गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे
ज्याचे खरे न गाणे तो बेईमान आहे
या शब्दांप्रमाणे त्यांनी कवितेशी आणि गाण्याशी आत्यंतिक निष्ठा राखत आपल्या आयुष्याचेच गाणे केले. कवीच्या मनात गाणं असलं पाहिजे आणि गीतकाराच्या मनात कविता असली पाहिजे या पाडगावकरांच्या वाक्याने कविता आणि गीत या साहित्यप्रकारांचे एकमेकांशी नाते अधिक घट्ट केले.
'शुक्रतारा मंदवारा' या गीताने तर वर्षानुवर्षे अनेक युगुलांच्या मनात प्रेमाचा झरा वाहता ठेवला, त्यांच्या हृदयात बारमाही वसंत फुलवला आणि चांदण्यांची अव्याहत बरसात केली. 'डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी' या गाण्याने अनेकांची कातरवेळ अधिक गहिरी झाली. 'श्रावणात घननीळा' या गीताने अनेक रसिकांच्या मनातला मोरपिसारा सतत फुलत ठेवला.
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेउनी जाती
दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती
या ओळींनी एक चिरंतन वैश्विक सत्य सांगितलं.
कुठे कुणाच्या घडल्या भेटी
गीत एक मोहरले ओठी
त्या जुळल्या हृदयांची गाथा सूर अजूनही गाती
अशासारख्या त्यांच्या अनेक भावूक गीतांनी शेकडो रसिकांच्या मनात कायमचं घर केलं ज्याचं मोल करता येणं केवळ अशक्य आहे.
पाडगावकरांची प्रतिभा निसर्ग कवितेतून खुलली, प्रेम कवितेतून फुलली, भाव कवितेतून तेवली आणि गझलेतून निनादली.
डोळ्यांत जन्म सारा दाटून डोह झाला
अश्रूत चंद्र माझ्या विखरून रात्र गेली
किंवा
बागेत अक्षरांच्या जन्मास फूल आले
अपुल्याच अंतरीच्या रंगात फूल न्हाले
ही व्यक्त होण्यातील उत्कटता त्यांच्या अनेक गझलांतून आणि भावकवितांतून जाणवत राहते.
वास्तवावर उपरोधिक भाष्य करणारी त्यांची 'सलाम' ही कविता किंवा
जेव्हा राजरस्त्यावर कोल्ह्यांचा महापूर येतो
आणि एकामागून एक कोसळतात मूल्यांची मंदिरे
यासारखे नीतिभ्रष्ट माणसांवर ओढलेले शाब्दिक कोरडे किंवा
मी पाहिले काचेचे संत
भुश्शाचे आत्मे भरलेले
झोपेच्या शब्दगोळ्यांचे घाउक कंत्राटदार
रेशमी नेसून प्रवचने करताना
या सारख्या पाखंडी अध्यात्मवाद्यांना सुनावलेले खडे बोल किंवा
हिप्नोटीस्टांनी हुकुम केला
एकसाथ द्वेष करा
आम्ही करकरा चावले सामूहिक द्वेषाचे दात
यासारख्या राजकीय संदर्भ असलेल्या कविता पाडगावकरांच्या सर्वकष जाणीवेच्या साक्षीदार होत्या.
शब्द खोल कळलेल्या समजूतदार दु:खासाठी
शब्द निष्पापांच्या घावावर बांधण्यासाठी
शब्द कालच्या काळोखाच्या विध्वंसासाठी
शब्द नव्या पहाटेच्या दुर्दम्य आश्वासनासाठी
असे असंख्य चपखल शब्द योजून ज्यांनी स्वप्रतीभेने कविता आणि गाणं रसिकहृदयी विराजमान केलं त्या शब्द्प्रभूला माझी ही छोटीशी आदरांजली!
भारतातील अनेक राज्यांना 'स्मार्ट सिटी' करण्याची अधिकृत घोषणा झाली आहे. पण जर बारकाईने पहिले तर यातील अनेक राज्यांतर्गत मुलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे, प्रदूषण, दारिद्र्य , भ्रष्टाचार, अत्याचार, अस्वच्छता व त्यामुळे होणारी रोगराई अशा अनेक अंतर्गत समस्यांनी कित्येक राज्यांना ग्रासलं आहे. या समस्यांचे निवारण न करता केवळ बाह्यस्वरूपी योजना अमलात आणणे हे म्हणजे हजारो व्याधींनी पछाडलेल्या व्यक्तीला केवळ उत्तम रंग-केश आणि वेशभूषा करून बसवल्यासारखे आहे.
दिवसागणिक किंबहुना तासागणिक होणाऱ्या महिलांवरील अत्याचाराचे समूळ उच्चाटन करण्यास शासन असमर्थ ठरले आहे. कायद्यात कोणत्याही कडक शिक्षेची योग्य ती तरतूद नसल्यामुळे लहान बालिका ते वयोवृध्द महिला या अत्याचारांना सतत बळी पडत आहेत. घरी व दारी या वाढत्या पुरुषी अत्याचाराच्या कहाण्या फोफावत आहेत आणि कोणत्याही कडक कायद्याअभावी या विकृत मानसिकतेचे तण माजले आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढतेच आहे. गरिबीला कंटाळून, रेल्वेचा पास काढायला पैसे नाहीत म्हणून, शाळेची फी भरायला पैसे नाहीत म्हणून, कुटुंबाचे पोट भरायला पैसे नाहीत म्हणून अनेकजण आपले वय विसरून आपली मान फासाच्या ताब्यात देत आहेत. सरकार मगरीचे अश्रू ढाऴण्यात आणि एकमेकांवर दोषारोप करण्यात व्यग्र आहे.
