Wednesday, 12 June 2013

अवेळीच मिटलेल्या अथवा मिटू पाहणाऱ्या कळ्यांना …………


नुकतीच जिया खान या अभिनेत्रीने प्रचंड नैराश्यापोटी आत्महत्या केली आणि मन अतिशय अस्वस्थ झाले. तिने लिहिलेल्या पत्रातील मजकूर जाहीर झाला आणि तिच्यावर झालेल्या अन्यायाची जाहीर वाच्यता झाली. यातील किती खरे किवा किती खोटे याचा यानंतर कीस काढला जाईल. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होतील. पण एक अवघी पंचवीस वर्षाची युवती आपले सगेसोयरे,  आपले करियर या गोष्टींचा जराही विचार न करता मृत्युच्या विचारांना आपल्यावर अधिराज्य गाजवू देते हे एक भीषण सत्य कोणालाच विसरता येणार नाही.  
तिने लिहिलेल्या पत्रात तिच्या प्रियकराने तिच्यावर सतत जबरदस्ती केल्याचे म्हटले आहे. मला एक कळत नाही की आपण ज्याला आपले सर्वस्व मानतो, ज्याच्यावर स्वत:हूनही अधिक प्रेम करतो, ज्याला निष्ठेने तन-मन-धन अर्पण करतो त्या पुरुषाची नियत आपल्याला आधी कशी कळत नाही? जो माणूस केवळ आपल्या देहाचा उपभोग घेण्यासाठी आपल्या जवळ येतो तो माणूस किती चांगल्या वर्तणुकीचा असू शकेल याचा अंदाज या मुलींना कसा येत नाही? जो पुरुष पार्ट्या,मद्य,मुली यात रममाण होण्यात धन्यता मानतो तो माणूस एकपत्नीबाणी कसा होऊ शकेल? किंबहुना लग्न,विवाह या कल्पना तरी त्याच्या मनाला शिवण्याची सुतराम शक्यता आहे का याचा पडताळा या मुलींना कसा येत नाही? एखाद्या पुरुषाच्या स्वाधीन होण्याआधी तो पुरुष खरोखर त्या लायकीचा आहे की नाही याची खातरजमा मुली का करून घेत नाहीत? त्याने आपली फसवणूक केली असे म्हणण्यापेक्षा मुलींनो तुम्ही आपली फसवणूक करून घेतलीत असे मला म्हणावेसे वाटते.  
आपण गरोदर राहू याची भीती असतानाही तिने स्वत:ला कोणतीही काळजी न घेता त्याच्या स्वाधीन करावे ही गोष्ट मनाला पटतच नाही. ती गर्भवती राहिली आणि ते बाळ तिला तिच्या इच्छेविरुद्ध abort  करावे लागले. गरोदर राहिल्यानंतर तिने जिद्दीने त्या बाळाला वाढवण्याचा निर्णय का घेतला नाही आणि गरोदर राहायचे नव्हते तर मग योग्य ती काळजी का घेतली नाही या प्रश्नांची उत्तरे जीयाबरोबरच वाहून गेली आहेत. जे चित्रपटातील करियर तिला आश्वासक वाटत होते त्या करियरला लाथ मारून अयोग्य माणसाच्या मोहजालात ती भरकटत कशी गेली या प्रश्नाचे उत्तर आता कधीच मिळणार नाही.    
अनेक मॉडेल्स, मुली चित्रपटसृष्टीत करियर करण्याच्या उद्देशाने आपापली शहरे, गावे सोडून मुंबानगरीत स्थायिक होतात आणि करियर पेक्षाही गुंतागुंतीच्या आणि जीवघेण्या मोहजालात गुरफटल्या जातात. त्यांनी त्यांच्या आयुष्याची रंगवलेली स्वप्ने काही दिवसातच धुळीला मिळतात आणि पुढ्यात असलेले आयुष्य दुधात मिठाचा खडा पडल्यासारखे नासून जाते. यातील काहीजणी मग स्वत:ला सिगारेट,दारू, ड्रग्ज या व्यसनांत पूर्णपणे बुडवून घेतात तर काहीजणी उद्विग्न मनस्थितीत मृत्यूला कवटाळतात.  
एखाद्या विकृत स्वभावाच्या माणसाच्या स्वाधीन स्वत:ला करून संपवण्यासाठीच केवळ आपण या शरीराचा वापर करणार आहोत का याचा विचार प्रत्येक सुशिक्षित म्हणवणाऱ्या मुलीने या क्षणापासून केला पाहिजे असे मला वाटते. आपले विचार, तत्वे, स्वप्ने  यांना साकार होण्याचा अधिकार आहे की नाही याचा विचार केला गेला पाहिजे. आपली सुखाची कल्पना आणि दुसऱ्या व्यक्तीची सुखाची कल्पना यांचा समन्वय साधला जातोय का याचा विचार किमान केला गेला पाहिजे. आपले प्रेम आपण दुसऱ्यावर त्याची इच्छा नसताना लादतोय का याचा विचार व्हायला हवा आणि या अशा एकतर्फी प्रेमसंबंधातून आपल्या स्वप्नांची पूर्तता होणार आहे की नाही याचेही भान प्रत्येक मुलीला असलेच पाहिजे. त्या पुरुषाच्या मोहजालात अडकून आपले घरच्यांशी असलेले नातेसंबंध दुरावत चालले आहेत का याचाही आढावा स्वत:शी घेणे आवश्यक आहे.      
शेवटी मृत्यूचे पाश गळ्याभोवती आवळत स्वत:चे आयुष्य स्वत:ला परके करायचे की प्रेमात सावधानता बाळगत नाती,करियर उत्तम रीतीने सांभाळत भविष्याच्या रेशमी लड्या आपल्याशा करायच्या हा निर्णय ज्याचा त्याचा !

No comments:

Post a Comment