Wednesday, 3 July 2013

भाषा तरुणाईची!


भाषा हे इतकं प्रभावी माध्यम आहे की त्याचा अनुकूल वा प्रतिकूल परिणाम ऐकणाऱ्यावर चटकन होत असतो. घरी पालकांसमोर वापरली जाणारी भाषा वेगळी असते, शाळेत शिक्षकांसमोर वापरली जाणारी भाषा वेगळी असते आणि मित्रपरिवारात वापरली जाणारी भाषा ही सर्वस्वी वेगळी असते.    
हल्लीची तरुणाई सभ्यतेशी विसंगत असणारी भाषा अगदी सहज, कसलाही विधिनिषेध न बाळगता वापरत असते. अगदी लहान लहान शाळकरी मुले मित्रांच्या घोळक्यात अतिशय गलिच्छ भाषा लीलया वापरतात. मग त्या घोळक्या शेजारून एखादी बाई चालली असो वा मुलगी त्यांना काहीही फरक पडत नाही. हा अनुभव मला अनेकदा आला आहे. मुले शाळेला किंवा क्लासला जाण्यासाठी रस्त्यावर एकवटतात. मग त्यांच्या गप्पा सुरु होतात. यात एकमेकांना अगदी हीन पातळीवर संबोधले जाते. फार घाणेरड्या स्तरावरील विनोद सांगून दुसऱ्याला हसवले जाते. मी अनेक वेळा दुपारी ट्युशनला जात असताना अशा काही घोळक्यांच्या बाजूने नाईलाजास्तव जावे लागते आणि आपण बहिरे असतो तर किती बरे झाले असते अशी पश्चात्ताप करण्याची पाळी आपल्यावर येते. आपल्या घरीही आपली आई, आपली बहिण आहे हे सोयीस्कररित्या विसरून या मुलांची अर्वाच्च्य बडबड चालू असते. बरे त्यांना असे बोलताना हटकावे तर आपल्याला ते काय ऐकवतील याची मनोमन धास्ती असते कारण ते जी भाषा वापरतात ती ऐकण्याचे धारिष्ट्य आपल्यात औषधालाही नसते.           
आपण मैत्रिणींबरोबर चित्रपट बघायला जातो. उद्देश निव्वळ करमणुकीचा असतो. आपण आनंदी मूडमध्ये असतो. पण समोर जमलेल्या तरुणांचा मूड मात्र काही औरच असतो. ते कुणाला तरी उद्देशून खूप घाणेरडे बोलत असतात. तेही इतक्या मोठ्याने की  आजूबाजूच्या कुणालाही ते सहज ऐकू जावे. आई-बहिणींच्या नावाने ती उधळलेली मुक्ताफळे ऐकताना आत खूप त्रास होत असतो. घरी जाउन आंघोळ करावीशी वाटते. त्यांना खडसावून विचारावेसे वाटते की अरे चांगल्या भाषेत तुम्हाला इतरांशी संवाद साधताच येत नाही का? घरीसुद्धा असेच बोलता का? ह्यांनी सांगितलेल्या विनोदात तर कंबरेखालच्या विनोदांचीच भर असते. या तरुणांचे काय होणार या प्रश्नाचा विचार करत आपण फक्त खंतावत राहतो.             
 ट्रेनमध्ये बायकांच्या डब्यात चढावे तर तिथेही बायकांच्या जिभेवर शिव्या-शापांचे ढीग रचलेले असतात. सीट मिळाली नाही घाल शिव्या, कोणी सरकले नाही घाल शिव्या, कोणी उत्तर दिले नाही घाल शिव्या हे अव्याहत चालू असते. अगदी चांगल्या घरातील वाटणाऱ्या बायका-मुलीही अतिशय घाणेरडे,बहिष्कृत शब्द सहज वापरत असतात. घरच्या मंडळींचा यथास्थित उद्धार केल्याशिवाय जणू या बायकांना चैनच पडत नाही.        
मराठीत भ, झ ने सुरु होणारे आणि इंग्रजीत एफ ने सुरु होणारे शब्द आजच्या युगातील जणू पर्वणीचे शब्द झाले आहेत. हे किळसवाणे शब्द उच्चारले नाहीत तर हा जन्म फुकट जाईल अशी भीती या शब्दांचा वापर करणाऱ्यांना वाटत असावी. प्रत्येक वाक्यागणिक या बीभत्स शब्दांची पेरणी करून ही मुले  संस्कृतीवर, संस्कारांवर नांगर फिरवत असतात. अवेळी कळलेले यातील शिव्यांचे, अश्लाघ्य शब्दांचे अर्थ यांच्यातील निरागस बाल्य पुरते उध्वस्त करून टाकतात. या शब्दांच्या अर्थातून एक किळसवाणी लैंगिक निष्पत्ती होत असते जी मनातील विकृत हेतूंना जन्म देऊ शकते किंवा असे घातक विचार करण्यास उद्युक्त करू शकते.      
तरुणाईच्या मनाला लागलेली ही शाब्दिक कीड वेळीच चांगल्या संवादांची, संस्कारांची फवारणी करून नष्ट केली पाहिजे अन्यथा याचे दुष्परिणाम साऱ्या समाजाला भोगावे लागतील.  