अनेक वेळा काही सार्वजनिक कामांसाठी रस्ते उकरले जातात परंतु काम झाल्यानंतर मात्र त्या रस्त्यांची जी काही अवस्था होते ती बघण्यासाठी या महानगरपालिकेतील अधिकारी चुकूनही फिरकत नाहीत. हा असा रस्ता म्हणजे अनेक अपघातांना खुले निमंत्रण असते. येणारे जाणारेही मनातल्या मनात या अधिकाऱ्यांच्या नावाने बोटे मोडत राहतात आणि अशा अपघातप्रवण रस्त्यांवरून सर्व वाहनांची येजा तशीच चालू राहते.
ठिकठिकाणी जाहीर समारंभ, सोहळे, जत्रा, मेळावे अव्याहत चालू असतात. रोषणाईवर वारेमाप पैसा उधळला जातो. वीजही फुकट जाते. याशिवाय खरा उच्छाद असतो तो ठणठणा वाजणाऱ्या गाण्यांचा. उत्तम ऐकू येत असलेल्यालाही कर्णबधीर करतील इतक्या जोरात ही गाणी सुरु असतात. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांत कुणी नुकतीच जन्मलेली बालके किंवा रुग्ण असू शकतात. तक्रार केल्यास दमदाटीचे भय असते. या ध्वनी प्रदूषणाच्या समस्येवर अजून तरी कोणताही प्रभावी तोडगा निघाल्याचे ऐकिवात नाही.
आता अट्टल गुन्हेगारांबरोबर शाळेतील शिक्षकही मुला-मुलींवर अत्याचार करण्यास सरसावत आहेत. वरून शिक्षकी पेशाचे वेष्टन घालून आत नराधम वावरत आहेत. सगळ्यात 'easy targets' म्हणजे लहान मुले व असहाय्य मुली. या मुलांच्या निरागसतेचा फायदा घेत या मुलामुलींना याच्या आयुष्यातून उठवून, त्यांचे भविष्य अंध:कारमय करून हे पापी उजळ माथ्याने समाजात वावरत आहेत. यांना कसलाही निर्बंध, धाक, वचक उरलेला नाही. भावी पिढीचे असे अतोनात नुकसान करणाऱ्यांना कायद्यात नक्की कोणती शिक्षा आहे?
रस्त्यावर जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढीग व त्यावर सर्रास वावरणाऱ्या घुशी, कुत्रे , कीटक, साचलेल्या पाण्याची डबकी, उघडून ठेवलेली गटारे व त्यातून वाहणारी दुर्गंधी आणि हे सर्व जातायेता अनुभवणारे पादचारी असे दैनंदिन दृश्य अनेक ठिकाणी पाहायला मिळते. स्वच्छ भारत अभियानाचे तीन तेरा वाजवणारी ही दृश्ये 'स्मार्ट सिटी' ची घोषणा करणाऱ्यांनी सोयीस्कर रित्या डोळ्यांआड केली आहेत का असा प्रश्न पडतो.
देशाचे संरक्षण करणाऱ्या पोलिसदलाची अवस्था बरी म्हणण्याइतपत तरी आहे का? त्यांना राहायला चांगली घरे नाहीत, कसल्याही सोयी नाहीत, व्यवस्थित म्हणावा असा पगार नाही आणि त्यांच्यावर लादलेला कामाचा अतिरिक्त ताण हे सगळे केवळ मजबुरी म्हणून त्यांनी कधीपर्यंत सोसायचे? आपल्या मासिक पगारात जर त्यांना घरच्यांच्या किमान गरजाही भागवता येणार नसतील तर त्यांचा हात टेबलाखाली जायचा राहील का? म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार करावा असे मुळीच नाही पण त्यांना स्वत:च्या किमान गरजा पूर्ण करण्याचा हक्क तरी आहे की नाही? यासाठी कोण जबाबदार आहे?
अनेक सरकारी शाळांची दुरावस्था, तिथे शिक्षण घेण्याऱ्या मुलांची हलाखीची स्थिती, कुपोषणामुळे बालकांचे ओढवणारे मृत्यू, अस्वच्छतेमुळे पसरणारी रोगराई, लहान मुलांची तस्करी, बालमजुरी, साक्षरतेपासून वंचित राहणारी अनेक मुले, अंधश्रद्धांच्या आहारी जाऊन घेतले जाणारे बालकांचे बळी, वाईट संगतीत फसली जाणारी शाळकरी मुले अशा अनेक समस्यांकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची आज गरज आहे अन्यथा देशाला पुढे घेऊन जाणारी ही भावी पिढी स्वत: तर अज्ञानाच्या अंधारात खितपत तर पडेलच पण देशाचे भविष्य सुद्धा अंध:कारमय झाल्याशिवाय राहणार नाही.
