मुळात अभ्यास आणि कला यांच्या समन्वयातून एखादी उत्तम गोष्ट घडू, आकारू शकते हे मुलांना पटवून देणे गरजेचे आहे. अभ्यास करण्याची कला आणि कला जोपासण्यासाठी केला जाणारा अभ्यास या दोन्ही गोष्टी मुलांच्या अंगवळणी पडायला हव्यात नव्हे त्या त्यांनी आत्मसात करायला हव्यात. आजकाल सर्वसाधारणपणे सुट्टी लागली की मुले वेगवेगळ्या छंदवर्गात जाताना दिसतात. पण तिथे ती आई-वडिलांच्या हट्टाखातर ढकलली गेलेली असतात की त्यांच्या व्यक्तिगत आवडीपायी जातात हे तपासणे गरजेचे आहे. निरनिराळे बैठे आणि मैदानी खेळ, थोडा स्व-अभ्यास आणि एखादी आवडीची कला यांचा सुरेख मिलाफ साधून सुट्टी उत्तम तऱ्हेने व्यतीत होऊ शकते. संगणकाद्वारेही अनेक गोष्टी शिकता येतात.
आपल्याला आवडत नसलेल्या एखाद्या विषयासंबंधित काही पुस्तके वाचल्यास त्या त्या विषयाची आवड उत्पन्न व्हायला मदत होऊ शकते. रोज थोडे पाढे लिहून काढल्याने पाढे पाठ करण्यास सोपे जातात. आपल्याला कठीण वाटत असलेला एखादा विषय आपण त्या विषयातील एखाद्या जाणकाराच्या सहाय्याने समजून घेऊ शकतो. कचरा म्हणून टाकून दिलेल्या वस्तूंपासून काही उपयुक्त गोष्टी बनवता येऊ शकतात. आईस्क्रीम स्टिक्स, बांगड्या, पेयाचे टीन्स यापासून पेन stand तयार करता येतात. रिकामे सेल्स , काड्यापेटी यापासूनही वस्तू बनवता येतात. वापरल्या गेलेल्या सीडी पासून फोटो आल्बम, wall hanging तयार करता येऊ शकते. रिकाम्या खोक्यांपासून पेपराच्या डेकोरेटिव्ह पिशव्या तयार करता येतात. कल्पकता असेल तर आपल्या अवतीभवती असलेल्या अनेक टाकाऊ गोष्टी आपण उपयुक्त गोष्टीत परिवर्तित करू शकतो.
मुलांना सुट्टी असली तरी त्यांच्या पालकांना सुट्टी असतेच असे नाही. त्यामुळे मग त्यांचा बराचसा वेळ पालकांच्या अनुपस्थितीत जातो. सारखे व्हिडीओ गेम खेळणे, कार्टून बघणे, पिक्चर टाकणे हे काही क्षणापुरतेच मनोरंजन असते पण त्याने मुलांच्या सृजनशीलतेला,कल्पकतेला, बुद्धीला, अंगभूत कौशल्याला काहीच खाद्य मिळत नाही. मित्र जमवून कोल्ड ड्रिंक्स पिणे, वेफर किंवा चिप्स खात खात टी. व्ही. बघणे हे आरोग्याला हानिकारक असते. याउलट सकाळ-संध्याकाळ मोकळ्या हवेत खेळणे अथवा फिरणे हा त्याला उत्तम पर्याय असू शकतो.
अभ्यास करणे म्हणजे एखादा विषय समजून घेणे, त्यातील खुबी आत्मसात करणे, त्याविषयी मनन करणे असा असतो. मग तो विषय मुलांच्या शालेय अभ्यासक्रमा बाहेरील सुद्धा असू शकतो. आईला स्वयंपाकात मदत करणे, बाजारहाट करणे, भाज्यांचे,फळांचे,धान्याचे भाव समजून घेणे, घरातील एखादी नादुरुस्त वस्तू रिपेअर करणे, कपडे स्वत: धुणे व त्यांना इस्त्री करणे, साफसफाई करणे ही कामे मुलांनी स्वत:हून, कोणताही कमीपणा न बाळगता केल्यास पालकांना तर मदत होतेच पण शिवास मुलांचे व्हावहारज्ञान पक्के व्हायला मदत होते.
गेलेला वेळ पुन्हा कधीही परतून कोणाच्याच आयुष्यात येत नाही. मग हाच वेळ चांगल्या गोष्टींसाठी, छंदांसाठी, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी वळवता आला तर भविष्यातील वेळ मुलांवर कधीही पश्चात्तापाची पाळी आणणार नाही.
No comments:
Post a Comment