Thursday, 27 June 2013

निसर्गाचा कोप की मानवी घात ?


केदारनाथ ह्या भगवान शंकराचा वास असलेल्या पावनभूमीवर निसर्गाने अवचित घाला घातला आणि मृत्यूचे भीषण तांडव सगळ्यांच्याच अंत:करणाचा थरकाप उडवून गेले. अनेक घरे वाहून गेली , अनेक संसार विस्कटले, अनेक मने मृतप्राय झाली , अनेक हृदये विदीर्ण झाली. प्रत्यक्ष केदारनाथ मंदिराच्या अवतीभवती प्रेतांचा खच पडला. रस्ते नाहीसे झाले. चंद्रापर्यंत झेपावलेल्या माणसाचे थिटेपण पुनश्च अनुभवास आले.       
झाडांची बेमालूम केलेली कत्तल, वळवलेल्या किंवा बुजवलेल्या नद्या, खाड्या, नष्ट केलेली तिवरे, जागोजागी अवैधपणे बांधलेल्या इमारती अशी कित्येक कारणे एकत्र आली आणि भारतीयांना महाप्रलयाची चुणूक बघायला मिळाली. 
लष्करातील जवान आपले प्राण पणाला लावून, अहोरात्र राबून अडकलेल्या लोकांची सुटका करत आहेत. कित्येक प्रेतांवर अंत्यसंस्कार करायचे अद्याप बाकी आहेत. केदारनाथ परिसराला दुर्गंधीने वेढलेले आहे. तेथील अनेक गावांवर रोगराईचे सावट पसरलेले आहे अडकलेल्यांना उपासमारीची, जीवघेण्या थंडीची चिंता भेडसावते आहे. आजूबाजूच्या पट्ट्यातील लुटारू, बलात्कारी यांना परिस्थितीच्या खिंडीत अडकलेले असहाय लोक आणि त्यातील महिला ही जणू काही सुवर्णसंधीच वाटते आहे. जे लोक बेपत्ता आहेत त्यांच्या येथील नातेवाईकांना अनेक शंका-कुशंकांनी ग्रासलेले आहे. आपल्या प्रियजनांच्या वाटेकडे आशेने डोळे लावून बसलेले अनेक जण आहेत. ज्यांच्या घरातील अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत त्या मागे राहिलेल्यांना आपल्या आयुष्याचेच निर्माल्य झाल्यासारखे वाटत आहे.  
अशा परिस्थितीत वरिष्ठ राजकारणी केवळ हवाई पाहणी करण्यात धन्यता मानत आहेत ही अत्यंत खेदजनक बाब आहे. कोणी राजकारणी पुनर्वसनाचा मुद्दा हाताशी धरून त्याचे सत्तेसाठी भांडवल करू पाहत आहेत. स्थानिक लोकांशी, नेत्यांशी, व्यावसायिकांशी साटेलोटे जमवून तेथील भूखंड गिळंकृत करणाऱ्या राजकारण्यांची बजबजपुरी माजली आहे. मग तिथे मोठाली हॉटेल्स, इमारती उभ्या राहतात. त्यांची ध्येये साध्य करण्यासाठी म्हणून मोठमोठ्या वृक्षांची निघृणपणे कत्तल केली जाते, नद्यांचे स्त्रोत वळवले जातात, रान-तिवरे नष्ट केली जातात. पर्यावरणाचा विध्वंस होतो. निसर्गाचा समतोल ढळतो आणि मग अशा प्रकारे निसर्ग मानवाचा घास घेतो.   
पण निसर्गाची कत्तल करणारे ह्यात भरडले जात नाहीत तर ह्यात तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांची आहुती पडते. त्यांच्या आलिशान बंगल्यात बसून निसर्गाचे हे भयाकारी तांडव पाहण्यात हे मश्गुल असतात. एखाद दुसरी मुलाखत दिली जाते तीही ढिम्म चेहऱ्याने! आम्ही ही मदत पाठवली आहे, ही कुमक पाठवली आहे, अमक्या रकमेचा धनादेश पाठवला आहे असे म्हटले कि ह्याची नैतिक जबाबदार जणू संपूनच जाते. निसर्ग संपत्ती, प्राणी संपत्ती, जल-जैविक संपत्ती ह्या सगळ्यावर तर निसर्गाच्या समतोल अवलंबून असतो. ह्यातील कोणत्याही गोष्टीचा साठा नष्ट झाल्यास अथवा जाणूनबुजून नष्ट केल्यास भू-स्खलनाचा धोका अपरिहार्यपणे संभवू शकतो. हा निसर्गाचा प्रकोप संपूर्ण सृष्टीची राखरांगोळी करण्यास पूर्णपणे समर्थ असतो. स्वार्थासाठी, राजकीय मतलबासाठी पोखरलेले डोंगर व त्यावर झालेली ढगफुटी यामुळेच हा प्रलय झाला. फक्त ह्या परिस्थितीला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष जबाबदार असलेले सुरक्षित राहिले आणि परमेश्वर चरणी नत व्हायला गेलेले प्रलयाच्या दलदलीत कायमचे गाडले गेले.         
आपले पूर्वज आर्य निसर्गालाच देव मानून त्याची पूजा करायचे. त्यांच्यासाठी देव हा सगुण स्वरूप नसून अवतीभवती पसरलेला निर्गुण निराकार निसर्ग हा होता. निसर्गाला जर देव मानले तर हल्लीचे सत्ताधारी,व्यावसायिक ह्या देवावरच लोभाची कुऱ्हाड चालवत आहेत आणि तेही अत्यंत बेदरकार,निर्लज्ज वृत्तीने! आणि स्वत:ची खुर्ची शाबूत राहू दे म्हणून देव्हाऱ्यात बसवलेल्या सगुण स्वरूपाला सोने-चांदी-हिऱ्यांनी मढवत आहेत. परंतु हे राजकारण्यांनो एक लक्षात ठेवा, ज्या कोटी लोकांच्या बळावर आज तुम्ही ही सत्ता उपभोगू शकता त्या जनतेच्या प्रक्षोभाला आमंत्रण देऊ नका अन्यथा भयंकर मानवी प्रकोपाला तुम्हाला आज ना उद्या सामोरे जावेच लागेल.             
   