शाळेत एखादा विषय कमी केला तरी चालेल पण मुलांना पर्यावरणाचे महत्व, सहृदयता, काही मुलभूत संस्कार जसे प्रेम, ममत्व, आदर, सहिष्णुता, मानवता यांचे शिक्षण मिळायलाच हवे जेणेकरून नुसतीच पैशांसाठी उरीपोटी घोडदौड करणारी मानवी यंत्रे निर्माण न होता त्यातून उद्याचे उत्तम मागारिक निर्माण होतील.
वयोवृद्धांसाठी सुरक्षेचा प्रश्नही दिवसेंदिवस बिकट होतो आहे. वार्धक्यात अनेकांना घरी एकटे राहण्याचा प्रसंग येतो अशावेळी त्यांना सुरक्षेची नितांत आवश्यकता असते. केवळ काही पैशांसाठी आजवर अनेक वृद्धांची हत्या झाली आहे. यात फक्त बाहेरचेच नाहीत तर बरेचवेळा कुटुंबीयही सामील असतात. अनेक वृद्धांना वेळ कसा घालवायचा हा प्रश्न पोखरून टाकत असतो. यावर उपाययोजना आखली गेली पाहिजे. त्यांच्या अनुभवाचा तरुणांना फायदा होण्यासाठी शासनाने मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावीत म्हणजे त्याद्वारे या अनुभवी लोकांना इतरांसाठी काही केल्याचे समाधान मिळेल आणि आर्थिक दृष्ट्याही कोणावर अवलंबून राहण्याची पाळी त्यांच्यावर येणार नाही शिवाय वेळेचेही उत्तम नियोजन होईल.
आजकालच्या तरुणांवर कामाचा अनावश्यक ताण असतो. त्यांच्या ऑफिसला जायच्या वेळा जरी निश्चित असल्या तरी यायच्या नसतात. सतत संगणकासमोर बसून डोळे आणि पाठ यांच्या व्याधी निर्माण होतात. 'targets' achieve करण्यासाठी जीवाचे रान करणारी ही तरुण पिढी अवघ्या तिशी-चाळीशीतच अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांनी ग्रस्त होते. वाढती महागाई, changed life style आणि बाहेर चाललेली जीवघेणी स्पर्धा यामुळे या तरुण पिढीची अतोनात दमछाक होते. ते कुटुंबालाही पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. घरचे सकस अन्न पोटात न जाता बरेचवेळा हॉटेल मधील अन्न, fast food खाउन पोटाची भूक शमवली जाते. मुलांनाही योग्य वयात त्यांच्या आई-वडिलांचा सहवास न मिळाल्याने ती हट्टी, बेपर्वा,
असंस्कारक्षम, संवेदना हरवलेली, कोरडी तसेच एकलकोंडी होऊन जातात. या सततच्या कामाच्या ओझ्याखाली अनेक शारीरिक आणि मानसिक व्याधींना आमंत्रण देणारया तरुण पिढीसाठी काही ठोस पावले उचलण्याची आत्यंतिक गरज आहे.
याशिवाय सार्वजनिक ठिकाणी उत्तम आणि स्वच्छ प्रसाधनगृहे उभारण्याची आवश्यकता आहे जेणेकरून रस्त्यावर इतरत्र घाण होणार नाही. चाकरमान्यांच्या प्रवासांतर्गत सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली पाहिजे जेणेकरून कामाच्या वेळा कोणत्याही असोत त्यांना प्रवासाचे आणि प्रवाशांचे भय वाटणार नाही.
आजमितीला अशा कैक समस्या आपल्या कराल दाढा उघडून उभ्या आहेत. त्यांचे वेळीच निराकरण करण्यात सरकारचे आणि पर्यायाने जनतेचे हित आहे. या समस्या तशाच ठेऊन स्मार्ट सिटी योजना राबवाल तर भविष्यात ही सिटी सगळ्याच निकषांवर 'poor' सिटी म्हणून घोषित करावी लागेल.
मी कोण आहे किंवा कोहं यासारख्या प्रश्नांची कोडी सोडवता सोडवता केस पांढरे होतात. सगळ्यांनाच असे प्रश्न पडतात असेही नाही. पण खरंच माझ्यात वसणाऱ्या या 'मी' ची ओळख जर आपण कुतुहलापोटी का होईना पण करून घेतली तर आपले आयुष्य रंजक व्हायला मदत होईल. धर्मभेद, जातीभेद, श्रेष्ठ-कनिष्ठ यांच्यातील वाद संपुष्टात येतील. प्रत्येकाची इहलोकीची यात्रा सुखकर होईल.
