हाच 'energy form' आहे हे किती जणांना ठाऊक असते? आपल्या आजूबाजूला वावरणारी अनेकविध माणसे म्हणजेच असे अनेकविध 'energy forms' असतात. आता हा energy form म्हणजे 'spirit' म्हणजेच 'आत्मा'. आत्मा हा शब्द उच्चारताच मेलेल्या माणसांचे इच्छा अतृप्त राहिलेले, पिंडाला न शिवणारे, पिशाच्चयोनीत भटकणारे असे काही चित्र आपल्या डोळ्यासमोर तरळते. परंतु शरीरात राहून जीवन व्यतीत करणारेही आत्मेच असतात.              
आपल्याला माता -पित्यांकडून नाव मिळाल्यानंतर आपला एक धर्म, एक जात निश्चित होते. हा हिंदू, तो मुस्लिम, तो शीख, तो पारशी, हा ब्राम्हण, तो कायस्थ, तो क्षत्रिय अशी धर्माची आणि जातीची वर्गवारी निश्चित होते. आखलेल्या रुळांवरून आपल्याला आता मार्गक्रमणा करायची असते. आपण मी हिंदू आहे किंवा मी मुस्लिम आहे असे अभिमानाने सांगतो. पण माझ्यातील 'मी' हा हिंदू वा मुसलमान वा ब्राम्हण वा क्षत्रिय कधीच नसतो. तर तो या जात, धर्म, पंथाच्या पलीकडे असतो. मी 'Indian' आहे असे सांगण्याऐवजी मी India या देशात जन्म घेतला आहे असे का म्हणत नाही? मी हिंदू आहे असे म्हणण्याऐवजी 'this is my way of connecting to Him' असे का म्हणत नाही त्याचप्रमाणे दुसऱ्या धर्मबंधूबद्दल 'that is his way of connecting to Him' असे का म्हणत नाही? यामुळे धार्मिक तेढ न वाढता धार्मिक सामंजस्य वाढू शकेल. कोणताही धर्म असो, त्याचा अंतिम उद्देश त्या 'source of light' ची उपासना करणे व त्याच्या जवळ जाता येणे हाच असतो ना?  एखाद्या जातीबद्दलसुद्धा मी ब्राम्हण असा वृथा अहंकार न बाळगता 'this is my way of functioning' असे का बरे म्हणत नाही? प्रत्येकाचा धर्म आणि जात वेगवेगळी असेना का त्यातून परस्पर सलोख्याची भावनाच निर्माण होणे अभिप्रेत असते. माणसाशी माणसासारखे वागणे हा माझ्यातील 'मी' चा सर्वोच्च धर्म असायला हवा व त्या दृष्टीने माझे आचरण असायला हवे.      
रंगभूमीवर वावरणारा नट त्याच्या वाट्याला आलेली भूमिका जीव ओतून करतो. रसिकांकडून 'appreciation' मिळवतो पण शो संपल्यावर त्या भूमिकेपासून अलिप्त होतो. या इहलोकात आपल्यापैकी प्रत्येकाच्याच वाट्याला काहीनकाही भूमिका येतात. मुलगी-मुलगा,बहिण-भाऊ, आई-वडील, आजी-आजोबा, मित्र-मैत्रीण अशा अनेक भूमिका आपण वठवत असतो. शिक्षण संपल्यानंतर काही व्यावसायिक भूमिकाही आपल्या वाट्याला येतात. त्याही आपण इमाने-इतबारे करतो. डॉक्टर, इंजिनियर, बिझनेसमन, शिक्षक, गायक-वादक, नर्तक, शिल्पकार अशा असंख्य लौकिकार्थाने कमी-जास्त प्रतिष्ठेच्या भूमिका प्रत्येकाच्या वाट्याला येतात. पण घरी-दारी या भूमिका करताना आपण त्याच्याशी इतके तादात्म्य पावतो की एक दिवस हा शो संपणार आहे हे भान बहुसंख्य लोकांना राहत नाही. यामुळे आपल्या वाट्याला येणारे सुख-दु:खाचे भोग आपण विचलित न होता भोगू शकत नाही.              
मी डॉक्टर आहे आणि तो माझा ड्रायव्हर आहे. अर्थात माझी सामाजिक प्रतिष्ठा त्याच्यापेक्षा मोठी आहे. त्याने माझ्याशी अदबीने वागायलाच हवे पण माझे त्याच्याशी वागणे हे मात्र माझ्या लौकिकाला साजेसे असेच असले पाहिजे. त्याला माझे वरिष्ठपण जाणवून देणे गरजेचे आहे. इथे एक 'मी' दुसऱ्या 'मी' शी संवाद साधत नसून माझा हुद्दा दुसऱ्या हुद्द्याशी संवाद साधतो आहे. माझी सामाजिक प्रतिष्ठा माझ्यासारख्याच दुसऱ्या 'मी'ला ओळखण्याच्या आड येते आहे. आम्ही फक्त दोन वेगळ्या भूमिका निभावतो आहोत आमच्या संस्कारांच्या माध्यमातून पण ती energy मात्र दोन्हीकडे एकच आहे हे स्वीकारायला मन तयार होत नाही. जाती,धर्म या बरोबर अशी शिक्षणानुसार, व्यवसायानुसार सामाजिक प्रतिष्ठेची वर्गवारी सर्रास केली जाते आणि आपण त्याप्रमाणे आपले आचरण करत राहतो.             
अगदी बाल्यावस्थेपासून ते वृद्धत्वापर्यंत ही सामाजिक व्यवस्था जशीच्या तशी आपण स्वीकारतो आणि आपल्या प्रेमात, आनंदात, सुखात अडसर निर्माण करून ठेवतो. आतल्या 'मी' च्या सत्चित स्वरूपावर हे असे धर्माचे, जातीचे, रंगरूपाचे, शिक्षणाचे, सामाजिक प्रतिष्ठेचे मळभ साचत जाते आणि त्यालाच आपण खरे मानून चालत राहतो.        
माझ्यातला 'मी' हा कृष्णासारखा असायला हवा. नानाविध लीला करूनही त्यात रममाण न होणारा. सुख-दु:खाच्या प्रसंगी 'स्व'भान हरपू  न देणारा. सगळीकडे असूनही नसणारा. कार्यरत तरीही अलिप्त. द्वेष,असूया,अहंकार, लोभ,मोह, भय यांनी लिप्त नसणारा आणि प्रेम, शक्ती, संयम  आणि शांततेची उटी यांच्या लिंपणाने अवकाश सुगंधित करणारा! तेजोमय ब्रम्हाशी सादृश्य सांगणारा!   

    

टीप: या ब्लॉगमधील संपूर्ण विचार माझे नाहीत. एका spiritual teacher चे आहेत. तिच्या विचारांनी प्रभावित झाल्यामुळे ते विचार मातृभाषेत लिहिण्याचा मोह मला आवरला नाही म्हणून हा प्रपंच!