Tuesday, 25 June 2013

प्रेम, आकर्षण, लग्न वगैरे वगैरे…………


सध्या मद्रास हायकोर्टाने दिलेला स्त्री-पुरुष संबंधा विषयीचा निकाल वेगवेगळ्या कारणास्तव गाजतो आहे. अनेक रोमीओंचे धाबे यामुळे दणाणले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मुळात प्रेम, लैंगिक आकर्षण आणि कायदेशीर विवाह या संबंधीच्या कल्पना खूपशा वैयक्तिक असतात. पुरोगामी, प्रतिगामी असे वेगवेगळ्या  विचार प्रवाहांचे गट अत्यंत निरनिराळी मते समाजात मांडताना दिसतात. पण या सगळ्याचा उहापोह न करता एक पुरोगामी विचाराची स्त्री म्हणून मला काही मते मांडावीशी वाटतात.      
सर्वसामान्य स्त्रीची प्रेमाची व्याख्या ही पुरुषाच्या प्रेमाच्या व्याख्येपेक्षा निश्चित वेगळी असते. आपण ज्या पुरुषावर मनापासून प्रेम करतो त्याने आपल्याशी लग्न करावं, आपल्याला आधार द्यावा, आपलं रक्षण करावं, आपल्या मुलांना पित्याचं प्रेम द्यावं, आपला संसार सुखाचा करावा अशा भावना मनाशी बाळगून स्त्री एखाद्या पुरुषावर प्रेम करू पाहते. पण पुरुषांचा प्रेम या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन असा असतोच असे नाही. त्यांच्या मनातील स्त्री विषयक लैगिक आकर्षण आधी जागं होतं आणि कालांतराने प्रेमभावना जागी होते पण ती प्रत्येकाच्या बाबतीत होतेच असेही नाही. पुरुषाला सर्वस्व अर्पण करणारी स्त्री त्याच्याशी संसार करण्याच्या इराद्यानेच पुढे जात असते तथापि एखाद्या स्त्रीशी शारीरिक दृष्ट्या समरस होणारा पुरुष तिच्याशी लग्न करण्याच्या उद्देशानेच जवळ येतो असे नाही. लग्न हा केवळ सामाजिक उपचार असतो. मंगळसूत्र, अंगठ्या, कायदेशीर विवाह नोंदणी ही स्त्री-पुरुष  संबंधांना मिळालेली समाजमान्यता असते एवढाच याचा अर्थ आहे. लग्ने जमतात, जमवली जातात पण प्रेम जमवून, ठरवून करता येत नसते. आपल्याकडे विवाह हा एक 'स्टेटस सिम्बॉल' मानला जातो. समारंभांना नवरा-बायकोने जोडीने जाणे ही गोष्ट प्रतिष्ठेची 
मानली जाते. मग अशा नवरा-बायकोत प्रेमाचा अंश असो वा नसो, रूढार्थाने असे पती-पत्नीचे लेबल लावून त्यांना समाजात मानाने फिरता येऊ शकते.  लौकिकार्थाने 'आदर्श' संसार करता येऊ शकतो आणि मुलेबाळे सुद्धा प्रसवता येऊ शकतात.    