जन्मत: आपल्याला शरीर मिळतं. पण हे शरीर म्हणजे मी आहे का? यथावकाश या शरीराला एक नाव मिळतं. मग हे नाव म्हणजे मी आहे का? आपल्याला नाती मिळतात. पालक मिळतात. मित्र-मैत्रिणी मिळतात. आपल्याला शिक्षण मिळते. डिग्री मिळते. नंतर नोकरी मिळते. नात्यांचा परीघ वाढत जातो. लग्न होते. घरी-दारी आपल्या संपर्कात येणाऱ्या माणसांची संख्या वाढतच जाते. मग काही काळानंतर आपल्याला मुले होतात. संसार विस्तारतो. तारुण्याकडून आपण प्रौढत्वाकडे झुकतो व नंतर वृद्धत्वाकडे. आता नातवंडे आपल्या अवतीभवती वावरू लागतात. आपली आजी-आजोबांची धुरा आपण आनंदाने सांभाळू लागतो. बाल्य-तारुण्य-प्रौढत्व-वार्धक्य या अवस्थेनंतर या शरीरावरील आपला हक्क डळमळीत व्हायला लागतो आणि कधीतरी या शरीरातील 'मी' चा प्रवास संपून जातो. पण 'मी' मात्र संपत नाही. ही यात्रा युगानुयुगे सुरूच राहते.
'Energy can never be created and destroyed' हे वाक्य आपण विज्ञानाच्या संदर्भात अनेकदा ऐकलेले असते. परंतु माझ्या शरीरातील 'मी' म्हणजे हाच 'energy form' आहे हे किती जणांना ठाऊक असते? आपल्या आजूबाजूला वावरणारी अनेकविध माणसे म्हणजेच असे अनेकविध 'energy forms' असतात. आता हा energy form म्हणजे 'spirit' म्हणजेच 'आत्मा'. आत्मा हा शब्द उच्चारताच मेलेल्या माणसांचे इच्छा अतृप्त राहिलेले, पिंडाला न शिवणारे, पिशाच्चयोनीत भटकणारे असे काही चित्र आपल्या डोळ्यासमोर तरळते. परंतु शरीरात राहून जीवन व्यतीत करणारेही आत्मेच असतात.
आपल्याला माता -पित्यांकडून नाव मिळाल्यानंतर आपला एक धर्म, एक जात निश्चित होते. हा हिंदू, तो मुस्लिम, तो शीख, तो पारशी, हा ब्राम्हण, तो कायस्थ, तो क्षत्रिय अशी धर्माची आणि जातीची वर्गवारी निश्चित होते. आखलेल्या रुळांवरून आपल्याला आता मार्गक्रमणा करायची असते. आपण मी हिंदू आहे किंवा मी मुस्लिम आहे असे अभिमानाने सांगतो. पण माझ्यातील 'मी' हा हिंदू वा मुसलमान वा ब्राम्हण वा क्षत्रिय कधीच नसतो. तर तो या जात, धर्म, पंथाच्या पलीकडे असतो. मी 'Indian' आहे असे सांगण्याऐवजी मी India या देशात जन्म घेतला आहे असे का म्हणत नाही? मी हिंदू आहे असे म्हणण्याऐवजी 'this is my way of connecting to Him' असे का म्हणत नाही त्याचप्रमाणे दुसऱ्या धर्मबंधूबद्दल 'that is his way of connecting to Him' असे का म्हणत नाही? यामुळे धार्मिक तेढ न वाढता धार्मिक सामंजस्य वाढू शकेल. कोणताही धर्म असो, त्याचा अंतिम उद्देश त्या 'source of light' ची उपासना करणे व त्याच्या जवळ जाता येणे हाच असतो ना? एखाद्या जातीबद्दलसुद्धा मी ब्राम्हण असा वृथा अहंकार न बाळगता 'this is my way of functioning' असे का बरे म्हणत नाही? प्रत्येकाचा धर्म आणि जात वेगवेगळी असेना का त्यातून परस्पर सलोख्याची भावनाच निर्माण होणे अभिप्रेत असते. माणसाशी माणसासारखे वागणे हा माझ्यातील 'मी' चा सर्वोच्च धर्म असायला हवा व त्या दृष्टीने माझे आचरण असायला हवे.
रंगभूमीवर वावरणारा नट त्याच्या वाट्याला आलेली भूमिका जीव ओतून करतो. रसिकांकडून 'appreciation' मिळवतो पण शो संपल्यावर त्या भूमिकेपासून अलिप्त होतो. या इहलोकात आपल्यापैकी प्रत्येकाच्याच वाट्याला काहीनकाही भूमिका येतात. मुलगी-मुलगा,बहिण-भाऊ, आई-वडील, आजी-आजोबा, मित्र-मैत्रीण अशा अनेक भूमिका आपण वठवत असतो. शिक्षण संपल्यानंतर काही व्यावसायिक भूमिकाही आपल्या वाट्याला येतात. त्याही आपण इमाने-इतबारे करतो. डॉक्टर, इंजिनियर, बिझनेसमन, शिक्षक, गायक-वादक, नर्तक, शिल्पकार अशा असंख्य लौकिकार्थाने कमी-जास्त प्रतिष्ठेच्या भूमिका प्रत्येकाच्या वाट्याला येतात. पण घरी-दारी या भूमिका करताना आपण त्याच्याशी इतके तादात्म्य पावतो की एक दिवस हा शो संपणार आहे हे भान बहुसंख्य लोकांना राहत नाही. यामुळे आपल्या वाट्याला येणारे सुख-दु:खाचे भोग आपण विचलित न होता भोगू शकत नाही.
