'दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती' ही काव्यपंक्ती २३ वर्षीय सौरभ निंबकर नावाच्या तरुणाने सार्थ ठरवली आहे. मी काही महिन्यांपूर्वी, नमस्कार हा वयाला नव्हे तर माणसाच्या वर्तनाला,कर्तृत्वाला करायचा असतो अशा आशयाचा ब्लॉग लिहिला होता. खरंच सौरभच्या या माणुसकी जपणाऱ्या वर्तनाला माझा मनापासून नमस्कार!
त्याची आई cancer होऊन गेली. ती केईएम मध्ये admit असताना इतर समदु:खी परिवारांच्या यातना त्याने बघितल्या. cancer सारख्या दुर्धर रोगाची treatment घेताना सामान्यांच्या तोंडाला फेस आणणारा अमाप खर्च, निकटच्या नातेवाईकांची होत असलेली कुतरओढ, आपल्या ऐपतीपेक्षा कित्येक पटींनी खर्च करून कंगाल झालेली कुटुंबे हे सगळे सौरभने अनुभवले आणि त्याच्या आत असलेला माणुसकीचा झरा खळखळून वाहण्यासाठी आतुर होऊ लागला.
त्याला cancer ने पिडीत असणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी काहीतरी करायचे होते. विचार सुरु झाला. विचार आणि लहानपणापासून जपलेली आवड यांची सांगड घातली गेली आणि मध्य रेल्वेतील डब्यांत गिटारचे सूर निनादू लागले. जरा बऱ्या घरातला आणि चांगल्या कपड्यांमधील हा 'भिकारी' अनेकांना आवडू लागला. गर्दीने खचाखच भरलेला डबा तर हवा परंतु गिटार वाजवण्यासाठी space सुद्धा हवी. त्यामुळे असा नेमका स्पॉट हेरून ही संगीतपूजा सुरु झाली. काही प्रवासी या स्वरलहरीत सामील होऊ लागले. यातून जमणाऱ्या उत्पन्नाचा cancer पिडीत तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी विनियोग केला जाणार होता. सौरभचा हा उपक्रम अनेकांना स्तुत्य वाटला.
२-३ दिवसांपूर्वी सौरभच्या या उपक्रमाला खुद्द बिग बिंचा हातभार लागला आणि त्याच्या प्रयत्नांना जणू परीसस्पर्शच झाला. या सीएसटी टू अंबरनाथ ट्रेनमधील सुरांच्या अनोख्या यात्रेत साक्षात अमिताभ सहभागी झाले. त्यांनीही इतर प्रवाशांबरोबर गाणी गात सौरभच्या उपक्रमाला चार चाँद लावले. हा गिटार वाजवणारा अवलिया आता अधिकाधिक परिचित होईल आणि त्याच्या या अभिनव योजनेला आणखी आर्थिक यश मिळेल अशी खात्री वाटते आहे.
टी व्ही वर नुसते 'शो' करून सामाजिक बांधिलकी जपली जाते का हाच खरा प्रश्न आहे. नामांकित सुपरस्टार अशा शो द्वारे जनजागृती करण्याचा फक्त 'शो' करतात. शो संपला की जाणीवही लोपते आणि हे सो कॉल्ड सुपरस्टार आपापली popularity एन्कॅश करून पुढील प्रोजेक्ट करायला धावतात.
सौरभला music मध्ये किती गती आहे यापेक्षा जे थोडंफार ज्ञान त्याच्या गाठीशी आहे ते अशा पद्धतीने एन्कॅश करून त्या ज्ञानाचा, छंदाचा तो ज्या कारणासाठी वापर करू इच्छितो आहे ही बाब मुळातच त्याच्यातील उत्तुंगतेची जाणीव करून देणारी आहे. वयाच्या पंचाहत्तरीला सुद्धा प्रॉपर्टी, दागिने, पैसा या भौतिकतेला घट्ट आवळून बसणाऱ्या आणि केवळ शारीरिक वयाच्या हिशेबात स्वत:ला 'ज्येष्ठ' म्हणवून घेणाऱ्या अनेकांना विचारप्रवृत्त करणारा सौरभ समस्त आबालवृद्धांसाठी एक 'आदर्श' आहे यात तिळमात्रही शंका नाही.
No comments:
Post a Comment