प्रश्न असतो तो परस्परांमधील नात्याचा, संबंधांचा! निसर्गनियमानुसार लैंगिक आकर्षण आणि त्यानंतर सहवासाने निर्माण होणारं प्रेम जर दोघांत रुजलच नाही तर संसार हा केवळ एक बाह्य उपचार ठरतो. ना अशी स्त्री कधी सुखी राहू शकत ना पुरुष! आजमितीला अशी अनेक जोडपी असे उपचार पार पडताना आढळतात. संसाराचे रहाटगाडगे, संसाराचा गाडा अशी शुष्क संबोधने वापरून हे उभयता दिवस रेटत राहतात. स्त्रिया अकाली पोक्त दिसू लागतात. यांच्या पुरुषांची नजर इतरत्र वेध घेत फिरू लागते. दोघांतील दुही वाढू लागते. आपण लग्न का केलं हा विचार अंतरबाह्य पोखरू लागतो  आणि लग्न या संकल्पनेवर आपण उपहासाने हसू पाहतो.       
स्त्रीने पुरुषाचा संसार करायचा, त्याच्यापासून होणारी मुले मोठी करायची , घरची चूल सांभाळायची आणि पुरुषाने स्त्रीला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून द्यायची, कुटुंबाचा आर्थिक भार उचलायचा आणि आपला वरचष्मा कुटुंबावर आणि पर्यायाने स्त्रीवर प्रस्थापित करायचा हे दिवस आता सरले आहेत. आज स्त्री शिक्षित आहे, कमावती आहे, स्वत:चा आणि स्वत:च्या कुटुंबाचा सांभाळ करण्या इतपत सक्षम आहे. तिलाही वर हवा आहे पण इच्छित ! कुणाच्याही गळ्यात वरमाला घालून त्याला जन्मभरासाठी आपला पती म्हणून स्वीकारणारी स्त्री एकतर ग्राम्य, विचारांनी मागासलेली अथवा आर्थिक दृष्ट्या परावलंबी तरी असावी,          
प्रेम हे एक अजब रसायन आहे. प्रेमासाठी जीव घेतले जातात तसेच दिलेही जातात. पण या धकाधकीच्या आणि संपूर्णपणे अस्थिर आणि क्षणभंगुर आयुष्यात हिरवळ फुलवण्याचे सामर्थ्य निव्वळ प्रेमभावनेत आहे. जो तुम्हा-आम्हा सर्वांचा हक्क आहे. लैंगिक आकर्षण ही वयानुसार कमी होत जाणारी बाब आहे तर प्रेमभावना ही चिरंतन टिकणारी अशी गोष्ट आहे.   
यापुढे प्रत्येक स्त्रीने सर्वार्थाने इतके सक्षम व्हावे की तिला स्वत:ला हवे तसे जगता येईल, आपल्या प्रेमासाठी लायक असलेल्या माणसाशी लग्न करता येईल आणि जिथे प्रेमाखेरीज आदर या भावनेचीही सम विभागणी होईल. जिथे केवळ तिच्या शरीरावर नाही तर तिच्या विचारांवर प्रेम करणारा, तिच्या मतांचा यथायोग्य आदर करणारा सहचर तिला लाभेल. त्यामुळे केवळ लैंगिक आकर्षणावर टिकलेला लग्न नामक उपचार मोडीत निघाल्यावर पोटगी मागण्याची वेळ तिच्यावर येणार नाही. त्याच्या आधाराशिवाय स्वत:च्या पोटात वाढणारे बाळ तिला या जगात येऊ देता येईल किंवा लग्न या सामाजिक उपचारापर्यंत न जाता ही तिची प्रेमभावना अबाधित ठेवता येईल.                    