मी डॉक्टर आहे आणि तो माझा ड्रायव्हर आहे. अर्थात माझी सामाजिक प्रतिष्ठा त्याच्यापेक्षा मोठी आहे. त्याने माझ्याशी अदबीने वागायलाच हवे पण माझे त्याच्याशी वागणे हे मात्र माझ्या लौकिकाला साजेसे असेच असले पाहिजे. त्याला माझे वरिष्ठपण जाणवून देणे गरजेचे आहे. इथे एक 'मी' दुसऱ्या 'मी' शी संवाद साधत नसून माझा हुद्दा दुसऱ्या हुद्द्याशी संवाद साधतो आहे. माझी सामाजिक प्रतिष्ठा माझ्यासारख्याच दुसऱ्या 'मी'ला ओळखण्याच्या आड येते आहे. आम्ही फक्त दोन वेगळ्या भूमिका निभावतो आहोत आमच्या संस्कारांच्या माध्यमातून पण ती energy मात्र दोन्हीकडे एकच आहे हे स्वीकारायला मन तयार होत नाही. जाती,धर्म या बरोबर अशी शिक्षणानुसार, व्यवसायानुसार सामाजिक प्रतिष्ठेची वर्गवारी सर्रास केली जाते आणि आपण त्याप्रमाणे आपले आचरण करत राहतो.
अगदी बाल्यावस्थेपासून ते वृद्धत्वापर्यंत ही सामाजिक व्यवस्था जशीच्या तशी आपण स्वीकारतो आणि आपल्या प्रेमात, आनंदात, सुखात अडसर निर्माण करून ठेवतो. आतल्या 'मी' च्या सत्चित स्वरूपावर हे असे धर्माचे, जातीचे, रंगरूपाचे, शिक्षणाचे, सामाजिक प्रतिष्ठेचे मळभ साचत जाते आणि त्यालाच आपण खरे मानून चालत राहतो.
माझ्यातला 'मी' हा कृष्णासारखा असायला हवा. नानाविध लीला करूनही त्यात रममाण न होणारा. सुख-दु:खाच्या प्रसंगी 'स्व'भान हरपू न देणारा. सगळीकडे असूनही नसणारा. कार्यरत तरीही अलिप्त. द्वेष,असूया,अहंकार, लोभ,मोह, भय यांनी लिप्त नसणारा आणि प्रेम, शक्ती, संयम आणि शांततेची उटी यांच्या लिंपणाने अवकाश सुगंधित करणारा! तेजोमय ब्रम्हाशी सादृश्य सांगणारा!
टीप: या ब्लॉगमधील संपूर्ण विचार माझे नाहीत. एका spiritual teacher चे आहेत. तिच्या विचारांनी प्रभावित झाल्यामुळे ते विचार मातृभाषेत लिहिण्याचा मोह मला आवरला नाही म्हणून हा प्रपंच!
निर्भया प्रकरणातील वयाने 'बाल' पण कृतीने 'प्रौढ' असलेला आरोपी सुटला आणि संपूर्ण देशात गदारोळ उठला. निर्भयाच्या पालकांना त्यांना झालेल्या वेदनांची पुन्हा एकदा उजळणी करावी लागली. बाल आरोपीचे नक्की कोणते वय शिक्षेसाठी ग्राह्य धरावे यावर अनेक वाहिन्यांवर खल सुरु झाला. अनेक विचारवंतांची मते पुन्हा एकदा चर्चेत आली. अखेर त्या दृष्टीने राजकीय हालचाली सुरु झाल्या आणि १८ ऐवजी १६ असे वय शिक्षेसाठी निश्चित करण्यात आले. तसा कायदा संमत झाला. ही बाब कितीही स्तुत्य असली तरी या नव्या कायद्यामुळे सामाजिक परिवर्तन होऊन बाल गुन्हेगारीला आळा बसेल किंवा हा नवा कायद्याचा बडगा मुलांच्या मनात भीती निर्माण करू शकेल व त्यामुळे अशा गुन्ह्यांचे प्रमाण घटेल असे समजणे हा बालिशपणा ठरेल.
मूल हे दोन ठिकाणी घडत किंवा बिघडत असते. एक म्हणजे घर आणि दुसरे म्हणजे शाळा. एखाद्या चांगल्या अथवा वाईट कृतीची पहिली पायरी म्हणजे विचार. विचारात आचाराची बीजे असतात. शाळेत भिंतींवर सुविचारांच्या अनेक पाट्या असतात पण यातील विचार विद्यार्थ्यांच्या मनात खरोखर बिंबले गेले आहेत की नाही हे पडताळून पाहण्याची नैतिक जबाबदारी किती शाळा घेतात? घरात किती पालक मुलांच्या मनात चाललेल्या उलटसुलट विचारांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करतात? मुलांचा आचार हे त्यांच्या मनातील विचारांचे प्रकटीकरण असते हे पालक आणि शिक्षक यांना समजू शकत नाही का? उत्तम मार्क मिळवलेला आणि शाळेत अव्वल आलेला मुलगा अथवा मुलगी मनाने निकोप आणि निरोगी आहेत याची ग्वाही शिक्षक वा पालक देऊ शकतात का? 'value education' अशा नावाचा एक विषय शाळेत केवळ देखाव्यापुरता लावला जातो. यातून खरंच काही 'value addition' होते आहे का हे तपासून पाहण्याची जबाबदारी कुणाची?
