गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे
ज्याचे खरे न गाणे तो बेईमान आहे
या शब्दांप्रमाणे त्यांनी कवितेशी आणि गाण्याशी आत्यंतिक निष्ठा राखत आपल्या आयुष्याचेच गाणे केले. कवीच्या मनात गाणं असलं पाहिजे आणि गीतकाराच्या मनात कविता असली पाहिजे या पाडगावकरांच्या वाक्याने कविता आणि गीत या साहित्यप्रकारांचे एकमेकांशी नाते अधिक घट्ट केले.
'शुक्रतारा मंदवारा' या गीताने तर वर्षानुवर्षे अनेक युगुलांच्या मनात प्रेमाचा झरा वाहता ठेवला, त्यांच्या हृदयात बारमाही वसंत फुलवला आणि चांदण्यांची अव्याहत बरसात केली. 'डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी' या गाण्याने अनेकांची कातरवेळ अधिक गहिरी झाली. 'श्रावणात घननीळा' या गीताने अनेक रसिकांच्या मनातला मोरपिसारा सतत फुलत ठेवला.
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेउनी जाती
दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती
या ओळींनी एक चिरंतन वैश्विक सत्य सांगितलं.
कुठे कुणाच्या घडल्या भेटी
गीत एक मोहरले ओठी
त्या जुळल्या हृदयांची गाथा सूर अजूनही गाती
अशासारख्या त्यांच्या अनेक भावूक गीतांनी शेकडो रसिकांच्या मनात कायमचं घर केलं ज्याचं मोल करता येणं केवळ अशक्य आहे.
पाडगावकरांची प्रतिभा निसर्ग कवितेतून खुलली, प्रेम कवितेतून फुलली, भाव कवितेतून तेवली आणि गझलेतून निनादली.
डोळ्यांत जन्म सारा दाटून डोह झाला
अश्रूत चंद्र माझ्या विखरून रात्र गेली
किंवा
बागेत अक्षरांच्या जन्मास फूल आले
अपुल्याच अंतरीच्या रंगात फूल न्हाले
ही व्यक्त होण्यातील उत्कटता त्यांच्या अनेक गझलांतून आणि भावकवितांतून जाणवत राहते.
वास्तवावर उपरोधिक भाष्य करणारी त्यांची 'सलाम' ही कविता किंवा
जेव्हा राजरस्त्यावर कोल्ह्यांचा महापूर येतो
आणि एकामागून एक कोसळतात मूल्यांची मंदिरे
यासारखे नीतिभ्रष्ट माणसांवर ओढलेले शाब्दिक कोरडे किंवा
मी पाहिले काचेचे संत
भुश्शाचे आत्मे भरलेले
झोपेच्या शब्दगोळ्यांचे घाउक कंत्राटदार
रेशमी नेसून प्रवचने करताना
या सारख्या पाखंडी अध्यात्मवाद्यांना सुनावलेले खडे बोल किंवा
हिप्नोटीस्टांनी हुकुम केला
एकसाथ द्वेष करा
आम्ही करकरा चावले सामूहिक द्वेषाचे दात
यासारख्या राजकीय संदर्भ असलेल्या कविता पाडगावकरांच्या सर्वकष जाणीवेच्या साक्षीदार होत्या.
शब्द खोल कळलेल्या समजूतदार दु:खासाठी
शब्द निष्पापांच्या घावावर बांधण्यासाठी
शब्द कालच्या काळोखाच्या विध्वंसासाठी
शब्द नव्या पहाटेच्या दुर्दम्य आश्वासनासाठी
असे असंख्य चपखल शब्द योजून ज्यांनी स्वप्रतीभेने कविता आणि गाणं रसिकहृदयी विराजमान केलं त्या शब्द्प्रभूला माझी ही छोटीशी आदरांजली!
No comments:
Post a Comment