आदरणीय श्री.शिरीष कणेकर यांस
तुमचं चारशेच्या वर पृष्ठसंख्या असलेलं 'मी माझं मला' हे प्रदीर्घ आत्मचरित्र वाचलं. बऱ्याच वर्षांनंतर एवढं मोठं पुस्तक वाचण्यासाठी म्हणून हातात धरलं. आजवर मी तुमची अनेक पुस्तके वाचली आहेत.( विकत घेऊन ) पण मला हे पुस्तक सौ. नंदिनी गोखले यांच्याकडून भेट मिळालं ही खास बाब आहे. माझा व्यवसाय आणि प्रापंचिक जबाबदाऱ्या (तुमच्या भाषेत त्या शिंच्या असतातच पाचवीला पुजलेल्या ) सांभाळून मी हे पुस्तक वाचून पूर्ण केलं. लेखनाची भट्टी छान जमली आहे. ( तशी तुमची नेहमीच जमते ) सगळ्या खऱ्या गोष्टी तुम्ही पुस्तकात समाविष्ट केल्या नाहीत तरी जे लिहिलं गेलं आहे ते सत्य आहे असं मानल्यास तुम्ही खूप काही लहानपणीच गमावलेलं आहे हे कबूल पण नंतर मात्र खूप काही कमावलेलही आहे याची जाणीव हे पुस्तक करून देतं.
तुम्ही विकसित केलेली 'कणेकरी शैली' खुमासदार आहे. एखाद्या प्रसंगातील बोलकं लघुभाष्य, त्या परिस्थितीतही सुचलेला विनोद,त्या विशिष्ट प्रसंगाला लाभलेली कारुण्याची झालर,काही प्रसंगांत माणसांच्या स्वभावामुळे,वर्तनामुळे त्यांच्याविषयी मनात निर्माण झालेला कडवटपणा आणि त्यातून जन्मलेलं उपरोधिक भाष्य या सगळ्या भावभावनांची सरमिसळ म्हणजे हे आत्मचरित्रपर लेखन आहे असे म्हणायला हरकत नसावी.
या पुस्तकातील काही प्रकारणे (लोकांची नव्हे ) अगोदर माझ्या वाचनात आलेली आहेत. काल्पनिक प्रकाशक कोठावळे यांच्या काल्पनिक भाच्याने तुम्हाला 'मामा ' बनविणे, लेखकाचा ऑटोग्राफ मागून मग त्याचे नाव विचारणे, advertising agency मधील लतादीदींच्या CD प्रकाशनाच्या वेळचा प्रसंग आणि असे अनेक प्रसंग तुमच्या खास शैलीत वाचायला जाम आवडले. 'पॉप्युलर' कडे तुमची सगळी ठेव बुडाल्यानंतर देखील तुम्ही जो काही प्रसंग वर्णन केला आहे त्यात पैसे बुडाल्याचे शल्य आहेच पण 'ह्या माणसांनी असेच परस्परांचे पैसे देऊन टाकावे' या कारखानिसांच्या वाक्यानंतर त्या परिस्थितीतही हसू आल्याशिवाय राहत नाही.
जेव्हा क्रिकेटचं चालतंबोलतं तंत्र सुनील गावसकर तुमच्या घरी जेवायला येत होता तेव्हा तुमच्या मुलाने जिन्यातच त्याला विचारले, ए सुनील गावसकर तुझे दात पाडू का ? त्यावर त्यानेही तितक्याच सहजतेने 'नको. राहू देत. जेवताना उपयोगी पडतील.' हे जे हजरजबाबीपणे उत्तर दिले तेही वाचताना मजा आली. एरवी ही छोटी मुले मोठ्यांना अतिशय निरागसपणे क्लीन बोल्ड करतात. यथावकाश अमर कणेकर हा डॉक्टर झालाच पण डेंटल सर्जन झाला असता तर 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात' ही म्हण त्याने खरी केली असती. प्रत्येक भारतीयाच्या मनात गायिका म्हणून जिचे अग्रगण्य स्थान आहे त्या लतादीदी तुमच्या घरी जेवायला आल्या, त्यांनी खिमा पटीस परत मागून घेतले आणि चक्क 'निगाहे मिलानेको जी चाहता हैं' हे आशाचं गाणं गुणगुणलं असं अनमोल भाग्य किती जणांच्या वाट्याला आलं आहे?