आजकाल ज्याच्या त्याच्या हातात मोबाईल नामक खेळणे असते. लहान लहान मुले त्यावर बघू नये ती दृश्ये घोळक्याने बघत रस्त्यावर उभी असतात. मग त्यावर अचकट -विचकट चर्चा करतात. अत्यंत बीभत्स बोलतात. अशावेळी त्यांच्यातील 'बाल्य' लुप्त होते. त्यांचे हातवारे अन हावभाव प्रौढ माणसांसारखे होतात. वाईट विचार करण्यासाठी वय नसतं पण आचार करण्यासाठी मात्र वय निश्चित केलं जातं. आता १६ वयोमानाची व त्याखालील मुले असा अश्लाघ्य विचार आणि आचार करायला मोकळी आहेत कारण त्यांना गुन्हा केल्यानंतर शिक्षा म्हणून निरीक्षण गृहात पाठवलं जाईल पण यापलीकडे काही होणार नाही. या कायद्यामुळे १६ ते १८ वयोगटातील मुले घाबरून जातील असे समजण्याचे कारण नाही कारण कायद्यात पळवाटा बऱ्याच आहेत शिवाय वयाचे खोटे दाखलेही देता येतातच की! असा एखादा कायदा ही नुसती वरवरची मलमपट्टी आहे पण समाज पोखरत चाललेल्या या विचार व आचारांच्या वाळवीला समूळ उपटून टाकण्यास हा कायदा असमर्थ आहे.
सामाजिक परिवर्तन हवे असेल, चांगला आचार मुलांच्या हातून घडायला हवा असेल तर त्यासाठी चांगला विचार करण्यास या मुलांना उद्युक्त करायला हवे. या मुलांना मुक्या प्राण्यांच्या, छोट्या बालकांच्या सहवासात राहायला देऊन त्यांच्या मनात सहृदयता जागी करायला हवी. त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात जास्तीत जास्त राहू द्यावे कारण निसर्ग हा परमोच्च गुरु आहे. समाजकल्याणासाठी झटणाऱ्या विचारवंतांचे चरित्र या मुलांना उलगडून सांगण्याची आज नितांत गरज आहे. चांगल्या विचारांची बीजे मुलांच्या मनात रुजवण्यासाठी पालक आणि शिक्षक या दोन्ही आधारस्तंभांनी कार्यरत होण्याची आज सर्वात जास्त गरज आहे. काय बघावे, काय बघू नये, काय बोलावे, काय बोलू नये, काय ऐकावे, काय ऐकू नये याचप्रमाणे विचार कसा करावा वा कसा करू नये याविषयी मुलांना लहान वयातच जागरूक करायला हवे. नाहीतर अशा मुलांची अभ्यासातील प्रगती चांगली होऊन सुद्धा वैचारिक प्रगती खुंटेल. मुलाने मिळवलेल्या चांगल्या मार्कांची जरूर प्रशंसा करा पण त्याचे विचार योग्य मार्गानेच पुढे जात आहेत ना याचीही खात्री करून घ्यायला विसरू नका.
आमची पिढी आजी-आजोबांनी सांगितलेल्या कर्तृत्ववान माणसांच्या गोष्टी ऐकत मोठी झाली. आज आजी-आजोबा ही संस्थाच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे आई-वडिलांची जबाबदारी अधिक वाढली आहे. थोर पुरुषांच्या स्फूर्तीदायक कथा मुलांच्या संस्कारक्षम मनावर उत्तम परिणाम करून त्यांना भावी आयुष्यात सत्प्रवृत्त होण्यास खचित मदत करू शकतात. मुलांना नुसतं साक्षर करून उपयोग नाही तर त्यांना सुसंस्कृत करणं आवश्यक आहे. त्यांच्या भरकटणाऱ्या नावेला सुयोग्य दिशा हे पालक आणि शिक्षक सहज दाखवू शकतात फक्त त्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे.
शिक्षेसाठी वय १६ की १८ ही चर्चाच गौण आहे. मुळात असे गुन्हे घडूच नयेत यासाठी सामाजिक घटकांनी सजग राहायला हवे. 'मुले हीच राष्ट्राची खरी संपत्ती' अशा घोषणा देत आम्ही वर्षानुवर्षे बालदिन साजरा केला. आता 'मुले हीच राष्ट्राची खरी आपत्ती' असे म्हणायची पाळी या समाजावर कधीही येऊ नये एवढीच पार्थना तमाम पालक आणि शिक्षकांच्या चरणी!
माझ्या सुदैवाने मला अशा ओसंडून वाहणाऱ्या लोकलमधून फारसा प्रवास करावा लागला नाही. नोकरीच्या निमित्ताने अगदी अल्पकाळ मी लोकलमधून ऑफिस अवर्समध्ये प्रवास केला. अर्थात त्यावेळेस या प्रचंड गर्दीची आणि त्यामुळे होणाऱ्या गैरसोयीची झलक नक्कीच पाहायला मिळाली. लोकलमधून प्रवास करणे म्हणजेच जीव मुठीत धरणे. ह्या दैवभोगाला ज्यांना रोज सामोरे जावे लागते त्यांच्या हालाची कल्पनाही करवत नाही.