Tuesday, 18 June 2013

अनुमती - एक कटू सत्य


अगदी अलीकडेच प्रदर्शित झालेला अनुमती हा एक विचाराधीन चित्रपट आहे. नवरा-बायको यांच्या नात्यातील एक  घट्ट वीण अधोरेखित करणारा असा हा चित्रपट आहे. काही काही आजार असे असतात की त्यातून माणूस बरा होईल की नाही हे सांगणे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही निश्चितपणे सांगता येणे शक्य नसते. अद्ययावत साधन-सुविधा असलेली हॉस्पिटल्स, अत्यंत महागडे औषधोपचार, डॉक्टरांच्या फीज परवडणे ही सर्वसामान्य  माणसाच्या आवाक्याबाहेरील गोष्ट असते.  ज्या मुलांना आई-वडिलांनी लहानपणापासून तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेले असते, ती मुलेही त्यांच्या मोठेपणी संसार,जबाबदाऱ्या या चक्रात इतकी अपरिहार्यपणे अडकली जातात की त्यांच्याकडूनही कुठल्याही घवघवीत मदतीची अपेक्षा करणे व्यावहारिक दृष्ट्या शक्य नसते. अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करता करता एका हरलेल्या किंवा लौकिकार्थाने अपयशी ठरलेल्या एका माणसाची ही कथा आहे.    
गजेंद्र अहिरे यांचा हा चित्रपट स्तुत्य आहे. काही वेळेस चित्रपट तुटक वाटतो हे खरे परंतु हे या चित्रपटाचे अपयश आहे असे मात्र वाटत नाही. कोकणातील निसर्ग मात्र अप्रतिम टिपला गेला आहे. समुद्राच्या खडकांवर आपटणाऱ्या लाटा, दुतर्फा माडांची झाडे, पायाखालचे हिरवेगार गवत आणि पावसाची संततधार हे दृश्य डोळ्यांना अक्षरश: जखडून ठेवते. संपूर्ण चित्रपटात रत्नाकर पाठारे  यांची त्यांच्या पत्नीला वाचवण्याची जीवापाड धडपड दाखवली आहे. त्यांची हतबलता, असहायता, DNR  फॉर्मवर साईन न करण्यासाठी त्यांच्या मनाची चाललेली कुतरओढ परिणामकारकरित्या दाखवली गेली आहे.       
हा सबंध चित्रपट म्हणजे जुन्या आठवणींचे आणि प्राप्त परिस्थितीचे एक कोलाज आहे असे म्हणायला हरकत नाही. चित्रपटाचा विषय गंभीर आहे, शेवट डिप्रेसिव्ह आणि संदिग्ध आहे. तरीही तुम्हा-आम्हा सारख्यांच्या मनात अशा एका कटू सत्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. भविष्यातील तरतुदीविषयी सजगता निर्माण करणारा आहे. भावनांच्या प्रवाहात न भरकटता शांतपणे आणि सुज्ञपणे विचार करायला लावणारा आहे.  
हा संपूर्ण चित्रपट ज्या कारणासाठी बघावासा वाटतो तो नि:संशय विक्रम गोखले या अभिनेत्यामुळे ! मनात चाललेली घालमेल अभिनित करण्याचे त्यांचे कौशल्य केवळ अतुलनीय आहे. ती हतबलता, निराशा, मनाला आलेला विलक्षण थकवा, अनेक शंका-कुशंकांनी पोखरलेले मन, पत्नीच्या आजारपणामुळे आलेली लाचारी, कटू वास्तवाने विझत चाललेली डोळ्यातील चमक, पत्नीच्या सतत मनात रुंजी घालणाऱ्या गतकाळातील आठवणी या रसायनातून रत्नाकर पाठारे ही भूमिका विक्रम गोखले यांनी उत्कृष्ट साकारली आहे  याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. नीनाने रंगवलेली रत्नाकरच्या पत्नीची म्हणजेच मधूची भूमिका चांगली आहे पण यात नीना आपल्याला फक्त गतकाळाच्या माध्यमातूनच भेटते. रीमाचे काम नीटनेटके परंतु अगदी छोटेसे आहे. आपल्या सासऱ्याच्या मनातील वादळ समजून घेऊ शकणारी सून सई ताम्हणकर हिने चांगली साकारली आहे. सुबोध भावे यांचे काम छोटेसे पण लक्षणीय आहे. नेहा पेंडसेची भूमिकाही ठीक आहे.   
 विझत चाललेल्या ज्योतीला कसे विझण्यापासून परावृत्त करायचे आणि ती ज्योत तेवती राहण्यासाठी प्रयत्नांचे पहाड कसे जीवाची पर्वा न करता फोडण्याची शिकस्त करायची याचा वस्तुपाठ म्हणजे हा चित्रपट आहे असे म्हणायला हरकत नाही. प्रेक्षकांनी जरूर बघावा असा हा चित्रपट आहे.   

