Monday, 6 July 2015

Water filter, चिक्की, वह्या अन बरेच काही ……….


या निवडणुकीच्या वेळी भाजपने आपल्या पक्षाची अशी काही हवा तयार केली की पंधरा वर्षांच्या काँग्रेसच्या भ्रष्टाचारी राजवटीला जनता कंटाळली आहे, मंत्रांच्या अनेकविध घोटाळ्यांनी पुरेपूर त्रस्त झाली आहे. त्यामुळे या समस्त जनतेला या भ्रष्टाचारी राजवटीच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी आम्ही सर्वार्थाने सक्षम आहोत. एकदा का आम्ही सत्तेवर आलो की हे वर्षानुवर्षे जनतेला दिसत असलेलं चित्र पूर्णतया बदलेल. उत्तम शासनकर्ते जनतेला लाभतील. काळा पैसा, बेकारी, अवैध बांधकामे, वीज, पाणी, महागाई, रस्ते, शिक्षण, वाहतूक, टोलसमस्या, शेतकऱ्यांची दयनीय अवस्था, महिलांवरील अत्याचार  अशा अनेक प्रश्नांना पूर्णविराम मिळेल. उद्योगधंद्यांना बरकत येईल. थोडक्यात सगळीकडे आलबेल होईल. या सगळ्या प्रचाराचा परिपाक म्हणून मग जनतेने एकदाचे भाजपला निवडून दिले. या आशेवर की ज्या दैनंदिन समस्या माणसाला भेडसावत आहेत त्यांचे निराकरण हा सत्ताधारी पक्ष व त्या पक्षाचा सहकारी पक्ष हे मिळून करतील. सामाजिक आणि राष्ट्रीय आपत्तीपासून आपलं रक्षण होईल. पण वास्तवातील चित्र मात्र अजिबात बदललेले नाही. फक्त खुर्च्यांवरील माणसे बदलली पण जनतेच्या पदरी मात्र घोर निराशाच पडली असे आज आत्यंतिक खेदाने म्हणावे लागते आहे.                      
विदेशातून काळा पैसा परत भारतात आणण्याच्या वल्गना हवेत कधीच्याच विरून गेल्या. महागाई य:त्किंचीतही कमी झाली नाही. शेतकऱ्यांकडे योग्य ती मदत पोहोचली नाही. उद्योगधंदे महाराष्ट्राबाहेर चालले.  अनेक ग्रामीण भागात भेडसावणाऱ्या पाणी आणि विजेच्या दुर्भिक्षावर तोडगा निघू शकला नाही. परप्रांतीयांचे लोंढे सुरूच आहेत त्यांना कोणताच अटकाव नाही. अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी केलेले अक्षम्य घोटाळे अजूनही उघडकीस आलेले नाहीत. समित्या, अहवाल आणि चौकश्या या पलीकडे सरकार काही ठोस पावले उचलेल याची शक्यता शून्य टक्के आहे. चुकीच्या डिग्र्या लिहून जनतेची दिशाभूल मंत्री करत आहेत. धर्मांध वक्तव्ये करून समाजात तणावाचे वातावरण पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. काही मंत्री अंधश्रद्धेच्या आहारी जात आहेत. जनता ज्या रस्त्यावरून दररोज ये जा करते त्या रस्त्यांचे नशीब बदलण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. रस्त्यांची कंत्राटे दिली की खड्ड्यांची असा संभ्रम माणसांच्या मनात उत्पन्न होतो आहे. पर्यावरणाची अपरिमित हानी रोजच होते आहे. एक पाउस फक्त समस्त जनतेला समस्यांच्या पुरात लोटण्यास समर्थ आहे. नालेसफाईचा आजवरच्या शिरस्त्याप्रमाणे बोजवारा उडालेला आहे. हॉस्पिटलच्या आवारातील दुर्गंधी हटायला म्हणून तयार नाही. अनेक ठिकाणी रस्त्यावर साचलेले कचऱ्याचे ढीग व त्याभोवती घुटमळणारे कीटक आणि प्राणी सामाजिक आरोग्याला घातक आहेत.   
त्यात आता रोजच भाजप मंत्रांची नवनवीन प्रकरणे ऐकिवात येत आहेत. ती खरी आहेत असे विरोधक ठासून म्हणत आहेत तर ती सपशेल खोटी आहेत असे सत्ताधीश म्हणत आहेत. आपापले निर्दोषत्व सिध्द करण्यासाठी पत्रकार परिषदा घेतल्या जात आहेत. दृक-श्राव्य माध्यमे आपल्या खास पद्धतीने अशा खमंग चर्चा घडवून आणून त्यांचे सादरीकरण जनतेला दाखवीत आहेत. अंगणवाड्या एकदम प्रकाशात आल्या आहेत. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. तिथले शिक्षक, आया किंवा संबंधित लोकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. ई-टेन्डरिंग, दरकरार, GR  असे रोजच्या वापरत ऐकू न येणारे शब्द  जनतेचे लक्ष वेधून घेत आहेत. इतक्या कोटींची खरेदी केली पण ती अनेक अंगणवाड्यांत पोहोचलीच कुठे हा सवाल मंत्री महोदयांना विचारला जातोय. निकृष्ट दर्जाचे अन्न अंगणवाड्यांतील मुलांना कसे मिळते आहे याबद्दलची दृश्ये अनेक वाहिन्यांवरून प्रसारित केली जात आहेत. चिक्कीत सापडलेल्या अळ्या, गळके water filter, अवाजवी आकाराच्या चटया आणि असे बरेच काही चव्हाट्यावर येते आहे.शाळांत बसवल्या जाणाऱ्या fire extinguisher संबंधीही गैरव्यवहार झाल्याचे ऐकिवात आले आहे. 
पाच वर्षात १०० शहरांना 'स्मार्ट सिटी' करण्याचा संकल्प सुटलेला आहे.  प्राथमिक आरोग्य, सुविधा यांना दुर्लक्षून शहरांचा कायापालट करण्याच्या सरकारच्या कार्यक्रमाचे स्वागत करावे की त्यावर उपहासाने हसावे हेच कळेनासे झाले आहे. कोर्टाच्या रस्त्यावर सार्वजनिक सण साजरे न करण्याच्या आदेशाने अनेक राजकीय रथी-महारथींना पोटशूळ उठला आहे. त्यात मग नमाजाच्या वेळचे भोंगे विरुद्ध सणाच्या वेळी लाउड स्पीकर वर ठणाणणारी  गाणी असे डिबेट रंगते आहे. त्यातून वेगवेगळ्या राजकीय वादांना उधाण आले आहे. जो तो एकमेकांच्या राजकीय कारकीर्दीवर जमेल तसे शरसंधान करतो आहे. येनकेन प्रकारेन दुसऱ्या पक्षाची प्रतिमा मलिन करणे हा जणू प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क असल्यासारखा जो तो वावरतो आहे. यातून आणखी नवनवे वाद उपस्थित होत आहेत. अशी ही राज्य व्यवस्थेची वाटचाल सुरु आहे. यातून जनकल्याणाची कोणती विकासकामे होण्याची शक्यता आहे हे तो जगनियंता तरी सांगू शकेल याची शक्यता जवळजवळ शून्यच  आहे.            
त्यामुळे यापुढे सत्तेवर कोणतेही सरकार असो, ते सरकार आपल्याला 'सुशासन' द्यायला बांधील आहे असा कृपया कोणी गैरसमज करून घेऊ नये.
             

No comments:

Post a Comment