माझी एक आत्या कांदिवली ते वसई दरम्यान नोकरीसाठी प्रवास करायची. तिचा किमान दोन ते तीन वेळा चढता-उतरताना हात मोडला होता. म्हणजे नोकरी तर अपरिहार्यपणे करायची आणि रेल्वे प्रशासनाकडून असा बोनसही मिळवायचा. दादरला उतरताना आपले दोन्ही पाय गमावून बसलेली व त्यानंतर जीवही गमावून बसलेली तसेच भर गर्दीत आपला केवळ वीस वर्षाचा जीव गमावलेला असे दोघे माझ्या सोसायटीमधील होते. अशी असंख्य उदाहरणे आपल्या अवतीभवती वावरत असतात. कुणाला परत एकदा जगण्याची संधी मिळते तर कुणापासून ती पहिल्या फटक्यातच हिरावून घेतली जाते. कुणी अपघातानंतर जन्मभर अपंगावस्थेत जगण्याची शिक्षा भोगतात.
प्रचंड वाढती लोकसंख्या आणि अपुरी वाहतुकीची साधने यामुळे हे दुष्परिणाम चाकरमान्यांना रोज सहन करावे लागतात. शहरे 'स्मार्ट' करण्याआधी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे व त्यासाठी काही कडक उपाययोजना करणे, जास्तीत जास्त वाहतुकीची साधने उपलब्ध करून देणे, ओव्हरहेड वायर्स, पेंटोग्राफ याविषयी जागरूक असणे, गाड्या 'डिरेल' न होण्याची खबरदारी घेणे, ज्या लोकांच्या जीवावर सरकार निवडून आलं आहे त्या जनतेचा दैनंदिन प्रवास सुखकर व्हावा यासाठी कार्यरत राहणे याचे भान सत्ताधारयांनी सतत ठेवले पाहिजे.
रेल्वे अपघात झाला की पीडितांना तात्पुरती मदत देऊन, वाहिन्यांना काही 'इमोशनल बाइट्स' देऊन प्रशासन हात झटकते. रोज वाढत जाणारी platform वरील गर्दी, गाड्यांची अनियमितता, खिसेकापू, भिकारी, फेरीवाले यांची गर्दीतील अव्याहत लुडबुड, प्रसाधनगृहांची कमालीची अस्वच्छता, रेल्वे वेळापत्रकाचा उडालेला बोजवारा, त्यात कधी येणारी नैसर्गिक तर कधी यांत्रिक संकटे यामुळे लोकलने प्रवास करणे म्हणजे मागील जन्मी केलेल्या पातकांचे प्रायश्चित्त घेणे असे वाटू लागले आहे. गरोदर बायका, लहान मुले आणि वृध्द यांनी या रेल्वेच्या माध्यमातून प्रवास टाळावा इतपत हा प्रवास असुरक्षित झाला आहे.
लोकल स्टेशनात आली की मागचा-पुढचा विचार न करता लोक धावत सुटतात. 'सीट' मिळवण्याची प्रत्येकालाच इतकी घाई असते की त्यापायी आपण कुणाचे शारीरिक नुकसान तर करत नाही याचे साधे भानही कुणाला उरत नाही. भर गर्दीच्या वेळेस लोकलमधून इच्छित स्थळी चढणे आणि उतरणे हा एक जीवावर येणारा अनुभव असतो. रेल्वेच्या डब्यात भल्या सकाळी प्रवास करणे हा एक दुर्गंधीयुक्त असाही अनुभव असतो. गाडीच्या दुतर्फा हेच दृश्य असते आणि ते फुटबोर्ड वर उभे राहणाऱ्यांना इच्छा असो वा नसो पण बघावेच लागते. गाडीत सीट वरून भांडणे, गलिच्छ शिवीगाळ हेही नित्याचेच असते. काही वेळेस मारामारीपर्यंत हे वाद जातात. रोज या नरकातून जाण्यापेक्षा मरण बरे अशी अनेकांची भावना असते.
हे सारे वर्षानुवर्षे तसेच आहे. तसूभरही बदललेले नाही. चाकरमान्यांचे लोंढे मात्र दिसामाशी वाढताहेत. संकुचित आकाराच्या ब्रिजवरून येणारी-जाणारी भीषण गर्दी बघून चेंगराचेंगरीच्या अपघाताचे सतत भय वाटत राहते. सकाळी रेल्वेमधून गेलेली आपल्या घरातील व्यक्ती सुखरूप परत येईल ना अशी शंका अनेक गृहिणींच्या, वडीलधारयांच्या मनात डोकावल्याशिवाय राहत नाही. शहरे आधुनिक आणि स्मार्ट बनवायची आणि जनतेच्या दैनंदिन गैरसोयी, मुलभूत गरजा दुर्लक्षित करायच्या या प्रशासनाच्या अजब न्यायाविरुध्द आवाज उठवण्याची आज खरी गरज आहे.