Wednesday, 12 June 2013

अवेळीच मिटलेल्या अथवा मिटू पाहणाऱ्या कळ्यांना …………


नुकतीच जिया खान या अभिनेत्रीने प्रचंड नैराश्यापोटी आत्महत्या केली आणि मन अतिशय अस्वस्थ झाले. तिने लिहिलेल्या पत्रातील मजकूर जाहीर झाला आणि तिच्यावर झालेल्या अन्यायाची जाहीर वाच्यता झाली. यातील किती खरे किवा किती खोटे याचा यानंतर कीस काढला जाईल. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होतील. पण एक अवघी पंचवीस वर्षाची युवती आपले सगेसोयरे,  आपले करियर या गोष्टींचा जराही विचार न करता मृत्युच्या विचारांना आपल्यावर अधिराज्य गाजवू देते हे एक भीषण सत्य कोणालाच विसरता येणार नाही.  
तिने लिहिलेल्या पत्रात तिच्या प्रियकराने तिच्यावर सतत जबरदस्ती केल्याचे म्हटले आहे. मला एक कळत नाही की आपण ज्याला आपले सर्वस्व मानतो, ज्याच्यावर स्वत:हूनही अधिक प्रेम करतो, ज्याला निष्ठेने तन-मन-धन अर्पण करतो त्या पुरुषाची नियत आपल्याला आधी कशी कळत नाही? जो माणूस केवळ आपल्या देहाचा उपभोग घेण्यासाठी आपल्या जवळ येतो तो माणूस किती चांगल्या वर्तणुकीचा असू शकेल याचा अंदाज या मुलींना कसा येत नाही? जो पुरुष पार्ट्या,मद्य,मुली यात रममाण होण्यात धन्यता मानतो तो माणूस एकपत्नीबाणी कसा होऊ शकेल? किंबहुना लग्न,विवाह या कल्पना तरी त्याच्या मनाला शिवण्याची सुतराम शक्यता आहे का याचा पडताळा या मुलींना कसा येत नाही? एखाद्या पुरुषाच्या स्वाधीन होण्याआधी तो पुरुष खरोखर त्या लायकीचा आहे की नाही याची खातरजमा मुली का करून घेत नाहीत? त्याने आपली फसवणूक केली असे म्हणण्यापेक्षा मुलींनो तुम्ही आपली फसवणूक करून घेतलीत असे मला म्हणावेसे वाटते.  
आपण गरोदर राहू याची भीती असतानाही तिने स्वत:ला कोणतीही काळजी न घेता त्याच्या स्वाधीन करावे ही गोष्ट मनाला पटतच नाही. ती गर्भवती राहिली आणि ते बाळ तिला तिच्या इच्छेविरुद्ध abort  करावे लागले. गरोदर राहिल्यानंतर तिने जिद्दीने त्या बाळाला वाढवण्याचा निर्णय का घेतला नाही आणि गरोदर राहायचे नव्हते तर मग योग्य ती काळजी का घेतली नाही या प्रश्नांची उत्तरे जीयाबरोबरच वाहून गेली आहेत. जे चित्रपटातील करियर तिला आश्वासक वाटत होते त्या करियरला लाथ मारून अयोग्य माणसाच्या मोहजालात ती भरकटत कशी गेली या प्रश्नाचे उत्तर आता कधीच मिळणार नाही.    
अनेक मॉडेल्स, मुली चित्रपटसृष्टीत करियर करण्याच्या उद्देशाने आपापली शहरे, गावे सोडून मुंबानगरीत स्थायिक होतात आणि करियर पेक्षाही गुंतागुंतीच्या आणि जीवघेण्या मोहजालात गुरफटल्या जातात. त्यांनी त्यांच्या आयुष्याची रंगवलेली स्वप्ने काही दिवसातच धुळीला मिळतात आणि पुढ्यात असलेले आयुष्य दुधात मिठाचा खडा पडल्यासारखे नासून जाते. यातील काहीजणी मग स्वत:ला सिगारेट,दारू, ड्रग्ज या व्यसनांत पूर्णपणे बुडवून घेतात तर काहीजणी उद्विग्न मनस्थितीत मृत्यूला कवटाळतात.  
एखाद्या विकृत स्वभावाच्या माणसाच्या स्वाधीन स्वत:ला करून संपवण्यासाठीच केवळ आपण या शरीराचा वापर करणार आहोत का याचा विचार प्रत्येक सुशिक्षित म्हणवणाऱ्या मुलीने या क्षणापासून केला पाहिजे असे मला वाटते. आपले विचार, तत्वे, स्वप्ने  यांना साकार होण्याचा अधिकार आहे की नाही याचा विचार केला गेला पाहिजे. आपली सुखाची कल्पना आणि दुसऱ्या व्यक्तीची सुखाची कल्पना यांचा समन्वय साधला जातोय का याचा विचार किमान केला गेला पाहिजे. आपले प्रेम आपण दुसऱ्यावर त्याची इच्छा नसताना लादतोय का याचा विचार व्हायला हवा आणि या अशा एकतर्फी प्रेमसंबंधातून आपल्या स्वप्नांची पूर्तता होणार आहे की नाही याचेही भान प्रत्येक मुलीला असलेच पाहिजे. त्या पुरुषाच्या मोहजालात अडकून आपले घरच्यांशी असलेले नातेसंबंध दुरावत चालले आहेत का याचाही आढावा स्वत:शी घेणे आवश्यक आहे.      
शेवटी मृत्यूचे पाश गळ्याभोवती आवळत स्वत:चे आयुष्य स्वत:ला परके करायचे की प्रेमात सावधानता बाळगत नाती,करियर उत्तम रीतीने सांभाळत भविष्याच्या रेशमी लड्या आपल्याशा करायच्या हा निर्णय ज्याचा त्याचा !