सिनेसृष्टीतील अनेक चेहऱ्यांना,मुखवट्यांना तुम्ही जवळून पाहिलंत. त्यांचा खरेपणा-खोटेपणा-भपका तुम्हाला अनुभवायला मिळाला. त्यातील काहींच्या मनातील सच्चेपणाला तुम्ही स्पर्श केलात, काहींशी मैत्री जोपासलीत. ज्येष्ठ नटी शशिकला यांनी अभिनेते प्राण यांच्या संदर्भात 'थरो जंटलमन' ची केलेली व्याख्या ऐकून तुम्ही अंतर्बाह्य थरारलात. अभिनेते मनोजकुमार(?) आणि अशोककुमार यांच्या एका चित्रपटातील प्रसंग मात्र डोळ्यांत पाणी आणेपर्यंत हसवून गेला. अशोककुमारचे पाय लुळे पडतात. मुंबईत काही केल्या डॉक्टर मिळत नाही. (बहुतेक सगळे ग्रामीण भागात दवाखाने उघडून असतात ) मनोजकुमार तिरका शिडीसारखा उभा राहतो आणि रेडिओ लावतो. रेडिओवर 'कदम कदम बढाये जा' हे गाणे सुरु होते आणि या गाण्यापासून स्फूर्ती घेऊन अशोककुमार त्याचे पाय ड्रील केल्यासारखे हलवू लागतो. हा प्रसंग 'परलिसिस' वर उपचार करणाऱ्या समस्त डॉक्टरांनी जरूर वाचवा. मनोरंजन तर होईलच पण त्यातून त्यांना संशोधनाची नवी दिशाही मिळू शकेल.
तुम्ही अनुभवलेला न्यूयॉर्क पासून जवळ असलेल्या तुम्ही राहत असलेल्या एका गावातील दिवे गेल्यानंतरचा प्रसंग अंगावर काटा आणतो. वैज्ञानिक,तांत्रिक,आर्थिक दृष्ट्या प्रगत असलेल्या देशातही असे जीवघेण्या थंडीत घाम फुटायला लावणारे प्रसंग घडू शकतात याचं प्रत्यंतर आलं. शिवाय शेजारधर्म तिथे औषधालाही नसल्याने अडचणीत सापडलेल्या माणसासाठी फक्त आणि फक्त त्याची पूर्वपुण्याईच कामाला येऊ शकते याची खात्री पटते. अशावेळेस आपल्या देशाची, येथील माणसांची आणि शेजारधर्माची किंमत आपल्याला कळते.
तुमचा 'कट्टा ग्रुप' देखील मनाला खूप भावाला. तुमच्या अनेक मिश्किल, धम्माल, हळव्या आठवणी त्या शिवाजीपार्कच्या कट्ट्याशी निगडीत आहेत. तुमच्या बऱ्याच मित्रांना तुम्ही लेखक आहात याचा पत्ताही नाही हे ऐकून मजा वाटली. आज यातील अनेक मित्र हे जग सोडून गेल्याचं दु:ख आहे, कुणाशी बिनसल्याची खंत आहे. पण डोळे ओले करणाऱ्या या सुगंधित आठवणींची शिदोरी हे तुमचे वैभव तुमच्यापाशी आहे.
एकपात्री प्रयोगाच्या निमित्ताने अकरा वेळा केलेले अमेरिकेचे दौरे, अवघा महाराष्ट्र पिंजून काढणारे दौरे आणि स्वदेशी व परदेशी प्रेक्षकांनी तुमच्या कार्यक्रमाला मनमुराद हसून दिलेला प्रतिसाद ही तुमच्या मर्मबंधातील ठेव असावी असे मानायला हरकत नाही. 'कुछ पानेके लिए कुछ खोना पडता है' हे सूत्र जवळजवळ प्रत्येकाच्याच आयुष्याला applicable आहे. तेव्हा आतातरी जुनी मढी उकरू नका कारण तुमच्याच शब्दात फक्त दु:खाचेच सांगाडे हाती लागतील. असो.
तुम्ही सिटीलाईटला 'ठाकूर आणि मंडळी' यांच्याकडे लाडू खात खात गप्पा मारता हे मला विश्वसनीय सूत्रांकडून कळले आहे. माझे माहेरही तिथलेच आहे. त्यामुळे कधी आपल्या भेटीचा योग आला तर मला खूप आवडेल आपल्याला भेटायला.
असेच लेखानाधीन होऊन लिहित जा आणि लिखाणातून वाचकांना भरपूर आनंद देत जा. ( कारण 'आनंद' नावाचा शब्द आताशा आपल्या जीवनातून हद्दपार होतो आहे की काय अशी भीती वाटू लागली आहे )
No comments:
Post a Comment