मुंबईची 'लाईफ लाईन' असे जिचे वर्णन केले जाते ती लाईफ देणारी आहे की हिरावून घेणारी आहे याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आज आली आहे.
संजय लीला भन्साळी यांचा बाजीराव-मस्तानी हा बहुचर्चित चित्रपट येत्या १८ तारखेला चंदेरी पडद्यावर झळकणार आहे. यातील गाण्यांचे प्रोमोज टीव्ही वर दाखवले जात आहेत. भन्साळी यांनी म्हणे तब्बल बारा वर्षे या चित्रपटाची अभ्यासपूर्ण तयारी केली(?) बाजीराव हे खंदे लढवय्ये होते. मस्तानीचा उल्लेख 'नाटकशाळा' असा केला जायचा. काशीबाई या बाजीरावांच्या भार्या असून त्या शालीन आणि कुलीन अशा स्त्री होत्या. त्यांची मस्तानीबरोबरची उठबस ही अशक्यप्राय कोटीतील गोष्ट होती. शिवाय बाजीराव हे फक्त नाच-गाण्यात रमणारे राज्यकर्ते नसून एक शूर आणि निष्णात राजकारणी म्हणून त्यांचा लौकिक होता. या पार्श्वभूमीवर या आगामी चित्रपटातील बाजीरावांवर चित्रित केलेले आणि काशीबाई आणि मस्तानी या दोघींवर चित्रित केलेली गाणी पूर्णपणे आक्षेपार्ह आहेत.
इतिहासाच्या निरीला हात घालताना तो जरा जपूनच आणि अवधान सांभाळूनच घालावा लागतो हे भन्साळी यांना कुणीतरी सांगायला हवे. अनेक दस्तऐवजातून आणि चरित्रातून ह्या अलौकिक व्यक्तींच्या उज्ज्वल प्रतिमा करोडो लोकांच्या हृदयात कोरल्या गेलेल्या असतात. या अशा लोकोत्तर पुरुषांचे तेजोमय कर्तृत्व हे अनेकांसाठी एक स्फूर्तीस्थान असते. त्यांचे खाजगी आयुष्य हा फक्त त्यांच्या संपूर्ण जीवनातील एक भावनिक कप्पा असतो जो इतरांसाठी बंद असतो. अशा वीरांचे खाजगी आयुष्य चव्हाट्यावर आणून जणू काही अशा प्रकारचेच जीवन बाजीराव जगत होते हे दाखवण्याचा खटाटोप या चित्रपटाच्या निमित्ताने केला जात आहे.
शिवाजी महाराजांचे खाजगी आयुष्य अथवा ज्या शूरांनी स्वपराक्रमाने इतिहास घडवला त्यांचे खाजगी जीवन अधोरेखित करून काय साधले जाणार आहे? ज्या व्यक्तींशी आपले नाते हे केवळ त्यांच्या असाधारण कर्तृत्वामुळे जोडले जाते त्या व्यक्तींच्या खाजगी जीवनाचा उहापोह चित्रपटाद्वारे करून कोणता संदेश जनमानसात दिला जातो याचे भान ठेवणे नितांत गरजेचे आहे. ज्या नव्या पिढीतील तरुणांनी बाजीरावांना कधी इतिहासातून अथवा कथा-कादंबरी यांच्या माध्यमातून अनुभवलेच नाही अशा व्यक्तींना बाजीरावाची ही पडद्यावर साकारली गेलेली प्रतिमाच खरी वाटू लागेल. जे जाणते आहेत आणि बाजीरावांचे लढवय्येपण ज्यांनी इतिहासातून अनुभवले आहे त्यांना ही गाणी म्हणजे बाजीरावांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रतिमेचे धिंडवडे वाटल्याशिवाय राहणार नाहीत.
केवळ भव्य-दिव्य आणि दिमाखदार सेट्स लावून, नट्यांना भरजरी साड्या आणि दागिन्यांनी मढवून इतिहासाची पाठराखण करता येत नाही. लोकांची दिशाभूल मात्र जरूर करता येते. भन्साळी यांच्या चित्रपटातील सोहळे जरी कितीही नेत्रदीपक असतील तरी त्यांनी हे लक्षात घ्यावे की अशा महापुरुषांचे कार्य हेच मुळी जनसामान्यांचे डोळे दिपवणारे होते. बाजीरावांचे फक्त मस्तानीवर प्रेम नव्हते तर त्यांच्या तख्तावर, राज्यातील जनतेवर आणि त्यांच्या नसानसातून स्त्रवत असलेल्या शौर्यावरही त्यांचे निस्सीम प्रेम होते. त्यांची निष्ठा नाच-गाण्यापेक्षा त्यांच्या समशेरीवर अधिक होती. घडलेला इतिहास त्याचे विद्रुपीकरण करून किंवा तो भ्रष्ट स्वरुपात दाखवणे हे थोर पुरुषांचे चारित्र्यहनन केल्यासारखेच आहे.
असो. चित्रपटावर आताच भाष्य करणे योग्य होणार नाही कारण अजून हा चित्रपट रिलीज झालेला नाही. परंतु त्यातील गाण्यांची झलक मात्र इतिहासाचे वास्तव गढूळ करणारी आहे असे प्रामाणिकपणे वाटते.