Tuesday, 7 May 2013

आय नो ………


काही व्यक्ती या विश्वातील प्रत्येक लहानसहान घटना आपल्या परिचयाची आहे अशा वृत्तीने वागत असतात. त्यांचा परवलीचा एकाच शब्द असतो 'आय नो' म्हणजे मला माहित आहे, मला ज्ञात आहे. कोणत्याही पेपरातून छापून आलेली हर एक गोष्ट यांना कशी माहित असते? स्वत:ची नोकरी, व्यवसाय अथवा विद्यार्थीदशेत असल्यास शाळा किंवा कॉलेज या गोष्टींना सुट्टी देऊन ह्या व्यक्ती दिवसाचे चोवीस तास फक्त आणि फक्त वर्तमानपत्रेच वाचत बसतात की काय अशी शंका यावी इतपत हे महाभाग 'आय नो' हा शब्द पुन्हा पुन्हा उच्चारत असतात.      
काही गोष्टी यांच्या परिचयाच्या असतील किंवा यांच्या कानावर आल्या असतील पण म्हणून प्रत्येक गोष्ट कशी यांना माहित असेल? अंजली तेंडूलकर ही सचिन तेंडूलकरची बायको आहे किंवा हृतिक रोशनला सहा बोटे आहेत किंवा शाहरुख खान आपल्या बायकोपेक्षा सिगारेटीवर जास्त प्रेम करतो किंवा जयाने रेखाकडे संसदेत टाकलेला जळजळीत कटाक्ष किंवा मनमोहन सिंग यांची बारमाही तटस्थता किंवा सोन्याचा भाव उतरला या गोष्टी 'आय नो' काय 'वुई नो' या वर्गात मोडतात पण म्हणून सोनियाच्या घरातील मांजरी व्याली या बातमीला राखी 'आय नो' असे का म्हणाली हे मला आजतागायत उलगडलेले नाही. ( या व्यक्ती अनुक्रमे सोनिया गांधी आणि राखी गुलजार किंवा राखी सावंत नव्हेत हे कृपया लक्षात घ्यावे)   
मला तर वाटते की ह्या व्यक्ती जन्मल्या जन्मल्या रडण्याऐवजी 'आय नो' हेच म्हणत असाव्यात. आता किनई बाळा तुझी आई तुला दुदू पाजणार आहे असं नुसतं कोणी म्हणायचा अवकाश की हुंकाराऐवजी 'आय नो' लोकांच्या कानावर पडत असेल. दिन्याला ब्याण्णव टक्के मिळाले हे कोणीही न सांगताच अर्णवला कसे कळले? फोनवरून जेव्हा आलोकने त्याला ही बातमी दिली तेव्हा तो लगेच म्हणाला 'आय नो'. आलोकने शंका येउन विचारले, तुला आधीच माहित होते ? कसे काय? रिझल्ट तर आत्ता लागला. यावर अर्णवचे उत्तर असे होते, अरे दिन्याने सॉलिड अभ्यास केला होता. तेव्हाच मी समजून चुकलो की हा नव्वदी पार करणार.      
अदिती साडी खरेदीला आईबरोबर दुकानात शिरली . तिथे तिला तिची जुनी मैत्रीण वृषाली भेटली. अदिती म्हणाली, माझ्या ताईचे लग्न ठरले आहे. वृषाली म्हणाली, 'आय नो'. अदिती आश्चर्याने म्हणाली, अगं तुला कशी कळली ही बातमी ? यावर वृषाली म्हणाली, अगं तुला साड्यांच्या दुकानात आईबरोबर शिरताना पहिले आणि माझ्या लगेच लक्षात आले. ग्रेट, अदिती म्हणाली.     
या 'आय नो' वर्गातील लोकांना बाजारभाव, सेन्सेक्समधील चढ-उतार, शिक्षकांच्या-व्यापाऱ्यांच्या मागण्या, वकिली डावपेच, राजकीय कुस्त्या, खून-दरोडे-बलात्कार सत्र , सुपरस्टार लोकांची इंगिते, हिट-फ्लॉप सिनेमा-नाटके, खाद्य-पर्यटन या विषयीचे ज्ञान म्हणजे थोडक्यात काय सगळे सगळे ठाऊक असते. त्यामुळे अय्या, बाप रे, खरं की काय, कित्ती कित्ती छान वगैरे प्रतिक्रिया यांना कधी देताच येत नाहीत. सगळ्या बातम्यांवर यांची आपली एकच प्रतिक्रिया 'आय नो'.        
या 'आय नो' वाल्यांची मदत घेऊन खालील प्रश्न सोडविता येतील का? कारण यांना सगळ्याचीच उत्तरे आधीच ठाऊक असतात. दुष्काळाचे निवारण कसे करता येईल ? यावर्षी पाऊस कसा पडेल? देशाचा पुढील पंतप्रधान कोण होईल? सैफ-करीना यांना अपत्यप्राप्ती कधी होईल? अंबानी बंधूंचे संबंध कधी सुधारतील? मराठी मालिका कधी वास्तवदर्शी होतील? पर्यावरणातील प्रदूषण कसे कमी करता येईल? 
एकदा राजू आपल्या दोन कुत्र्यांना घेऊन फिरायला बाहेर पडला. समोरून त्याचा एकेकाळचा 'आय नो'वाला मित्र  रवि येत होता. काय म्हणतोस ? कसा आहेस ? अशा काही जुजबी गप्पा झाल्यावर काहीतरी नवीन माहिती देण्याच्या उद्देशाने राजू रविला म्हणाला , माझ्या या दोन पठ्ठ्यांना रोज एक किलो चिकन लागतं. 'आय नो' , रवि म्हणाला. राजू हिरमुसला. तुला याबद्दल कशी काय माहिती आहे? तुझ्याकडे पण कुत्री आहेत का? नाही. माझ्याकडे एक मांजरी आहे. ती रोज साधारण अर्धा किलो पर्यंत चिकन खाऊ शकते त्यावरून मी अंदाज लावला. तेव्हापासून राजू रोज वेगळ्या रस्त्यावरून जातो .         

