Friday, 3 July 2015

भावनिक IQ - एक भले मोठे शून्य


बसने दिलेल्या धडकेत दोन तरुणी भीषण अवस्थेत रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. मात्र आजूबाजूचा जमाव त्यांना तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याऐवजी त्यांचे मोबाईल शूट करण्यात गुंतला होता. अतिशय संवेदनाहीन, निरुपयोगी, माणुसकी  हरवलेल्या गर्दीचा चेहरा या निमित्ताने सगळ्यांनीच अनुभवला. त्या मरणासन्न अवस्थेत पडलेल्या तरुणींमध्ये आपली जिवाभावाची एखादी व्यक्ती असती तर आपण असेच बघ्याची भूमिका बजावत राहिलो असतो का असा प्रश्न सुद्धा त्या गर्दीतील एखाद्याच्या मनाला शिवू नये हे नक्की कशाचे द्योतक आहे? आपण बौद्धिक आणि यांत्रिक दृष्ट्या पुढारलेले आणि भावनिक, नैतिक दृष्ट्या मागासलेले झालो आहोत का हे प्रत्येकाने तपासून घेणे अत्यावश्यक आहे. हातात मोबाइल असलेले आपण सर्व त्या यंत्राचाच आधार अशा वेळी  डावलतो आहोत का? ज्या रस्त्यावर पडल्या आहेत त्या तर आपल्या कुणीच नाहीत मग उगाच हा खटाटोप का करायचा आणि पोलिसांचा ससेमिरा हकनाक मागे का लावून घ्यायचा अशासारख्या विचारांनी आपण घेरले गेले आहोत का? मोबाइलवर ही भीषण दृश्ये चित्रित करून आपण काय मिळवणार?  भावनेचा लेशही नसलेली अशी आपण माणसं आहोत का? या आणि अशा प्रश्नांची उत्तरे मिळवायची वेळ आता नक्कीच आली आहे.    
भावना नावाची व्यक्तीच्या अंत:करणात स्त्रवत असलेली गोष्ट समूळ नष्ट झाली आहे का अशी शंका यावी अशी ही वर्तणूक आहे. कोंबड्यांची अथवा रेड्यांची रक्तबंबाळ होईपर्यंतची झुंज enjoy करण्याची मानसिकता ही अशीच निषेधार्ह आहे. अपंग मुलीवर आपल्या डोळ्यांदेखत बलात्कार होत असताना त्या गुन्हेगारापेक्षा अधिक संख्येने तिथे उपस्थित असलेली माणसे सुद्धा त्याला विरोध करू शकत नाहीत आणि आमच्याही वासना उद्दीपित होतील म्हणून आम्ही त्याला प्रतिकार करायला गेलो नाही असा अतिशय अधम पातळीवर स्वत:चा बचाव करू पाहतात हे धिक्कारार्ह आहे. मुळातच बघ्यांची भूमिका घेणे हा एक कलमी कार्यक्रम अशावेळी सर्वजण निष्ठेने निभावताना आढळतात.  
दमलेल्या बाबांची कहाणी तर सर्वश्रुत आहे पण दमलेल्या आईची कहाणी ऐकून किंवा प्रत्यक्ष अनुभवून तिची मनापासून सेवा करणारे हाताच्या बोटांवर मोजण्या इतपत तरी आहेत का? इथे भाषा लागते ती भावनेची. एखाद्याला वेदना होते आहे हे पाहूनही ज्याच्यात समानुभूतीची भावना उत्पन्नच होत नाही तो स्वत:ला माणूस कसा म्हणू शकतो? शिकून सवरून मोठे होऊन गलेलठ्ठ पगार घेणे आणि स्वत:ला यांत्रिकतेत बंदिस्त करून घेणे एवढेच आयुष्याचे संकुचित ध्येय राहिले आहे काय? याला आधुनिकता म्हणतात का? लहानपणी शाळेत शिकत असताना वाचलेल्या सुविचारांवर आज परिवर्तनाची इतकी धूळ साचली आहे की त्यामागील अक्षरेच आज धुसर झाली आहेत. शेजारच्या ब्लॉक मध्ये खून का पडेना आपल्याला काय त्याचे या विचारांनी भारलेली पिढी निर्माण झाली आहे का या भीतीने मनात चर्र झाल्याशिवाय राहत नाही.      
तसं बघायला गेलं तर आजचं शिक्षण हे 'money based' आहे , 'value based' नाही असे खेदाने म्हणावसे वाटते. झाडाची आभाळाकडे झेपावणारी फांदी झाडाच्या मुळाचे महत्व विसरू शकेल काय? Moral education नावाचा एक विषय पूर्वी शालेय अभ्याक्रमात असे.  आज त्याचे उच्चाटन झाले आहे की काय न कळे. मुके प्राणी, वृक्षवल्ली आणि आपल्यासारखी दिसणारी भोवतालची माणसे यांच्याप्रती भूतदया आणि कणव दाखवावी असे आपले कोणे एकेकाळी संत सज्जन सांगून गेले. त्यांचे विचार आम्ही चित्रपटात बघितले, पुस्तकात वाचले, अभ्यासक्रमात काही मार्कांसाठी आहेत  म्हणून अभ्यासले पण आचरले मात्र मुळ्ळीच नाही. दुसऱ्याची वेदना आपल्यातील भावनेची मुळे गदगदा हलवू शकत  नाही. अमक्या  ठिकाणी झालेल्या अपघातात इतके ठार असे आपण सहजगत्या म्हणू शकतो. रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जीवाची वेदना आपल्या डोळ्यांच्या कडा पाणावू शकत नाही. आपल्यातील माणुसकीच्या लोपलेल्या जाणीवेला आर्त साद घालू शकत नाही.             
'तू प्यार का सागर है,  तेरे इक बूंद के प्यासे हम' ही प्रार्थना ऐकल्यावर वाटत की खरंच त्या परमेश्वराच्या अंतरात पाझरणाऱ्या मायेच्या समुद्राचा एक थेंब तरी आपल्यात आज शिल्लक आहे का? आपण त्याचीच लेकरे आहोत ना? मग ही माया , ही ममता आपण कुणावर निछावर करण्यासाठी राखून ठेवली आहे? कुणाच्याही जखमेवर फुंकर घालण्याची क्षमता आपल्यात नाही का? कुणाच्या वेदनेवर ममतेची मलमपट्टी करण्याची ताकद आपल्यात नाही का? अहस्य वेदनेने, दु:खाने कुणी कळवळत असता त्याला तातडीने उपचारासाठी आपण शुश्रुषालयात घेऊन जाणे हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे असे समजत नाही का? उद्या हीच वेळ आपल्यावर आल्यास किंवा आपल्या जवळच्या कुणावर आल्यास आपण असेच उदासीन राहू शकू का? ही भावनिक, नैतिक बधिरता आपल्या माणूसपणाच्या अध:पतनाची पहिली पायरी नव्हे का? आपण इतके मेलेले आहोत का की कुणाची प्राणांतिक हाक सुद्धा आपल्यातील माणसाला जिवंत करू शकत नाही? आपल्यातील भावनेचा, असीम प्रेमाचा झरा वाहता करू शकत नाही?      
पैसा हे केवळ चरितार्थाचे साधन, प्रतिष्ठा हे शो ऑफ करण्याचे साधन आहे पण मनात रुजलेली माणुसकीची भावना हा या पृथ्वीतलावरील आपण माणूस असल्याचा आणि या देशाचे महत्तम नागरिक असल्याचा एक सबळ पुरावा आहे हे विसरून चालणार नाही. 

No comments:

Post a Comment