Tuesday, 18 June 2013

अनुमती - एक कटू सत्य


अगदी अलीकडेच प्रदर्शित झालेला अनुमती हा एक विचाराधीन चित्रपट आहे. नवरा-बायको यांच्या नात्यातील एक  घट्ट वीण अधोरेखित करणारा असा हा चित्रपट आहे. काही काही आजार असे असतात की त्यातून माणूस बरा होईल की नाही हे सांगणे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही निश्चितपणे सांगता येणे शक्य नसते. अद्ययावत साधन-सुविधा असलेली हॉस्पिटल्स, अत्यंत महागडे औषधोपचार, डॉक्टरांच्या फीज परवडणे ही सर्वसामान्य  माणसाच्या आवाक्याबाहेरील गोष्ट असते.  ज्या मुलांना आई-वडिलांनी लहानपणापासून तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेले असते, ती मुलेही त्यांच्या मोठेपणी संसार,जबाबदाऱ्या या चक्रात इतकी अपरिहार्यपणे अडकली जातात की त्यांच्याकडूनही कुठल्याही घवघवीत मदतीची अपेक्षा करणे व्यावहारिक दृष्ट्या शक्य नसते. अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करता करता एका हरलेल्या किंवा लौकिकार्थाने अपयशी ठरलेल्या एका माणसाची ही कथा आहे.    
गजेंद्र अहिरे यांचा हा चित्रपट स्तुत्य आहे. काही वेळेस चित्रपट तुटक वाटतो हे खरे परंतु हे या चित्रपटाचे अपयश आहे असे मात्र वाटत नाही. कोकणातील निसर्ग मात्र अप्रतिम टिपला गेला आहे. समुद्राच्या खडकांवर आपटणाऱ्या लाटा, दुतर्फा माडांची झाडे, पायाखालचे हिरवेगार गवत आणि पावसाची संततधार हे दृश्य डोळ्यांना अक्षरश: जखडून ठेवते. संपूर्ण चित्रपटात रत्नाकर पाठारे  यांची त्यांच्या पत्नीला वाचवण्याची जीवापाड धडपड दाखवली आहे. त्यांची हतबलता, असहायता, DNR  फॉर्मवर साईन न करण्यासाठी त्यांच्या मनाची चाललेली कुतरओढ परिणामकारकरित्या दाखवली गेली आहे.       
हा सबंध चित्रपट म्हणजे जुन्या आठवणींचे आणि प्राप्त परिस्थितीचे एक कोलाज आहे असे म्हणायला हरकत नाही. चित्रपटाचा विषय गंभीर आहे, शेवट डिप्रेसिव्ह आणि संदिग्ध आहे. तरीही तुम्हा-आम्हा सारख्यांच्या मनात अशा एका कटू सत्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. भविष्यातील तरतुदीविषयी सजगता निर्माण करणारा आहे. भावनांच्या प्रवाहात न भरकटता शांतपणे आणि सुज्ञपणे विचार करायला लावणारा आहे.  
हा संपूर्ण चित्रपट ज्या कारणासाठी बघावासा वाटतो तो नि:संशय विक्रम गोखले या अभिनेत्यामुळे ! मनात चाललेली घालमेल अभिनित करण्याचे त्यांचे कौशल्य केवळ अतुलनीय आहे. ती हतबलता, निराशा, मनाला आलेला विलक्षण थकवा, अनेक शंका-कुशंकांनी पोखरलेले मन, पत्नीच्या आजारपणामुळे आलेली लाचारी, कटू वास्तवाने विझत चाललेली डोळ्यातील चमक, पत्नीच्या सतत मनात रुंजी घालणाऱ्या गतकाळातील आठवणी या रसायनातून रत्नाकर पाठारे ही भूमिका विक्रम गोखले यांनी उत्कृष्ट साकारली आहे  याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. नीनाने रंगवलेली रत्नाकरच्या पत्नीची म्हणजेच मधूची भूमिका चांगली आहे पण यात नीना आपल्याला फक्त गतकाळाच्या माध्यमातूनच भेटते. रीमाचे काम नीटनेटके परंतु अगदी छोटेसे आहे. आपल्या सासऱ्याच्या मनातील वादळ समजून घेऊ शकणारी सून सई ताम्हणकर हिने चांगली साकारली आहे. सुबोध भावे यांचे काम छोटेसे पण लक्षणीय आहे. नेहा पेंडसेची भूमिकाही ठीक आहे.   
 विझत चाललेल्या ज्योतीला कसे विझण्यापासून परावृत्त करायचे आणि ती ज्योत तेवती राहण्यासाठी प्रयत्नांचे पहाड कसे जीवाची पर्वा न करता फोडण्याची शिकस्त करायची याचा वस्तुपाठ म्हणजे हा चित्रपट आहे असे म्हणायला हरकत नाही. प्रेक्षकांनी जरूर बघावा असा हा चित्रपट आहे.   

No comments:

Post a Comment