Monday, 6 May 2013

सुट्टीतील वेळेचा सदुपयोग ……


सुट्टी आणि अभ्यास याच मुळी परस्परविरोधी अशा गोष्टी आहेत.  परंतु अभ्यास या शब्दाचा नेहमी केवळ शालेय अभ्यास असाच अर्थ घेतला जातो जो इथे अभिप्रेत नाही. आम्हाला बालमोहन शाळेत असताना दिवाळी , नाताळ आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील अभ्यास दिला जायचा. आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले लोक, संशोधने ,प्राणी,पक्षी,फुले-झाडे या आणि अशा इतर गोष्टींबद्दल सचित्र माहिती, थोडे पाढे, अगदी थोडी गणिते, छोटेखानी निबंध अशा स्वरूपाचा अभ्यास असायचा. परंतु खरी मजा यायची ती वही सजवताना! गोल्डन किंवा सिल्व्हर पेपरचे कव्हर किंवा दुसरा एखादा रंगीत पेपर आणि त्यावर पारदर्षी जिलेटीन पेपरचे कव्हर यामुळे सगळ्याच विद्यार्थ्यांच्या वह्या सुंदर दिसायच्या. शिवाय रंगीत पेन्सिली,स्केजपेन वापरून सुशोभित केलेली अक्षरे आणि त्याभोवतीची नक्षी पाहताना खूप छान वाटायचे. वह्यांतील अभ्यास आणि त्यावरील सजावट पाहून आम्हाला नंबर दिले जायचे व बक्षीसही! त्यामुळे प्रत्येकजण आपली वही उत्तम होण्यासाठी खूप मेहनत घ्यायचा.          
मुळात अभ्यास आणि कला यांच्या समन्वयातून एखादी उत्तम गोष्ट घडू, आकारू शकते हे मुलांना पटवून देणे गरजेचे आहे. अभ्यास करण्याची कला आणि कला जोपासण्यासाठी केला जाणारा अभ्यास या दोन्ही गोष्टी मुलांच्या अंगवळणी पडायला हव्यात नव्हे त्या त्यांनी आत्मसात करायला हव्यात. आजकाल सर्वसाधारणपणे सुट्टी लागली की मुले वेगवेगळ्या छंदवर्गात जाताना दिसतात. पण तिथे ती आई-वडिलांच्या हट्टाखातर ढकलली गेलेली असतात की त्यांच्या व्यक्तिगत आवडीपायी जातात हे तपासणे गरजेचे आहे. निरनिराळे बैठे आणि मैदानी खेळ, थोडा स्व-अभ्यास आणि एखादी आवडीची कला यांचा सुरेख मिलाफ साधून सुट्टी उत्तम तऱ्हेने व्यतीत होऊ शकते. संगणकाद्वारेही अनेक गोष्टी शिकता येतात.    
आपल्याला आवडत नसलेल्या एखाद्या विषयासंबंधित काही पुस्तके वाचल्यास त्या त्या विषयाची आवड उत्पन्न व्हायला मदत होऊ शकते.  रोज थोडे पाढे लिहून काढल्याने पाढे पाठ करण्यास सोपे जातात. आपल्याला कठीण वाटत असलेला एखादा विषय आपण त्या विषयातील एखाद्या जाणकाराच्या सहाय्याने समजून घेऊ शकतो. कचरा म्हणून टाकून दिलेल्या वस्तूंपासून काही उपयुक्त गोष्टी बनवता येऊ शकतात. आईस्क्रीम स्टिक्स, बांगड्या, पेयाचे टीन्स यापासून पेन stand  तयार करता येतात. रिकामे सेल्स , काड्यापेटी यापासूनही वस्तू बनवता येतात. वापरल्या गेलेल्या सीडी पासून फोटो आल्बम, wall hanging तयार करता येऊ शकते. रिकाम्या खोक्यांपासून पेपराच्या डेकोरेटिव्ह पिशव्या तयार करता येतात. कल्पकता असेल तर आपल्या अवतीभवती असलेल्या अनेक टाकाऊ गोष्टी आपण उपयुक्त गोष्टीत परिवर्तित करू शकतो.          
मुलांना सुट्टी असली तरी त्यांच्या पालकांना सुट्टी असतेच असे नाही. त्यामुळे मग त्यांचा बराचसा वेळ पालकांच्या अनुपस्थितीत जातो. सारखे व्हिडीओ गेम खेळणे, कार्टून बघणे, पिक्चर टाकणे हे काही क्षणापुरतेच मनोरंजन असते पण त्याने मुलांच्या सृजनशीलतेला,कल्पकतेला, बुद्धीला, अंगभूत कौशल्याला काहीच खाद्य मिळत नाही. मित्र जमवून कोल्ड ड्रिंक्स पिणे, वेफर किंवा चिप्स खात खात टी. व्ही. बघणे हे आरोग्याला हानिकारक असते. याउलट सकाळ-संध्याकाळ मोकळ्या हवेत खेळणे अथवा फिरणे हा त्याला उत्तम पर्याय असू शकतो.       
अभ्यास करणे म्हणजे एखादा विषय समजून घेणे, त्यातील खुबी आत्मसात करणे, त्याविषयी मनन करणे असा असतो. मग तो विषय मुलांच्या शालेय अभ्यासक्रमा बाहेरील सुद्धा असू शकतो. आईला स्वयंपाकात मदत करणे, बाजारहाट करणे, भाज्यांचे,फळांचे,धान्याचे भाव समजून घेणे, घरातील एखादी नादुरुस्त वस्तू रिपेअर करणे, कपडे स्वत: धुणे व त्यांना इस्त्री करणे, साफसफाई करणे ही कामे मुलांनी स्वत:हून, कोणताही कमीपणा न बाळगता केल्यास पालकांना तर मदत होतेच पण शिवास मुलांचे व्हावहारज्ञान पक्के व्हायला मदत होते.  
गेलेला वेळ पुन्हा कधीही परतून कोणाच्याच आयुष्यात येत नाही. मग हाच वेळ चांगल्या गोष्टींसाठी, छंदांसाठी, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी वळवता आला तर भविष्यातील वेळ मुलांवर कधीही पश्चात्तापाची पाळी आणणार नाही.