Saturday, 4 July 2015

……… त्याच्या पियानोत 'लता' आहे


सुरांच्या साम्राज्यातील लता हे निर्विवाद आणि अंतिम सत्य मानलं तर होय ब्रायनच्या पियानोत लताचा वास आहे. म्हणजेच स्वरमाधुर्य आहे, सुरांवर असीम निष्ठा आहे, दोन शब्दांमधील अंतरात सौष्ठव आहे, लयीवर हुकमत आहे, गाण्यात अंतरात्मा आहे. जशी लता भावनेने ओथंबून गाते  तद्वत ब्रायनचा पियानोही गातो. दोन सुरांमधील आणि शब्दांमधील ठहरावाची त्याची भाषा आपल्याला अंतर्मुख करते. तहानभूक हरपून हातात घेतलेलं हे वाद्य आज अनेक अजरामर रचनांचा पुन:प्रत्यय आपल्याला आणून देत आहे.           
 दिलकी गिरह खोल दो, जाने क्या ढूंढती रहती है, धीरे धीरे मचल, कही दीप जले कही दिल, प्यार हुआ इकरार हुआ, जारे उड़ जा रे पंछी, रहे न रहे हम अशी एक ना अनेक गाणी आज ब्रायनच्या पियानोच्या मुशीतून बाहेर येऊन श्रोत्यांवर मोहिनी घालत आहेत. गाण्याचं कोणतही प्राथमिक शिक्षण नसताना त्याने त्याच्या आतील सुरांचा दिवा परिश्रमाने घासूनपुसून लख्ख केला आणि आपल्याभोवतीचा परिसर सुरांनी उजळवला. एखाद्या लाटेवर अलगद तरंग उमटावेत त्याप्रमाणे त्याच्या पियानोवर सुरांचे नानाविध तरंग उमटतात आणि रसिकांची मने काबीज करतात. त्याची बोटे अव्याहतपणे सगळ्या सप्तकांमध्ये लीलया संचार करतात आणि त्यातून चित्रपट संगीताचा इतिहास जिवंत होतो.           
वास्तविक पाहता पियानो हे वाद्य continuity म्हणजेच अखंडतेच्या दृष्टीने वाजवायला अवघड. परत गाणे वाजवायचे म्हणजे त्यातील मर्म नेमके पकडता आले पाहिजे. त्यातील ठराविक जागा beautify करता यायला हव्यात. त्यात चित्रपट संगीत म्हणजे लोक वर्षानुवर्षे ज्या गाण्यांवर जगत आले आहेत त्या गाण्यांतील गोडवा तसाच्या तसा श्रोतृमनात प्रतिबिंबित झाला पाहिजे. नुसती ध्रुवपद आणि कडवी नव्हेत तर interlude म्हणजे दोन कडव्यांमधील संगीतही लोकांना पाठ असते. ते तसेच्या तसे सादर झाले नाही तर असा कलाकार रसिकांना अपील होण्याची शक्यता कमी असते. परंतु ब्रायन सारखा कलाकार केवळ एवढ्यावरच थांबत नाही तर काही स्वरांवरील त्याने वाजवलेल्या बारीक, सूक्ष्म हरकती सुद्धा लाजबाब असतात. गाण्यातील मर्म त्याच्या पियानोने अचूक पकडलेले असते.        
ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांनी ब्रायनला दिलेली शाब्दिक पावती फार बोलकी आहे. ते म्हणाले, 'आपने तो मेरे गाने की रुह ही पकड ली'. जे काही माझ्या गाण्यात  द्यायचं राहून गेलं होतं तेही ते आपण अचूक वेधलत आणि गाण्याला चार चांद लावलेत. तसे ब्रायन फारसे बोलके नसावेत. जे काही बोलायचं आहे ते ते पियानोच्या माध्यमातून बोलतात. चेहऱ्यावर विशिष्ट अदब, नम्रता. सुरांशी तद्रूप होऊन गाणे वाजवणे हा त्यांचा धर्म आहे. मी वाजवताना बघा कशी चमत्कृती करतो आहे असा फाजील अविर्भाव त्यांच्या देहबोलीत औषधालाही नसतो. आपलं सुरांशी, संगीताशी नातं किती घनिष्ठ आहे हे त्यांचा पियानोच सांगत असतो. रसिकांनी दिलेली दाद ते काहीसे संकोचून अदबशीरपणे स्वीकारताना दिसून येतात.              
गाणी प्रेमाची असोत वा विरहाची, आनंदाची असोत वा दु:खाची ब्रायन त्यांना तितक्याच उत्तम रीतीने, त्यातील सौदर्य समजून सादर करतात. देशाविदेशात  ब्रायनने  पियानोला लताच्या, आशाच्या, रफीच्या, मुकेशच्या, किशोरच्या आवाजात गातं  केलं आहे. एखाद्या चित्रकाराच्या कुंचल्यातून सहस्त्र रंगांची उधळण व्हावी तशी ब्रायनच्या पियानोतून सुरांची उधळण होत असते.  लताने गाण्याच्या माध्यमातून तमाम रसिकांवर जे सुरांचे लोभस वार केले आणि लाखोंच्या आयुष्याची सुरावट बदलून टाकली तसेच लोभस वार ब्रायनही आपल्या पियानोतून रसिकमनावर चिरकाल करत राहोत हीच सदिच्छा!  


No comments:

Post a Comment